एका आत्महत्येचे गूढ …

एका आत्महत्येचे गूढ …

मोहमयी जगाचे नियम भयंकर असतात, तिथे आपला तारा सतत चमकत ठेवतांना मोजावी लागणारी किंमत आपल्या कल्पनेपलीकडची. सतत चिरतरुण, सुंदर दिसणे या झगमगत्या जगाचा अलिखित नियम आहे.

अरुणाचलमध्ये चीनने गांव वसवले
रस्त्यावरील मुले गेली कुठे?
अभिनंदन वर्धमान वीर चक्र पुरस्काराने सन्मानित

अम्लान सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री फेडोरा ही रेल्वेच्या खाली झोकून देऊन आत्महत्या करते आणि या बातमीने हॉलिवूडविश्व हादरते. साठीच्यापुढे वय असलेली फेडोरा अगदी तिशी- बत्तीशीची दिसत असे. तिच्या या सौंदर्याचे निस्सीम चाहते जगभर असतात. मृत्यनंतरही तिचे सौंदर्य कमी झालेले नसते. तिच्या अंत्यदर्शनासाठी भली मोठी रांग लागते. त्या रांगेत निर्माता बॅरी डच पण असतो. तिचे अंत्यदर्शन घेत असताना त्याच्या मनात विचारांचे काहुर माजते. दोन आठवड्यापूर्वीच त्याने ‘ॲना करेनिना’ या भूमिकेसाठी फेडोराकडे विचारणा केली होती. तिची आत्महत्या नसून हा खून आहे व हा खून तिच्या जवळपासच्या ‘चौकडीनेच’ केला आहे, असे त्याला ठामपणे वाटत असते.

त्याला कारणही तशीच घडलेली असतात.

फेडोराच्या कारकिर्दीचा आलेख हा सरळ नसतो. काही वर्षे सलग काम करून मध्येच अज्ञातवासात जाते. तिचे पुनरागमन होते, ते तिला मिळालेल्या विशेष ऑस्करमुळे. एका बेटावर राहात असलेल्या फेडोराला तो पुरस्कार तिच्या आग्रहावरून बेटावरील एका जागेत प्रदान केला जातो. या प्रसंगाचे फोटो प्रसिद्ध होतात. आणि फोटोमधील तिचे अबाधित सौंदर्य बघून सर्वच अवाक होतात. तिला भूमिकेसाठी मागणी यायला सुरुवात होते. आणि फेडोराचे शानदार पुनरागमन होते. दोन-तीन चित्रपट केल्यावर परत ती अज्ञातवासात जाते. इकडे बॅरी डच आपल्या नव्या सिनेमाची जुळवाजुळव करत असतो, त्या भूमिकेसाठी त्याला फेडोराच हवी असते. भूमिका वाचून ती काम करण्यास नक्की तयार होईल, याची डचला खात्री असते. आणि तो फेडोराचे वास्तव्य असलेल्या बेटाजवळच्या खेड्यात मुक्काम करतो. आणि विचित्र घटनांना सुरवात होते.

हवेलीतून त्याला फेडोरा बाहेरगावी गेली आहे, असे खोटं सांगण्यात येतं. हवेलीच्या मागील एका आडवाटेने डच एका भागात पोहचतो तर त्याला दिसते की फेडोरा तिथेच आहे. फेडोराच्या अवतीभवती असणारी तिची ‘खास माणसं’ तिच्यावर हुकूमत गाजवत आहेत. ती ओरडत, रडत भेकत असते. दुसऱ्या दिवशी बाजारात फेडोरा त्या लोकांना चकवा देत, एका दुकानात शिरते. डच तिचा पाठलाग करत तिथे पोहचतो तर ती त्याला ओळखत नाही. नंतर त्याच्याकडून पैसे उसने घेऊन ‘काहीतरी’ विकत घेते. डच तिला भूमिकेबद्दल सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा तिची केअरटेकर आणि शोफर येऊन तिला बळजबरीने घेऊन जातात.

