विंबल्डनविना जुलै महिना

विंबल्डनविना जुलै महिना

दोन महायुद्धांचा काळ सोडला तर अत्यंत प्रतिष्ठेची व टेनिस प्रेमींची विंबल्डन स्पर्धा यंदा कोरोना महासाथीमुळे होत नाहीये. ही घटनाच जगभरातील टेनिस रसिकांच्या मनाला वेदना देणारी आहे.

दरवर्षी जुलैतील दुसरा रविवार हा जगातल्या क्रीडाप्रेमी आणि रसिक विशेषत: टेनिस भक्तांसाठी खास असतो कारण त्या दिवशी असते ती विंबल्डन या टेनिसच्या पंढरीतील पुरुषांच्या एकेरीतील अंतिम मॅच. जगभरातील टेनिस भक्त येथील सगळ्या मॅचेस बघायला हजेरी लावतात आणि त्यातही अंतिम फेरी किंवा फायनल बघणे हा एक खास अनुभव असतो. उर्वरित कोट्यवधी टेनिसप्रेमी तसेच क्रीडा रसिक टेलीविजनवर ही मॅच आवर्जून बघतात. गेली १३३ वर्षे चालणार्‍या या जगप्रसिद्ध टूर्नामेंटमध्ये यावर्षी कोरोनामुळे मात्र खंड पडला. दोन्ही महायुद्धात अर्थातच ही टूर्नामेंट बंद होती. म्हणजेच गेल्या सलग ७५ वर्षात यात कधीही खंड पडला नव्हता.

फ्रेंच आणि यूएस ओपन स्पर्धा तूर्तास होणार

यावर्षी, फ्रेंच ओपन ही ग्रँड स्लॅम स्पर्धा पुढे पुढे नेत आता ती २० सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर तर यूएस ओपन ही स्पर्धा ३१ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर दरम्यान होणार आहे. यात नक्की किती खेळाडू भाग घेतील याविषयी मात्र अजूनही साशंकता आहे. काहींनी चक्क मायदेशी परत आल्यावर क्वारंटाईन रद्द करण्याच्या मागण्या केल्या आहेत. कोरोनाच्या संकटात या दोन्ही टूर्नामेंटस आयोजित करण्याचं खरं कारण आर्थिकच आहे टूर्नामेंटस सुरू होऊ शकल्या नाहीत तर मोठ्या आर्थिक संकटाचा सामना स्पर्धा आयोजकांना व टेनिसपटूंना करावा लागेल.  कोरोंनाच्या काळात सगळेच उलटेपालटे झाले आहे त्याला टेनिस अपवाद कसा असेल? एरवी सगळ्या जगभर टेनिस स्पर्धांचे आयोजन एटीपी (ATP- Association of Tennis Professionals) आणि डब्ल्यूटीए (WTA – Women’s Tennis Association) यांच्या आणि देशोदेशीच्या टेनिस संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने केले जाते.  त्यात  २५०, ५०० आणि १००० पॉईंट्सच्या मास्टर्स स्पर्धा असतात. शेवटी २००० पॉईंट्सच्या चार ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धा असतात.  वर्षाच्या सुरूवातीला ऑस्ट्रेलियन ओपन हार्डकोर्टवर खेळली जाते तर  जूनच्या सुरूवातीस फ्रेंच ओपन क्ले म्हणजे लाल मातीच्या कोर्टवर खेळली जाते. जूनच्या शेवटास आणि जुलैमध्ये खेळली जाते विंबल्डन. ही ग्रास कोर्ट म्हणजे विंबल्डन परिसरातील निगुतीने वाढवलेल्या, कातीव आणि सुंदर हिरवळींवर खेळली जाते. ऑगस्टच्या शेवटी ते सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात खेळली जाते ती यूएस ओपन. या चार स्पर्धा म्हणजे टेनिसचे सर्वात मोठे आणि मानाचे रंगमंच. त्यातील अव्वल दर्जाची, सर्वोच्च आणि अतिप्रसिद्ध टूर्नामेंट म्हणजे विंबल्डन! ही टूर्नामेंट सर्वतोपरी आगळी वेगळी आणि लक्षवेधक आहे ती अनेक कारणांनी.

