व्याघ्रसंवर्धनासाठी ‘कॉरिडॉर्स’ जपणे हाच मार्ग!

व्याघ्रसंवर्धनासाठी ‘कॉरिडॉर्स’ जपणे हाच मार्ग!

भारतभरातील वाघांच्या एका जनुकीय अभ्यासात असे आढळले आहे, की वाघ अधिकाधिक एकाकी आयुष्य जगू लागले आहेत आणि परिणामी जनुकीयदृष्ट्या जवळचे नाते नसलेला जोडीदार वाघांना सापडण्याची शक्यता कमी झाली आहे.

‘स्वातंत्र्याचे भय’
यूपीएससी परीक्षेत जामियाच्या ३० विद्यार्थ्यांचे यश
मोदी- योगींचे फोटो कचरा म्हणून नेल्याने सफाई कर्मचारी निलंबित

२९ जुलै रोजी, आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिनाच्या निमित्ताने, काली व्याघ्र संवर्धनक्षेत्राच्या (केटीआर) क्षेत्र संचालकांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात काही रोमांचक तपशील होते. यातील एक म्हणजे एका वाघाचा तो २१५ किलोमीटरहून अधिक अंतरापर्यंत पांगला होता हे दाखवणारा फोटो होता; दुसरा म्हणजे गेल्या दोन वर्षांत वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे असे यात नमूद होते.

दर चार वर्षांनी केल्या जाणाऱ्या ऑल इंडिया टायगर एस्टिमेशननुसार, भारतातील वाघांची संख्या २,९६७ आहे असा अंदाज वर्तवण्यात आला होता. याचा आनंद साजरा करण्यासाठी फारसा वाव नसावा, कारण, देशातील बहुतेक व्याघ्र संरक्षक प्रकल्पांना सध्या रस्ते, वीजवितरण, रेल्वेमार्ग यांसारख्या मोठ्या संरचना विकास प्रकल्पांचा धोका आहे. या हस्तक्षेपांमुळे वाघांचा अधिवास आक्रसत जाण्याचा किंवा त्याच्या विभाजनाता धोका कायम आहे.

भारतभरातील वाघांच्या एका जनुकीय अभ्यासात असे आढळले आहे की, वाघ अधिकाधिक एकाकी आयुष्य जगू लागले आहेत आणि परिणामी जनुकीयदृष्ट्या जवळचे नाते नसलेला जोडीदार वाघांना सापडण्याची शक्यता कमी झाली आहे. पर्यायाने जनुकीय वैविध्याचे प्रमाण कमी झाले आहे आणि विलोपनाचा धोका वाढला आहे. भारतातील बहुतेक व्याघ्रसंख्या ही छोट्या, निर्जन अशा संरक्षित क्षेत्रांत आहे आणि यात करण्यासारखे फार काही नाही. म्हणूनच संरक्षित क्षेत्राच्या आतमध्ये मोठ्या मांसाहारी प्राण्यांबाबत संरक्षक पवित्रा घेणे फारसे प्रभावी ठरणार नाही.

टी-थर्टीवन नावाचा वाघ

अर्थात, संरक्षित क्षेत्रांदरम्यान वाघांना हालचालीसाठी कॉरिडॉर्स उपलब्ध आहेत, तोपर्यंत ते मोठी अंतरे कापून जात आहेत. मानवाचे वर्चस्व असलेल्या भागांपर्यंतही वाघ जात आहेत. साधारणपणे दीड ते दोन वर्षे वयाचे वाघ त्यांच्या बालपणीच्या कक्षेबाहेर जाऊन नवीन प्रदेशांचा शोध घेतात.

सेंटर फॉर वाइल्डलाइफ स्टडीज आणि वाइल्डलाइफ कंझर्वेशन सोसायटीने (इंडिया) कर्नाटकातील पश्चिम घाटामध्ये गेली दोन दशके केलेल्या कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये वाघ संरक्षित क्षेत्रांमध्ये हालचाल करत असल्याची अनेक उदाहरणे दिसून आली आहेत.

