काश्मीर पर्यटकांसाठी खुले

काश्मीर पर्यटकांसाठी खुले

पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणून पर्यटकांना नेहमी भुरळ घालणाऱ्या जम्मू व काश्मीरमधील १० जिल्हे पर्यटकांना खुले करण्यात आले आहेत. गेल्या ३० वर्षानंतर हे पहिल्यांदा घडत असून काश्मीरमधील सर्व म्हणजे १० जिल्ह्यांत पर्यंटक भीतीविना फिरू शकतात. आतापर्यंत केवळ श्रीनगर, अनंतनाग, बारामुल्ला आणि बडगाम या चार जिल्ह्यातच पर्यटकांना फिरण्यास मान्यता होती. पण आता उर्वरित सहा जिल्हे खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये कुपवाडचे तंगधर, बंगास, बांदीपोराचे गुरेझ, पुलवामाचे शिकारगह या पर्यटन स्थळांचा समावेश आहे. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० काढून टाकल्यानंतर गेले दोन वर्षे येथे तणावाची स्थिती होती. पण हळूहळू काश्मीर खोरे शांत होऊ लागले आहे आणि पर्यटनाला पुन्हा उभारी येऊ लागली. या हंगामात एक लाखांहून अधिक पर्यटकांनी काश्मीर वारी केली आहे. गुलमर्ग या हिल स्टेशन ठिकाणी १०० टक्के हॉटेल्स बुक झाली. तर श्रीनगरमधील ३० ते ४० टक्के हॉटेल्स आधीपासूनच बुक झाली होती. गेल्या काही दिवसात श्रीनगर विमानतळावरून फक्त १० ते १५ विमानाचे उड्डाण होत असे आता हा आकडा ४५ ते ५० वर गेलेला आहे. काश्मीरमधील तंगधार हा डोंगराळ परिसर कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर आहे. पाकिस्तान व्याप्त काश्मीरला तीन बाजूंनी वेढलेले आहे. हा एक नितांत सुंदर परिसर आहे. तर गुरेज हे खोरे बांदीपोरा जिल्ह्याच्या नियंत्रण रेषेवर असून ट्रेकरसाठी हा परिसर नेहमीच खुणावतो. येथील दूध पथरी खोरे हे एक पाहण्यासारखे ठिकाण आहे. दूध पत्री म्हणजे दुधाची दरी. कारण इथल्या गवताच्या शेतांतून वाहणारे पाणी दुधासारखे दिसते. लोलाब हे ठिकाण उत्तम आहे कारण पूर्वी याला काश्मीरचे प्रवेशद्वार म्हटलं जात होते. ही अंडाकार असलेली अनोखी दरी आहे. कोरोनामुळे अनेक लोकांनी परदेशी प्रवास रद्द केला असल्याने काश्मीर आणि हिमाचल प्रदेशकडे जाणे पसंत केले आहे.

काश्मीरमध्ये नवीन पर्यटन हंगाम सुरू होताच आशियातील सर्वात मोठं ट्यूलिप गार्डन पर्यटकांसाठी खुलं करण्यात आले. पूर्वेतील सिराज बाग म्हणून ओळखले जाणारे इंदिरा गांधी मेमोरियल ट्यूलिप गार्डन २००८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी सुरू केले होते. ट्यूलिप गार्डन जबरवन पर्वत रांगाच्या पायथ्याशी स्थित असून आशियातील सर्वात मोठं ट्यूलिप गार्डन आहे.

ट्यूलिप गार्डन सुमारे ३० हेक्टर क्षेत्रात पसरलेले आहे. काश्मीर खोऱ्यात फुलांची शेती आणि पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशाने हे उद्यान उघडण्यात आले होते. या बागेत यावर्षी विविध प्रकारची सुमारे १५ लाख फुलांची लागवड करण्यात आली आहे. आतापर्यंत बागेत सुमारे २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ट्यूलिप गार्डनमध्ये यंदा ६२ प्रकारच्या ट्यूलिप आहेत. ट्यूलिपची फुले सरासरी तीन ते चार आठवडे टिकतात. परंतु मुसळधार पाऊस किंवा जास्त उष्णतेमुळे ते नष्ट होण्याची शक्यता जास्त असते.

फ्लोरीकल्चर विभाग टप्प्याटप्प्याने ट्यूलिप लावतात. जेणेकरून फुले बागेत महिनाभर किंवा त्याहून अधिक काळ टिकतील. खोऱ्यात नवीन पर्यटन हंगाम सुरू झाल्याने पर्यटन विभागाने पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बागेत सांस्कृतिक कार्यक्रमाची योजना आखली आहे. ट्यूलिप गार्डन उभारण्यामागील उद्देश म्हणजे पर्यटकांना आणखी एक पर्याय देणे. येथे दरवर्षी हजारो पर्यटक येतात. लॉकडाऊनमुळे मागील वर्षी बंद असलेलं गार्डन दोन वर्षांनंतर खुलं करण्यात आले आहे. याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की फ्लोरिकल्चर विभागाने मानक ऑपरेटिंग प्रक्रियेची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी पुरेसे उपाय केले आहेत.

अतुल माने, ज्येष्ठ पत्रकार आहेत.

COMMENTS