मुंबई – भीमा-कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणामध्ये कबीर कला मंच या कला पथकामधील शाहीर सागर गोरखे आणि शाहीर रमेश गायचोर यांना ‘एनआयए’ने अटक केली. भि
मुंबई – भीमा-कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणामध्ये कबीर कला मंच या कला पथकामधील शाहीर सागर गोरखे आणि शाहीर रमेश गायचोर यांना ‘एनआयए’ने अटक केली.
भिमा-कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणामध्ये आतापर्यंत देशभरातील मानवाधिकार कार्यकर्ते, वकील, प्राध्यापक आणि साहित्यिक यांना अटक करण्यात आली आहे.
एल्गार परिषद ज्या भीमा कोरेगाव शौर्यदिन प्रेरणा अभियानातर्फे आयोजित करण्यात आली होती, त्याचे सदस्य आणि कबीर कला मंचचे शाहीर सागर गोरखे आणि शाहीर रमेश गायचोर यांना अनेक दिवस चौकशीसाठी बोलावले जात होते.
गोरखे आणि गायचोर यांनी काल सकाळी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता आणि त्यामध्ये आपल्याला अटक होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली होती.
“दीड महिन्यांपूर्वी चौकशीला बोलावण्यात आले होते. आम्हाला जी माहिती होती, ती आम्ही दिली. मॅटर काल पुन्हा बोलावण्यात आले. आणि संध्याकाळी आम्हाला सांगण्यात आले, की तुमचे नक्षलवाद्यांशी संबंध आहेत, हे कबूल करा, तुम्हाला सोडून देऊ अन्यथा तुम्हाला अटक करू,” असे गोरखे आणि गायचोर यांनी व्हिडिओमध्ये म्हंटले आहे.
कबीर कला मंच हे कला पथक आणि त्यांचे कार्यकर्ते हे नेहमीच सरकारच्या निशाण्यावर राहिले आहेत. या कला पथकावर हल्ले झाले असून, सचिन माळी आणि शीतल साठे यांना नक्षल संबंध असल्यावरून २०१३ मध्ये अटक करण्यात आली होती.
३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यात शनिवारवाड्यावर एल्गार परिषद झाली होती. १ जानेवारी २०१८ रोजी भीमा-कोरेगाव येथे विजय स्तंभाला अभिवादन करायला अनेक बांधव गेले होते. त्यावेळी आजूबाजूच्या परिसरामध्ये दंगल झाली होती. या दंगलीमध्ये नक्षलवादी गटांचा हात असल्याचा दावा पुणे पोलिसानी केला होता. त्या प्रकरणात कवी वरवरा राव, सामाजिक कार्यकर्त्या सुधा भारद्वाज, महेश राऊत, अरुण फरेरा, गौतम नवलाखा, वरनन गोन्सालवीस, रोना विल्सन, सुरेन्द्र गडलिंग, शोमा सेन, सुधीर ढवळे यांना अटक करण्यात आली आहे.
नुकतीच २८ जुलैला दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक हनीबाबू यांना याच प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे.
COMMENTS