केटीआरमध्ये २००८ साली घेण्यात आलेल्या कॅमेरा-ट्रॅपिंग सर्वेक्षणादरम्यान, वाघाने दीर्घ अंतर कापल्याची पहिली घटना दिसून आली. बीडीटी-वनथर्टी नावाचा एक चार महिन्यांचा छावा २००६ मध्ये भद्रा व्याघ्र संरक्षण क्षेत्रात आढळून आला. हाच छावा प्रौढ नर झाल्यानंतर केटीआरच्या गाभाक्षेत्रात आढळला होता. या वाघाच्या टप्प्यातील त्रिज्या अंतर २०० किमी होते, तर त्याचा प्रवासाचा मार्ग हा शरावती खोरे व केटीआर यांदरम्यानचा वन्यजीव कॉरिडॉर असावा असा अंदाज होता.

२०१५ सालापासून कर्नाटक वनखाते केटीआरमध्ये राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांनी माननीकृत केल्यानुसार कॅमेरा-ट्रॅप अभ्यास घेत आहे.

टी-थर्टीवन हे नाव दिलेला एक वाघ मे २०१८ मध्ये प्रथम महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र संरक्षक क्षेत्रात दिसला होता. मे २०२० मध्ये हा वाघ केटीआरमध्ये आढळला. हे साधारण २१५ किमींचे अंतर आहे. वाघ केटीआरमधून स्थलांतरित झाल्याचे  हे नोंद झालेले दुसरे प्रकरण आहे. हा प्रवाह उत्तर कर्नाटक-गोवा-दक्षिण महाराष्ट्र या भागांतील वाघांची संख्या वाढवण्याचा महत्त्वपूर्ण स्रोत ठरू शकतो.

वेगवान वाढ

केटीआरमधील यंदाच्या मार्च-मे या काळात कॅमेरा ट्रॅपिंग सर्वेक्षणादरम्यान, अधिकाऱ्यांना २२ वेगळ्या प्रौढ वाघांचे फोटो दिसून आले. यातील १२ मादी आहेत.

“वाघांच्या संख्येतील ही गेल्या दोन वर्षांतील अत्यंत वेगवान वाढ आहे आणि यातील लिंगगुणोत्तरही उत्तम आहे. उत्तम लिंगगुणोत्तर सहसा स्थिर लोकसंख्येत दिसून येते,” असे केटीआरचे क्षेत्र संचालक मारिया ख्रिस्तू राजा डी. यांनी ‘द वायर’ला सांगितले. केटीआरमध्ये वाघांच्या वाढत्या संख्येबद्दल लगेच काही विधान करणे योग्य ठरणार नाही. मात्र, २०२१ मध्ये होणाऱ्या सर्वेक्षणाच्या चौथ्या टप्प्यात लोकसंख्या वाढ किती स्थिर आहे याबद्दल काही ठोस माहिती देता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. केटीआर आणखी एका उपक्रमाचे नियोजन करत आहे. यामध्ये अधिकारी केटीआर लगतच्या संरक्षित क्षेत्रातील वाघांचे पॅटर्न-मॅच करतील.

“केटीआर, उत्तरेतील भीमगड वन्यजीव अभयारण्य आणि पश्चिमेकडील गोव्यातील संरक्षित क्षेत्र यांमधील वाघ नियमितपणे इकडून तिकडे जात आहेत अशा निष्कर्षाप्रत आम्ही येऊ शकू अशी शक्यता आहे,” असेही राजा यांनी सांगितले. हे एकूण १०,००० चौरस किलोमीटरचे वनक्षेत्र असून, जनुकीयदृष्ट्या व्यवहार्य व्याघ्र लोकसंख्येला आधार देण्यासाठी हे स्थळ आदर्श ठरू शकेल.

