श्रीनगर : काश्मीरमधील इंटरनेट बंदीला झुगारून व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्कचा (व्हीपीएन) वापर करून इंटरनेट मिळवून सोशल मीडियावर लिहिणाऱ्या अनेकांची पोलि
श्रीनगर : काश्मीरमधील इंटरनेट बंदीला झुगारून व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्कचा (व्हीपीएन) वापर करून इंटरनेट मिळवून सोशल मीडियावर लिहिणाऱ्या अनेकांची पोलिसांकडून चौकशी सुरू झाली आहे. गेले सहा महिने जम्मू व काश्मीरमध्ये इंटरनेट बंदी असल्याने व्हीपीएनद्वारे इंटरनेट मिळवण्याचे प्रयत्न खोऱ्यातील काही जण करत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी सोशल मीडियावर आपले लक्ष केंद्रीत केले आहे.
ज्या कोणी व्हीपीएनद्वारे इंटरनेट मिळवले असेल त्यांच्यावर आमचे लक्ष असून सोशल मीडिया वापरण्यांपर्यंत आम्ही लवकरच पोहचू व त्यांच्यावर यूएपीए कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा पोलिस महानिरीक्षक दिलबाग यांनी दिला आहे.
पोलिसांनी अद्याप किती जण व्हीपीएन वापरत आहेत याची माहिती उघड केलेली नाही. पण अवैधमार्गाने सोशल मीडिया वापरणाऱ्यांवर पहिल्यांदाच यूएपीएअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येत आहे. हा कायदा दहशतवादी कृत्यांसंदर्भात राबवला जातो पण काश्मीर पोलिसांनी त्याचा उपयोग व्हीपीएन वापरून इंटरनेट मिळवणाऱ्यांवर केला आहे.
काश्मीर पोलिसांनी या संदर्भात एक फिर्यादही नोंद केली आहे. त्या अंतर्गत व्हीपीएन वापरण्यांना अटक करण्यात येईल असे इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलिस विजय कुमार यांनी स्पष्ट केले.
काश्मीरमध्ये इंटरनेटवर बंदी असताना व्हीपीएन वापरून सोशल मीडियाच्या माध्यमातून अप्रचार केला जात आहे, अफवा पसरवल्या जात आहेत त्याचा फायदा दहशतवाद्यांना मिळू शकतो असे पोलिसांचे म्हणणे आहे. व्हीपीएनद्वारे इंटरनेट वापरल्याने काश्मीरमधील शांततेलाही बाधा पोहचत असल्याचा पोलिसांचा दावा आहे.
गेल्या १४ जानेवारी रोजी जम्मू व काश्मीर प्रशासनाने सर्व सोशल मीडिया संकेतस्थळांवर बंदी आणली आहे. सध्या काश्मीरमध्ये टूजी इंटरनेट सेवा सुरू आहे.
मूळ बातमी
COMMENTS