हलाल मांसावर बंदी हवीः भाजप आमदाराची मागणी

हलाल मांसावर बंदी हवीः भाजप आमदाराची मागणी

नवी दिल्लीः हलाल मांस हा एक प्रकारचा आर्थिक जिहाद असल्याचे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी यांनी मंगळवारी केले. मुस्लिमांच्या दुकानातून हिंदू देवदेवतांसाठी मांस विकत घेऊ नये अशी मागणी कर्नाटकातल्या अनेक भाजप नेत्यांकडून केली जात असताना रवी यांनी या प्रकरणाला जिहादाचे स्वरुप दिले आहे.

मुस्लिम समाज हिंदूंकडून मांस खरेदी करण्यास नकार देतो, तेव्हा हिंदूंना मुस्लिमांकडून मांस खरेदी करण्यास का सांगितले जात आहे, असा सवालही सी. टी. रवी यांनी केला आहे.रवी हे चिगमंगळूर येथील भाजपचे आमदार आहेत.

जर मुस्लिमांनी हलाल न केलेले मांस खाण्यास होकार दिला तर हिंदू हलाल मांस घेऊ शकतात. मुस्लिमांनी धंद्याची ही रित समजून घेतली पाहिजे, असेही रवी म्हणाले.

रवी यांच्या या वक्तव्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी भाजपवर हल्ला केला आहे. राज्यातल्या एकाच नव्हे तर अन्य ६५ लाख मुस्लिमांच्या संरक्षणाची जबाबदारी सत्तारुढ भाजपची आहे. भाजप २०२३मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपला असा अजेंडा राबवत असून तो कट्टर उजव्या संघटनांमार्फत रेटला जात असल्याचा आरोप कुमारस्वामी यांनी केला. राज्यातल्या हिंदू तरुणांनी हिंसाचाराचे समर्थन करू नये अशी आपली हात जोडून विनंती असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान कर्नाटकातल्या ६१ विचारवंत, लेखकांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना एक पत्र लिहून वाढत्या विद्वेषी प्रचाराला सरकारने रोखावे अशी विनंती केली आहे. या पत्रावर के. मरलूसिद्धप्पा, प्रा. एस. जी. ओ. सिद्धरामय्या, बोलवार महमंद कुन्ही, डॉ. विजया आदी विचारवंतांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मूळ बातमी

COMMENTS