हेमंत करकरे यांचा मालेगावबद्दलचा एफआयआर आजच्या हिंदुत्ववादाबद्दल सांगतो की भारतातील हिंदुत्ववादाची दोन घराणी एकत्र झाली आहेत.
पारंपरिकदृष्ट्या, हिंदू महासभा आणि आरएसएस ही हिंदू राष्ट्रवादाच्या दोन वेगवेगळ्या प्रकारांचे प्रतिनिधित्व करतात. वि. दा. सावरकर यांच्या नेतृत्वाखालील हिंदू महासभेने निवडणूक लढवायचा आणि त्यानंतर गोडसेंच्या हिंदू राष्ट्र दलासारख्या दहशतवादी गटांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दीर्घकालीन परिप्रेक्ष्यासह मूलभूत स्तरावर काम करण्याची निवड केली होती.
‘अभिनव भारत’ या संघटनेची कारकीर्द पाहिली असता असे दिसून येते की मतभेद असूनही दोन्ही विचारप्रवाह आता एकत्रित झाले आहेत. एबीचे माजी सदस्य प्रज्ञा सिंग ठाकूर आणि रमेश उपाध्याय यांना भाजपद्वारे लोकसभा निवडणुकांसाठी नामांकन मिळणे या गोष्टीतून हेच सिद्ध होते. हा लेख २००८ साली हेमंत करकरे यांनी ज्याचा मसुदा तयार केला त्या एफआयआरवर आधारित आहे. तसेच त्यामध्ये सप्टेंबर २०१० मध्ये लेखकाच्या इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकलीमध्ये प्रकाशित झालेल्या ‘Abhinav Bharat, the Malegaon blast and Hindu Nationalism: Resisting and Emulating Islamist Terrorism’या लेखातील काही अंशांचा समावेश आहे.
गोपाळ गोडसे यांची मुलगी आणि वीर सावरकरांच्या पुतण्याची पत्नी असणाऱ्या हिमानी सावरकर यांनी असा दावा केला आहे कीअभिनव भारतची स्थापना समीर कुलकर्णी यांनी केली असून त्यांनी सावरकर यांना या संस्थेच्या चेअरमन होण्यास सांगितले. त्यावेळी हिमानी या हिंदू महासभेच्या अध्यक्ष होत्या. त्या या पक्षाच्या पूर्णवेळ कार्यकर्त्या बनल्या होत्या आणि २००० मध्ये मुंबई येथे आर्किटेक्ट म्हणून करत असलेल्या कामातून निवृत्त झाल्यानंतर पुणे येथे परतल्या होत्या.
त्यांनी पोलिसांना सांगितले की भोपाळ येथील एका बैठकीमध्ये त्यांची एबीच्या अध्यक्षा म्हणून निवड झाली. त्यांनी असेही सांगितले की कुलकर्णी हे मध्यप्रदेशमध्येच ही संस्था वाढवत होते. या बैठकीमध्ये स्वामी अमृतानंद देव तीर्थ (जे सुधाकर द्विवेदी आणि दयानंद पांडे अशा नावांनीही ओळखले जातात आणि ज्यांना हिमानी ‘जम्मू आणि काश्मीरचे शंकराचार्य’ म्हणतात), साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर, मेजर उपाध्याय, सुधाकर चतुर्वेदी आणि कर्नल पुरोहित हेसुद्धा हजर होते. त्यांनी असेही सांगितले की कर्नल पुरोहित यांना त्या दोन वर्षांपासून ओळखत होत्या. दोघांच्या कुटुंबांमध्ये दीर्घकाळपासून नातेसंबंध आहे.
इतर साक्षींनुसार, अभिनव भारतचे खरे रचनाकार पुरोहित स्वतःच होते. जून २००६ मध्ये त्यांनी १६ लोकांना शिवाजीच्या रायगड या किल्ल्यावर नेले आणि अभिनव भारत ट्रस्टची स्थापना केली. एका सहभागीच्या आठवणीनुसार: “आम्ही शिवाजी महाराजांच्या सिंहासनाचे आशीर्वाद घेतले आणि ट्रस्टचे नाव अभिनव भारत असे ठेवण्याचा निर्णय घेतला, तसेच त्याच्या यशाकरिता प्रार्थनाही केली.”