टेनिसची पंढरी – विंबल्डन

एकतर विंबल्डन ही सगळ्यात जुनी स्पर्धा आहे. तिला १३३ हून कितीतरी अधिक वर्षांचा इतिहास आहे. पूर्वी हे एक गावठाण होते. ते आजही विंबल्डन व्हिलेज म्हणून ओळखले जाते. हा सगळा परिसर नयनरम्य आहे. मुख्य इमारतींच्या भिंतीवर जांभळ्या फुलांनी लगडलेल्या चित्ताकर्षक हिरव्या वेलीं चढवलेल्या. हिरव्या आणि जांभळ्या रंगाच्या उधळणीमुळेच हिरवा आणि जांभळा रंग हे विंबल्डनचे ब्रॅंड कलर्स आहेत. हे ब्रांडिंग सगळीकडे दिसते. येथील चेंडू झेलणारी मुले-मुलीदेखील अगदी उत्तम ट्रेनिंग देऊन तयार केलेली असतात. त्यांचा पोषाखही देखणा तोही या दोन रंगाचा.

इथले आणिक एक वैशिष्ट्य म्हणजे कोर्टावर दिसणार्‍या जाहिरातींचा अभाव. रोलेक्स ही प्रसिद्ध घड्याळांची कंपनी. तिचे नाव दिसते ते मॅचच्या सगळ्या वेळा आणि स्कोअर दाखवणार्‍या बोर्डवर. तसेच चेयर अंपायरचा जो माईक असतो त्याखाली तसेच चेयरच्या मागे सल्झेंजर या टेनिसचे चेंडू बनवणार्‍या कंपनीचे नाव दिसते. गेली ११३ वर्ष ही कंपनी या स्पर्धेला चेंडू पुरवते आहे. आयबीएम ही कंपनी चेयर अंपायरचे स्कोअर नोंदणीचं यंत्र आणि सॉफ्टवेअर पुरवते. बाकी दरवर्षी पंधरा किंवा त्याहून अधिक कंपन्या विंबल्डनला पैसे देत असल्या तरी त्यांची जाहिरात कोर्टमध्ये कधीही नसते. गेल्या वर्षी प्रायोजकांकडून मिळणारे उत्पन्न ५ कोटी डॉलर्स इतके होते.

मुख्य कोर्ट म्हणजेच सेंटर कोर्ट. त्याच्या जवळील लिली असलेलं तळं आणि हेन्मन हिल नावाची छोटी टेकडी हेही प्रेक्षकांचं अगदी आवडतं ठिकाण. क्रीडारसिकांसाठी इथे अनेक खाद्य पदार्थांची रेलचेल असली तरी येथील सगळ्यात प्रसिद्ध म्हणजे स्ट्राबेरिज आणि क्रीम. ही हिरवळीवर खेळली जाणारी स्पर्धा. विंबल्डन येथील गवतांची काळजी घेणारे तज्ज्ञ आहेत. गवताचे कोर्ट हे द्रुतगतीचे कोर्ट असते. यावर बॉल वेगाने उसळला तरी जमिनीवरून फार उंचावर जात नाही. त्यामुळे वेगाने, आक्रमक खेळणार्‍याना हे कोर्ट जास्त यश देते जसे की रॉजर फेडरर किंवा पिट सॅम्प्रस.

