जोएल कोएनचं पडद्यावरचं नाटक

जोएल कोएनचं पडद्यावरचं नाटक

२०२१ मध्ये जोएल कोएनचा ‘दी ट्रॅजेडी ऑफ मॅक्बेथ’ न्यू यॉर्कच्या काही सिनेघरात प्रदर्शित झाला १६१० मध्ये ‘मॅक्बेथ’चा प्रयोग (पहिला?) लंडनच्या ग्लोब न

शैलीदार आद्यनायक
सामाजिक बांधिलकीचा दिग्दर्शक – ख्वाजा अहमद अब्बास
अनुराग ‘डिसेंट’ कश्यप

२०२१ मध्ये जोएल कोएनचा ‘दी ट्रॅजेडी ऑफ मॅक्बेथ’ न्यू यॉर्कच्या काही सिनेघरात प्रदर्शित झाला

१६१० मध्ये ‘मॅक्बेथ’चा प्रयोग (पहिला?) लंडनच्या ग्लोब नाटकघरात झाला होता.

चारशे दहा वर्षाच्या काळात मॅक्बेथचे अगणित प्रयोग जगभरात झाले. अगणीत भाषांत मॅक्बेथची भांषांतरं आणि रुपांतरं झाली. सिनेमा सुरु झाल्यावर मॅक्बेथवर आणि मॅक्बेथच्या रुपांतरावर इंग्रजीत आणि जगभरच्या इतर भाषात शंभरपेक्षा जास्त सिनेमे झाले.

नाटकातल्या आणि सिनेमातल्या लोकांना आयुष्यात कधी तरी शेक्सपिअर करावा, कधी तरी ‘मॅक्बेथ’ करावं असं वाटतंच. प्रत्येकाला ते एक आव्हान वाटतं.

मॅक्बेथमधले संवाद आणि भाषा सोळाशे सालातली आहे. शेक्सपिअरच्या आसपास, लंडनमधे ती भाषा बोलली जात असे. शेक्सपिअरला एक लय आहे, त्याची शब्दांची निवड आणि वाक्य रचना अगदी शेक्सपिअरचीच आहे. चारशे वर्ष शेक्सपिअरची भुरळ आणि गारूड काही जात नाही.

आज एकविसाव्या शतकात ती भाषा समजत नाही, संवाद समजून घेता घेता जीव जातो. अगदी अभ्यासक मंडळी सोडली तर कोणी शेक्सपिअरच्या नादाला लागत नाही. जगभरच्या विद्यापीठांतून शेक्सपिअर कटाप व्हायला लागलाय.

तरीही नाटकातल्या लोकांना, सिनेमातल्या लोकांना शेक्सपिअर, मॅक्बेथ हे आव्हान वाटतं. कारण त्यातली पात्रं, त्या पात्रांची आंतरीक खळबळ आणि घडण हे एक गूढ रहातं आणि ते सार्वकालिक वाटतं.

मॅक्बेथ हा एक जनरल. डंकन या राजाच्या राज्यातला. तो एक युद्ध जिंकून राजाला भेटायला परत येत असतो तेंव्हा त्याला तीन चेटकिणी भेटतात. त्या भविष्यवाणी करतात की मॅक्बेथ राजा होईल, पण कोणीही आईच्या पोटी जन्मलेला माणूस त्याला मारू शकणार नाही.

चेटकीण. भविष्यवाणी. आईच्या पोटी न जन्मलेला. सारं चमत्कारीच. तिथून गोष्ट आणि नाटक सुरु होतं. मॅक्बेथ राजाचा खून करतो. त्याला भीती आणि असुरक्षितता पछाडते. तो मनोरोगी होतो. खून करत सुटतो. शेवटी सीझरीन होऊन जन्मलेला एक माणूस मॅक्बेथला मारतो.

आजच्या भाषेत बोलायचं तर एक थरारपट. माणसाला थरार हवा असतो हे शेक्सपिअरनं हेरलं. नाटकांतून तो थरार देत गेला. तोच थरार प्रत्येक शतकात नाटकवाल्यांना, सिनेमावाल्यांना आणि प्रेक्षकांना हवासा आहे.

सिनेमा हे वेगळं प्रकरण असतं. सिनेमाची भाषा वेगळी असते. सिनेमा पहाणाऱ्यांची रुची वेगळी असते. सिनेमा तयार करण्याची साधनं वेगळी असतात. त्यामुळं नाटक आणि सिनेमा यात खूप म्हणजे खूपच फरक असतो.

