जुन्या वस्तू विकताय? सावधान!

जुन्या वस्तू विकताय? सावधान!

सतत जुन्या वस्तू विकून, नवीन घेण्याच्या भांडवली बाजारपेठेमध्ये, फसवणुकीचा मोठा धंदा सुरू असून, त्यामध्ये आता युनिफाईड पेमेंट इंटरफेसचा (युपीआय) कसा वापर केला जातो, हे सांगणारा अनुभव.

आजच्या नाविन्याने भरलेल्या बाजारपेठा आणि सतत वस्तू बदलत राहण्याच्या सवयीच्या रेट्यामध्ये, जुन्या वस्तू विकायच्या आणि नवीन घ्यायच्या, हे आपल्याला आता चांगलचं अंगवळणी पडलंय. सतत खरेदी विक्रीचे व्यवहार, हे भांडवली बाजारपेठेचे व्यवच्छेदक लक्षणच आहे. जुनी वस्तू पटकन ‘ओएलेक्स’ (OLX) वर लिस्ट करायची आणि ग्राहक खरेदी करून वस्तू नेताना पैसे देतो, हे मी या आधी केलेले होतेच.

काही दिवसांपूर्वी ‘ओएलक्स’वर घरातला जुना बेड विकायला लावला. म्हणजे काय तर बेडची माहिती, किंमत आणि फोटो अपलोड केले. स्मार्ट फोन आल्यापासून, ऑनलाईन व्यवहारही नवीन राहिलेले नाही. जुना बेड विकायला लावल्यावर, काही वेळातच जगदीश कुमार वर्मा यांचा कॉल आला. त्यांनी बेड विकत घ्यायचा आहे, मुलाला घ्यायला पाठवतो, तो तासाभरात येईल घ्यायला, असे सांगून, ‘बेड किती जुना आहे,’अशी वरवरची चौकशी केली. मग पैसे कसे द्यायचे, हा मुद्दा चर्चेला आला. किंमतीची घासाघीस सुद्धा न करावी, हे मला विशेष वाटलं.

कॅश किंवा ‘गूगल पे’ अथवा ‘फोन पे’, चालेल असे पर्याय आले. तर ‘गूगल पे’ करतो, असे ते म्हणाले. नेहमीच्या सवयीने मी ‘व्हॉट्सअॅप’साठी त्यांचा नंबर सेव्ह केला. सहज पाहिले,तर ‘व्हॉट्सअॅप’ला प्रोफाईल पिक्चर (डीपी)मध्ये सधन वाटेल असा, कुटुंबाचा फोटो होता. मग माझे अकाउंट आर्मीचे आहे, त्यामुळे नुसत्या फोननंबर ऐवजी तुम्ही ‘गुगल पे’चा ‘क्यू आर’(QR)कोड स्कॅन करण्यासाठी पाठवा, ही नवीन माहिती आणि नवीन मागणी आली. आम्हाला सुरक्षित (सिक्युअर्ड) अकाऊंट दिलेले असते, त्याची पैसे पाठवण्याची विशिष्ट पद्धत असते, अशी आशयाची ज्यादाची माहिती त्यांनी दिली. ‘क्यू आर’ कोड पाठवायला मी फारशी उत्साही नव्हते. त्या ऐवजी पैसे डायरेक्ट मोबाईल नंबर वरून का पाठवत नाही, अशी थोडी कुरकुर मी केली. पण तरी त्यांना ‘क्यू आर’ कोडचा पर्याय सोपा किंवा गरजेचा वाटत असेल, असा विचार करून ‘क्यू आर’ कोड पाठवला. ‘क्यू आर’कोड म्हणजे, प्रत्येकची एक ओळखच (युजर आयडी) असते. असं एक प्रत्येकाचं खास चित्र (युनिक बारकोड) म्हणूयात हवेतर!

