‘जम्मू-काश्मीर’मध्ये ‘गुपकार’ला सर्वाधिक जागा

‘जम्मू-काश्मीर’मध्ये ‘गुपकार’ला सर्वाधिक जागा

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील जिल्हा विकास परिषदांच्या पहिल्या निवडणुकीत, फारुख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील ७ पक्षांच्या गुपकार आघाडीने ११० जागा जिंकल्या आहेत. भाजपला ७४ जागा मिळाल्या आहेत. उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा आणि कुपवाडा जिल्हे तसेच जम्मू भागातील पूंछ व राजौरी जिल्ह्यांतील निकाल अद्याप आलेले नाहीत. कुपवाडा व बांदीपोरा जिल्ह्यांतील दोन उमेदवार पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील रहिवासी असल्याने मतमोजणी थांबवण्यात आली आहे. ही मतमोजणी पुढील आदेश आल्यानंतरच पुन्हा सुरू केली जाईल, असे संबंधितांनी सांगितले.

निकाल जाहीर झालेल्या २७६ जागांवर पीएजीडी आणि भाजप वगळता, अपक्षांनी ४९ जागा जिंकल्या आहेत, काँग्रेसने २६, अपनी पार्टीने १२, पीडीएफ व नॅशनल पँथर्स पार्टीने प्रत्येकी दोन तर बीएसपीने एक जागा जिंकली आहे.

राजौरी जिल्ह्यात आत्तापर्यंत पीएजीडीने सहा जागा जिंकल्या आहेत, काँग्रेसने तीन तर भाजपने दोन जागा जिंकल्या आहेत.

पीएजीडीच्या घटकपक्षांपैकी नॅशनल कॉन्फरन्सने सर्वाधिक ६७ जागा जिंकल्या आहेत, त्यापाठोपाठ पीडीपीने २७, तर पीपल्स कॉन्फरन्सने आठ जागा जिंकल्या आहेत. सीपीआयने (एम) पाच, तर जेअँडके पीपल्स मुव्हमेंटने तीन जागा जिंकल्या आहेत. भाजपने ७४ जागा जिंकल्या आहेत पण जम्मू, कठुआ, उधमपूर, सांबा, दोडा आणि रियासी या सहा जिल्ह्यांमध्येच पक्षाला स्पष्ट बहुमत प्राप्त झाले आहे. पीर पांचाल आणि चिनाब खोऱ्यात पीएजीडीने उत्तम कामगिरी केली आहे.

गेल्या वर्षी कलम ३७० रद्द करून जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिल्यानंतर प्रथमच या प्रदेशात निवडणुका होत आहेत. जम्मू आणि काश्मीर प्रदेशातील प्रत्येकी १४० जागांवर निवडणुका घेतल्या जात आहेत.

मतमोजणीच्या एक दिवस आधी यंत्रणांनी पीडीपी व नॅशनल कॉन्फरन्सच्या अनेक नेत्यांना ताब्यात घेतले. यासाठी कोणतेही कारण देण्यात आले नाही. सध्या तुरुंगात असलेले पीडीपीचे ज्येष्ठ नेते वहीद पार्रा पुलवामा-१ मतदारसंघातून निवडून आले आहेत. भाजपनेही काश्मीर खोऱ्यात प्रथमच विजयाची नोंद केली आहे. काश्मीर खोऱ्यातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नया काश्मीरच्या स्वप्नावर विश्वास दर्शवला आहे, असे मत भाजपचे सरचिटणीस विबोध गुप्ता यांनी व्यक्त केले. भाजपच्या विजयामुळे काश्मीरमध्ये नवीन पहाट उदयाला आली आहे व गुपकार गँगच्या दुहीच्या सांप्रदायिक राजकारणाला चपराक मिळाली आहे, अशी पुस्तीही गुप्ता यांनी जोडली.

अर्थात जम्मू-काश्मीरच्या जनतेने गुपकार आघाडीवर विश्वास दर्शवला आहे, असे पीडीपीच्या अध्यक्ष महबूबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला म्हणाले. काश्मीरच्या जनतेने भाजपला व त्यांच्या काश्मीर धोरणाला नाकारले आहे हे डीडीसी निवडणुकांच्या निकालातून स्पष्ट झाले आहे, असे काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम म्हणाले. अगदी जम्मू भागातही जनतेने भाजपचे धृवीकरणाचे राजकारण नाकारले आहे, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.

५ ऑगस्ट २०१९ रोजी केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केला आणि राज्याचे विभाजन जम्मू-काश्मीर व लदाख अशा दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये केले.

मूळ बातमी

COMMENTS