मोदींच्या वाढदिवशी लसीकरण आणि सर्टिफिकेट घोटाळा

मोदींच्या वाढदिवशी लसीकरण आणि सर्टिफिकेट घोटाळा

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १७ सप्टेंबर रोजी झालेल्या वाढदिवसाप्रित्यर्थ देशात विक्रमी अडीच कोटी कोविड-१९ लसीकरण झाल्याचा दावा करण्यात

कोव्हिड लसींची परिणामकारकता
सीरमने सर्व आरोप फेटाळले
देशात मोफत लस द्यावीः १३ विरोधी नेत्यांची मागणी

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १७ सप्टेंबर रोजी झालेल्या वाढदिवसाप्रित्यर्थ देशात विक्रमी अडीच कोटी कोविड-१९ लसीकरण झाल्याचा दावा करण्यात आला होता. पण द कारवाँ या मासिकाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार कोविड लसीकरण प्रमाणपत्र वाटपात मोठ्या प्रमाणात घोटाळा व फसवेगिरी झाल्याचे दिसून आले आहे. कारवाँच्या पत्रकारांनी देशातील विविध राज्यांची आकडेवारी जमा केली, त्यात असे आढळून आले की, ज्यांनी पहिली लस घेतली त्यांना कोविड प्रमाणपत्र देण्यात आले तर अनेक नागरिकांना कोविडची दुसरी लस न घेताही कोविड प्रमाणपत्र देण्यात आले.

या संदर्भात स्क्रोल या वेबसाइटने बिहारमधील लसीकरण घोटाळा उघडकीस आणला आहे. बिहारमध्ये १५ व १६ सप्टेंबर रोजी लसीकरण झाले होते. पण या लसीकरणाची आकडेवारी मोदींचा वाढदिवस म्हणून १७ सप्टेंबर रोजी कोविन पोर्टलवर अपलोड करण्यात आली.

कोविन पोर्टलवर १७ सप्टेंबरला अडीच कोटी लसींचे वाटप झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. पण १७ सप्टेंबरच्या आधी एक आठवडा लसीकरणाचा वेग कमी करून तो ७६ लाखांवर आला होता. यावरून १७ सप्टेंबर रोजी मोदींच्या वाढदिवसादिवशी लसीकरणाची विक्रमी आकडेवारी दिसावी म्हणून लसीकरणाचा वेग मंदावण्यात आला होता. या दिवसापर्यंत लसींची मागणी कमी ठेवण्यात आली असेही म्हणता येते.

कारवाँने हुसैन बाजी यांचे एक उदाहरण दिले आहे. हुसैन बाजी यांना १७ सप्टेंबर रोजी कोरोना लसीकरण प्रमाणपत्र देण्यात आले. प्रत्यक्षात बाजी यांनी कोविडची लसही घेतलेली नाही. त्यांना गुजरातमधील दाहोद येथील लसीकरण केंद्राकडून लसी प्रमाणपत्र देण्यात आल्याचे दिसून आले.

गुजरातमधील तुषार वैष्णव व त्यांच्या पत्नीला १७ सप्टेंबरला रात्री ८ वाजता एसएमएस आला. त्यात त्यांना दुसरी लस दिल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यांचे प्रमाणपत्र त्यांच्या घरापासून २५ किमी अंतरावरील एका लसीकरण केंद्राकडून मिळाले. तुषार यांनी आपण लस घेण्यासाठी एवढ्या लांब गेलोच नव्हतो असे स्पष्ट केले. तुषार आपली तक्रार घेऊन १८ सप्टेंबरला लसीकरण केंद्राकडे गेले असता तेथे त्यांच्यासारखीच तक्रार घेऊन येणारे पाच नागरिक होते. तुषार यांच्या तक्रारीकडे उपस्थित नर्सने लक्ष दिले नाही. पण नंतर तुषार यांचे नाव कोविन पोर्टलवर न नोंदवता, आधार कार्ड न तपासता त्यांना कोरोनाची लस दिली.

बिहारमध्ये हिल्सा येथील राजू कुमार यांना १५ सप्टेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रातून फोन आला. त्यांना आठवडाभरात दुसरी लस घेण्यासाठी बोलावण्यात आले. पण १७ सप्टेंबरला दुपारी साडेतीन वाजता राजू कुमार यांना दुसरी लस घेतल्याबद्दल प्रमाणपत्र घ्यावे असा एसएमएस आला. या प्रकरणावरून हैराण झालेल्या राजू कुमार यांनी लसीकरण केंद्रावर फोन केला असता त्यांना गप्प राहण्यास सांगितले व हवी असेल तर केंद्रावरून लस घेऊन जावे असे सांगण्यात आले.

या अनेक बातम्यांवरून स्पष्ट दिसते की मोदींच्या ‘आत्मसमाधानासाठी’साठी केंद्र व राज्य सरकारने कोविड संबंधित आरोग्य आकडेवारीत फेरफार केले. लसीकरणाचा वेग मंदावला, लसींची बनावट नोंद केली गेली व मोदींच्या वाढदिवशी तो उच्चांक म्हणून दाखवण्यात आला.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0