जरा वेळात वर्मा यांचा परत कॉल आला. पैसे पाठवले आहेत, रिसीव्ह करून घ्या, असे ते म्हणाले. इतके वर्ष बँकेत असल्यामुळे असेल कदाचित, अकाउंटला पैसे जमा होण्यासाठी काही करायला लागते, हा विचार करून मला हसू आले. पण मग मात्र वर्मांनी पाठवलेला मेसेज बघून मी चक्रावलेआणि सावधही झाले. कारणही तसेच होते. कारण मी वस्तू विकत होते. म्हणजे मला फक्त पैसे क्रेडिट म्हणजे जमा झाले असा मेसेज यायला हवा होता. दुसरीकडे वर्मासारखे लागोपाठ फोन करून, तुम्ही पे ला क्लिक करा, पिन टाका म्हणजे तुमच्या अकॉउंटला पैसे जमा होतील, असे मला सांगत होते. मला एका बाजूला तुमच्या अकॉउंटला पैसे क्रेडिट आले आहे, असे तपशील (नॅरेशन) ‘गुगल पे’ला दिसत होते आणि दुसरीकडे मीच वस्तू विकत असताना, मला हे वर्मा पैसे ‘पे’ करा असे का सांगत आहेत, हे अनाकलनीय होते. पण मी सावध होते. प्रथम तर मी त्यांना सांगितले, की मला यामध्ये व्यवहारात सहजता वाटत नाहीये आणि तुम्हाला इतकी घाई का आहे पैसे पाठवायची? मी फोन बंद केला आणि थोडे थांबून समजावून घेऊयात, असा विचार केला. मग मात्र मला सर्वच गोष्टी स्पष्ट झाल्या. वर्मा मला पैसे पाठवत नव्हतेच, तर ते माझ्याकडूनच पैसे काढून घ्यायला बघत होते.

‘गुगल पे’, ‘भीम’, ‘फोन पे’, हे सगळे यूपीआय (UPI)आहेत. म्हणजे यूनिफाईड पेमेंट इंटरफेस. यात बँकेच्या नोंदीमध्ये असलेला मोबाईल वापरून किंवा अकाउंटची माहिती वापरून, अन्यथा क्यूआर कोड वापरून, पैसे पाठवता येतात. यात अजून एक जरा वेगळे वैशिष्ट्य आहे. ते माहिती असायलाच हवे. ते म्हणजे जसे पैसे पाठवता येतात तसे, ते मागवण्यासाठी विनंती पण करता येते. म्हणजे असे, की जर मी आणि एक मित्र,आम्ही दोघे एकत्र जेवलो आणि बिल मात्र त्याने भरले, तर बिलातला माझा हिस्सा तो युपीआय विनंती (रिक्वेस्ट) वापरून मागू शकतो आणि मी त्याच्या रिक्वेस्टचा वापर करून त्याला पैसे पाठवू शकते.

तर वर्मा बेड खरेदी करताना पैसे देण्याऐवजी, मलाच ते पैसे रिक्वेस्ट करून मागवत होते. याचा अर्थ ते खरे ग्राहक नव्हते, तर मला फसवण्यासाठीच आपण खरेदी करत आहोत, असे दाखवत होते. पण असे करताना त्यांनी शिताफीने रिक्वेस्टचे नॅरेशन लिहिले होते, की ‘रक्कम तुम्हाच्या खात्यात जमा झाली’ (money credited to your account) हे वाचून कोणालाही प्रथम दर्शनी पैसे जमा होतायेत, असेच वाटणार.  हे सरळ आणि साधे तत्व वर्मांनी वापरले होते. जर मी त्यांच्या सांगण्याप्रमाणे पे वर क्लिक करून पिन टाकला असता, तर माझ्या अकाऊंटला डेबिट पडून, पैसे त्यांना पाठवले गेले असते आणि त्यासाठी मी स्वतः पिन टाकून ते ट्रान्झॅक्शन प्रमाणित (ऑथोराईज) केलेले असल्याने ती माझीच चूक झाली असती.

