दगड-विटा-मातीचे नुसते घर महत्त्वाचे असते का नसते? ते ठिकाण (प्लेस), ती जागा(स्पेस) किती महत्त्वाची असू शकते? ‘घर म्हणजे नेमके काय’, याचा असा विचार, सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांचा, ‘वेलकम होम’, हा चित्रपट करतो.
‘घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, इथे असावा प्रेमजिव्हाळा नकोत नुसती नाती’, अशी कवी वि. द. घाटे यांची एक कविता आहे. पण दरवेळी असे दगड-विटा-मातीचे नुसते घर महत्त्वाचे नसते का? ते ठिकाण (प्लेस), ती जागा(स्पेस) किती महत्त्वाची असू शकते? ‘घर म्हणजे नेमके काय’, याचा असा विचार, सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांचा, ‘वेलकम होम’, हा चित्रपट असे विविध दृष्टीकोन, वेगवेगळ्या पात्रांच्या नजरेतून घेत जातो आणि समोर येतात या पिढीच्या जाणीवा.
पुण्यातील सुशिक्षीत मध्यमवर्गीय घरात वाढलेली, डॉ.सौदामिनी आचार्य ही पीएचडी झालेली मध्यमवयीन स्त्री. तिने एका हुशार ‘सीए’शी लग्न केलेले आहे. पुण्यातच अतिशय संपन्न घरामध्ये राहणाऱ्या सौदामिनी (मृणाल कुलकर्णी) चे नवऱ्याशी भांडण झालेले आहे. नवरा न सांगता अचानक घरातून बाहेर गेलेला आहे. त्यामुळे सौदामिनी आपली मुलगी कुकी ( प्रांजली श्रीकांत) आणि आपल्या सासूबाई माई म्हणजे (सेवा चौहान) यांना सोबत घेऊन येते. सासूबाईंची मानसिक अवस्था चांगली नसते. त्यांना अशा अवस्थेत घरात एकटं ठेवण्यापेक्षा, ती त्यांना घेऊन माहेरी येते. सौदामिनीच्या माहेरी आईवडिल अप्पासाहेब जोशी (डॉ.मोहन आगाशे) आणि विमल जोशी ( उत्तरा बावकर) आणि सौदामिनीची लहान बहीण मधुमती (स्पृहा जोशी) तिच्या अचानक येण्यामुळे काहीसे बावचळतात.
सौदामिनी अचानक माहेरी, तेही माईंना घेऊन आल्यामुळे घरात थोडी अडचण होते आणि महत्त्वाचे प्रश्न उभे राहतात. आप्पा आणि आई या अडचणी आपल्यापरीने सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि तिच्याशी संवाद करण्याचा प्रयत्न करतात. सौदामिनी घरातून निघून गेल्यामुळे, तिची विचारपूस करायला तिचा मित्र सुरेश (सुमीत राघवन) मुंबईवरून पुण्याला येतो आणि तोही तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो.
प्रगत विचारांची मधुमती, जी पत्रकार आहे आणि तिचे तिच्या बॉयफ्रेंडबरोबर मोकळे संबंध आहेत. तिला प्रश्न पडतो, की सौदामिनी आता आपल्या खोलीमध्ये राहणार आहे का? आणि सुरू होतो, जागे (स्पेस)चा शोध. सौदामिनीला प्रश्न पडतो, की आपलं नेमकं घर कोणतं? माहेर सोडल्यानंतर ते आपले घर असते का? की नवऱ्याचे घर हेच आपले घर? की आपण जिथे राहतो, तेच आपले घर? स्त्री, तिची आर्थिक सत्ता आणि तिचं हक्काचं घर नेमकं कुठलं? हे समकालीन प्रश्न आहेत. या प्रश्नांशी कोण कसे भिडते, हे चित्रपटातील अनेक स्त्री व्यक्तीरेखा सांगत राहताना दिसतात.
आजच्या काळातील घर नावाची संकल्पना काय आहे. भविष्यात ती काय असू शकेल, नातेसंबंधांमध्ये घर काय भूमिका निभावते, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उभे राहतात. प्रत्येकाचा स्वतःच्या घराचा आणि स्वतःला हव्या असणाऱ्या जागेचा शोध अखंड चित्रपटभर सुरू आहे. वडिलोपार्जित घराचे तुकडे विकण्याच्या तयारीत असलेली मावशी, अमेरिकेत राहणारी आणि आता आहे त्या घरात सुख मानून घेणारी मैत्रिण, भारतातील घर सोडून अमेरिकेत राहणारा सौदामिनीचा भाऊ केदार, सद्यकाळातील आपापल्या स्पेसविषयीचा आग्रह आणि संकल्पना मांडताना दिसतात.
