दलितांना काही झालं, तर मी तुमचा शत्रू नंबर एक! – जिग्नेश मेवाणी

दलितांना काही झालं, तर मी तुमचा शत्रू नंबर एक! – जिग्नेश मेवाणी

‘एल्गार परिषद’, दलितांवर होणारे अत्याचार, आनंद तेलतुंबडे, महाआघाडी, सरकारकडून होणारी मुस्कटदाबी यासंदर्भात जिग्नेश मेवाणी यांची आमच्या प्रतिनिधी आर. अनुराधा यांनी पुण्यात घेतलेली मुलाखत.

आदिवासींच्या हक्कांबाबत प्रश्न उभे केले म्हणून मी देशद्रोही?
एल्गार परिषद प्रकरणः वर्नन गोन्साल्विस यांना डेंग्यूची लागण, रुग्णालयात दाखल
‘कबीर कला’च्या गोरखे, गायचोर यांना अटक

प्रश्न –एल्गार परिषदेला आता एक वर्ष झालंय. या एका वर्षांत अनेक गोष्टी बदलल्या आहेत. नक्षलवादी असण्याच्या आरोपावरुन अनेक कार्यकर्त्यांना झालेली अटक पासून ते आज आनंद तेलतुंबडे सारख्या व्यक्तीला ‘अटक करु नका, केस खोटी आहे’म्हणून लोकांपुढे आपलं म्हणणं मांडण्याची आलेली वेळ! जो एक भीमा कोरेगावला अभिवादन म्हणून आखला गेलेला कार्यक्रम होता, त्यातून इतकं सगळं कसं काय घडलं ?

उत्तर :  हे भयंकर आहे आणि विनाशकारीही! आनंद तेलतुंबडे ही अतिशय हुशार व्यक्ती आहे. त्यांचं संपूर्ण आयुष्य त्यांनी गरीब आणि मागासवर्गीयांच्या भल्यासाठी खर्ची घालतंय. सरकार वैरभावातून करत असलेल्या गोष्टींचा फटका त्यांना बसतोय. तेलतुंबडेंनी आयुष्यभर सरकार विरोधी भूमिका मांडली आहे.त्यामुळे मोदी सरकार सत्तेत आल्यापासून त्यांच्याशी वैरभावाने वागत आहेत. त्यामुळेच तेलतुंबडेंचा इपीडब्ल्यु मधला स्तंभ महिन्यापूर्वी बंद केला गेला.आणि आता त्यांना कधीही अटक होईल अशा परिस्थितीला सामोरं जावं लागतंय.

एल्गार बद्ल बोलायचं तर जेव्हा जेव्हा मोदींच्या नेत्रुत्वाला धोका निर्माण झाला आहे तेव्हा तेव्हा त्यांनी सहानुभूती मिळवायचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी मला मारायचा कट शिजतोयअशा कथा निर्माण केल्या जातात ज्यातून सहानुभूती पण मिळते; शिवाय भाजप-आर.एस.एस. विरोधी लोकांवर वर निशाणासुद्धा साधता येतो आणि थेट कारवाई करता येते. परिणामी लोकांच्या मनात भीती पण निर्माण करता येते.

प्रश्न –एल्गारच्या प्रकरणात पोलिसांनी एक भूमिका कायम ठेवलेली दिसत नाही. कधी या परिषदेमुळे कोरेगाव भिमाच्या दंगली झाल्या असं म्हटलं जातंय तर कधी हे प्रकरण फक्त नक्षलवादाशी संबंधीत आहे असं म्हणतात?

उत्तर :  जर कायद्याचा आधार घ्यायचा म्हटलं तर आनंद तेलतुंबडे आणि मला या गुन्ह्यात गोवल्याबद्दल,खोटा एफ.आय.आर. केल्याबद्दल पोलिसांवरच केस दाखल केली जाऊ शकते. आम्ही दोघंही अनुसूचीत जातींचे असल्यामुळे एट्रोसिटीची कलमं देखील लावली जाऊ शकतात.एल्गार परिषदेच्या संयोजनाशी नक्षलवाद्यांचा संबंध असल्याच्या आरोपासंदर्भात पुणे पोलिसांनी दाखल केलेली एफआयआर रद्द करावी म्हणून तेलतुंबडेनीसुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. कोर्टाने त्यांची ही मागणी नाकारतानाच त्यांना संबंधित कोर्टाकडून जामीन मिळवण्यासाठी अर्ज करण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या विरोधात एकही पुरावा नाही. यालाच लोकशाहीचं दमन म्हणतात. पण मी एक नक्की सांगतो की इथून पुढे तेलतुंबडेंना किंवा एखाद्या दलित व्यक्तीला काही झालं तर भाजपला त्याची किंमत नक्की मोजावी लागेल. मी हे देखील सांगतो की मग त्या परिस्थीतीत तुम्हांला जिग्नेश मेवानीला तुमचा एक नंबरचा शत्रू मानावा लागेल. मी देशभरात त्यांच्या विरोधात वणवा पेटवू शकतो याची आर.एस.एस. आणि भाजपला जाणीव आहे.