हॉटेलमध्ये तिच्या खाजगी डॉक्टरची अचानक भेट होते. जो तिच्या तब्येतीची आणि सौंदर्याची काळजी घेत असतो. त्याच्या कोटात आपलं लिखाण ठेवून ते फेडोरापर्यंत पोहचवण्यात डच यशस्वी होतो. आणि त्याला फेडोराच्या हवेलीतून भेटीचे आमंत्रण येत. तिथे व्हीलचेअरवर बसलेली एक म्हातारी बाई, जी एका सावकाराची विधवा आणि त्या हवेलीची मालकीण असते, ती आपल्या कठोर स्वरात डचला सुनावते की फेडोराची मनःस्थिती ठीक नाहीये, कृपा करून तू इकडे येऊन नवीन गोंधळ घालू नकोस! तू पाठवलेल्या स्क्रिप्टमधील ‘ॲना करेनिना’ रेल्वेखाली जीव देते हा शेवट अतिशय चुकीचा व भयावह आहे. असे कोणी आपले सौंदर्य संपवत नसते.

तितक्यात फेडोरा जिन्यावरून खाली येते. सौंदर्याला वेगळे परिमाण देणारे हे कथानक तिला भावतं. सौंदर्याच्या वरवरच्या कल्पना तिला झुगारून द्याव्याशा वाटतात. ती ही भूमिका करायला तयार होते. आपल्याबरोबर मायकल यॉर्क याला सहकलाकार म्हणून चित्रपटात घ्या, असे आवर्जून सुचवते. तिच्यातील तो उत्साह बघून डच खुश होतो. पण तिची अगदी पहिल्या चित्रपटापासून सावलीसारखी सोबत करणारी केअरटेकर येते आणि तिला बळजबरीने आत घेऊन जाते. फेडोरा परत ओरडायला, किंचाळायला लागते. तेव्हा डॉक्टर त्याला तुम्ही या भूमिकेसाठी तिचा विचार करू नका, असा सल्ला देतात. तो आपल्या हॉटेलमधील खोलीत येतो तर फेडोरा त्याच्या रुममध्ये असते. ती त्याला सांगत असते की ही लोकं मला कोंडून ठेवतात. ड्रग्ज देतात. मी सतत नजरकैदेत असते. ती त्याच्याकडे मदतीची याचना करते. पण डॉक्टर आणि शोफर येऊन तिला पकडून परत घेऊन जातात.

दुसऱ्या दिवशी तिला सोडवण्यासाठी डच तिच्या हवेलीत जातो तर हवेली रिकामी असते. तितक्यात फोनची रिंग वाजते. फोनवर त्याला फेडोराबद्दलची काही माहिती मिळत असतांनाच मागून शोफर डोक्यात काठी मारून त्याला बेशुद्ध करतो. एका आठवड्याने तो शुद्धीवर येतो, तेव्हा कळत की फेडोराने आत्महत्या केली आहे. अंत्यदर्शनाच्या वेळेतील मध्यंतरात ‘त्या चौकडी’ला भेटून जाब विचारतो. तेव्हा अत्यंत शांत स्वरात ती म्हातारी विधवा सांगते, “मेली ती फेडोरा नाहीये.”

हे ऐकून डच बुचकळ्यात पडतो. तो कॉफीनमधील शांत झोपलेल्या फेडोराकडे बघतो. तेव्हा ती म्हातारी सांगते की तू तिचे हात बघ, ते किती तरुण आहेत. चेहेरा तरुण दिसू शकतो पण हात नाही. ती सतत हातमोजे वापरत होती कारण आपले म्हातारे हात झाकण्यासाठी नव्हे तर तरुण हात कोणच्या नजरेस पडायला नको म्हणून. खरी फेडोरा मी आहे. मेली ती माझी मुलगी ॲन्टोनिया आहे. माझ्या चेहऱ्यावरील शस्त्रक्रिया फसली, मी विद्रुप झाले. ओव्हर डोसमुळे अधिक म्हातारी आणि अपंग झाले. त्यामुळे मी सर्वांपासून दूर गेले.

ऑस्कर प्रदान करते वेळी माझ्याऐवजी मुलीला उभे केले. माझे विद्रूप रूप मला जगासमोर आणायचे नव्हते. कारण लोकांच्या मनात माझी सुंदर छबीच कायम राहायला हवी.