त्यानंतर हा गट १६ डिसेंबर, २००६ रोजी भेटला, जेव्हा सदस्यांनी बांगलादेश युद्धात पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचा दिवस साजरा केला. मात्र ट्रस्टची अधिकृत बैठक फेब्रुवारी २००७ मध्ये पुणे येथे झाली.
(Chargesheets and misc documents in the Malegaon case by The Wire on Scribd)
आणखी एक बैठक सप्टेंबर२००७ मध्ये देवळाली येथे झाली. यावेळी पूर्व दिल्लीचे भाजपचे माजी खासदार बी. एल. शर्मा हेसुद्धा बैठकीला हजर होते. शर्मा २००४ मध्ये अमृतानंद देव तीर्थ यांना भेटले होते, जेव्हा ते काश्मीरमधून पळून आलेल्या पंडित निर्वासितांमध्ये लोकप्रिय होते. २६ डिसेंबर, २००८ रोजी चौकशीदरम्यान त्यांनी पोलिसांना सांगितले, “…स्वामींनी आम्हाला लॅपटॉपवर व्हिडिओ दाखवले. त्यांनी आम्हाला हिंदूंचे गळे चिरणाऱ्या मुस्लिमांचे व्हिडिओ दाखवले.” शर्मांनी असेही सांगितले की, “सप्टेंबर २००७ मध्ये शर्मांनी अखंड भारताची आणि भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याची त्यांची कल्पना आम्हाला सांगितली. त्यांनी आम्हाला सांगितले की अभिनव भारत या संस्थेद्वारे प्रसाद पुरोहित ते साध्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. आमच्या बैठकीमध्ये आम्ही हिंदू स्त्रियांवर जम्मू काश्मीरमध्ये होत असलेले बलात्कार, खून याबद्दलही बोललो.”
(Translation of the transcript of the AB meeting that took place in fall 2007 by The Wire on Scribd)
पोलिसांच्या म्हणण्यानुसार मालेगाव संबंधित योजनेचा निर्णय २००८ मधील चार बैठकांमध्येच झाला. २५-२६ जानेवारी २००८ रोजी पुरोहित, उपाध्याय, कुलकर्णी, चतुर्वेदी, आणि अमृतानंद देव तीर्थ फरीदाबाद मध्ये भेटले. ११-१२ एप्रिल, २००८ रोजी तेच सगळे भोपाळ मध्ये प्रज्ञा सिंग ठाकूरला भेटले आणि त्यांनी “मालेगावमधील गच्च वस्ती असलेल्या भागात बाँबस्फोट करून मुस्लिमांच्या विरुद्ध सूड उगवण्याचा कट रचला. आरोपी प्रज्ञा सिंग ठाकूरने स्फोटासाठी माणसे पुरवण्याची जबाबदारी घेतली. या बैठकीमध्ये सर्व सहभागींनी मालेगावमध्ये बाँबस्फोट करण्याला संमती दिली.”
(English Translation of the Transcript of the Faridabad Meeting of Abhinav Bharat by The Wire on Scribd)
११ जून, २००८ रोजी प्रज्ञा सिंग यांनी रामचंद्र कलासंग्रा आणि संदीप डांगे या दोघांची मालेगाव येथे बाँब ठेवण्यासाठी तयार असलेल्या दोन विश्वसनीय व्यक्ती म्हणून अमृतानंद देव तीर्थ यांच्याशी भेट घालून दिली. कलासंग्रा आणि डांगे यांना पुणे येथे “स्फोटके देण्यात यावीत” अशी सूचना पुरोहित यांना करावी असेही त्यांनी अमृतानंद देव तीर्थ याला सांगितले.
