कर्नाटकचे मंत्री जारकिहोली यांचा राजीनामा

कर्नाटकचे मंत्री जारकिहोली यांचा राजीनामा

बंगळुरूः एका महिलेचा लैंगिक छळ केल्याच्या प्रकरणात कर्नाटकचे जलसंधारण मंत्री रमेश जारकिहोली यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांनी राजीनाम्याचे पत्र मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना पाठवले आहे.

एक मुलगी नोकरी मागण्यासाठी रमेश जारकिहोली यांच्याकडे गेली असता तिच्यावर लैंगिक अत्याचाराचे प्रयत्न झाले. जारकिहोली यांनी संबंधित महिला व तिच्या कुटुंबियांना धमकीही दिली. याची एक व्हीडिओ क्लिप उघडकीस आली होती. या क्लिपवरून सामाजिक कार्यकर्ते दिनेश कल्लाहल्ली यांनी जारकिहोली यांच्याविरोधात पोलिसांत फिर्याद दाखल केली. या क्लिपमध्ये दोघांमधील संवाद असून या क्लिपचे प्रसारण कन्नड वृत्तवाहिन्यांनी केल्यानंतर जारकिहोली व कर्नाटकमधील भाजप सरकारवर टीका होऊ लागली. गुरुवारपासून कर्नाटक विधानसभा अधिवेशन सुरू असून अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. त्या आधी जनता दल व काँग्रेसचा प्रखर विरोध लक्षात घेऊन येडियुरप्पा यांना जारकिहोली यांचा राजीनामा घ्यावा लागला.

दरम्यान, जारकिहोली यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देताना आपण या प्रकरणात पूर्णतः निर्दोष असून नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा देत असल्याचे सांगितले. पण काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षात वरून आदेश आल्यानंतर जारकिहोली यांना राजीनामा द्यावा लागला.

गोकाकचे आमदार असलेले जारकिहोली हे पूर्वी काँग्रेसचे आमदार होते पण नंतर राज्यातील काँग्रेस-जेडीएसचे सरकार पाडण्यात व भाजपचे सरकार सत्तेवर आणण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. जारकिहोली यांची कथित सीडी बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकांची घोषणा होण्याअगोदर बाहेर आली आहे. बेळगावचे भाजपचे खासदार व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनाने निधन झाले होते. त्यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक होत आहे.

मूळ बातमी

COMMENTS