जनुकीयदृष्ट्या जोडलेल्या व्याघ्रसंख्येच्या संवर्धनासाठी संरक्षित क्षेत्रांदरम्यान वन्यक्षेत्रांचे कॉरिडॉर्स असणे महत्त्वाचे आहे. २३ जून रोजी महाराष्ट्र सरकारने या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग वन्यक्षेत्रामधील २९.५३ चौरस किलोमीटर क्षेत्र तिल्लारी संवर्धन क्षेत्र म्हणून जाहीर केले.

महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमांवर काम करणाऱ्या वाइल्डलाइफ कंझर्वेशन ट्रस्टचे गिरीश पंजाबी म्हणाले, “टी-थर्टीवनने नुकताच चांदोली अभयारण्यातून केटीआरपर्यंत केलेल्या प्रवासामुळे हा कॉरिडॉर निर्णायकरित्या महत्त्वपूर्ण आहे हे सिद्ध झाले आहे. याचे पूर्ण संरक्षण करणे आवश्यक आहे.”

कर्नाटकातील वन्यजीव कॉरिडॉर्स

कर्नाटक-केरळ-तमीळनाडू सीमेवरील पश्चिम घाटातील जंगलांपासून उत्तरेकडील केटीआर व लगतच्या गोव्यातील जंगलांपर्यंतच्या भागात अंदाजे १००० वाघ आहेत. पश्चिम घाटामध्ये अनेक संरक्षित क्षेत्रांना जोडणारे कॉरिडॉर्स आहेत. वाघांसारखे मोठे प्राणी या क्षेत्रात सहज फिरू शकतात. हे १००० वाघ पश्चिम घाटातील एका ‘जेनेटिक क्लस्टर’चा भाग आहेत असे निरीक्षण आहे आणि या संख्येत उत्तम जनुकीय वैविध्य आहे.

मध्यभारतात मात्र ही परिस्थिती नाही. राजस्थानातील रणथंबोर व्याघ्य प्रकल्पात वाघ आहेत. मात्र, या क्षेत्राला मध्य भारतातील अन्य संरक्षित प्रकल्पांशी जोडणारा एकही कॉरिडॉर अस्तित्वात नाही. ही व्याघ्रसंख्या जनुकीयदृष्ट्या विलगीकृत असल्याने नवीन आजार किंवा नैसर्गिक आपत्तींविरोधात जलदगतीने प्रतिकार विकसित करण्याची क्षमता त्यांच्यात नाही आणि पर्यायाने विलोपनाचा धोका त्यांना अधिक आहे.

बीडीटी-वनथर्टी या वाघाने भद्रा व्याघ्र प्रकल्पातून केटीआरपर्यंत केलेला प्रवास हा बेडथी संरक्षित क्षेत्र व केटीआरमधील कॉरिडॉरमुळे शक्य झाला. मात्र, हुबळी-अंकोला प्रस्तावित रेल्वेमार्गामुळे हा कॉरिडॉर धोक्यात आला आहे. कर्नाटक सरकारने प्रकल्पाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी होत आहे. कर्नाटक सरकारने महाराष्ट्र सरकारचा कित्ता गिरवत कॉरिडॉरचे संरक्षण करणे आवश्यक आहे. जगातील अधिकाधिक वाघांचा अधिवास म्हणून भारताचे अभिमानास्पद स्थान अधिक भक्कम करण्यासाठी जंगलांमधील कनेक्टिव्हिटीवर भर देणे आवश्यक आहे.

नरेंद्र पाटील यांनी वाइल्डलाइफ कंझर्वेशन सोसायटी (इंडिया आणि सेंटर फॉर वाइल्डलाइफ स्टडीज यांच्यासोबत १० वर्षांहून अधिक काळ काम केले आहे. लदाखमधील स्नो लेपर्ड कंझर्व्हन्सीमध्येही त्यांनी काम केले आहे.

मूळ लेख:

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0