येथील स्पर्धा ही सगळ्यात जुनी असल्याने तिला मोठी परंपरा लाभली आहे. येथील नियम अतिशय कडक आहेत. जसे की महिला आणि पुरुष खेळाडूंनी फक्त पांढरा पोशाख करायचा. खेळाडू कधी कधी हा नियम भंग करतात तेव्हा त्यांना ताकीद दिली जाते आणि दंडही ठोकला जातो. ८ वेळा ही स्पर्धा जिंकणार्‍या रॉजर फेडररने एकदा हिरव्या रंगाचे तळवे असलेले बूट घातले होते. त्यावेळी त्याला दंड तर केलाच आणि ते बूट घालण्यास मनाई केली गेली. तसेच हे कोर्ट नको त्या कोर्टावर खेळणार असे खेळाडूंचे लाड किंवा मागण्या ते खपवून घेत नाहीत. जे ठरवले असते ते कसोशीने पाळले पाहिजे असा दंडक. मात्र आधीची मॅच लांबली तरी खेळाडूंना ताटकळत ठेवले जाते कारण नाईलाज असतो. अर्थात कधीकधी पावसाने व्यत्यय आला तर मॅच पुढे ढकलली जाते. सेंटर कोर्टवर आता सरकणारे छत आहे त्यामुळे तिथे फक्त काही मिनिटेच खेळ थांबवला जातो. पंधरवड्याच्या स्पर्धेत पहिल्या रविवारी सुट्टी असते. तीही अगदी दरवर्षी दिली जाते. विंबल्डन येथे १८ कोर्ट आहेत तसेच काही फक्त प्रॅक्टिससाठी असणारे कोर्ट आहेत. प्रॅक्टीस कोर्टाची बुकिंग्स असतात. तिथेही कडक नियम आणि त्यांच्या पालनाची अपेक्षा. खेळाडूंना स्पर्धेच्या आधी व्यवस्थित तयारी करण्यासाठी उत्तम लॉकर रूम्स आहेत जिथे अत्याधुनिक सुविधा असतात. तिथेही आयडेंटिटी कार्डाशिवाय प्रवेश नसतो. तिथेही खेळाडूंकडून उत्तम वर्तनाची अपेक्षा असते.

विंबल्डन येथील आणखी एक आकर्षण म्हणजे तेथील ‘ऑफिसर रुफस’, जो एक ससाणा आहे. त्याला खास ट्रेनिंग देऊन कोर्टवर येणार्‍या कबुतरांना हुसकवण्याची जबाबदारी सोपवली आहे. तो देखील ते काम मोठ्या कौशल्याने करतो. त्याला भरपूर पगार मिळतो आणि त्याची उत्तम बडदास्त ठेवली जाते. इतकेच काय तर त्याचे ट्विटर अकाऊंट देखील आहे. एके वर्षी त्याला कुणीतरी चोरुन नेला. त्यावर फार गहजब झाला. विशेषत: नेटीझेन्सने ओरड केली, आवाज उठवला आणि त्यामुळे दुसर्‍या दिवशी चोराने त्याला चक्क परत जागेवर आणून सोडले.

ब्रिटनमध्ये खेळावरील बेटिंग हे बेकायदा नाही त्यामुळे इथे प्रचंड बेटिंग होत असले तरी त्याची काळी छाया अजूनतरी या खेळावर पडली नाही. याचे मुख्य कारण हा एकट्याने किंवा दोघांनी खेळायचा खेळ आहे तसेच खेळाडूंचे रँक ठरवणारी व्यवस्था अतिशय शास्त्रशुद्ध आणि नेमकी आहे.

चेयर अंपायर हे खेळाडूंना मिस्टर, मिसेस किंवा मिस असे संबोधून मग खेळाडूंची आडनावे घेतात. ही देखील अगदी ब्रिटिश प्रथा. तसेच फेर्‍यांची नावं देखील भारदस्त – Gentlemen’s Singles & Doubles, Ladies Singles & Doubles वगैरे. येथील प्रेक्षक देखील अगदी चोखंदळ आणि टेनिस या खेळाची उत्तम जाण असणारे असतात. त्यामुळे जगातल्या प्रत्येक टेनिसपटूंचे इथे खेळण्याचे स्वप्न असते. येथील प्रेक्षक जर एखाद्या खेळाडूला डोक्यावर घेत असतील तर तो उत्तम टेनिस खेळतो हे गृहीत धरण्यात हरकत नाही कारण खरोखरीच तेथील प्रेक्षकवर्ग जाणकार आहे.

