‘एनआरसी’सारखी ट्रम्प यांची योजना रद्द

‘एनआरसी’सारखी ट्रम्प यांची योजना रद्द

वॉशिंग्टनः अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर काही तासांतच ज्यो बायडन यांनी १७ नव्या आदेशांवर स्वाक्षर्या केल्या. यातील काही निर्णय माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेले होते, ते रद्द केले गेले. या निर्णयात ट्रम्प यांनी अमेरिकेची जनगणना करताना बिगर अमेरिकी नागरिकांना वेगळे करण्याचा निर्णय घेतला होता. तो रद्द करण्यात आला. अमेरिकी नागरिकांची माहिती गोळा केल्यानंतर (जनगणना) त्यावरून मतदानाचा अधिकार देण्याचा हेतू ट्रम्प सरकारचा होता. त्यावरअमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने असहमती दर्शवली होती. सरकार आपला हेतू स्पष्ट करू शकले नाही, असे सर्वोच्च न्यायालयाचे मत होते.

दुसर्या महायुद्धात जपानने अमेरिकेवर हल्ला केला, त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब हल्ला केला होता. या युद्धादरम्यान अमेरिकेत जपानी वंशाच्या नागरिकांना देशातून हुसकावून लावण्याचे प्रयत्न सुरू होते. या इतिहासाची आठवण करणार्या चार याचिका जपानी वंशाच्या चार अमेरिकी नागरिकांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या. त्यावर ट्रम्प सरकार योग्य युक्तिवाद करू शकले नव्हते.

दोन वर्षांपूर्वीच भारतात नरेंद्र मोदी सरकारने राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) अंतर्गत देशातील जनगणना सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. अशा जनगणनेचा दुरुपयोग देशातील अल्पसंख्यांक समुदायावर होणार होता. अशी जनगणना करून मतदानाचा अधिकार देण्याचा सरकारचा प्रयत्न होता. त्यावरून देशभर विरोध झाला होता. अशा स्वरुपाची जनगणना अमेरिकेतही व्हावी म्हणून ट्रम्प यांनी अमेरिकेचे नागरिक व बिगर अमेरिकेचे नागरिक यांची गणना करण्याचा निर्णय जाहीर केला होता. आता हा निर्णय बायडन यांनी रद्द केल्याने अमेरिकेत जनगणना होणार नाही.  

मूळ बातमी

 

COMMENTS