स्त्रीचे घरातले स्थान. स्त्रीचे आपल्या घराशी असलेले नाते, हा चित्रपट अधोरेखित करतो. यात चार पिढ्यांतील स्त्री व्यक्तीरेखा आपापल्या काळातील परिस्थिती आणि स्वतःच्या घरातील स्थानाविषयीचे प्रश्न, उपस्थित करताना दिसतात. हे दैनंदिन संवादातून आणि फ्लशबॅकमधून फार प्रवाहीपणे आणि प्रभावीपणे चित्रित करण्यात आले आहे. मात्र तरीही हा चित्रपट हा केवळ स्त्रीकेंद्री नाही. त्याऐवजी चित्रपटाचा विषय हाच केंद्रस्थानी आहे.
‘वेलकम होम’, या सिनेमातले आबा लग्नाच्या बारा वर्षांनंतर नवऱ्याचे घर कायमचे सोडून आलेल्या आपल्या प्राध्यापक मुलीला, सौदामिनीला एक साधा प्रश्न विचारतात, “घर सोडून येताना तू तुझं चेकबुक तरी बरोबर आणलयस का?”, या प्रश्नावर ती पीएचडी असलेली प्राध्यापक मुलगी बावचळते आणि त्याचबरोबर चित्रपट काही महत्त्वाच्या प्रश्नांना हात घालतो. उच्चशिक्षित असणाऱ्या स्त्रियांची आजची, भावनिक आणि आर्थिक स्थिती आणि निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य या विषयी थेट भाष्य, हा चित्रपट करतो.
सौदामिनी आपल्या घरी जाते का, की आपल्या माहेरीच राहते. हे सर्व चित्रपटातच पाहायला हवे. पण घर, आपली जागा, घर एक संपती आणि याभोवती फिरणारे नातेसंबंध यावर हळू हळू प्रकाश टाकण्यात आला आहे. यामुळे बऱ्याचवेळा चित्रपट संथ झाल्यासारखा वाटतो.
सुमित्रा भावे आणि सुनिल सुकथनकर या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या लेखक ,दिग्दर्शक जोडीचा हा चित्रपट आहे. उत्तम दिग्दर्शन, उत्तम लेखन, उत्तम संवाद आणि उत्तम अभिनयाने वेगळा ठरणारा हा चित्रपट असला तरी शेवट सुखांतीकेकडे नेण्याच्या नादात, अती भावूक झाला आहे.
संवाद उत्तम असले, तरी काहीवेळा ते फारच शिकविण्याच्या भूमिकेतून लिहिल्यासारखे वाटतात. शेवटी सुबोध भावेला उगाच चित्रपटात आणल्यासारखे वाटते. चित्रपटात दाखविलेली रेव्ह पार्टीची भट्टी नीट जमलेली नाही. अशा काही गोष्टी सोडल्या तर चित्रपट प्रभावी आणि परिणामकारक झाला आहे.
चित्रपटाची निर्मिती अभिषेक सुनील फडतरे, विनय बेळे, अश्विनी सिधवानी, दीपक कुमार भगत यांनी केली आहे. तसेच चित्रपटाचं लेखन सुमित्रा भावे यांचं असून सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शन केलं आहे. पार्थ उमराणी यांनी संगीत, सुनील सुकथनकर यांनी गीतलेखन, मोहित टाकळकर यांनी संकलन, धनंजय कुलकर्णी यांनी छायांकन, तृप्ती चव्हाण यांनी कला दिग्दर्शन, साकेत कानेटकरनं पार्श्वसंगीत केलं आहे.
चित्रपटात मृणाल कुलकर्णीसह सुमित राघवन, स्पृहा जोशी, सुबोध भावे, जितेंद्र जोशी, प्रसाद ओक,सुमित राघवन, डॉ. मोहन आगाशे, उत्तरा बावकर, सेवा चौहान, सिद्धार्थ मेनन, मिलिंद फाटक, इरावती हर्षे, दीपा श्रीराम, अश्विनी गिरी, रेणुका दफ्तरदार, श्रुती अत्रे, शाल्व किंजवडेकर, प्रांजली श्रीकांत कलाकार आहेत.
मिथिला बिनीवाले, माध्यम विषयाच्या अभ्यासक आणि संशोधक आहेत.
COMMENTS