काश्मीर प्रश्नात हस्तक्षेप करणार नाही – संयुक्त राष्ट्र

काश्मीर प्रश्नात हस्तक्षेप करणार नाही – संयुक्त राष्ट्र

नवी दिल्ली : काश्मीरप्रश्न हा भारत आणि पाकिस्तान या दोघांनी चर्चेतून सोडवायचा असून त्यामध्ये संयुक्त राष्ट्र हस्तक्षेप करणार नाही असे बुधवारी संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटानिओ गुटेरस यांनी स्पष्ट केले. गेले दोन दिवस जिनिव्हात सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत भारत आणि पाकिस्तानमध्ये काश्मीरमधील मानवाधिकार उल्लंघनावरून वादविवाद झाले होते. आणि गेल्या महिन्यात पाकिस्तानने काश्मीरप्रश्नी संयुक्त राष्ट्रांनी मध्यस्थी करावी अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर गुटेरस यांचे विधान अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. गुटेरस यांची भूमिका संयुक्त राष्ट्रांचे मुख्य प्रवक्ते स्टीफन ज्युरीक यांनी मांडली.

१९७२च्या सिमला करारात काश्मीर प्रश्न हा द्विपक्षीय असून कोणतीही मध्यस्थी अमान्य असल्याचे भारत व पाकिस्तानने मान्य केले होते आणि त्या कराराचा संयुक्त राष्ट्रही आदर करत आले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सनदेनुसार हा प्रश्न संवादाने व शांततामय मार्गाने सोडवावा अशी अपेक्षा आहे. काश्मीर प्रश्न हा जरी संवेदनशील व चिंतेचा असला तरी दोन्ही देशांच्या नेत्यांनी हा विषय चर्चेच्या माध्यमातून सोडवणे हाच पर्याय आहे, असे गुटेरस म्हणाले.

काही दिवसांपूर्वी जी-७ बैठकीत गुटेरस व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा झाली होती. त्याचबरोबर पाकिस्तानच्या विनंतीनुसार पाकिस्तानच्या संयुक्त राष्ट्रांमधील दूत मलिहा लोधी यांनीही गुटेरस यांची भेट घेतली होती.

काश्मीर प्रश्नात संयुक्त राष्ट्राने मध्यस्थी करावी अशी मागणी पाकिस्तानने दोनवेळा केली आहे. पण आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या मागणीकडे सर्व देशांनी दुर्लक्ष केले आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीनेही काश्मीर प्रश्नी चर्चा घेण्यास टाळले आहे. भारताने ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय हा अंतर्गत मामला असल्याचे म्हटले आहे आणि हे वास्तव पाकिस्तानने स्वीकारावे असे सांगितले आहे.

मूळ बातमी

COMMENTS