३ ऑगस्ट, २००८च्या उज्जैन येथील महाकाळेश्वर मंदिराच्या धर्मशाळेत झालेल्या बैठकीत पुरोहित यांच्यावर कलासंग्रा आणि डांगेला आरडीएक्स घेऊन देण्याची जबाबदारी टाकण्यात आली. पुरोहित यांनी ‘स्फोटके घडवणे आणि स्फोटक साधने तयार करणे यामध्ये तज्ञ असलेल्या’ राकेश धावडे यांना ९ किंवा १० ऑगस्टला कलासंग्रा आणि डांगेला पुण्यात स्फोटके पुरवायला सांगितले.
लष्करातील माजी अधिकारी असलेल्या रमेश उपाध्याय यांना पहिल्यांदा अटक करण्यात आली आणि त्यांनी नाशिक बीएमएस परिसरात मालेगाव स्फोटाची योजना बनवण्यासाठी प्रज्ञा सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर तीन बैठका केल्याचे लगेचच कबूल केले. सरकारी वकील अजय मिसार यांनीजाहीर केले की “पूर्वी भारतीय लष्करामध्ये आर्टिलरी विभागात असलेल्या उपाध्याय यांनी अटक केलेल्या आरोपींना बाँब बनवणे आणि आरडीएक्स खरेदी करणे याबाबत मार्गदर्शन केले असावे असा संशय आहे.” एबीच्या अध्यक्षा हिमानी सावरकर होत्या तेव्हा रमेश उपाध्याय कार्यकारी अध्यक्ष होते असे प्रेसच्या एका अहवालात म्हटले आहे.
(Conversation Between Ramesh Upadhyaya and Sudhakar Dwivedi by The Wire on Scribd_
पण या गटातील महत्त्वाची व्यक्ती होती लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित. पुरोहित आणि उपाध्याय यांनी तरुण कार्यकर्त्यांना बाँब बनवण्यासहित बाकीही लष्करी प्रशिक्षण दिले. शस्त्रास्त्रे आणि स्फोटके खरेदी करण्यातही त्यांचीच महत्त्वाची भूमिका होती. पुरोहित यांनी २००४-०५ मध्ये त्यांचे पोस्टिंग जम्मू आणि काश्मीर येथे असताना इतरांना शस्त्रपरवाना मिळावा याकरिता खोटी कागदपत्रे तयार केली.
संघ परिवारातील भ्रमनिरास झालेले कार्यकर्ते
उपाध्याय एके काळी भाजपच्या माजी सैनिक विभागाच्या मुंबई युनिटचे प्रमुख होते. पण संघ परिवाराशी घट्ट संबंध असलेले ते एकटेच अभिनव भारतचे नेते नव्हते. प्रज्ञा सिंगसुद्धा अभाविपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य होण्यापूर्वी आणि संन्यास घेण्यापूर्वी १९९७ पर्यंत उज्जैन आणि इंदोरमधील अभाविपच्या नेत्या होत्या. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, मध्य प्रदेशमध्ये अभिनव भारतची शाखा सुरू करणारे समीर कुलकर्णी हे आरएसएस कार्यकर्ते होते. २६ डिसेंबर, २००८ रोजी पोलिसांच्या चौकशीदरम्यान हिमानी सावरकर म्हणाल्या:
“मी दीड वर्षांपूर्वी कुलकर्णी यांना भेटले, जेव्हा ते आरएसएसचे पूर्णवेळ सदस्य म्हणून काम करत होते. माझे घर सावरकरांच्या घराशेजारीच असल्यामुळे, ते अनेकदा यायचे आणि माझी त्यांची चांगली ओळख झाली. त्यांनी नंतर मला सांगितले की ते आता अभिनव भारतसाठी काम करण्याकरिता मध्यप्रदेशमध्ये असतील.”
