माणसांना नव्या साधनांच्या आधारे नव्या क्ल्पृत्यांच्या आधारे दिसून येणारी जातीआधारित भयानक व दुष्ट प्रवृत्ती यावर प्राचीनतेचा आधार घेऊन वर्तमान स्थितीला सहजपणे वास्तविकपणे मांडण्यात गिरीश कर्नाड यशस्वी झाले. त्यांची कलासाधना हे भारतीय रंगभूमीवरील एक युग म्हणून ओळखले जाईल.
पद्मश्री, पद्मभूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि ज्ञानपीठ पुरस्कारांनी सन्मानित झालेले तसेच लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक अशी ओळख जगाला असलेले व्यक्तिमत्व गिरीश कार्नाड यांचे सोमवारी सकाळी दुःखद निधन झाले. भारतीय साहित्य, संस्कृती आणि चित्रपटांच्या प्रचलित संकल्पना आणि प्रमाणे या सर्व बाबींना नव्या अंगाने व दूरदृष्टीने बघणारे, नव्या संकल्पना तितक्याच प्रभावी व प्रगल्भपणे सर्वांसमोर विविध कलाविष्कारांच्या माध्यमातून मांडणारे परिपूर्ण व्यक्तिमत्व म्हणून गिरीश कार्नाड यांची संपूर्ण साहित्य विश्वाला ओळख आहे. म्हणूनच, त्यांच्या दुःखद निधनाची बातमी कळताच जगभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे; तसेच, त्यांनी त्यांच्या साहित्यातून उभे केले नवे आयाम, निकष, प्रमाण त्याचबरोबर संस्कृतीची जगापुढे मांडलेली नवी अंगे व स्वरूपे या सर्व बाबींचा आढावा घेतला जात आहे. अगदी सरळ सांगायचे म्हणजे गिरीश कार्नाड यांच्या निधनामुळे भारतीय साहित्य व संस्कृतीचे एक प्रभावी पथदर्शी युग आज काळाच्या पडद्याआड गेले आहे.
सर्वार्थाने विचार करता, भारतीय नाटक, साहित्य, संगीत, इत्यादी क्षेत्रांना अनेकानी त्यांच्या योगदानाने ‘सुपीक’ बनवले आहे; या सर्व वल्लीमध्ये गिरीश कार्नाड यांचे योगदान मैलाचा दगड ठरते. १९३८ साली महाराष्ट्रातील ‘माथेरान’ येथे जन्मलेल्या गिरीश कार्नाडांच्या आयुष्याचा मोठा काळ कर्नाटकातील ‘शिरसी’ आणि ‘धारवाड’ या ठिकाणी गेला. या काळात ‘नाटक मंडळी’ व ‘रंगभूमी समूह’ यांनी सादर केलेली नाटके त्यांना बालपणातच पाहता आली. यातूनच गिरीश कार्नाड यांना रंगभूमीबद्दल आकर्षण आणि गोडी निर्माण झाली. बालपणात निर्माण झालेल्या रंगभूमीबद्दलच्या आकर्षणातूनच कन्नड नाट्य क्षितिजावर ‘ययाती’, ‘तुघलक’, ‘हयवदन’ या सारख्या दहापेक्षा अधिक अजरामर नाट्यकृतींची निर्मिती होऊन कन्नड रंगभूमीच्या आधुनिक पर्वाची पहाट उजाडली. गिरीश कार्नाडांनी कन्नड भाषेतून नाटके लिहून इंग्रजीसह अनेक भाषांमधून भाषांतरित केली. ज्या काळात कार्नाड कन्नडमधून नाटके लिहायला लागले, त्या दरम्यान समकालीन कालखंडातील आधुनिक माणूस अनेक प्रश्नांनी ग्रासलेला होता. त्याच्या भोवताली घडत असलेल्या घटना, जीवनाचे अर्थहीन अंग यांचे वास्तववादी अंग साहित्यातून व्यक्त झाले पाहिजे व पारंपरिक साहित्य तसे करण्यास असमर्थ ठरते असा आरोप केला जात होता.
