पंचतारांकित हॉटेल झाला तुरुंग

पंचतारांकित हॉटेल झाला तुरुंग

श्रीनगर : शहरातील प्रसिद्ध दल लेकच्या किनाऱ्यावर हॉटेल सेंटॉर हे आलिशान हॉटेल आहे. उन्हाळ्याच्या दिवसात या हॉटेलमध्ये राहण्याकडे पर्यटकांची पसंती असते

काश्मीरमध्ये फक्त जिओचॅट याच मेसेजिंग ऍपला परवानगी का?
३७० कलम : परप्रांतीयांचा रोजगार कायमचा गेला
३७० कलम : सर्व याचिकांची सुनावणी ऑक्टोबरमध्ये

श्रीनगर : शहरातील प्रसिद्ध दल लेकच्या किनाऱ्यावर हॉटेल सेंटॉर हे आलिशान हॉटेल आहे. उन्हाळ्याच्या दिवसात या हॉटेलमध्ये राहण्याकडे पर्यटकांची पसंती असते. हॉटेलच्या मागेच झबरवान टेकडी असल्याने निसर्ग सौंदर्याचा एक अद्भूत अनुभव मिळतो.

पण सध्या हे हॉटेल राजकीय कैद्यांच्या गर्दीने गच्च भरलेले आहे. पर्यटक कमी पण कैदी जास्त अशी परिस्थिती येथे अनुभवायला मिळतेय. या राजकीय कैद्यांना त्यांचे आप्त, नातेवाईकांनाही भेटू दिले जात नाही. गेले २४ दिवस या हॉटेलमध्ये हे राजकीय कैदी आहेत.

सोमवारी केंद्र सरकारने एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मार्फत राजकीय कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांशी भेटू देण्याची परवानगी दिली. त्यानंतर हॉटेलमध्ये नातेवाईकांची प्रचंड रिघ लागलेली दिसून येत आहे. लहान मुले ते वयोवृद्ध असा नातेवाईकांचा राबता असून सगळेच जण स्थानबद्ध केलेल्यांना भेटण्यासाठी उत्सुक आहेत. सोबत सफरचंद, औषधे, सुकामेवा अशा भेटवस्तूही आहेत.

हॉटेल सेंटॉरमध्ये ४० ते ५० राजकीय कैदी असून त्यांना ५ ऑगस्टपासून येथे ठेवण्यात आल्याचे एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले. यामध्ये सज्जाद लोन, अली मुहम्मद सागर, नाईम अख्तर, शाह फैजल, वाहिद-उर-रेहमान पर्रा, तन्वीर सादिक, हिलाल शहा, शेख इम्रान (श्रीनगरचे उपमहापौर), युसूर रेशी, निझाम-उद-दिन भट, मुहम्मद हकीम यासिन, मुहम्मद अश्रफ मिर, शेख इम्रान, आरटीआय कार्यकर्ते राजा मुझफ्फर भट, समीर अहमद असे राजकीय नेते, कार्यकर्ते आहेत.

सोमवारी दुपारी पीपल्स कॉन्फरन्सचे नेते सज्जाद लोन यांची पत्नी, आई त्यांना भेटायला आली होती. त्यांना दुपारची पावणे दोनची वेळ देण्यात आली होती. गेल्या आठवड्यात सज्जाद लोन यांच्या बहिणीने शबनम यांनी श्रीनगर उच्च न्यायालयात सरकारविरोधात एक याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवरच्या निर्णयावरून शबनम यांना सज्जाद लोन यांची भेट घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.

श्रीनगरचे उपमहापौर शेख इम्रान यांना भेटण्यासाठी त्यांची बहिण, मेहुणे व त्यांचा मुलगा आला होता तसेच त्यांचे काही नातेवाईक लंडनहून येणार आहेत.

अटक केलेल्यांना भेटण्यासाठी आलेल्या आप्तांमध्ये सरकारविरोधात रोष आहेच. ते तसा व्यक्तही करत आहेत. अनेक वर्षे भारतासोबत राहूनही आमच्यावर हा जुलूम चालल्याची प्रतिक्रिया एका महिलेने दिली. काश्मीर भारताचा भाग आहे असे म्हणून ज्यांनी आयुष्यभर आपले जीवन राजकारणात झोकून दिले त्यांना तुरुंगात टाकल्याने परिस्थिती कशी सुधारेल असा सवाल या महिलेचा आहे.

‘लोकांना कैदेत टाकून काश्मीर प्रश्न सुटणार आहे का? असा प्रश्न हॉटेलच्या लॉबीत थांबलेल्या एका वृद्ध गृहस्थाने केला. सरकार आमचे सर्व हिरावून घेत आहे असेही ते म्हणाले.

५ ऑगस्टनंतर केंद्र सरकारने खोऱ्यातील अनेक जणांना अटक केली आहे पण सरकारने किती जणांना अटक केली आहे याचा आकडा अद्याप सांगितलेला नाही. पण एएफपी या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार जवळपास ४ हजार जणांना अटक करण्यात आलेली आहे.

३७० कलम रद्द करून २४ दिवस होत आहेत पण खोऱ्यातील एवढ्या जणांना कोणत्या आरोपाखाली अटक केलेली आहे हेही सरकारने अजून स्पष्ट केलेले नाही.

दोन दिवसांपूर्वी खोऱ्यातील लँडलाइन सेवा सुरू झाली पण मोबाइल व इंटरनेट सेवा अद्यापही बंद करण्यात आलेली आहे.

शनिवारी सरकारने ६९ पोलिस ठाण्याच्या प्रभागातील बंदी शिथिल केल्याचे सांगितले. पण रस्त्यांवर निमलष्करी दले, पोलिस मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेले आहेत.

सेंटार हॉटेल हे गर्दीचे एक ठिकाणही झाले असून कैद केलेल्या आमच्या घरातील व्यक्तीस भेटायला येणे ही अत्यंत अशक्यप्राय बाब आहे असे एकाने सांगितले. सरकारने इतके अडथळे उभे केले आहेत की आम्हाला आमच्या नातेवाईकास भेटण्यासाठी अनेक तास ताटकळत उभे राहावे लागत आहे, अशी तक्रार अनेकांची होती.

हॉटेलमध्ये कैद करून ठेवलेल्या अनेकांना जगात बाहेर काय चाललेय याचा पत्ता नाही. कोणालाही बातम्या, माहितीचा सुगावा लावून दिला जात नाही. बंदी असलेल्या एका कार्यकर्त्याने माझा जीव हॉटेलमध्ये गुदमरू लागला आहे, असे त्याला भेटायला गेलेल्या एका व्यक्तीला सांगितले.

काश्मीरमधील सर्वच राजकीय नेत्यांचे भविष्य आता संपले आले. एकाही नेत्याला आता जनाधार मिळणे अवघड आहे. सर्वांनी काश्मीरी जनतेचा भ्रमनिरास, विश्वासघात केला आहे. या पुढच्या अनेक पिढ्या त्यांना माफ करणार नाहीत, अशी एकाची प्रतिक्रिया होती.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0