येथील विजेत्याचे चषक आणि विजेतीची प्लेट यांना देखील इतिहास आहे. ही स्पर्धा जिंकली की चषक किंवा प्लेटवर त्या खेळाडूचे नाव कोरले जाते तसेच विजेत्याचे नाव हिरव्या बोर्डवर छापले जाते.  हा देखील या सोहळ्याचा एक रम्य भाग आहे. केंट परगण्यातील ड्यूक किंवा डचेसलाच चषक देण्याचा अधिकार आहे. तो सोहळा या स्पर्धेचं सर्वोच्च क्षण.

कोरोनाच्या काळात यूएस ओपन आणि फ्रेंच ओपन यांनी या टूर्नामेंटस होतील अशी भूमिका घेतली. विंबल्डनने मात्र ही स्पर्धा सरळ पुढल्या वर्षी होईल असे जाहीर केले. त्यांनी म्हटले की देशोदेशीचे खेळाडू, व्यवस्थापक, प्रेक्षक इथे येतात तेव्हा आम्हाला कसलीही जोखीम घ्यायची नाही. तेव्हा जर लस नसेल तर टेनिस खेळले जाणार नाही असे त्यांनी जाहीर केले. मुख्य म्हणजे पारितोषिकांची रक्कम सगळ्या खेळाडूंना सारखी वाटली देखील. या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून स्त्रिया आणि पुरूषांच्या पारितोषिकांची रक्कम ही समान केली ती पहिल्यांदा विंबल्डनने! कडक नियम, परंपरेचे काटेकोर पालन आणि समानता तसेच लोकशाहीवादी समतोल भूमिका आणि प्रचंड लोकप्रियता त्यामुळेच सर्वार्थाने ही टेनिसची पंढरी आहे यात कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही.

टेनिस या खेळाचा उगम आणि विकास

एकंदरीत टेनिस हा लहान आणि मोठ्यांना आवडणारा सुंदरसा खेळ. त्याची जन्म कथाही अगदी सुरस आणि चमत्कृतीपूर्ण आहे.

हा खेळ हजार -अकराशे वर्षांपूर्वी खेळला जात असे. त्यावेळी हा खेळ अर्थातच अगदी प्राथमिक स्वरुपात खेळला जाई तो प्रामुख्याने इजिप्त, ग्रीस आणि रोममध्ये. असे असले तरी सगळे इतिहासकार हे मानतात की साधारणपणे हजार वर्षांपूर्वी फ्रेंच मठात (monasteries) या खेळाचा जन्म झाला. तेथील साधक (monks) हा खेळ खेळत. त्याला ‘हाताचा खेळ’ असे म्हटले जाई. लाकडी चेंडू भिंतीला आडव्या बांधलेल्या दोरीवरून ते हाताने टोलवत असत. इतिहासकार असेही मानतात की tenez या फ्रेंच भाषेतील शब्दापासून टेनिस हा शब्द आला आहे या शब्दाश: अर्थ आहे ‘हे घे किंवा घ्या’.

पुढे अनेक शतके या खेळाची लोकप्रियता वाढत गेली संपूर्ण युरोपभर. तेराव्या शकतात जवळजवळ १८०० कोर्ट युरोपात होती असे मानले जाते. पुढे हा खेळ लेदर बॉल आणि वल्हीसारखी बॅट घेऊन खेळला जाऊ लागला. काही फ्रेंच राज्यकर्त्यांनी या खेळावर बंदी आणायचा प्रयत्न केला तर काहींनी प्रोत्साहन दिले. लवकरच तो खेळ इंग्लंडला पोचला. सातव्या आणि आठव्या हेन्री यांनी या खेळासाठी अनेक कोर्ट देशभर उभी केली. त्याकाळी लहानखुर्‍या बंदिस्त कोर्टात हा खेळ खेळला जाऊ लागला. मात्र १७०० व्या शतकात या खेळाची लोकप्रियता बरीच ओसरली.

