सामाजिक बांधिलकीचा दिग्दर्शक – ख्वाजा अहमद अब्बास

सामाजिक बांधिलकीचा दिग्दर्शक – ख्वाजा अहमद अब्बास

ख्वाजा अहमद अब्बास यांचा ७ जून हा जन्मदिवस. त्यानिमित्ताने त्यांच्या कारकीर्दीवर प्रकाश टाकणारा लेख.

अमिताभ बच्चनला सर्वप्रथम चित्रपटामध्ये पहिली संधी दिली, ख्वाजा अहमद अब्बास यांनी. ही ओळ आपलं लक्ष वेधून घेते. पण कोण हे ख्वाजा अहमद अब्बास? हे आपल्याला तितकंस माहीत नसतं. ख्वाजा अहमद अब्बास हे असे व्यक्तिमत्व आहे जे सुरूवातीला पत्रकार होते. मग लेखक बनले. त्यानंतर संपादक. पुढे सिनेमा समीक्षक. मग नंतर त्यांनी चित्रपटच्या कथा पण लिहिल्या आणि सरतेशेवटी ते एक उत्तम सिने-दिग्दर्शक म्हणून गाजले.

७ जून १९१४ साली हरियाणाच्या पानीपत या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. अलिगढ विद्यापीठात असतानाच ते वृतपत्रात लेखन करू लागले. ‘बॉम्बे क्रॉनिकल’ या वर्तमानपत्रात त्यांनी अनेक सिनेमांच्या समीक्षा लिहिल्या. त्यामुळे सिनेक्षेत्रात त्यांचे नाव चर्चित झाले. पुढे त्यांनी काही कथा-पटकथा लिहिल्या. ते चित्रपट लोकांना आवडले. पण दिग्दर्शक त्यांच्या लेखनाला खर्‍या अर्थाने न्याय देत नाहीत, हे त्यांच्या लक्षात आले. उलट त्यांच्या कथेत खूप फेरफार केले जातात हे त्यांना खटकले. मग त्यांनी स्वतः दिग्दर्शन करण्याचा निश्चय केला. पहिला चित्रपट तयार केला १९४५साली, ‘धरती के लाल’. हा चित्रपट १९४३ साली बंगालमध्ये पडलेल्या भयानक दुष्काळावर आधारित होता. आंतरराष्ट्रीय महोत्सवात या चित्रपटाची चर्चा झाली.

त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपट तयार केले. आपण जर त्यांच्या चित्रपटांचे शिर्षक जरी पाहिले तरी आपल्या लक्षात येईल की हा एक वेगळ्या प्रकारचा लेखक-दिग्दर्शक होता.

त्यांचा सिनेमा सामाजिक वास्तव मांडतो आणि नव्या समाजनिर्मितीचे स्वप्नदेखील मांडतो. तो सिनेमा एखाद्या सामाजिक मुद्द्या भोवतीच उभा राहतो. गरीबी, अस्पृश्यता, विषमता, अभाव, शोषण या मुद्यांभोवती त्यांनी सिनेमांच्या कथा रचल्या. सिनेमासारख्या व्यावसायिक आणि पैशांचा प्रचंड बोलबाला असणार्‍या माध्यमात तत्वांशी अशी बांधिलकी आपल्याला अभावानेच आढळते.

त्यांना या प्रेरणा मिळाल्या साम्यवादी तत्वज्ञानामुळे. ‘कलेसाठी कला नसून जीवनासाठी कला असावी’, या ब्रिदाला अनुसरून ते काम करीत राहिले. कष्टकर्‍यांच्या कलेचा सांस्कृतिक तानाबाना ज्या संस्थेने भारतभर विणला त्या ‘ईप्टा’ (Indian Peoples Theatre Association) या संस्थेचे ते संस्थापक सदस्य होते.