प्रश्न- या सगळ्या पार्श्वभूमीवर,गेल्या वर्षात सुप्रीम कोर्टाने जस्टिस लोयांपासून ते तेलतुंबडे प्रकरणापर्यंत जे निर्णय घेतले त्याकडे तुम्ही कसं बघता ?

उत्तर :  याघटनांमधूनच मोदी सरकार जाणं, किती गरजेचं आहेहे स्पष्ट होते.

प्रश्न – उमर खालिद आणि कन्हैया यांच्या विरोधात जे चार्जशीट आत्ता दाखल केले जात आहे, ती या दमनाचीच पुढची पायरी आहे असं वाटतं ?

उत्तर :  उमरने याला चांगले उत्तर दिले आहे.जे चार्जशीट गुन्हा दाखल झाल्यावर नव्वद दिवसांनी दाखल करायचे असते,ते निवडणुकांच्या नव्वद दिवस आधी दाखल झाले आहे यातच सगळे आले! महत्वाचं म्हणजे ज्या वकिलांनी कन्हैयावर राजरोसपणे लोकांसमोर हल्ला केला होता,त्यांच्यावर मात्र साधा गुन्हाही नोंदवला नाही. उनाच्या घटनेनंतर आजपर्यंत, मी जेव्हा जेव्हा  उमर आणि कन्हैयाला भेटलो होतो तेव्हा तेव्हा त्यांनी त्या घटनेचे महत्व, देशातल्या गरीबांची व्यथा आणि शेतकर्‍याचे प्रश्न मांडले आहेत. आम्ही भेटतो तेव्हा याच गोष्टींबद्दल वाद आणि चर्चा होते. पण फॆंसिझमचे वैशिष्ट्य हेच आहे की त्यात एक काल्पनिक शत्रू निर्माण केला जातो. ते खोट्या गोष्टी तयार करतात आणि त्याचाच भाग म्हणून हे होते आहे. पण तरुणांना जितके लक्ष्यकेले जाईलतितकेच त्याचे फटके भाजपला बसतील. कारण तरुणवर्ग त्यांच्या विरोधात जाईल.

प्रश्न- तुम्ही आत्ता उनाचा उल्लेख केला.उनाच्या घटनेच्या बळींना तुम्ही वार्‍यावर सोडले आहेअसातुमच्यावर आऱोप होतो आहे.

उत्तर :  मी कायमच त्यांच्या बाजूने उभा राहिलो आहे; त्यांच्यासाठी भांडलो आहे आणि त्यांचे प्रश्न विधानसभेत मांडले आहेत. पण आता यापुढची जबाबदारी ह्या सरकारची आहे. सरकारने त्यांना जी आश्वासनं दिली होती, ती आमदार जिग्नेश मेवानी कशी पुरी करणार? आनंदीबेन पटेल यांनी प्रत्येकी ५ एकर जमीन, सरकारी नोकरी आणि गावाचा विकास करण्याचं आश्वासन दिलं होतं. हे साप्ताहिक ‘गुजरात’ जे सरकारचं मुखपत्र आहे त्यात प्रसिद्ध सुद्धा झालं होतं. त्याला आज तीन वर्ष होत आहेत. पण यातलं एकही आश्वासन पूर्ण झालं नाही. आता ही पूर्तता आत्ताचं सरकार करणार का जिग्नेश मेवानी? ते आरोप कशाच्या आधारावर करत आहेत? उलटं माझं म्हणणं आहे की तुम्ही आश्वासनांची पूर्तता करा आणि घ्या नात्याचं क्रेडीट! जिग्नेशकडून कां अपेक्षा करता आहात ? त्याला कां हिरो बनवत आहात?

प्रश्न- सध्या आणखी एक चर्चा होतेय ती म्हणजे दलितांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने सगळ्या दलित संघटनांना एकत्र आणलं जाण्याची!एकीकडे महाआघाडी आणि दुसरीकडे ही मागणी – हे शक्य आहे असं वाटतं का?प्रकाश आंबेडकरांनी आधीच एम.आय.एम. बरोबर युती केली आहे.

उत्तर :  जशा निवडणुका जवळ येत आहेत तसे राजकीय पक्षही एकत्र येत आहेत. कलकत्त्यात २३ पक्ष एकत्र आले होते.त्यानंतर भाजपला ठिकठिकाणी पत्रकार परिषदा घेऊन उत्तरे द्यावी लागली. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्ष हे एकत्र आल्यामुळे आता उत्तर प्रदेशात भाजपला एकही खासदार निवडून आणणं अवघड होणार आहे. यात आत्ता कोंग्रेस नाही. जर त्यांनी हातमिळवणी केली तर१५ पेक्षा जास्त जागा निवडून आणणे भाजपला शक्य होणार नाही. योगेद्र यादवांच्या गणितानुसार भाजपला३५ जागांच्यावर जागा मिळणार नाहीत. उत्तर प्रदेशात ४० जागा कमी होणं म्हणजे निवडणुक हरल्यातच जमा आहे. कलकत्त्यात तर भाजपचा सुपडा साफ होईल. तिथे एक किंवा दोन जागा निवडून येतील. गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेश मध्ये मिळून त्यांच्या ३० जागा कमी होत आहेत. यामुळे स्पष्ट दिसतंय की भाजप सत्ता स्थापन करणार नाही आणि मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत.

