२ ऑगस्टपासून पर्यटकांसाठी बंद असलेले काश्मीर खोरे १० ऑक्टोबरपासून खुले होण्याची शक्यता आहे. तशा सूचना जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केल्
२ ऑगस्टपासून पर्यटकांसाठी बंद असलेले काश्मीर खोरे १० ऑक्टोबरपासून खुले होण्याची शक्यता आहे. तशा सूचना जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केल्या आहेत.
काश्मीर खोऱ्यात पर्यटकांसाठी जाहीर करण्यात आलेले सुरक्षा व प्रवासविषयक आदेश मागे घेण्यात यावेत, अशी मलिक यांनी गृह विभागाला सूचना केली आहे. राज्यपालांच्या सूचनेनुसार १० ऑक्टोबर रोजी संबंधित सुचना निर्देश (अॅडव्हायजरी) मागे घेतली जाणार असून, त्यानंतर पर्यटकासाठी काश्मीरचे खोरे खुले होणार आहे.
राज्यपाल मलिक यांनी ७ ऑक्टोबरला जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेचा आढावा घेतला. या बैठकीला विशेष सल्लागारांसह राज्याचे मुख्य सचिव तसेच योजना व गृहनिर्माण, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव उपस्थित होते. बैठकीत ब्लॉक डेव्हलपमेंट कौन्सिलच्या (बीडीसी) निवडणुकीबाबत अधिकाऱ्यांनी राज्यपालांना माहिती दिला. बीडीसी निवडणुका घेऊन जास्तीत जास्त अध्यक्ष निवडी पूर्ण करण्यात येतील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
अमरनाथ यात्रा सुरू असतानाच २ ऑगस्ट रोजी राज्य प्रशासनाने काश्मीर खोऱ्यासाठी सुरक्षाविषयक सूचना निर्देश जाहीर केले होते. त्यासाठी दहशतवादी हल्ल्याचे कारण देण्यात आले होते. पर्यटकांनी व यात्रेकरूंनी लवकरात लवकर काश्मीर सोडावे व आपल्या प्रदेशात परतावे, असे निर्देश देण्यात आले होते.
त्यानंतर ५ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने काश्मीरबाबत लागू असणारे ३७० कलम रद्द केले. त्यानंतर राज्याची पूनर्रचना करून जम्मू-काश्मीर व लडाख अशा दोन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर काश्मीरमध्ये ठिकठीकाणी संचारबंदी लागू करण्यात आली असून, माध्यमांवर नियंत्रण आणण्यात आले आहे. तसेच फोन आणि इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. काही ठिकाणी दूरभाष यंत्रणा सुरु करण्यात आली आहे. मात्र एकूण खोरे बंद अवस्थेत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून काश्मीरमधील पर्यटन व्यवसाय पूर्णपणे थांबला आहे. या पार्श्वभूमीवर हा नवा निर्णय घेण्यात आला आहे.
COMMENTS