त्यांची कथा-पटकथा असलेला आणि चेतन आनंद यांनी दिग्दर्शित केलेला ‘नीचा नगर’ हा चित्रपट विशेष उल्लेखनीय आहे. सामाजिक वास्तव आणि त्यातील द्वंद्व ठळकपणे मांडणारा भारतीय सिनेमासृष्टीतील पहिला चित्रपट म्हणता येईल. यात शासक आणि शोषित यांचा झगडा प्रखरपणे मांडण्यात आला होता. त्या काळात उद्योगधंदे आणि नागरी समाज निर्माण होऊ लागला होता. स्वातंत्र्यलढा जोमात होता. भारतीय समाज कसा आहे ? येणार्‍या काळात स्वतंत्र देशाला कोणात्या प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे? हे त्या सिनेमात अधोरेखित करण्यात आले होते. १९१७सालच्या रशियन कामगार क्रांतीने जगासमोर आदर्श निर्माण केला होता. जगभरच्या कलाकारांवर आणि चित्रपटनिर्मात्यांवर त्या क्रांतीने मोठा प्रभाव टाकला होता. त्या वातावरणात ख्वाजा अहमद अब्बास यांची जडणघडण झाली.

त्यांच्या ‘राही’ या सिनेमात चहाच्या मळ्यात काम करणार्‍या कामगारांच्या जीवनाचे चित्रण आहे. ‘बंबई रात की बाहों में’मध्ये शहरातील रात्रीच्या जीवनाची काळी बाजू आहे. ‘शहर और सपना’त फुटपाथवर जीवन व्यतित करणार्‍यांची व्यथा आहे. ‘दो बूँद पानी’, या सिनेमात राजस्थानच्या पाणीप्रश्नाचा विषय मांडला जातो. तर मिथुन चक्रवर्ती आणि स्मिता पाटील अभिनीत ‘नक्सलाईट’ या सिनेमात नक्सल प्रश्नावर भाष्य करण्यात आलेले आहे. त्यांच्या प्रत्येक कलाकृतीत सामाजिक निष्ठा, तत्वविचारांची पाठराखण आणि ध्येयवाद प्रवाहित झालेला आढळतो.

सत्तरच्या दशकात तरूणवर्गाच्या ‘दिल की धडकन’बनलेल्या डिंपल-ऋषि कपूर अभिनीत ‘बॉबी’ सिनेमाची पटकथा संवाद त्यांनी लिहिले. खरं तर लेखक म्हणून अब्बास यांनी राजकपूर यांच्या सोबत अधिक काळ काम केले. १९५१ला ‘आवारा’ या सिनेमापासून या कलंदर कलाकारांची जोडी जमली. मग या जोडीने ‘श्री ४२०’, ‘जागते रहो’, ‘मेरा नाम जोकर’ यांसारखे अनेक सिनेमे दिले. अब्बास यांच्या लेखणीतून आणि राजकपूर यांच्या दिग्दर्शनातून एक से बढ कर एक कलाकृती तयार झाल्या.

‘बॉबी’ सिनेमाच्या निर्मितीची कथा विलक्षण आहे. ‘मेरा नाम जोकर’ सिनेमा व्यावसायिक दृष्ट्या तितकासा न चालल्याने राजकपूर आर्थिक दृष्ट्या अडचणीत आले होते. एखादा ‘हीट सिनेमा’ बनविण्याची गरज त्यांना वाटत होती. त्यांनी अब्बास यांच्यासमोर आपले मन मोकळे केले. अब्बास यांनी त्यांना मदत देण्याचे कबुल केले. आणि अशा प्रकारे जन्माला आला एक जबरदस्त हीट म्युझिकल ड्रामा ‘बॉबी’. मित्राची मदत करण्यासाठी अब्बास यांनी आपली शैली बदलली आणि एक वेगळ्या प्रकारचा रोमঁटीक चित्रपट लिहिला. परंतु त्या रंजनप्रधान सिनेमात सुद्धा त्यांनी सामाजिक वर्ग-भेद आणि आंतरजातीय विवाहाचा मुद्दा मोठ्या खुबीने पेरला.

