पारुल यांची कविता आता ‘नक्षली’, ‘अराजकवादी’

पारुल यांची कविता आता ‘नक्षली’, ‘अराजकवादी’

कोरोना महासाथीत गंगेच्या प्रवाहातून वाहणाऱ्या बेवारस प्रेतांवर अत्यंत संवेदनशील अशी कविता लिहिणार्या गुजराती कवयित्री पारुल खक्कर यांची कविता गुजरात साहित्य अकादमीच्या नजरेत ‘नक्षलवादी’ व ‘अराजकतावादी’ ठरली आहे.

रेल्वे, वाहन उद्योगातील कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड
दिल्ली दंगलीत गोळ्या झाडणाऱ्या शाहरूखला अटक
काबूलमध्ये अडकलेले १७० भारतीय मायदेशी परत

अहमदाबादः कोरोना महासाथीत गंगेच्या प्रवाहातून वाहणाऱ्या बेवारस प्रेतांवर अत्यंत संवेदनशील अशी कविता लिहिणार्या गुजराती कवयित्री पारुल खक्कर यांची कविता गुजरात साहित्य अकादमीच्या नजरेत ‘नक्षलवादी’ व ‘अराजकतावादी’ ठरली आहे. गुजरात साहित्य अकादमीच्या जूनच्या ‘शब्दसृष्टी’ मासिकाच्या संपादकीय स्तंभात पारुल खक्कर यांची कविता पसरवणार्यांना अकादमीचे अध्यक्ष व संपादक विष्णु पंड्या यांनी ‘साहित्यिक नक्षलवादी’ असे संबोधले होते. आपल्या संपादकीयमध्ये पंड्या यांनी पारुल यांच्या कवितेचा वापर डावे, तथाकथित उदारमतवादी मंडळींनी देशात अराजकता पसरावी अशा रितीने केला असल्याचा आरोप केला आहे. पारुल यांची कविता दुसर्याच्या खांद्यावरून बंदुक धरून गोळी चालवावी अशा रितीने पसरवण्यात आली. देशभर या मंडळींना गोंधळ हवा होता. डावे, तथाकथित उदारमतवादी देशात सर्व आघाड्यांवर सक्रीय आहेत व साहित्यातील एक घाण म्हणून ही मंडळी काम करत आहेत. या कवितेतील सुख व दुःखाशी स्वतःला जोडणार्या एका वर्गाला प्रभावित करण्याचा या साहित्यिक नक्षल्यांचा उद्देश असल्याची टीका पंड्या यांनी केली आहे.

पारुल खक्कर यांच्या ‘शव वाहिनी गंगा’ कवितेत काहीच सार नाही, अशा पद्धतीने कविताही लिहिली जात नाहीत. आपल्या मनातला राग, संताप दुसर्यावर काढण्याच्या उद्देशाने केलेला हा प्रयत्न दिसत आहे. या कवितेचा उपयोग मोदीविरोध, भाजपविरोध व संघविरोधासाठी (आरएसएस) केला जात आहे. आपला पारुल खक्कर यांच्यावर व्यक्तिगत द्वेष नाही. ही कविताच नाही. याचा उपयोग सामाजिक भेदभाव निर्माण करण्यासाठी केला जाऊ शकतो, अशी टीका पंड्या यांनी केली आहे.

पारुल खक्कर यांच्या या आधीच्या साहित्यकृती गुजरात साहित्य अकादमीने प्रकाशित केल्या आहेत. या पुढे त्यांच्याकडून उत्तम कविता आल्या तर त्यांचे स्वागत आहे, असेही या संपादकीयात म्हटले आहे.

गेल्या महिन्यात पारुल खक्कर यांची शववाहिनी गंगा ही कविता सोशल मीडियात पहिल्यांदा प्रसिद्ध झाल्यानंतर तिची देशभरात चर्चा झाली. या कवितेत देशातील कोविड परिस्थिती सांभाळता न आलेल्या मोदी सरकारच्या नाकर्तेपणावर व्यंगात्मक टीका करण्यात आली होती. केवळ १४ ओळींच्या या कवितेचे सहा भाषांतून रुपांतर झाले व ती सामान्य भारतीय नागरिकाची कविता झाली.

शववाहिनी गंगा

एकमुखाने मुडदे गरजले “सब कुछ चंगा चंगा”

रामराज्यात तुझ्या राजा शव-वाहिनी ती गंगा 

भरली सगळी समशाने नुरली काष्ठे सरणाची 

राजा माझे थकले खांदे विरळा झाले शोककरी 

नाचे थयथय नाच तो नंगा यम जाउनी दारोदारी

रामराज्यात तुझ्या राजा शव-वाहिनी ती गंगा 

धगधगती ती चिमणी मागे थोडासाच विसावा

वाढल्या बांगड्या अन आक्रोशें तर उर फुटावा 

फिडल वाजते जळते नगरी वा:रे ‘बिल्ला रंगा’

रामराज्यात तुझ्या राजा शव-वाहिनी ती गंगा

दिव्य तुझा अंगरखा व दिव्य तुझी मुखज्योती 

दिसला नगरां अस्सल मुखडा पत्थर तू ना मोती 

असेल हिम्मत तर यावा बोला राजा अमुचा नंगा 

रामराज्यात तुझ्या राजा शव-वाहिनी ती गंगा

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0