एल्गार परिषद प्रकरणः वर्नन गोन्साल्विस यांना डेंग्यूची लागण, रुग्णालयात दाखल

एल्गार परिषद प्रकरणः वर्नन गोन्साल्विस यांना डेंग्यूची लागण, रुग्णालयात दाखल

एल्गार परिषद-माओवादी संबंध खटल्यातील आरोपी असलेल्या ६५ वर्षीय वर्नन गोन्साल्विस या मानवाधिकार कार्यकर्त्याचे वकील म्हणाले, की ते जवळपास १० दिवसांपासून आजारी आहेत. मात्र, तळोजा मध्यवर्ती कारागृहातील कर्मचाऱ्यांनी त्यांना केवळ औषध देत राहून योग्य उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यास नकार दिला होता.

एल्गार परिषद चौकशीत आता ईडी; गडलिंग यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप
दिल्ली दंगल, भीमा कोरेगाव तपासी अधिकाऱ्यांना मेडल
गौतम नवलखा व तेलतुंबडे यांचे जामीन अर्ज फेटाळले

मुंबई : एल्गार परिषद-माओवादी संबंध प्रकरणातील आरोपी कार्यकर्ती वर्नन गोन्साल्विस यांना डेंग्यूची लागण झाली आहे. गोन्साल्विस यांच्या वकिलाने गुरुवारी वैद्यकीय कारणास्तव तात्पुरत्या जामिनासाठी त्याच्या अर्जावर सुनावणी करत असलेल्या विशेष न्यायालयाला ही माहिती दिली.

वकिलाने सांगितले, की त्यांच्या अशिलाला मुंबईतील सरकारी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे.

वकिलाच्या म्हणण्यानुसार, ६५ वर्षीय गोन्साल्विस यांनाही न्यूमोनिया झाल्याचा संशय आहे.

वैद्यकीय कारणास्तव तात्पुरत्या जामिनासाठी गोन्साल्विस यांचा अर्ज विशेष एनआयए (नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी) न्यायालयात प्रलंबित आहे. गुरुवारी याचिकेच्या सुनावणीदरम्यान वकिलाने न्यायालयाला सांगितले की, त्यांच्या अशिलाला डेंग्यू तापाने त्रास होत आहे.

१० दिवसांपूर्वी गोन्साल्विस यांना खूप ताप आला होता. तुरुंगात ते अनेक वेळा बेशुद्ध पडले होते.  मात्र, तळोजा मध्यवर्ती कारागृहातील कर्मचाऱ्यांनी त्यांना केवळ पॅरासिटामॉल दिले आणि रुग्णालयात दाखल करण्यास नकार दिला.

८ सप्टेंबर रोजी त्यांची पत्नी आणि त्यांचे वकील सुसान अब्राहम हे विशेष राष्ट्रीय तपास संस्था (NIA) न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने आदेश जारी केला. त्यानंतर अखेर त्यांना शासकीय जेजे रुग्णालयात नेण्यात आले. तोपर्यंत गोन्साल्विस यांची प्रकृती खूपच बिघडली होती.

जेजे हॉस्पिटलने पुष्टी केली आहे की गोन्साल्विस जवळजवळ दोन आठवड्यांपासून डेंग्यूने ग्रस्त आहेत आणि त्यांना न्यूमोनिया देखील असू शकतो.

गोन्साल्विस यांना पुणे पोलिसांनी २०१८ मध्ये बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायद्यांतर्गत (UAPA) अटक केली होती.

गोन्साल्विस हे एल्गार परिषद प्रकरणात पहिल्यांदा अटक झालेल्यांपैकी एक आहेत. पुणे पोलिसांनी – गोन्साल्विस आणि इतर आरोपी शहरी नक्षलवादी आहेत आणि ते देशविरोधी कारवायांमध्ये सामील होते असा दावा केला होता. राजीव गांधींप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.

७ सप्टेंबर रोजी, वकील आणि गोन्साल्विस यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या आजाराची माहिती मिळताच त्यांनी मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयात तात्पुरत्या जामिनासाठी अर्ज दाखल केला.

गोन्साल्विस यांचे वकील लार्सन फुर्ताडो यांनी अर्जात म्हटले आहे, की ते ७ सप्टेंबर रोजी तळोजा तुरुंगात गेले होते. गोन्साल्विस यांची प्रकृती खराब असल्याची माहिती या प्रकरणातील अन्य आरोपींनी त्यांना दिली.

या प्रकरणातील सहआरोपी असलेले मुंबईतील अधिकार कार्यकर्ते सुधीर ढवळे यांनी फुर्ताडो यांना सांगितले, की ते गोन्साल्विस यांच्या प्रकृतीबद्दल त्यांच्या डायरीत नोंदी करत आहे. नोट्सनुसार, गोन्साल्विस ३० ऑगस्ट रोजी पहिल्यांदा आजारी पडले होते.

नोट्सनुसार, त्याच्या ८ व्या दिवशी फक्त गोन्साल्विस यांची मलेरियासाठी चाचणी करण्यात आली. गोन्साल्विस यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी तुरुंग अधिकाऱ्यांना सांगितले, की हा टायफॉइड किंवा डेंग्यूचा असू शकतो. मात्र, तुरुंग प्रशासनाने तपासणीचे आदेश दिले नाहीत.

अर्जात म्हटले आहे की गोन्साल्विस यांनी तळोजा कारागृह अधिकाऱ्यांकडे ७ सप्टेंबर रोजी हात जोडून विनंती केल्यानंतरच त्यांना जेजे रुग्णालयात नेण्यात आले. येथे त्यांना दोन तासांपेक्षा कमी वेळ ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आणि परत पाठवण्यात आले.

गुरुवारी (८ सप्टेंबर) अखेर एनआयए न्यायालय आणि न्यायाधीश आर.जे. कटारिया यांनी तुरुंग प्रशासनाला तातडीने पुरेशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. गोन्साल्विस यांना आता रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0