अब्बास यांनी विपुल लेखन सुद्धा केले. त्यांनी इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषेत ७३ पुस्तके लिहिली. ‘आई एम नॉट अॅन आइलैंड’ या शीर्षकाचे आत्मकथन लिहिले. आत्मकथन लेखनाचा हा एक वेगळा प्रयोग मानला जातो. त्यांची ‘इंकलाब’ ही कादंबरी सांप्रदायिक राजकारणाचा  प्रश्न मांडते. रुसी करंजियांच्या ‘ब्लिट्ज’ या साप्ताहिकात त्यांचा कॉलम (सदर) सलग ५० वर्षे प्रकाशित झाला. भारताच्या वृतपत्र जगात हा मोठा विक्रम आहे. इंग्रजी आवृतीत ‘लास्ट पेज’ या नावाने तर हिंदी व उर्दू आवृतीत ‘ आजाद कलम’ या नावाने तो कॉलम येत असे. वाचक शेवटच्या पानावरील त्या कॉलमपासून ते साप्ताहिक वाचायला सुरुवात करायचे.

जेंव्हा अमिताभ बच्चन यांना सगळीकडून नकार मिळत होता. अमिताभ निराशेने व्यापलेला होता. तेंव्हा ‘सात हिंदुस्तानी’ या सिनेमात अब्बास यांनी त्याला महत्वाची भूमिका दिली. गोव्याला पोर्तुगिजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी झुंज देणार्‍या सात क्रांतिकारकांची ही कथा आहे. या सिनेमाच्या माध्यमातून अमिताभने सिनेमाच्या झगमगाटी दुनियेत प्रवेश केला. अमिताभ पुढे कितीही मोठा झाला असेल. मीडियाने त्याला महानायकाच्या पदावर नेऊन बसविले असेल. पण अब्बास मात्र या झगमगाटी दुनियेत प्रकाशझोतापासून लांब राहून नवनवे विषय हाताळत राहिले. नव्या चेहर्‍यांना संधी देणे, त्यांना पुढे आणणे, हे तत्व मात्र त्यांनी आयुष्यभर पाळले आणि स्टार सिस्टिमला एकप्रकारे धक्काच दिला.

ख्वाजा अहमद अब्बास यांना मोठा वारसा मिळाला होता. त्यांचे आजोबा ख्वाजा गुलाम अब्बास १८५७च्या बंडात सामील झालेले एक प्रमुख क्रांतिकारक होते. त्यांना इंग्रजांनी तोफेच्या तोंडावर बांधून, उडवून ठार मारले होते. ख्वाजा अहमद अब्बास यांना त्या संघर्षशील वारश्याची जाणीव होती. त्यांनी त्या वारश्याला अधिक समृद्ध, अधिक नवउन्मेषी केले. इथल्या मातीशी, मातीत राबणार्‍या श्रमिक-कष्टकरी शेतकर्‍यांशी आणि कामगारांशी कायम बांधिलकी मानली. त्यांची लेखणी या सृजनशील आणि संघर्षरत वर्गांसाठी झिजली. हे वर्ग केवळ शोषित नाहीत, तर सर्जक पण आहेत. तेच उद्याचा मानवी समाज घडविणार आहेत. या मनोभूमिकेतून  त्यांनी या वर्गांचे समर्पक आणि सर्वंकष चित्रण त्यांच्या सिनेमांत केले.

शेवटी त्यांना समर्पित, ख्वाजा अल्ताफ हुसैन ‘हाली’ यांचा एक शेर

“फ़रिश्ते से बढ़ कर है इंसान बनना

मगर इसमें लगती है मेहनत ज़ियादा.”

अमरनाथ सिंग, हे लेखक आणि सामाजिक, सांस्कृतिक कार्यकर्ते आहेत.

COMMENTS