कन्नड रंगभूमीला आधुनिकतेचे स्वरूप देण्याचे श्रेय कार्नाडांबरोबरच आद्य रंगाचार्य यांना जाते. आद्य रंगाचार्य यांनी केलेले रंगभूमीवरील प्रयोग कर्नाड, लंकेश आणि चंद्रशेखर पाटील यांनी स्वीकारले. कार्नाडांनी भूतकाळ आणि वर्तमान काळातील मिथकांच्या तुलनेतून निर्माण झालेल्या तणावाला स्पर्श करणारी नाटके लिहून कन्नड रंगभूमीच्या परंपरेला एक नवे वळण दिले. यातूनच म्हणून गिरीश कार्नाडांची ओळख निर्माण झाली. एक बाब निदर्शनास येते ती म्हणजे, जरी गिरीश कार्नाड परंपरा, मिथके आणि आधुनिक व प्राचीन इतिहास या विषयांना ठळकपणे स्पर्श करीत असले तरी देखील या सर्व विषयांना राजकीय स्पर्श असलेला दिसून येतो. त्याचबरोबर, कार्नाड त्यांच्या नाटकातून प्राचीन परंपरेच्या तुलनेत आधुनिक मानवी परिस्थितीसोबतच समकालीन विशिष्ठ सामाजिक व राजकीय परिस्थितीवर भाष्य करत होते. या विषयांना हात घालताना कार्नाडांचे प्रत्येक नाटक जुन्या व प्रचलित लिखाणाच्या प्रघाताना ओलांडून नाटकाचे नवे निकष आणि नवी ओळख निर्माण करते. त्यामुळेच ‘ययाती’मधील त्याग, ‘द फायर अँड द रेन’ मधील मिथके, ‘तुघलक’ व ‘द ड्रीम ऑफ टिपू सुलतान’ यामधून वर्णन केलेला इतिहास, ‘नागमंडला’ या नाटकांतून केलेले प्राचीन संस्कृतीचे वर्णन आणि ‘अंजु मल्लिगे’ या नाटकातून मांडलेले समकालिन जीवनाचे दर्शन करोडो साहित्य प्रेमींनी हृदयात साठविले व कार्नाडांच्या साहित्यकृतीवर यामुळेच ते जीवापाड प्रेम करू लागले.
काळाच्या ओघात इतिहासाचे, मिथकांचे, परंपरागत कथांचे, विचारांचे आणि एकंदरीत जीवन जगण्याचे संदर्भ समकालीन स्वरूपात बदलले जातात असा अनुभव सगळीकडेच आहे. काळाच्या ओघात संवाद केला जातो; या संवादात आधुनिक पिढी वेळोवेळी नव्या समीकरणाची आणि परिमाणांची मांडणी करण्याची मागणी करताना दिसून येते. त्यामुळेच काही नवे प्रश्न निर्माण होतात. या सर्व प्रक्रियेमध्ये एखादी घटना ‘केव्हा’ घडली आणि नक्की ‘काय’ घडले याचा सर्वकष आढावा घेण्याची प्रथा आणि प्रवृत्तीदेखील आढळून येते; त्याचबरोबर, जेव्हा मिथके आणि पिढीजात परंपरा यांचा विचार केला जातो तेव्हा ती घटना ‘कुठे’ घडली हे अधिक महत्त्वाचे ठरते. आधुनिक काळात या बाबींना हाताळताना अशी विचारसरणी दिसून येते; म्हणूनच गिरीश कार्नाड जेव्हा असे विषय हाताळतात तेव्हा त्यांच्या कलेचे सौंदर्य वाचकांच्या नजरेस येते. कारण या विषयांना खूपच अचूकतेने व सुरसतेने मांडून कर्नाडांनी त्याच्या सर्वच कलाकृतींना लालित्याचे कोंदण दिलेले आढळते. ते हा विषय इतक्या सहजतेने मांडताना दिसले की त्यामध्ये नैसर्गिक गोडी निर्माण होऊन प्राचीन परंपरागत विचार आणि काळाच्या ओघात पुढे येत असलेला नवा विचार या दोन अटीतटीच्या विचार प्रवाहात दुहेरी विचारप्रवाहांचा सांभाळताना त्यांनी निवडलेल्या इतिहास आणि प्राचीन परंपरा यांच्याशी संबंधित विषयांना ते वेगळ्या अंगाने न्याय देताना दिसतात.
