बंगुळरु : प्रसिद्ध कन्नड लेखक व विचारवंत एमएम कलबुर्गी यांच्या मारेकऱ्याला कलबुर्गी यांची पत्नी उमादेवी यांनी पोलिस ओळख परेडमध्ये ओळखले आहे. उमादेवी य
बंगुळरु : प्रसिद्ध कन्नड लेखक व विचारवंत एमएम कलबुर्गी यांच्या मारेकऱ्याला कलबुर्गी यांची पत्नी उमादेवी यांनी पोलिस ओळख परेडमध्ये ओळखले आहे. उमादेवी यांनी ओळखलेल्या मारेकऱ्याचे नाव गणेश मिस्कीन (२७) असून त्याला कर्नाटक एसआयटीने मागेच पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणात अटक केली होती. गणेश मिस्कीन हा हिंदुत्ववादी संघटना सनातन संस्थेशी निगडीत आहे.
कलबुर्गी यांचा मुलगा श्रीविजय कलबुर्गी यांनी आपल्या आईने मारेकऱ्याला ओळखल्याचे सांगितले आहे पण त्याचे नाव जाहीर केलेले नाही असे स्पष्ट केले. पण कर्नाटक पोलिसांनी उमादेवी यांनी ओळखलेला मारेकरी हा गणेश मिस्कीनच असल्याचे सांगितले आहे.
पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाल्यानंतर गणेश मिस्कीन याला हुबळी येथे अटक करण्यात आली होती. त्याच्यावर २०१८मध्ये चार्जशीट दाखल केले होते. नंतर उमादेवी यांच्या एका याचिकेवरून कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास एसआयटीकडे आला होता.
कलबुर्गी यांची हत्या ज्या पिस्तुलाने झाली त्याच पिस्तुलाने गौरी लंकेश यांची हत्या झाली असा संशय उमादेवी यांच्या याचिकेत व्यक्त करण्यात आला होता. गेल्या मे महिन्यात हे प्रकरण एसआयटीकडे आले तेव्हा त्यांनी मिस्कीन शिवाय प्रवीण प्रकाश चतुर या आणखी एक आरोपी कलबुर्गी यांच्या हत्येत सामील असल्याचे म्हटले होते. चतुर व मिस्कीन कलबुर्गी यांच्या घरात गेले. मिस्कीन यांनी कलबुर्गी घरात आहेत का असे उमादेवी यांना विचारले होते. नंतर कलबुर्गी दारात आल्यावर त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यावेळी चतुर हा मोटारसायकल घेऊन बाहेर उभा होता. दोघेही नंतर फरार झाले होते.
COMMENTS