महाराष्ट्रानंतर झारखंडही भाजपच्या हातातून गेले

महाराष्ट्रानंतर झारखंडही भाजपच्या हातातून गेले

नवी दिल्ली : महाराष्ट्रात सत्ता स्थापण्यात अपयश आलेल्या भाजपला  झारखंड विधानसभा निवडणुकांतील दारुण पराभवाचा सामना करावा लागला. ८१ जागांच्या विधानसभेत झारखंड मुक्ती मोर्चा- काँग्रेस-आरजेडी युतीने ४६ जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळवले तर भाजपला २५ जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत भाजपचे विद्यमान मुख्यमंत्री रघुबर दास यांना बंडखोर नेते सरयू राय यांनी पराभूत केले. सरयू राय यांनी रघुबर दास यांच्या विरोधात बंड करून त्यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. राज्यात महाआघाडी आल्यास ते टिकवण्यासाठी आपण पाठिंबा देऊ असे सरयू राय यांनी जाहीर केले आहे.

दरम्यान, या राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष हेमंत सोरेन यांचा शपथविधी होईल. हेमंत सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस-आरजेडी युतीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार होते. आपल्या विजयाबद्दल हेमंत सोरेन यांनी झारखंडच्या जनतेचे आभार मानले आहेत. हा दिवस राज्याच्या जनतेसाठी आनंदाचा असून जनतेच्या अपेक्षा पुऱ्या करण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून हेमंत सोरेन यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आम्हाला या राज्याने सेवेची संधी दिली त्याबद्दलही मोदी यांनी आभार मानले आहेत. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी झारखंडच्या जनतेने दिलेल्या निर्णयाचा आम्ही सन्मान करतो असे ट्विट केले आहे.

ही निवडणूक भाजप विरुद्ध झारखंड मुक्ती मोर्चा- काँग्रेस-आरजेडी युती अशी सरळ लढली गेली. भाजपने ही निवडणूक एनआरसी, कॅब अशा मुद्यांसोबत अन्य राष्ट्रीय मुद्द्यांवर लढवली. त्यांनी आपल्या मित्रपक्षांशी अखेरच्या क्षणी सोबत सोडली. त्याचा फटका भाजपला बसला. मोदी-अमित शहा यांनी झारखंडमध्ये अनेक जाहीर सभा घेतल्या. या सभांमधून त्यांनी एनआरसीचा मुद्दा जोरकसपणे मांडला. पण विरोधकांनी एनआरसीचा मुद्दा आदिवासींच्या अस्तित्वाशी जोडल्याने भाजपला पराभवाचा सामना करावा लागला.

झारखंडच्या पराभवामुळे भाजपकडे राहिली १४ राज्ये

महाराष्ट्रासोबत झारखंडमधीलही सत्ता गेल्याने भाजपकडे आता १४ राज्ये बाकी आहेत. त्या १४ मधील ७ राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे तर अन्य राज्यांमध्ये युतीचे राज्य आहे.

२०१४मध्ये मोदी सरकार केंद्रात पहिल्यांदा सत्तेत आल्यानंतर मोदी-शहा जोडगोळीने देशातील अनेक राज्ये पादाक्रांत करण्याचा सपाटा लावला होता. २०१८ पर्यंत भाजपच्या हातात २१ राज्ये होती. पण नंतर राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड ही भाजपशासित राज्ये काँग्रेसने हिसकावून घेतली. कर्नाटकात काही दिवसांपूर्वी त्यांनी पोटनिवडणुकीच्या द्वारे व जनता दल-काँग्रेसचे सरकार पाडून पुन्हा बहुमत मिळवले. तर महाराष्ट्रात मित्र पक्ष शिवसेनेशी न पटल्यामुळे त्यांना हे राज्य हातातून घालवावे लागले. भाजपकडे सध्याच्या घडीला १६ पैकी ११ अशी राज्ये आहेत ज्यांची विधानसभेतील सदस्य संख्या १०० च्या आत आहेत. त्यामुळे या राज्यातील विजय मोठा मानता येत नाही. पण गुजरात, कर्नाटक, उ. प्रदेश या राज्यांत त्यांचे यश मोठे आहे.

मूळ बातमी

COMMENTS