अचानकपणे १८५० साली या खेळाला नवसंजीवनी मिळाली ती एका शोधामुळे. चार्ल्स गुडइयरने (Charles Goodyear) नैसर्गिक रबर अधिक टिकाऊ आणि वापरायला उत्तम प्रकारचे करता येईल याची एक पद्धत शोधली. या शोधामुळे उसळणारे किंवा टप्पा पडणारे चेंडू तयार करता येऊ लागले. परिणामी हे चेंडू बंदिस्त कोर्टात न खेळता बाहेर गवतावर खेळता येऊ लागले. पुढे १८७४ साली सर क्लॉप्टन विंगफील्ड यांनी टेनिस या खेळाचे नियम, चेंडू आणि खेळाची रॅकेट तसेच कोर्टाचा आकार देखील ठरवला. या खेळला त्यांनी नाव दिले होते स्फेअरस्टिक. तसेच त्याच वर्षी टेनिसची कोर्ट अमेरिकेत उदयास झाली. तसेच रशिया आणि कॅनडात देखील हा खेळ पोचला.

१८७७ साली ऑल इंग्लंड क्रौकी क्लबला तेथे काही सुधारणा करायच्या होत्या. त्यासाठी पैसा उभा करायला लागणार होता. तेव्हा क्रौकीचे (croquet) कोर्ट टेनिस कोर्टात सहज रूपांतरीत करता येईल म्हणून त्यांनी पहिली टेनिस स्पर्धा लंडन जवळील विंबल्डन नामक गावठाणात आयोजित केली. ती लवकरच लॉन टेनिस नावाने ओळखली जाऊ लागली जी अजूनही इतिहास घडवते आहे. १८७७ पासून ते आजतागायत ही स्पर्धा हा क्लब भरवते आणि तिची लोकप्रियता आणि महत्त्व तसूभर कमी झाले नाही तसेच तिचे ऐश्वर्य अजूनही वृद्धिंगतच होते आहे.

त्याकाळी उमराव आणि राजघराण्यातील मंडळी हा खेळ खेळत त्यामुळे त्याचे स्वरूप बर्‍याच अंशी राजेशाही झाले असावे. कारण तीन गेम खेळले की खेळाडूंनी थोडीशी विश्रांती घ्यायची, तेही अगदी छान खुर्चीत किंवा बाकावर बसून. तसेच हा खेळ खेळताना घाम येतो, तो पुसायला टॉवेल द्यायला माणसे असे सगळे अजूनही या खेळात आहे. एकंदरीत घरंदाज जातकुळीचा म्हणावा असा हा खेळ. त्यामुळे त्यात कुठेही आडदांडपणा दिसत नाही, कुठे धक्काबुक्की नाही की मारामारी नाही. सगळं कसं नीटनेटकं, आखीव रेखीव, आदबशीर आणि जरासे निवांतच म्हणता येईल असे आणि अगदी राजेशाही.

वेगवेगळ्या खेळात विविध आकारांचे चेंडू, त्यांचा प्रेक्षकवर्ग आणि त्यांची आर्थिक स्थिती यावरून मार्केटिंग

असे म्हटले जाते की विविध खेळांच्या चेंडूच्या आकारावरून ते खेळ खेळणार्‍या आणि बघणार्‍या माणसांचे सामाजिक स्थान आणि आर्थिक परिस्थिती कळते. फुटबॉल खेळणारे खेळाडू नवश्रीमंत असले तरी तो खेळ आवडणारा वर्ग मुख्यत: कष्टकरी तसेच कनिष्ठ मध्यम वर्ग असे मानले जाते. हा खेळ जरी ‘ब्यूटीफूल’ गेम मानला गेला तरी तो अगदीच प्राथमिक स्वरूपाचा खेळ आहे जो पूर्वी श्रमिक वर्गात फार लोकप्रिय होता आणि अजूनही आहे. मग येतात ते बास्केटबॉल, रग्बी वगैरे हे खेळ. जे प्रामुख्याने आवडतात ते साधारणपणे निम्न मध्यमवर्ग आणि मध्यमवर्गातील लोकांना. त्यानंतर येतं ते क्रिकेट आणि टेनिस जे मध्यमवर्ग, उच्च मध्यमवर्ग आणि काही प्रमाणात उच्चभ्रू वर्गातील लोकांना अतिशय आवडतात आणि हे खेळ ते हौस म्हणून खेळतात.  शेवटी येतो तो गोल्फ हा खेळ जो फक्त उच्चभ्रू आणि अतिश्रीमंत लोकांना आवडतो. केवळ तेच लोक तो प्रामुख्याने खेळतात. अर्थात हे सगळे ढोबळमानाने म्हटले जाते.