एबीकडे आकर्षित होणाऱ्या संघपरिवारातील भ्रमनिरास झालेल्या कार्यकर्त्याचे सर्वात चांगले उदाहरण म्हणजे बी. एल. शर्मा. १९४० पासून आरएसएस कार्यकर्ते असलेले शर्मा यांना रामजन्मभूमी चळवळीच्या वेळी संघाने भाजपमध्ये पाठवले. त्यावेळी ते विहिंपच्या बाजूने चळवळीत भाग घेत होते. त्यांनी १९९१ मध्ये आणि १९९६ मध्ये पूर्व दिल्लीतून लोकसभेची जागा जिंकली पण १९९७ मध्ये त्यांनी खासदारपदाचा आणि भाजपचा राजीनामा दिला.
(Transcripts of interrogatories of some witnesses in the Malegaon case by The Wire on Scribd)
त्यानंतर त्यांनी राज्यसचिव म्हणून विहिंपच्या कामावर लक्ष केंद्रित केले. पण अखंड भारताच्या प्रश्नाच्या बाबतीतल्या संघ परिवाराच्या कामाच्या बाबतीत निराश होते. त्यांनी या प्रश्नाबाबत अडवाणी यांना कडक शब्दात पत्रही लिहिले होते.
पुढे जाऊन आरएसएसमधील सर्वात चांगले लोक एबी मध्ये येतील आणि एबी आरएसएसची जागा घेईल अशी पुरोहित यांची महत्त्वाकांक्षा होती.
एबीचे लोक मोहन भागवत यांच्यासह आरएसएसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात होते. पण त्यांना विहिंपबद्दल सर्वात जास्त आशा होती. पुरोहित तोगडियांच्या संपर्कात होते. तोगडिया हे गुजरातमधील विहिंपचे नेते होते. पुरोहितांनी तोगडियांना एबी बाँबहल्ले घडवून आणू शकेल आणि संघ परिवाराने त्याची जबाबदारी घ्यावी असे सुचवले होते. पण शेवटी एबी नेते या निष्कर्षाप्रति पोहोचले होते की नजीकच्या काळात संघ परिवाराकडून काही होईल अशी अपेक्षा करता येणार नाही. विहिंपकडूनही नाही, कारण बाकी संघटनेने त्यांना त्यांचाही कट्टरतावाद कमी करण्यास भाग पाडले होते. पण दीर्घ काळात त्यांना मोठ्या प्रमाणात विहिंपचे नेते खेचून घेता येतील अशी त्यांना आशा होती. फरिदाबाद येथील बैठकीत पुरोहित म्हणाले होते:
“विश्व हिंदू परिषदेची ओळख वेगळी आहे, त्यांच्याकडे प्रवीण तोगडियांसारखे खंदे नेतृत्व आहे. विहिंपच्या सध्याच्या नेतृत्वाला हटवले पाहिजे असे काहीजण बोलतात, आजच्या तारखेला भाजपच्या अंतर्गत काही अडथळ्यांमुळे ते असे बोलत आहेत. मात्र त्यांच्या राजकीय लक्ष्याकरिता हे अयोग्य आहे. विहिंपचे धार्मिक लोक हे ‘लढाऊ लोक’ आहेत. जर सिंघलना विहिंपमधून काढून टाकले तर विहिंपची गत मुंडके नसलेल्या कोंबडीसारखी होईल. बिनाडोक्याचे धड शिल्लक राहील आणि भाजपला तेच हवे आहे. हा विभाग आपला झाला पाहिजे. याबाबत मला विरोध करू नका. हा आपला मुख्य उद्देश असेल. ही बिगर-राजकीय संस्था नक्कीच राजकीय संस्था बनेल. याचा अर्थ असा की भाजप राष्ट्रीय पातळीवरची शिव सेना बनेल आणि तेच हवे आहे.”
ख्रिस्तोफी जॅफ्रेलॉट हे सीईआरआय-सायन्सेस पीओ/सीएनआरएस, पॅरिस येथे वरिष्ठ संशोधक आहेत.
(छायाचित्र ओळी – मालेगाव स्फोटातील दृश्य. श्रेय: पीटीआय)
मूळ लेख
अनुवाद – अनघा लेले
COMMENTS