लेखक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचे आज सकाळी पुण्यातील पत्रकारनगर येथील त्यांच्या घरी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. आज दुपारी दो
लेखक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचे आज सकाळी पुण्यातील पत्रकारनगर येथील त्यांच्या घरी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते.
आज दुपारी दोन वाजेपर्यंत, पत्रकारनगर येथे त्यांचे पार्थिव, अंतिम दर्शनाकरता ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार केले जातील. अनिल अवचट यांच्या मागे त्यांच्या मुली मुक्ता आणि यशोदा आणि त्यांचा परिवार आहे.
मुळात वैद्यकीय डॉक्टर असले तरी अनिल अवचट यांनी पत्रकार आणि लेखक म्हणून आपली कारकीर्द घडवली. त्यांनी डॉक्टर व्हावे ही त्यांच्या वडीलांची इच्छा होती. ते ओतूरमधून पुण्यात आले आणि मॉर्डन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. १९५९ साली दहावी झाल्यावर फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी इंटर पूर्ण केले आणि पुण्यात बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून ते एम.बी.बी.एस. झाले. याच महाविद्यालयातील मैत्रीण सुनंदा यांच्याबरोबर त्यांनी लग्न केले.
अनिल अवचट यांनी पत्रकार म्हणून मजूर, दलित, भटक्या जमाती, वेश्या यांच्या प्रश्नांविषयी विपुल लिखाण केले आहे. ‘संभ्रम’ हे त्यांचे गाजलेले रिपोर्ताज पुस्तक आहे. ‘माणूस’ सप्ताहिकातून केलेली शोध पत्रकारिता त्यांनी पुस्तक रूपाने पुढे मांडली.
शिल्पकला, चित्रकला, फोटोग्राफी आणि ओरिगामीतून विविध आकार साकारणे हा त्यांचा आवडता छंद होता.
वैद्यकीय व्यवसाय न करता त्यांनी सामाजिक चळवळीमध्ये सहभाग घेतला. सामाजिक क्षेत्रातील अनुभवाशी निगडीत अशा प्रकारचे लेखन ‘साधना’ साप्ताहिकातील वेध या सदरातून त्यांनी केले. साधना व पुरोगामी सत्यशोधक या त्रैमासिकाचे संपादनही त्यांनी केले. युवक क्रांती दलामध्ये असताना बिहारचा अभ्यास करून लिहिलेले, ‘पूर्णिया’ हे त्यांचे पहिले पुस्तक १९६९ मध्ये प्रकाशित झाले. तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केलं. त्यांची ३८ हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली.
विविध व्यसनांनी भरकटलेल्या युवक-युवतींना व्यसनमुक्त करत नव्याने आयुष्य जगता यावे, यासाठी त्यांनी दिवंगत पत्नी डॉ. अनिता अवचट यांच्यासह पुण्यात ‘मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रा’ची स्थापना केली.
मुक्तांगण परिवारातर्फे दरवर्षी डॉ. अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार मिळविणाऱ्यांमध्ये पारोमिता गोस्वामी, गिरीश लाड, आबा महाजन, पुण्याचे पार्किन्सन मित्रमंडळ, चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे, प्रमोद उदारसारख्या मान्यवरांचा समावेश आहे.
त्यांना व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्यासाठी २०१३ साली राष्ट्रीय पुरस्कार, तर २०१८ साली अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला. महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार, तसेच २०१७ साली फर्ग्युसन गौरव पुरस्कार मिळाला होता.
COMMENTS