मग आपल्याला सर्व घटनांचा उलगडा होत जातो. ऑस्कर घेण्याचा खेळ तेवढ्या पुरताच मर्यादित राहिलेला नसतो. जसजशी भूमिकेबद्दल विचारणा वाढत जाते, तशी एक आसुरी योजना आकारास येते. ॲन्टोनियाला फेडोरा बनवून पुढे करण्याचा निश्चय होतो. ती सुद्धा हे धाडस करायला प्रचंड उत्सुक असते. ॲन्टोनियाच्या असणाऱ्या वयापेक्षा, ती थोडी मोठी दिसण्यासाठी शस्त्रक्रिया केली जाते. ती आईच्या देखरेखीखाली चित्रपटाचा अभ्यास करून, चांगली तयारी झाल्यावर, ‘फेडोरा’ बनून ती जगासमोर येते. मिळणारा आयता मानसन्मान, प्रसिद्धी, कौतुक ॲन्टोनीयाला हवाहवासे वाटते. पण जग ‘फेडोरा’च्या दिसण्यावर मंत्रमुग्ध झाले असते, अगदी तिचा तरुण सहकलाकार मायकल यॉर्क ‘फेडोरा’च्या प्रेमात पडतो. (ॲन्टोनिया मायकलच्या) आणि तिथेच घोटाळा होतो. फेडोरा बनलेल्या ॲन्टोनियाला आता स्वओळख हवीशी वाटते. तिच्या तारुण्यसुलभ भावना जागृत होतात. ती मायकलला सर्व खरं सांगून, आपलं आयुष्य नव्याने जगू इच्छिते. पण यामुळे फेडोराची कीर्ती पणाला लागणार असते. या फसवेगिरीची मोठी किंमत ‘फेडोरा’च्या लोकमानसातल्या प्रतिमेला मोजण्याची वेळ येते तेव्हा ॲन्टोनियाला बेटावर परत आणले जाते. शाळेत असताना लागले ड्रग्जचे व्यसन मध्यंतरी सुटलेलं असतं. ते परत सुरू होतं. म्हणून बाजारात डचकडून उसने पैसे घेऊन जे ‘काहीतरी’ विकत घेते ते ड्रग्ज असत. तिचे ड्रग्जचे व्यसन सुटावे, म्हणून तिला दवाखान्यात भरती करतात. तिथे तिला उमजते की आता यातून सुटका नाही. मायकल आपल्याला मिळणं शक्य नाही. आणि आपण ॲन्टोनिया म्हणून जगू शकणार नाही. आपण मेल्याशिवाय फेडोराचा अवतार संपणार नाही. ‘ॲना करेनिना’च्या शेवटासारखा आपला शेवट करून घेते.

हे सर्व ऐकून डच चक्रावतो. जगासमोर सत्य आणायचा विचार करतो. पण पूर्वी अगदी थोड्या काळापुरती फेडोराशी झालेली जवळीक आठवते. जे झालं ते बदलणारे नसते. तो गप्प बसायचा निर्णय घेतो. सहा महिन्यानंतर वृत्तपत्राच्या एका छोट्याशा कोपऱ्यात म्हाताऱ्या विधवाबाईच्या मरणाची बातमी येते. जी फारशी कोणी वाचत नाही…

१९७८सालच्या या चित्रपटाची कथा आताच्या काळात फिल्मी वाटत असली तरी त्याची हाताळणी अतिशय संयमित आणि प्रभावीपणे केली आहे. गुढतेकडे जाणारे हे कथानक मानवी क्लिष्ट मनोव्यापारांबद्दल भाष्य करते. जरी चित्रपटातील आत्महत्येचे गूढ उलगडले असले तरी माणसांच्या वागण्यातले गूढ कायम रहाते. फेडोराच्या निमित्ताने समाजातील काही मानसिकतेवर विचार करायला हवा.
आख्यायिका बनलेल्या फेडोराचा आपल्या नावाभोवती असलेले वलय अबाधित राहावे म्हणून चालला आटापिटा हा सुन्न करणारा.
मोहमयी जगाचे नियम भयंकर असतात, तिथे आपला तारा सतत चमकत ठेवतांना मोजावी लागणारी किंमत आपल्या कल्पनेपलीकडची. सतत चिरतरुण, सुंदर दिसणे या झगमगत्या जगाचा अलिखित नियम आहे. मग नाक, ओठापासून अगदी केस, दात, स्तनांचा आकार

अशा शरीराच्या अनेक भागांवर शस्त्रक्रिया केल्या जातात. मनाजोगत रूपडं प्रदान केले जात. या ग्लॅमर जगातील अधिक लोकं बी. डी. डी. या मनोविकाराचे बळी असतात. बी.डी.डी म्हणजे Body Dysmorphic disorder.