नाटकातला फील सिनेमात नसतो आणि सिनेमातला फील नाटकात नसतो.

पोलान्सकीनं मॅक्बेथ केला. तो मंचाच्या पलिकडं गेला होता. २०१५ मधे जस्टीन कर्झेलनं मॅक्बेथ केला, संवाद शेक्सपिअरचे, सिनेमा मात्र कर्झेलचा. लोकांचे पेहराव, घरं, राजवाडे, घोडे, युद्ध, तलवारी सगळं सगळं कर्झेलचं होतं. ग्लॅडियेटरसारखे देखणेपण, स्पेक्टॅकल पात्रं, संवाद सोडले तर त्या सिनेमांत नाटक नव्हतं, नसतं. तिथं सिनेमा होता, असतो.

कोएनचा ‘दी ट्रॅजेडी ऑफ मॅक्बेथ’ हा सिनेमा एक नाटक आहे. ऐंशी नव्वद टक्के नाटक आहे दहा वीस टक्के सिनेमा आहे.

नाटकाप्रमाणंच कोएनच्या सिनेमात पात्रं दुरून दिसतात, क्लोज अप अगदी कमी आहेत. नाटकातही आपल्याला पात्रं दुरून दिसत असतात, अगदी पहिली दुसरी रांग सोडली तर.

नाटकात मंच असल्यानं प्रॉपर्टीबाबत खूपच मर्यादा असतात. ग्लोब नाटकघरात नाटक झालं, तेव्हां नेपथ्य नव्हतं, स्थळ दर्शवण्यासाठी अलिकडं नाटकांत पाठीमागे रंगवलेले पडदे वापरले जातात तसं काही ग्लोबमधे नव्हतं. सिंहासन आणि दरबारी लोकांची आसनं म्हणजे खुर्च्या असत. स्थळ हा राजवाडा आहे किंवा रणांगण आहे हे प्रेक्षकानी कल्पायचं. कपडे आणि तलवारी तेवढ्या खऱ्या वाटाव्यात अशा.

कोएननं नाटकाची मर्यादा हे नाटकाचं बळ आहे असं मानून पडदा हा मंच केला. पडद्यावर राजवाडा दिसतो. म्हणजे काय तर मख्ख खांब, मख्खं भिंती दिसतात. छतावर झुंबरं नाहीत. भिंतींवर पोर्ट्रेट्स नाहीत की शिकार झालेल्या जनावरांची मुंडकी वा कातडं नाहीत. खिडक्या दारं अगदी साधी. कुठंही नाजूक कलाकुसर नाही, ते सारं प्रेक्षकांनी कल्पनेनं रंगवायचं. कपडेही अगदीच सजेस्टिव.

राजाच्या डोक्यावरचा मुकूट म्हणजे सामान्य धातूचं एक वेटोळं. बस.

राजाचं सिंहासन म्हणजे एक उंच पाठीची खुर्ची. बस. सिंहासन नव्हे!

अलिकडं नाटकांत सूचक प्रॉपर्टी वापरली जाते. म्हणजे जंगल दाखवण्यासाठी झाडांचे एकदोन कटाऊट वापतात. घर आहे हे सुचवण्यासाठी दाराची चौकट वापरतात किंवा नुसती खिडकी दाखवतात. सूचकता हे नाटकाच्या नेपथ्याचं एक वैशिष्ट्यं असतं. कोएननं झाडांच्या फांद्या हातात घेतलेले सैनिक दाखवलेत. सैन्यात कॅमूफ्लाज म्हणून सैनिकाच्या हेलमेटवर झाडाची फांदी वापरतात किंवा रणगाड्यावर जाळं टाकून त्यात झाडं खुपसतात. तसंच. नाटकात शेक्सपिअरनं जंगल चालत येतं असं म्हटलंय. कोएननं ते अशा रीतीनं वापरलं.