ही वर्गवारी जाहिरात, मार्केटिंग तसेच व्यवस्थापन क्षेत्रातल्या चतुर आणि अतिशय धूर्त मंडळींनी हेरली आणि त्याचा पुरेपूर वापर केला हे लक्षात घ्यायला हवे. यातील महत्त्वाचा मुद्दा हा आहे की वरील वर्गवारीवरून या सगळ्या खेळांचे नेमके “मार्केट” कोणते हे ठरवले जाते आणि त्यानुसार “योग्य” त्या जाहिरातींचा मारा त्या त्या वर्गांवर केला जातो. आपल्या कडील 20-20 मॅचेस किंवा आयपीएल, क्रिकेटच्या इतर स्पर्धा यातील जाहिराती आठवा, लगेच संगती लागेल. त्यातही तरुण प्रेक्षक किती, मध्यम वयाचे किती याचाही विचार केला जातो. त्यामुळे मोबाईल फोनच्या जाहिराती तसेच फोनची सुविधा देणार्‍या कंपन्याची भली मोठी रांग IPL स्पर्धात प्रायोजक म्हणून दिसून येते ती यामुळेच.

टेनिस – एक व्यावसायिक, प्रचंड आर्थिक उलाढाल असलेला खेळ

१९६८ साली टेनिस ‘ओपन’ झाले. म्हणजेच खेळाडूंनी कंपन्याकडून मदत घेणे, त्यांच्या जाहिराती करणे वगैरे गोष्टींना परवानगी दिली. हे एक प्रकारचे उदारीकरण म्हणता येईल कारण त्याआधी बंधने होती. ती सगळी शिथिल करण्यात आली आणि आधुनिक टेनिस या व्यावसायिक खेळाचा उदय झाला. टेनिस बनले एक प्रचंड मोठे एंटरप्राइज ज्यात अब्जावधी डॉलर्सची निर्मिती आणि उलाढाल होते.

काही वर्षातच लाकडी रॅकेट जाऊन धातूची मूठ आणि पुढे पूर्ण धातूंच्या रॅकेटस आल्या. हे तयार करणार्‍या काही मोठ्या कंपन्या आहेत. चेंडू करणार्‍या कंपन्या उदयास आल्या. तसेच रॅकेटच्या तारा घालणारी मशीन्स आली. खेळाडूंचे पेहराव करणार्‍या कंपन्या तर आल्याच आणि त्यासाठी जगभरातील मोठ मोठे ड्रेस डिझाईनर्स देखील काम करू लागले. बुटांच्या मोठ्या कंपन्या तयार झाल्या. कोर्ट प्रमाणे बुटांची निवड करता येईल इतकी विविधता बुटात आली. त्यातही हजारो प्रकारची डिझाईन्स तयार होऊन वैविध्य आले. त्याचबरोबर रॅकेट ठेवण्यासाठी बॅगा तयार याच कंपन्या करू लागल्या. इतर कंपन्या देखील यात उतरल्या. बुटांच्या कंपन्याच हँड बँडस, बंदाना (डोक्यावरील पट्टी) तयार करू लागल्या.

या सगळ्याबरोबर स्पोर्ट्स मेडिसिनमधील विकास, त्यातील तज्ज्ञ याच्याशी जोडले गेले. तसेच खेळाडूंचा फिटनेस, शारीरिक तंदुरुस्ती आणि क्षमता वाढवणारी फिटनेस इंडस्ट्री आणि त्यांची मशीन्स, उपकरणे वगैरे यांचा जसजसा विकास होता गेला ते सगळे या खेळात अंतर्भूत झाले.

अनेक माजी खेळाडू नवोदित खेळाडूंना कोचिंग देऊ लागले. त्याचबरोबर अनेक क्षेत्रातील जसे कंडिशनिंग कोचेस, फिटनेस ट्रेनर्स, फिजिओ देखील या खेळाडूंबरोबर काम करू लागले. त्यामुळे या खेळाला अतिशय शिस्तबद्ध असे व्यावसायिक स्वरूप आले.

