जैविक संपदेचे १०० मारेकरी?

जैविक संपदेचे १०० मारेकरी?

• जगातल्या केवळ १०० कंपन्यांकडून ७१% हरितगृह वायूचे उत्सर्जन. • या नकाशात कंपन्यांची नावे, त्यांची ठिकाणे व सीईओ यांचा उल्लेख. • १०० सीईओंच्या नजरेत हवामान बदल हा फारसा गंभीर विषय नसला तरी या मंडळींची नावे घेणे व त्यांचा ढोंगीपणा उघडकीस आणणे हे जैविक संपदा वाचवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरू शकते. देशाचा आकार जेवढा मोठा तेवढे कर्ब वायू उत्सर्जनाचे प्रमाण अधिक - असे उत्सर्जन औद्योगिक क्रांतीपासून सुरू आहे ते आजही कायम आहे.

तुम्ही बाजारहाट करायला जाताना प्लास्टिकची नव्हे तर कापडी किंवा ज्याचा पुनर्वापर होईल अशी पिशवी घेऊन जाता का? दात घासताना वॉश बेसिनचा नळ बंद करता का? तसे करत असाल तर या सवयी चांगल्या आहेत. पण आपल्याला पृथ्वी वाचवायची असेल, तिला जगवायचे असेल तर यापेक्षा वेगळी पावले, योग्यदिशेने उचलावी लागतील.

काही दिवसांपूर्वी पृथ्वीच्या जैविक संपदेचा वेगाने होत असलेला ऱ्हास व त्याने मानवी जीवनावर होणारे गंभीर परिणाम यांचा सखोल अभ्यास करणारा सुमारे १५०० पानांचा संयुक्त राष्ट्र पुरस्कृत अहवाल प्रसिद्ध झाला. वास्तविक आजपर्यंत पृथ्वीवरच्या जैविक संपदेवर होत असलेले मानवी आक्रमण व त्याचे होणारे दुष्परिणाम यासंदर्भात अनेक अहवाल प्रसिद्ध झाले आहेत पण हा अहवाल आपल्यापुढे आणखी काही गंभीर धोके मांडतो.

हे जग, ‘जैविक सृष्टीचा ऱ्हास होऊ नये म्हणून चिंता वाहणारे आदर्शवादी’ आणि ‘आपल्या फायद्यासाठी जैविक संपदा वारेमाप लुटणारे काही शक्तीशाली गट’ यांच्या कचाट्यात सापडले आहे. त्यामुळे जगाची अवस्था पक्षाघात झालेल्या एका रुग्णासारखी झाली आहे. सर्वत्र निराशा, उदासिनता दिसत आहे. पण पृथ्वीवरील जैविक संपदेची लूट थांबवता येत नसल्यामागचे एक कारण म्हणजे हे लुटारू अनोळखी आहेत, त्यांना नावे नाहीत, त्यांना चेहरे नाहीत. त्यामुळे ही मंडळी उजळमाथ्याने लूट करताना दिसतात. तरीही या मंडळींनी केलेला पर्यावरण ऱ्हास उघडकीस आणता येतो. ही कृत्ये कोणत्या कंपनीने केली आहेत, त्यांची नावे काय आहेत, त्यांचे सीईओ कोण आहेत हे लोकांपर्यंत आणता येते. असे करून या कंपन्यांचा लबाडपणा उघड करता येऊ शकतो.

अहवालात छापलेल्या नकाशातून पृथ्वीवर सर्वाधिक हरितगृह वायू उत्सर्जन करणाऱ्या १०० कंपन्या, त्यांची ठिकाणे व त्यांच्या सीईओची माहिती मिळते. ज्या देशात या कंपन्या आहेत त्या देशांनी औद्योगिक क्रांतीनंतर आजपर्यंत किती टक्के कार्बन डाय ऑक्साइड वायूचे उत्सर्जन केले आहे हेही लक्षात येते. या विषयाच्या खोलात जाऊन अधिक माहिती हवी असेल तर कोणत्या कंपन्यांनी आजपर्यंत किती प्रमाणात कार्बन डाय ऑक्साइड व हरितगृह वायूचे उत्सर्जन केले आहे आणि विशेषत: कोणत्या सीईओच्या काळात या वायूंचे उत्सर्जन सर्वाधिक झाले आहे त्या सीईओचे नाव या नकाशाच्या माध्यमातून कळू शकते. आपण या सीईओंना पृथ्वीच्या नाशाबद्दल जबाबदारही धरू शकतो.

अशा पद्धतीचा नकाशा तयार केला यामागील एक कारण असे की, २०१७मध्ये ‘कार्बन डिस्क्लोजर प्रोजेक्ट’च्या आधारावर ‘कार्बन मेजर्स रिपोर्ट’ तयार केला गेला. या रिपोर्टमध्ये जीवाश्म इंधन उत्पादन करणाऱ्या जगातील प्रमुख १०० ऊर्जा उत्पादकांची माहिती देण्यात आली होती. या १०० कंपन्यांनी १९८८ पासून आजपर्यंत सुमारे ७१% हरितगृह वायूचे उत्सर्जन केले असून या कंपन्यांमधील केवळ २५ कंपन्यांनी ५० टक्क्याहून अधिक हरितगृह वायूचे उत्सर्जन केल्याचे आढळून आले आहे.