मात्र, हा प्रवास गिरीश कार्नाडांच्या नाटकात इथेच थांबत नाही. वर्णन करणे आणि साधी सोपी बाब सांगून थांबणे, ते गिरीश कार्नाड कसले! एकीकडे इतिहासाची पाने उलगडायची आणि त्यातील राजकारणातून होत असलेल्या वाईट बाबींवर हळूच भाष्य करून आसूड ओढायचा ही कला त्यांच्याकडे होती. त्यामुळेच संस्कृती खोदणारा व चुकीच्या बाबींचा कणखर निषेध करणारा नाटककार म्हणून ही त्यांची ओळख नाकारता येत नाही.
इतिहासावर आधारित नाटकांमधून गिरीश कार्नाडांनी स्वतःचे वेगळेपण जपले. ‘टेल तांडा’, ‘ड्रीम ऑफ टिपू सुलतान’ आणि ‘तुगलक’ या इतिहासाशी संबंधित नाटकांमधील त्यांनी वर्णन केलेलं क्षेत्र व काळ या आधारित परीघ जपला. ‘हयवदन’ या नाटकाचे कथानक बाराव्या शतकातील आहे; ‘तुघलक’ या नाटकाचे कथानक मुघलांच्या चौदाव्या शतकातील कालखंडाचे आहे; आणि, ‘द ड्रीम ऑफ टिपू सुलतान’ या नाटकाचे कथानक अठराव्या शतकात घडते. या तिन्ही नाटकांतून गिरीश कार्नाड यांनी तीन वेगवेगळ्या इतिहासाच्या टप्प्यांचे कालखंड हाताळले आहेत. यामध्ये ‘तुघलक’ या नाटकात दिल्ली आणि दौलताबादमधील आणि ‘द ड्रीम ऑफ टिपू सुलतान’ या नाटकात श्रीरंगपट्टनम या क्षेत्रांचा अभ्यास आणि वर्णन नाटकात आढळते. या विषयांना आणि ठिकाणांना हाताळत असताना गिरीश कार्नाड परिस्थितीचा संदर्भ ठेवत त्यातील समकालीन लालित्य प्रकर्षाने वाचकांपुढे आणण्यात यशस्वी ठरले. ‘नागमंडल’ आणि ‘अग्नी मत्तू माले’ या नाटकांमधून देखील त्यांनी हाती घेतलेल्या विषयाला काळाच्या ओघात चपखलपणे बसवले. समीक्षकांच्या मते या गोष्टीत यशस्वी होण्यासाठी गिरीश कार्नाड यांनी कायमच काळाच्या पुढे जाऊन लिखाणाचा विचार केला. त्या काळातील मिथकांचा, परंपरांचा तात्कालिक संदर्भ जपला; पण काळाच्याही पुढे जाऊन त्याचे समकालीन व भविष्यकालीन संदर्भ अतिशय जबाबदारीने लिखाणातून प्रसिद्ध केले.