प्रश्न – पण भाजप तर लोकाभिमुख निर्णय घेत असल्याचा दावा करतो आहे. नुकतेच त्यांनी सवर्णांना १० टक्के आरक्षणही जाहीर केले आहे.

उत्तर :ही फक्त गोळी आहे,सवर्णांना खुष करण्यासाठी दिलेली! पण यातून काहीही साध्य होणार नाही. असं दिलेल आरक्षण यापूर्वी न्यायालयात कधीच टिकलेलं नाही. तरी ते दावा करतात की बघा आम्ही प्रयत्न केला, पण कोर्टाची संमती मिळाली नाही. पण मला भिती आहे की ही घटना बदलाची नांदी तर नाही ना… आरक्षण हे सर्वांना समान संधी मिळावी म्हणून दिले गेले. आरक्षण म्हणजे गरीबी दूर करण्याचा कार्यक्रम नाही. त्यामुळे घटनेच्या शिल्पकारांनी ज्या कारणासाठी आरक्षण दिले तेच बदलायचा हा डाव आहे असं मला वाटते आहे. ओबीसी आणि दलित या दोन्ही समाजांना यामुळे धक्का बसला आहे.

प्रश्न- आरक्षणाबाबत ही भूमिका मांडताना तुम्ही हार्दिक पटेल सोबतही निवडणुकी पूर्वीपासून युती केली आहे.

उत्तर :  आमचे अनेक मुद्द्यांवर मतभेद असले तरी त्यापेक्षा भाजपचा पाडाव करण्याचा जो मोठा उद्देश साधायचा आहे त्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.

प्रश्न – तुमच्या कलकत्त्याच्या मोर्च्याची दखल खुद्द पंतप्रधानांनी घेतली आणि उत्तरे दिली. पण या महाआघाडीला समान मुद्देघेऊन लोकांसमोर जाणं शक्य आहे का? यातले अनेक पक्ष हे एकमेकांचे पारंपारिक विरोधक म्हणून ओळखले जातात…

उत्तर :  पण आत्ता सगळ्यांना माहिती आहे की ज्या प्रकारे लालुप्रसाद यादवांना अटक झाली, अखिलेश यादव आणि मायावतीला सीबीआयची भिती दाखवली जाते आहे, टिडीपी ला घाबरवले गेले किंवा अगदी गौरी लंकेशच्या खून खटल्यातून ४३ जणांची नावं वगळण्यासाठीही प्रयत्न झाले… या सार्‍यातून ही मंडळी  कोणत्याही थराला जाऊ शकतात हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सगळे जण भानावर आले आहेत!

प्रश्न – पण तुमच्यावर असाही आऱोप होतो आहे कीमहाआघाडी मोदींचा सामना करु शकणार नाही. हे एका मुद्द्यावर एकत्र येणे कठीण आहे; साधा समान कार्यक्रम काय द्यायचा याचाही निर्णय अजून झालेला नाही.

उत्तर :  आता भाजप-आरएसएसवालेच तर गडकरी हा मोदींना पर्याय आहे म्हणू लागले आहेत. आम्ही काही म्हणायची गरजच नाही. अर्थात महाआघाडीच्या प्रत्येकालाच एक चांगला आणि पुरोगामी कार्यक्रम घेऊन लोकांसमोर जाणे गरजेचे आहे. हे नक्कीच शक्यही आहे. शिक्षण, आरोग्य अशा मुद्द्यांवर काही मांडणे तितकंसं कठीण नक्कीच नाही. बहुजनांसाठी काय गरजेचे आहे ते मुद्दे लक्षात घेण्याची गरज आहे. त्यासाठी महाआघाडीतल्या प्रत्येक पक्षावर दबाव टाकावा लागेल॰

प्रश्न – तुम्ही महाआघाडीमध्ये गेला तर आहात. पण जे मुद्दे तुम्ही मांडत होता की शेतकर्यांना भूमीहीन करणे असो की कारखान्यांसाठी जमीन संपादन करणं असो, यात महाआघाडीतले अनेक पक्ष आघाडीवर राहिलेले आहेत. तुमचं आणि त्यांचं कसं जमणार?

उत्तर :  आम्ही आत्तापर्यंत ४००० एकर जागा वाचवू शकलोआहोत. महाआघाडीला सत्ता मिळाली तरी आम्ही या मुद्द्यांवर टीका करत राहणार. पण आत्ता भाजपचा पराभव करणं हे जास्त गरजेचं आहे. आणि त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

प्रश्न – राहुल गांधी हे महाआघाडीचा पंतप्रधानपदासाठीचा चेहरा असणार का ?

उत्तर :  याचं उत्तर तुम्ही त्यांनाच विचारलेलं बरं!

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 1