सर्वाधिक हरितगृह वायू उत्सर्जन करणाऱ्या कंपन्यांची नावे : चीन (सरकारी मालकीच्या कंपन्या), अर्माको, गॅझप्रॉम, नॅशनल इराणीयन ऑइल, एक्सॉन मोबाइल, कोल इंडिया, पेमेक्स, रशिया (सरकारी मालकीच्या कंपन्या), शेल, चायना नॅशनल पेट्रोलियम, बीपी, शेवरॉन, पीडीव्हीएसए, अबू धाबी नॅशनल ऑइल, पोलंड ऑइल, पीबॉडी एनर्जी, सोनाट्रॅच, कुवेत पेट्रोलियम, टोटल, बीएचपी बिलिटन, कॉनोकोफिलिप्स, पेट्रोब्रास, ल्युकऑइल, रिओटिंटो, नायजेरियन नॅशनल पेट्रोलियम.

गेल्या २५ वर्षांत ज्या वेगाने जीवाश्म इंधनाचे उत्पादन केले गेले तो वेग पुढील २५ वर्षे असाच कायम ठेवला तर या शतकाअखेर पृथ्वीचे तापमान ४ अंश सेल्सियसने वाढेल, असा इशारा कार्बन मेजर्स रिपोर्टने दिला आहे. तापमानातील अशा वाढीने जैविक संपदेचा अतोनात नाश होईलच पण अन्नधान्य टंचाईचा सामना जगाला करावा लागेल. हा एक गंभीर इशाराच आहे.

पृथ्वी आणि मानवी समुहापुढे उभे असलेले हे धोके या कंपन्यांना माहिती नाहीत असे नाही. त्यांनाही तापमान वाढीनंतर जगात बदलत चाललेले वारे लक्षात आले आहेत. म्हणून कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टीने, अक्षय्य ऊर्जानिर्मितीच्या दृष्टीने या कंपन्यांनी काही योजना, प्रकल्प हाती घेतले आहेत. पण असे आढळून आले आहे की, असे प्रकल्प- मोहीमा किंवा योजना कागदावर आखल्या जातात, प्रत्यक्षात कंपन्यांकडून असे प्रकल्प कार्यान्वित व्हावेत म्हणून मूलभूत पातळीवर फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. केवळ दिखाव्यापुरते हे प्रयत्न असतात असे फार तर म्हणता येते.

वरील नकाशामुळे कर्ब वायू व अन्य हरितगृह वायू उत्सर्जन कोणत्या देशातल्या कोणत्या कंपनीतून केले जाते व त्या कंपनीचे सीईओ कोण आहेत याची मािहती मिळते. या माहितीने हा विषय व्यक्तिगत पातळीवर जाण्याची भीती असल्याने तो सावधगिरीने हाताळला पाहिजे. ही सावधगिरी दोन पद्धतीने पाळली पाहिजे

एक म्हणजे- बाजारपेठेत ऊर्जैची प्रचंड मागणी असल्याने तेल उत्पादक कंपन्यांना आपला व्यवसाय वाढवावा लागतो. ऊर्जेची गरज ही दैनंदिन स्वरुपाची आहे. तिच्यािवना आपले जीवन ठप्प होऊन जाईल. त्यामुळे कंपन्यांच्या उत्पादन हेतूकडे पाहिले पाहिजे.

दुसरी गोष्ट म्हणजे हे सीईओ म्हणजे कंपन्यांचे मालक नव्हेत. मालक असतात कंपन्यांचे समभागधारक. त्यात गुंतवणूक करणारे. या गुंतवणूकदारांनी पैसा हवा की पृथ्वी जगली पाहिजे याचा विचार केला पाहिजे. अखेरीस गुंतवणूकदाराच्या दबावातूनच कंपन्यांना निर्णय घ्यावे लागतात. गुंतवणूकदारांमध्ये अधिक वाटा असतो तो वित्तीय गुंतवणूक कंपन्यांचा आणि सरकारचा. साधारण तेल उत्पादक कंपन्यांमधील २० टक्के गुंतवणूक ही सर्वसामान्य भागधारकाची असते, म्हणजे ती आपली असते.

तरीही आपल्याला या समस्येवरचे उत्तर मिळत नाही. कोणत्याही मोठ्या कंपनीत तुमचा-माझा हिस्सा असला तरी त्या कंपनीला चेहरा-ओळख नसते. या कंपन्यांनी नेमलेले सीईओ कंपन्यांचे हितसंबंध सांभाळत असतात. कदाचित या सीईओनी जैविक संपदेला पोहचलेला धोका लक्षात घेऊन, तापमान वाढीचे दुष्परिणामावर विचार करून निर्णय घेतल्यास तो एक आपणा सर्वांसाठी मोठा दिलासा ठरेल.

या लेखात प्रसिद्ध झालेले नकाशे ‘द डिकोलोनियल अॅटलास’ या पुस्तकातले आहेत. या पुस्तकात उताह फिलिप्स या कामगार नेत्याचे व कलाकाराचे एक महत्त्वाचे वाक्य आहे. ते म्हणतात, ही पृथ्वी मरत नाहीये तर ती मारली जात आहे आणि जे लोक हिला मारत आहेत त्यांचा नाव, गाव पत्ता आपल्याकडे आहे.’ जैविक संपदा ऱ्हासाच्या यादीत माझे, तुमचे नाव आहे, पत्ता आहे. आपण सर्वजण ही पृथ्वी जिवंत राहावी, तिची जैविक संपदा अबाधित राहावी म्हणून प्रयत्न करायला हवेत. आपले प्रयत्न वर उल्लेख केलेल्या १०० व्यक्तींएवढे नसले तरी या नकाशातून आपल्याला या मंडळींचे चांगले वा अन्य हेतू कळून येतात हे महत्त्वाचे आहे.

फ्रँक जॅकोब यांनी लिहिलेला मूळ लेख येथे वाचू शकाल.

COMMENTS