मिथकांचा आणि परंपरांचा वापर गिरीश कार्नाड यांनी लिखाणाची एक तांत्रिक तृप्ती म्हणून उपयोगात आणला, असे मत मीनाक्षी मुखर्जी नावाच्या समीक्षेने मांडले. कारण, गिरीश कार्नाड यांचे सोबत अनेक आधुनिक लेखक समकालीन कालखंडातील सर्वसामान्य माणसाची दयनीय स्थिती व जीवनाकडे जीवनाकडे बघण्याचा निराशावादी दृष्टिकोण याच्यावरती भाष्य करण्यासाठी करण्यासाठी प्राचीन घटनांचा आधार घेताना दिसून आले आहे. गिरीश कार्नाड याला अपवाद नाहीत. एकीकडे प्राचीन परंपरांना उलगडताना इतिहासाचा व संस्कृतीतील मिथकांचा अनादर न करता त्याचे पावित्र्य जपत दुसरीकडे आधुनिक कालखंडातील माणसांपुढे दैनंदिन जीवन जगताना होणारा प्रचंड संघर्ष, मनाची घालमेल आणि त्यातून होणारे वैयक्तिक, सामाजिक आणि राजकीय पातळीवरचे संघर्ष यांचे प्रखर वर्णन गिरीश कार्नाडांनी त्यांच्या नाटकांतून यशस्वीपणे केलेले आहे. होय, गिरीश कर्नाड मिथकांचा आणि प्राचीन परंपरांचा लिखाणामध्ये वारंवार उलगडतात. मात्र, या मिथकांना आणि प्रथा-परंपरांना नव्या अर्थाने संबोधताना त्यांनी संस्कृतीची नवी साधने, संस्कृतीचे नवे संदर्भ, जीवन मानाचे उलगडणारे विविध टप्पे आणि त्यातून भविष्यकाळाच्या मांडता येणाऱ्या आशा यावर प्रखरपणे भाष्य केले आहे. गिरीश कार्नाड यांच्या रूपाने कन्नड रंगभूमी समृद्ध झालीच; पण त्याचबरोबर भाषेचा संदर्भ ओलांडून जगभरातील विविध भाषांमध्ये कार्नाड यांच्या नाटकांचे भाषांतर होऊन ही नाटके जगभर पोहोचल्याने आधुनिक व उत्तर आधुनिक कालखंडात सर्वसामान्य माणसाची, समाजधुरिणांची, राज्यकर्त्यांची होणारी फरफट आणि त्यातून जे सर्वसामान्य आहेत या माणसांना नव्या साधनांच्या आधारे नव्या क्ल्पृत्यांच्या आधारे दिसून येणारी जातीआधारित भयानक व दुष्ट प्रवृत्ती यावर प्राचीनतेचा आधार घेऊन वर्तमान स्थितीला सहजपणे वास्तविकपणे मांडण्यात गिरीश कर्नाड यशस्वी झाले. त्यामुळेच आज ते एक शतप्रतिशत लेखक आणि त्याचबरोबर भारतीय रंगभूमीवरील एक युग म्हणून ओळखले जातात.
त्यांची नाटके या समाजाला नवी दिशा व शिकवण देतात, ही बाब आपण सर्वजणच मान्य करतो आणि म्हणूनच जगभरातील करोडो लोक त्यांच्या निधनाने आज हळहळ व्यक्त करीत आहेत. गिरीश कार्नाडांच्या साहित्यकृतीतून त्यांनी व्यक्त केलेले विचार, हाताळलेले विषय आणि त्यातून दिलेले भविष्यकाळाचे संदर्भ केवळ वाचण्यापुरते मर्यादित न ठेवता त्या संदर्भांना समाजातील सर्व घटकांना पुढे घेऊन जाण्यासाठी आपण दैनंदिन आयुष्यामध्ये कसे आणू शकतो शकतो, हा विचार सर्वांनी केल्यास एक आदर्श समाजाची निर्मिती होईल, आणि हीच सर्वार्थाने गिरीश कार्नाडांना खरी आदरांजली ठरेल; कारण, कुठल्याही समाजातील साहित्य हे त्या समाजाच्या विचाराचे, मताचे आणि घटनांचे प्रतिबिंब असते.
प्रा. डॉ. दीपक ननवरे, सोलापूर येथे दयानंद वाणिज्य महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक आहेत.
COMMENTS