बी.डी.डी हा मनोविकार हा फक्त ग्लॅमर दुनियेपुरता मर्यादित नाहीये. अगदी सर्वसामान्य माणूसही या विकाराने पछाडलेला असतो. आपल्या दिसण्याला अवाजवी महत्त्व देणे, मंत्रचळ लागल्यासारखा सतत आरशात बघणं, आपल्या शरीरातील वैगुण्य शोधत बसणे, नसलेलं वैगुण जाणवणे, ते दिसू नये म्हणून सतत उपाययोजना करत राहणे. अशी बरीच दिसण्याशी संबंधित असणारी लक्षणे यात आढळतात. त्याची तीव्रता कमी अधिक स्वरूपात असली तरी सरासरी पन्नास जणांमागे एक व्यक्ती बी.डी.डीचा रुग्ण असतो. केवळ स्टार लोकचं नाहीत तर अशी बी.डी.डीग्रस्त सर्वसामान्य लोकं सुद्धा अहोरात्र आपल्या दिसण्यावर विचार करत असतात. अशी लोक एकलकोंडे बनतात. मानसिक विकारामुळे होणाऱ्या आत्महत्येपेक्षा बी.डी.डी रुग्णांचे आत्महत्येचे किंवा तसा प्रयत्न करणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे.
मर्लिन मन्रो, मायकल जॅक्सन, स्वतःवर सतत सर्जरी करणारे कलावंत, मॉडल्स हे बी.डी.डीचे शिकार आहेत.

मायकल जॅक्सनचे हे वेड तर पराकोटीला पोहोचले होते. त्याच्या नैसर्गिक दिसण्यापासून कोसो दूर गेलेला त्याचा चेहरा बी.डी.डीचा ढळढळीत पुरावा आहे.

या लोकांना प्रसिद्धीच्या मृगजळाच्या मागे धावत आपला ऊर फोडून का घ्यावासा वाटतो? आपलं वय, सौंदर्याची उतरतीकळा स्वीकारणे फेडोराला का सहजशक्य होत नाही? आई म्हणून सुद्धा ती आपल्या मुलीचा विचार करत नाही. यशाच्या शिखरावर असताना ती ॲन्टोनियाकडे दुर्लक्ष करते आणि नंतरच्या काळात तिच्यावर वर्चस्व गाजवते.

पुरुला तारुण्याच्या बदल्यात राज्य देऊन, त्याला आपले म्हातारपण देणारा ययाती आणि आपले नाव चिरतरुण राहण्यासाठी आपले वलयांकित राज्य देऊन त्या बदल्यात ॲन्टोनियाचे सत्व नाहीसे करणारी फेडोरा हे एकाच जातकुळीची माणसं!

वाकला देह वाकली इंद्रिये दाही
चिरतरुण राहिली देहातील वैदेही
मन नाचविते अन नेसविते तिज लुगडी
मन नपुंसक खेळे शृंगाराची फुगडी
                               – रॉय किणीकर

डेरेदार वृक्षाखाली वाढणारी रोपटी ही खुजी होतात, तशी ॲन्टोनिया. स्वतःचे आयुष्य फुलवण्याची ताकद नसलेली. आपण होऊन बोन्साय झालेली. त्याच्या विरूद्ध ‘द प्रिन्सेस डायरीज्’ मधील मिया. आपली मूळ ओळख कोणत्याही किंमतीत न सोडणारी. राजकन्या म्हणून तिची ओळख पटण्याच्या आधी जगत असलेल्या साध्या आयुष्याला ठामपणे चिटकून राहाते. राज्यकन्या म्हणून वावरतांना नेमकी काय किंमत चुकवावी लागणार आहे, याची सुस्पष्ट  जाणीव मियाला असते. त्यासाठी बंडखोरी करणारी. ॲन्टोनिया बंडखोरी करते पण चुकीच्या पद्धतीने.

फेडोराचे सौंदर्य अबाधित ठेवण्याचे वेड आणि अन्टोनियाची चुकीच्या पद्धतीने बंड करण्याची वृत्ती या दोन्ही एकत्रित आढळतात त्या लेडी डायनात. तिलाही बी.डी.डी अंतर्गत असलेला ‘ब्युलिमिया’ हा विकार जडला होता. आपली शरीरयष्टी नीट राहावी म्हणून खाल्लेलं अन्न उलट्या करून काढण्याची मानसिकता म्हणजे ब्युलिमिया. लेडी डायना आपण सदोदित सुंदर दिसावे म्हणून पछाडलेली होती. त्याच बरोबर स्वतःचे आयुष्य बेधुंद होऊन जगण्याची बेफिकिरी तिच्यात ठायीठायीने भरली होती. आपली बंडखोरी नीट हाताळता न आल्याने, ती एक शोकांतिका ठरली.