यूपीआयचा प्रभावी वापर आणि फसवण्यासाठीचे व्यविस्थत तंत्र यामध्ये आहे. आर्मीचे अकॉऊंट,आर्मीचा माणूस म्हणजे एकंदर चटकन विश्वास ठेवला जाऊ शकतो. दुसरे म्हणजे हे आर्मीचे खास अकाऊंट आहे म्हणजे, असे ते सांगतात आणि भासवतात, की याला काही विशिष्ट पद्धतीच्या पायऱ्या (स्टेप्स्) गरजेच्या आहेत. ते सांगतील तशा स्टेप्स् करण्याचा पर्याय आपण निवडला, तर या पूर्ण फसवणुकीच्या जाळ्यात आपण अगदी अलगद अडकू शकतो.

‘ओएलेक्स’वर नंबर सहज मिळू शकतात. आपण वस्तू विकण्याच्या नादात असतो आणि पैसे आधी देण्याची इतकी घाई का आहे, असा विचार सुद्धा आपल्याला पडत नाही. असे फसवणुकीचे दिवस भरात चार कॉल आले. फसवणुकीचा प्रकार सारखाच होता पद्धत थोडी फार वेगळी होती. जसे दुसरे कॉल आले त्यात काही रक्कम कमी करण्याचे बोलणे झाले, पण यात समान धागा हा की कॉल करणारे खोटे ग्राहक आपण आर्मीशी निगडित आहोत, हे किंवा आर्मीचे अकाऊंट आहे, आर्मीने आम्हाला स्वाईप मशीन दिले आहे. किंवा आर्मीचे सिक्युअर्ड अकाऊंट आहे असे सांगतात.

विकत घ्यायची वस्तू कोणासाठी तरी घेतोय, मी बाहेर गावी आहे पण मला वस्तू विकत घ्यायचीच आहे. वस्तू घेऊन जायला माणूस पाठवतो असे पटवून देतात. टेम्पो येईल असे सांगतात. बोलणारी व्यक्ती यूपीआय पेमेंट रिक्वेस्ट पाठवणाऱ्या व्यक्तीचे नाव, ट्रूकॉलर वरचे नाव, याचा काही मेळ नसतो. गंमत म्हणजे एका कॉलवर एका माणसाने त्याचे नाव वाघमारे सांगितले. तरी तो हिंदीत का बोलतोय, असे विचारल्यावर, मी अहमदाबादला आलोय ना, असे हास्यास्पद उत्तर मिळाले.

हे लोक पैसे देण्याची प्रचंड घाई करतात. मग मेसेज लिंक किंवा यूपीआय अॅप जसे की गूगल पे, भीम, पे पाल अॅपवर पैसे मागणारी रिक्वेस्ट पाठवतात. तुमची पे आणि आणि प्रोसिड फॉर पेमेंट आणि पिन देऊन अॅप्रूव्ह करावे लागेल, ऑनलाईन राहा आणि मी सांगतो तसे करा. मी पैसे पाठवले आहेत पण जर तुम्हाला अकाऊंटला यायला हवे असतील, तर पे ला क्लिक करा प्रोसीड करा आणि पिन टाका असे सतत सांगत राहतात.

माझ्याकडून पैसे गेलेत, असे कसे आले नाहीयेत? सांगितले ना, हे आर्मी अकाऊंट आहे, याला असेच करावे लागते. पैसे जमा होण्यासाठी पे अप्रूव्ह करा, असे सारखं सांगत, प्रसंगी रेटत, किंवा वैतागत पण सांगत राहातात.

लक्षात घेण्याचा महत्त्वाचा भाग असा, की जर आपण ‘ओएलक्स’ फ्राॅड असे फेसबुक किंवा यूट्यूबला सर्च केले तर, फसवणुकीचे नानाविध प्रकार वस्तू विकताना वर सांगितल्या प्रमाणे होतात किंवा वस्तू जेव्हा आपण वस्तू विकत घ्यायला जातो तेव्हा सुद्धा पैसे पूर्ण किंवा काही रक्कम पाठवायला सांगून नंतर वस्तू न पाठवण्याची किंवा वस्तू न मिळण्याच्या हजारो केसेस झाल्या आहेत असे कळते.