असा एक प्रचंड उदीम तयार व्हायला महत्त्वाची असते ती खेळाची वाढती लोकप्रियता आणि स्टार खेळाडूंची निर्मिती. हे होण्यासाठी एका मोठ्या इंडस्ट्रीची गरज असते ती म्हणजे वर्तमानपत्र, टेलिविजनसारख्या माध्यमांची. त्यात आता आयटी, इंटरनेटच्या आणि मोबाईल संप्रेषण तंत्रज्ञान यांच्या आधाराने उदयास आलेले सगळे सोशल मीडिया वगैरेची मोलाची भर पडली आहेच.

१९६८ पासून आता पर्यंत रॉड लेव्हरपासून टेनिसमधील मोठे स्टार्स नेमाने उदयास येऊ लागले. जसे की आर्थर अ‍ॅश, मार्गरेट कोर्ट, बिली जीन किंग, बियॉन बोर्ग, जॉन मॅकेनरो, जिमी कॉनर्स, बोरिस बेकर, स्टीफन एडबर्ग, एव्हान लेंडल, ख्रिस एव्हर्ट, मार्टिना नवरातिलोवा, स्टेफी ग्राफ, आंद्रे आगासी, पिट सॅम्प्रस, जिम कुरीयर, मोनिका सेलीस, मार्टिना हिंगिस, व्हीनस आणि सेरेना विलियम्स, अॅंडी रॉडिक, मारीया शारापोवा, रॉजर फेडरर, राफाएल नदाल, नोवॉक जोकोविच, अॅंडी मरी हे सगळे जगप्रसिद्ध स्टार्स. भारतातील विजय अमृतराज, लिअँडर पेस आणि सानिया मिर्झा हे देखील आशिया खंडातील स्टार्स मानले जातात.

या सगळ्या प्रभावळीत बोर्ग, सॅम्प्रस, आगासी, स्टेफी ग्राफ, सेरेना विलियम्स, मरिया शारापोवा, रॉजर फेडरर, राफाएल नदाल, नोवॉक जोकोविच हे या खेळाचे सुपर स्टार्स म्हणता येतील असे आहेत. दीडशेच्यावर इतर लहान मोठ्या स्पर्धा तसेच ३९ ग्रँड स्लॅम रॉजर फेडरर आणि राफाएल नदाल दोघांनी मिळून अर्थातच स्वतंत्रपणे जिंकल्या आहेत. हे दोघे टेनिस या खेळाचे राजदूत आणि महान खेळाडू आहेत. त्यातही रॉजर फेडरर याने टेनिस या खेळाला कलात्मक आयाम देऊन तसेच अभिजात आणि नितांत सुंदर खेळ कसं खेळावा याचा दंडक घालून दिला आहे. त्याचबरोबर अतिशय उत्तम, नेमस्त वागणूक, जबाबदार वावर आणि उत्कृष्ट व्यावसायिकतेचा संगम दाखवून टेनिस खेळाची लोकप्रियता आणि लोकमान्यता शिगेला नेली आहे. आता नवोदित स्टार्स जसे डॉमिनिक टिम, साशा झेरेव्ह, स्टिफॅनोस त्सित्सिपास, दानील मेद्वेदेव वगैरे देखील खूप मोठे होतील असे वाटते.

सुमारे हजार वर्षांपूर्वी फ्रेंच मोनॅस्ट्रीत जन्माला आलेला हा साधा खेळ होता. तो आता आधुनिक टेनिसच्या रूपात व्यवसायिकता, तंत्रशुद्धता, अति उत्तम फिटनेस व शारीरिक क्षमता आवश्यक असणारा तसेच पैसा, यश, प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवून देणारा एक नितांत सुंदर खेळ, व्यवसाय आणि क्रीडा क्षेत्र म्हणून उदयास आलेला आहे.

गायत्री चंदावरकर, या इन्स्ट्रक्शनल डिझाइन कन्सल्टंट असून पुणे विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापिका आहेत.

COMMENTS