सदाअत हसन मंटो

सदाअत हसन मंटो

‘आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां’ अशी फेडोराची अवस्था होते. पण तिथेही तिची बी.डी.डी.ची मानसिकता दिसते. ‘फेडोराचा मृत्यू’ ही एक इव्हेंट बनते. थोड्या थोड्या वेळाने फुले बदलली जातात. मृतदेहाचा मेकअप ठीक केला जातो. मागे वाजवल्या जाणाऱ्या संगीताबद्दल सूचना दिल्या जात असतात. दुःख व्यक्त करणाऱ्या जगभरातील मान्यवरांच्या तारांची दखल गर्वाने घेतली जाते. मृत्यूनंतर ही फेडोराचे सौंदर्य लोकांच्या लक्षात राहायला हवे, हा अट्टाहास शहारा आणणारा.

मंटोने लिहिलेल्या ‘चाचा साम को खत’ या विंडबनात्मक लेखातून विकसनशील देशात बक्कळ पैसा असल्याने त्यांच्या उधळपट्टीसाठी

सुचणाऱ्या कल्पनाशक्तीच्या नवनव्या धुमाऱ्यांवर खिल्ली उडवली आहे.

मंटो लिहितात –

एवलिन वॉग हमें बताता है कि आपके कैलिफोर्निया में मुर्दों, यानी बिछड़े हुए अजीजों पर भी कॉस्मेटिक कलई की जा सकती है और उसके लिए बड़ी-बड़ी कंपनियाँ मौजूद हैं – उसमें अपनी इच्‍छाएँ दर्ज कर दीजिए। काम मनपसन्‍द होगा। यानी मुर्दे को आप जितना खूबसूरत बनवाना चाहें, दाम देकर बनवा सकते हैं। अच्‍छे-से-अच्‍छा माहिर मौजूद है जो मुर्दे के जबड़े का ऑपरेशन करके उस पर मीठी-से-मीठी मुस्‍कराहट बिठा सकता है। आँखों में रोशनी पैदा की जा सकती है, माथे पर जरूरत के हिसाब से नूर पैदा किया जा सकता है। और यह सब काम ऐसी कुशलता से होता है कि कब्र में यमदूत भी धोखा खा जाए

एक हम हैं कि लिया अपनी ही सूरत को बिगाड़
एक वह हैं जिन्‍हें तसवीर बना आती है

काले साहब मेरा मतलब न समझे, मगर हकीकत यह है चचाजान कि हमने अपनी सूरत को बिगाड़ रखा है। इतना बिगाड़ रखा है कि अब वह पहचानी भी नहीं जाती, अपने आपसे भी नहीं – और एक आप हैं कि भद्दी सूरत मुर्दों तक की शक्‍ल सँवार देते हैं। सच तो यह है कि इस दुनिया के तख्‍ते पर एक सिर्फ आपकी कौम को ही जिंदा रहने का हक हासिल है बाखुदा बाकी सब झक मार रहे हैं।

‘शिप ऑफ थिसस्’ नावाची एक संकल्पना आहे. समजा एका जहाजाचं नाव ‘अ’ आहे. त्याचा एकेक भाग हळूहळू बदलत गेलो आणि यामुळे कालांतराने त्याचे सर्वच भाग बदलले गेले तर ते जहाज ‘अ’ असेल का?
समजा ‘अ’चं असेल तर त्याचे मूळ स्वरूप शिल्लक कुठे आहे? आणि जर हे नवीन जहाज म्हणावं तर त्यातील बदल एकाच वेळी न झाल्यामुळे, त्याचे बदलते स्वरूप समजायचे तरी कसे?
पण हा बदल इतका हळूहळू होत असतो की कोणाच्या लक्षात येत नाही. म्हणून आपण त्या जहाजाला ‘अ’ म्हणूनच ओळखत असतो.

स्वतःच्या नैसर्गिक दिसण्याचा, वयाचा स्वीकार न करणाऱ्यांचे आपल्या बुद्धिशी, आत्म्यांशी काही नाते असते का?

फेडोराचा डॉक्टर ॲन्टोनियाच्या मानसिक अवस्थेबद्दल एकदा म्हणतो, “निसर्गाच्या विरोधात गेल्याची किंमत ही मोजावी लागते.”

हा देह तुझा पण देहातिल तू कोण
हा देह तुझा पण देहाविण तू कोण
हा देह जन्मतो वाढत जातो सरतो
ना जन्म मरण ना देहातील तो म्हणतो
                        – रॉय किणीकर    

देवयानी पेठकर, या शॉर्टफिल्म लेखिका व दिग्दर्शिका आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0