आपली खात्री देण्यासाठी स्वतःचा पॅन, आधार सुद्धा पाठवतात. त्या लोकांप्रमाणेच ही डॉक्युमेंटस सुद्धा खोटी असतात. आणखी एक फसवणुकीचा प्रकार, तर असा आहे, की आपल्या वस्तूंचे फोटो, आपले नाव आणि उत्पादनाचे नाव वापरून, दुसरेच कोणीतरी आपल्या वस्तू विक्रीला लावतात.

म्हणजे आता जर आपल्याला ऑनलाईन विक्री, खरेदीपासून घाबरायचे आहे का? तर बिलकुल नाही. ना गूगल किंवा इतर यूपीआयवर व्यवहार करणे थांबवायचे आहे. आपण ओएलक्सवर किंवा अशा कोणत्याही साईटवर खरेदी करताना जवळच्या भागातील विक्रेता किंवा ग्राहक यावर भर द्यायचा. यामुळे वस्तू पारखून आणि दाखवून जागच्या जागी वस्तू विकत घेऊन (COD) रोखीने व्यवहार करू शकतो. किंवा समोरासमोर असताना ऑनलाईन पैसे देणेही सहज शक्य होते. कोणतीही गोष्ट जर आशर्यकारक स्वस्त मिळत असेल, तरी जास्त शंका घ्यायला हवी. तपासून मगच व्यवहार करायला हवे.

व्यवहार करताना वस्तूची माहिती देणे ठीक आहे, पण स्वतःची माहिती किंवा ओळखीची (KYC) प्रमाणपत्रे देणे टाळले पाहिजे. अशी प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे, वस्तूचे जास्तीचे फोटो किंवा व्हििडओ व्हॉट्सअॅपवर शेअर करणे टाळले पाहिजे. याचा वापर आपल्या अपरोक्ष दुसऱ्या कोणाच्या फसवणुकीसाठी होऊ शकतो. याचा आपल्याला आर्थिक फटका बसणार नसला, तरी आपले नाव आणि आपली माहिती वापरल्या गेल्यामुळे मानसिक त्रास नक्कीच होऊ शकतो.

जर ग्राहक, किंवा विक्रेता अनावश्यक घाई करत असेल, तरी यात काही तरी काळजी घेण्यासारखे आहे, हे लक्षात घ्यायला हवे. आर्मीचा माणूस म्हणजे एकदम विश्वास टाकायचा, असाही विचार करण्यात काही अर्थ नाही. कारण आर्मी म्हणजे लगेच लोकांचे देशप्रेम जागृत होणार, हाच गनिमी कावा या फसवणूकीमागे आहे.

विक्रेता किंवा ग्राहक म्हणून छोट्या मुद्द्यांकडे लक्ष द्यायला हवे. जसे की विक्री करणारा किंवा ग्राहक, व्यक्ती कोण आहे आणि ती खरी वाटत आहे का, हे तपासून पाहता येऊ शकते. व्यवहार डोळे उघडे ठेऊन, चौकस बुद्धीने करता येऊ शकतात. म्हणजे काही लाखाची कार कोण खरेदी करू शकते? किंवा महागडा मोबाईल कोण विकू शकते? याचे व्यवहार ज्ञान ठेवणे गरजेचे आहे. जर शंका वाटली तर फोन बंद करण्याचा पर्याय, व्यवहार थांबण्याचा पर्याय आपल्याकडे असतो. इतर काम करताना किंवा विचलित मनस्थितीत किंवा कामाच्या वेळेत असे कॉल घेणे टाळले पाहिजे. गडबडीत चूक होऊ शकते.

वस्तू विक्री-खरेदी हा तर जीवनाचा अविभाज्य घटक आहे आणि जर काळजीपूर्वक आणि सावधानतेचे भान ठेवून आपण व्यवहार केले तर खरेदी विक्री नक्कीच आनंदी होऊ शकते. ‘ओएलक्स’च्या साईटवर सुद्धा संभाव्य फसवणूकीची माहिती देणारे पान आहे. पण आपण वाचून माहिती घेऊन व्यवहार करण्याचे भान ठेवले पाहिजे. न घाबरता, सजग राहून व्यवहार केले पाहिजेत.

मिथिला जोशी, या बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत.

COMMENTS