जवाहरलाल नेहरू विद्यापीठात डावी आघाडी

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात डावी आघाडी

जवाहरलाल नेहरू (जेएनयु) विद्यापीठामध्ये डाव्या विद्यार्थी संघटनांच्या संयुक्त आघाडीने विद्यार्थी परिषदेच्या सर्व जागा मोठ्या फरकाने जिंकल्या आहेत.

अमित शहांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसची राष्ट्रपतींकडे धाव
शैक्षणिक संस्थांमध्ये महिला सुरक्षेला प्राधान्यक्रमाचे निर्देश
नवे कृषी कायदे: शेतीला निर्यातकेंद्री करण्याचे साधन

डाव्या विद्यार्थी संघटनांच्या संयुक्त आघाडीने जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील(जेएनयु) विद्यार्थी परिषदेच्या (जेएनयुएसयु) अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि संयुक्त चिटणीस या सर्व चार जागा जिंकल्या. या आघाडीची उमेदवार आयशे घोष परिषदेची अध्यक्ष म्हणून निवडून आली. या आघाडीमध्ये स्टुंडटस फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय), ऑल इंडिया स्टुंडट असोसिएशन (एआयएसए), डेमोक्रॅटिक स्टुंडटस फेडरेशन (डीएसएफ) आणि ऑल इंडिया स्टुंडटस फेडरेशन (एआयएसएफ) या संघटनांचा समावेश आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधीत असलेली अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) दुसऱ्या स्थानावर राहिली. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि संयुक्त चिटणीस या पदांसाठी ‘एबीव्हीपी’ने निवडणूक लढविली होती. काँग्रेसशी संबंधीत असलेल्या एनएसयुआय या विद्यार्थी संघटनेने अध्यक्ष पदासाठी निवडणूक लढविली होती.

डाव्या आघाडीच्या आणि ‘एसएफआय’ची सदस्य असलेल्या आयशे घोष हिला २ हजार ३१३ मते मिळाली तिने ‘एबीव्हीपी’च्या मनीष जांगीड याचा पराभव केला. त्याला १ हजार १२८ मते मिळाली. या निमित्ताने ‘एसएफआय’कडे विद्यार्थी परिषदेचे अध्यक्षपद १३ वर्षानंतर आले आहे.

निवडणुकीचे निकाल ६ सप्टेंबरलाच लागले होते. मात्र दिल्ली उच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर निवडणूक समितीने हे निकाल १८ तारखेला जाहीर केले. दोन विद्यार्थ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्याने निकाल अगोदर जाहीर करण्यात न्यायालयाने परवानगी दिली नव्हती.

निकाल जाहीर होताच ‘लाल सलाम’ आणि ‘इन्किलाब झिंदाबाद’च्या घोषणा हवेमध्ये घुमल्या. संयुक्त आघाडीच्या विद्यार्थ्यांनी डफली वाजवत गंगा ढाब्यापासून मिरवणूक काढली.

मुळची पश्चिम बंगालमधील दुर्गापूर इथली असलेली आयशे आंतरराष्ट्रीय संबंध क्षेत्रामध्ये एमफीलचे शिक्षण घेत आहे. ती म्हणाली, “कोणताही अडथळा नसलेला कॅम्पस निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आरोग्य सुविधा केंद्रे २४ तास कार्यरत राहतील आणि अधिक वसतीगृहे आणि विद्यार्थ्यांना अधिक सुविधा मिळतील, यासाठी आम्ही काम करू.” ती म्हणाली, “प्रशासनाविरुद्ध आमचा प्रतिकार आणि संघर्ष सुरूच राहील आणि पुढील वर्षामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना संघटीत करण्याचा प्रयत्न करू.”

‘डीएसएफ’चा सदस्य असणारा साकेत मुन विद्यार्थी परिषदेचा उपाध्यक्ष म्हणून निवडून आला आहे. त्याला ३ हजार ३६५ मते मिळाली. त्याने ‘एबीव्हीपी’च्या श्रुती अग्निहोत्री हिचा २ हजार ३० मतांनी पराभव केला. मुन म्हणाला, “कॅम्पसमधील प्रश्न मांडण्याबरोबरच, निधीची कपात आणि लोकशाही संस्थांना दाबण्याचे जे प्रकार सुरु आहेत, त्याविरोधात काम करू.”

यावर्षी ५ हजार ७०० विद्यार्थ्यांनी या निवडणुकीमध्ये मतदान केले. गेल्या ७ वर्षांमधले हे सर्वाधिक मतदान होते.

‘एआयएसए’चा सतीश चंद्र यादव हा बिहारमधील महाराजगंज इथला आहे. तो सरचिटणीसपदी निवडून आला आहे. त्याला २५१८ मते मिळाली. त्याने सुबरेश पीए याचा प्रभाव केला. त्याला १ हजार ३५५ मते मिळाली. सतीश म्हणाला, “कॅम्पसमध्ये अशा काही शक्ती आहेत, ज्यांना लोकशाही आवाज दाबायचा आहे. अशा लोकांपासून विद्यार्थी परिषद वाचविण्याची गरज आहे. अशा शक्तींच्या विरोधात आम्ही लढू.”

‘एआयएसएफ’चा सदस्य असणारा एमडी दानिश संयुक्त चिटणीसपदी निवडून आला आहे. त्याला ३ हजार २९५ मते मिळाली. त्याचा प्रतिस्पर्धी असणाऱ्या सुमन्था कुमार साहू हिला १५०८ मते मिळाली.

‘एसएफआय’, ‘एआयएसए,’ ‘डीएसएफ’ आणि ‘एआयएसएफ’ या संघटनांचा समावेश असणाऱ्या संयुक्त डाव्या आघाडीची २०१८ च्या निवडणुकीपूर्वी स्थापना करण्यात आली आणि आघाडीने सलग दुसऱ्या वर्षी सगळ्या जागा जिंकल्या आहेत.

बिरसा आंबेडकर फुले स्टुंडटस असोसिएशन(बापसा)तर्फे अध्यक्ष आणि सरचिटणीस या दोन पदांसाठी उमेदवार उभे करण्यात आले होते. ते तिसऱ्या स्थानावर राहिले. ‘बापसा’तर्फे अध्यक्षपदासाठी जितेंद्र सुना हा उभा होता. त्याला १ हजार १२१ मते मिळाली आणि सरचिटणीस पदासाठी निवडणूक लढविलेल्या वसीम आरएस याला १ हजार २३२ मते मिळाली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0