डेंझिल वॉशिंग्टन आणि फ्रान्सेस मॅक्डॉर्मंड यांच्या प्रमुख भुमिका आहेत. दोघांनीही ऑस्करं मिळवलेली आहेत. त्यांचा अभिनय नाटकातला आहे. दिग्दर्शकानंही तो तसाच चित्रीत केलंय. नाटकात नटनटीची देहबोली दिसत असते, चेहरा दिसत नाही. दी ट्रॅजेडीतही अनेक दृश्य दुरून आहे. सर्वाची शब्दफेक नाटकाला जवळची आहे, नाटकात ती जितकी लाऊड असायला हवी तितकी ठळक आहे.

चित्रपट काळा पांढरा आहेत. दोन्ही रंगांच्या छटा, तीव्र आणि पुसट, अशा आहेत की चित्रपटातली प्रत्येक फ्रेम प्रेक्षकाला खिळवून ठेवते. कला दिग्दर्शन म्हणजे कमालच आहे.

कलाकुसरीचा मागमूसही नसलेलं कला दिग्दर्शन.

कोएननं खूप उंचावरून खाली पहाणारी आणि खूप खालून वर पहाणारी दृश्यं दाखवलीत. मध्ये मध्ये ही करामत करून कोएननं हा चित्रपट आहे याची आठवण प्रेक्षकांना करून दिलीय. नाटकात कॅमेरा नसतो. नाटकात ही करामत करता येत नाही.

जोएल कोएननं पडद्यावर नाटक दाखवलंय.

गेल्या वर्षी लव्हिंग विन्सेंट नावाची फिल्म प्रदर्शित झाली होती. व्हॅन गॉगची निवडक चित्रं घेऊन हज्जारो कॅनव्हास रंगवण्यात आले. हे कॅनव्हास जोडून त्यांना गती देऊन चित्रपट तयार करण्यात आला. पूर्ण चित्रपट कॅनव्हासचा; कॅमेरा स्टुडियोच्या बाहेर गेलाच नाही. चित्रातली माणसं हलती चालती करण्यासाठी ग्रीन स्क्रीन तंत्र वापरून नट आणि चित्रं एकमेकात मिसळण्यात आली.

अभिनेते म्हणून माणसं नाहीत आणि ॲनिमेशनही नाही. एक वेगळाच फॉर्म.

असे चित्रपट स्वतंत्रपणेच पहावे लागतात, त्यांची तुलना इतर चित्रपट शैलीशी करून पहायची नसते.

ज्यानं शेक्सपिअर वाचलेला नाही अशा माणसाला हा चित्रपट पहावासा वाटेल? त्यातल्या संवादांचा अर्थ लावता लावता माणूस थकून जाईल. रंजक करमणूक पहायची सवय असलेल्या माणसाला हा चित्रपट पहावणार नाही. पाच दहा मिनिटांतच तो उठून जाईल नाही तर झोपेल.

नाटकप्रेमी, ज्याला शेक्सपिअरच्या संवादाची चव आणि चटक आहे तो एखादेवेळेस या सिनेमाच्या वाट्याला जाणार नाही.

ज्याला  प्रयोग पहायचा आहे, ज्याला चित्रपट आणि नाटक दोहोंच्या कक्षा रुंदावताना पहायच्या आहेत तो माणूस हा सिनेमा पाहील. नाटक या कलाशैलीचं एक वेगळं रूप, त्या शैलीच्या गाभ्याला हात न लावता चितारलेलं, त्याला पहायला मिळेल.

कोएन बंधू हे एक मजेशीर प्रकरण आहे. जोएल आणि ईथन हे दोघं निर्माते असतात, दिक्दर्शक असतात, पटकथाही लिहितात. प्रस्तुत चित्रपट जोएलनं केला आहे. या मंडळींनी वीस चित्रपट केलेत. एकदोन वगळता सगळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले आहेत. कारण कोएन लोकांची एक स्वतंत्र शैली आहे. दी बिग लबोवस्की आणि फार्गो हे त्यांचे गाजलेले चित्रपट पाहिले तर याची कल्पना येईल. असले चित्रपट करणारा माणूस व्यावसायिक निर्माते किंवा कंपन्याना नको असतो, त्यांच्या चित्रपटावर पैसे गुंतवून बुडायला कोण तयार होईल?

बहुदा ऑस्करच्या अटी पूर्ण करण्यासाठी सुरवातीला चित्रपटाचे काही निवडक शो निवडक सिनेघरात झाले. नंतर चित्रपट ॲपलच्या ओटीटी फलाटावर दाखवला जातोय.

निळू दामले लेखक आणि पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0