अंधाराची झगमगाटावर मात…

अंधाराची झगमगाटावर मात…

‘कौन प्रवीण तांबे?’ हा चित्रपट आयुष्यात एकदा तरी रणजी सामना खेळण्याची मनीषा बाळगून असणाऱ्या प्रवीणची खरीखुरी गोष्ट. त्यासाठी केलेली धडपड, मेहनत, प्रतीक्षा या सर्वाचा अचंबित असा प्रवास.

क्रिकेट निकालाचे गणित
लॉर्डस् कसोटी: भारताचा “न भूतो न भविष्यति” विजय….
दंतकथेतील राजाने केला प्राक्तनाचा स्वीकार!

एका गावात एकदा आकाशवाणी होते की ‘पुढील बारा वर्ष पाऊस पडणार नाही. ढगांना विश्रांती देण्याचे देवाने ठरविले आहे. गावाला धनधान्य, भाजीपाला, पाणी पुरविण्याची व्यवस्था केली जाईल.’ हे समजल्यापासून गावकऱ्यांनी विचार केला की, इतकी वर्ष आपणही राबराब राबतोय, या निमित्ताने आपण देखील विश्रांती घेऊ. म्हणजे जेव्हा पाऊस पडेल तेव्हा अधिक जोमाने कामाला लागू. सर्व गाव आराम, गप्पाटप्पा यात रमलेला असताना मात्र एक माणूस रोज शेतात जाऊन काही ना काही काम करायचा. लोक त्याला हसायचे. त्याला खुळा म्हणायला लागले. एक दिवस त्याच्या मुलाने विचारले, ‘बाबा सारा गाव तुमच्यावर हसतोय, कशाला करताय ही वायफळ ढोर अंगमेहनत? याचा काय उपयोग?’ त्यावर तो माणूस शांतपणे म्हणाला, ‘जेव्हा बारा वर्षाने पाऊस पडेल तेव्हा माझी श्रम करण्याची सवय मोडलेली नसावी, म्हणून मी काम करतोय.’ हे उत्तर मुलाबरोबर ढगांनी देखील ऐकले. त्यांच्या मनात आशंका निर्माण झाली. हा माणूस म्हणतोय त्यात तथ्य  आहे. आपली देखील पाऊस पाडण्याची शक्ती आरामामुळे गमवून बसलो तर.. या विचाराने ते सैरभैर झाले. इकडेतिकडे पळू लागल्याने, एकमेकांवर आपटू लागले. परिणामी आकाशवाणी होऊनही पाऊस पडायला लागला.

या गोष्टीला दुजोरा देणारी घटना आयपीएल २०१४मध्ये घडली. प्रवीण तांबे नामक ४२ वर्षाच्या माणसाने आपल्या अखंड मेहनतीने, जिद्दीच्या जोरावर नशिबाला सैरभैर करून आपल्या पदरात दान पाडायला भाग पाडलं. जेव्हा त्याच्या वयाची लोकं या खेळातून निवृत्ती स्वीकारून, तृप्तीचा ढेकर देत जगत होती. तेव्हा हा अवलिया न कंटाळता स्वतःला परत, परत सिद्ध करत होता. क्रिकेट जगात एक मोठी आश्चर्यकारक अशी घटना घडत होती. अशक्यप्राय गोष्टीला साध्य करणाऱ्या अंकल प्रवीण तांबेला बघून केवळ तरुणाई नाही तर आख्खे क्रिकेटप्रेमी थक्क झाले. फार क्वचितच स्वप्नांना तरुणाईच्या ताज्या वासाऐवजी प्रौढत्वाचा परिपक्व सुगंध येतो. इथे तर तो गंध सर्वत्र दरवळत होता.

अचानक सर्वत्र कोण हा प्रवीण तांबे? याबद्दल कुतूहल निर्माण झालं. प्रसारमाध्यम, सोशल मीडिया प्रवीण तांबेबद्दल भरभरून लिहित, बोलले जात होते. मिळालेल्या माहितीवरून वाह, वाह करत होते. सर्वजण या चमत्काराला नमस्कार करत होते. पण हा योगायोगाने घडलेला चमत्कार नसून, हे एका खडतर तपश्चर्येचे नियतीला दिलेले सणसणीत उत्तर आहे, हे लोकांच्या लक्षात येत नव्हते. पण कोणीही खोलात जाऊन प्रवीण तांबेच्या अशक्यप्राय प्रवास समजून घेतला नाही.

आणि १ एप्रिल २०२२ला ओटीटीवर ‘कौन प्रवीण तांबे?’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. आयुष्यात एकदा तरी रणजी सामना खेळण्याची मनीषा बाळगून असणाऱ्या प्रवीणची खरीखुरी गोष्ट. त्यासाठी केलेली धडपड, मेहनत, प्रतीक्षा या सर्वाचा अचंबित असा प्रवास. चित्रपट बघणाऱ्या प्रत्येकाच्या मनात प्रवीणच्या पिळवटून टाकणाऱ्या धडपडीला बघून कालवाकालव झाली असेल, डोळ्यात पाणी आलं असेल. त्यातल्या त्यात ७०-८० च्या दशकातील तरुणाईला हा चित्रपट जास्त हृदयगत वाटला असेल.

कारण त्याकाळी जगण्याची एक सुरक्षित चौकट सर्वमान्य होती. शिक्षणाला- डिग्रीला प्रचंड महत्त्व, सरकारी नाहीतर बँकेत अथवा एखाद्या मोठ्या कंपनीतली नोकरी, घर, लग्न, मुलंबाळं हे म्हणजे कृतार्थ आयुष्य. आवडी, छंद, खेळ याचा त्या चौकटीत फारसा शिरकाव नव्हता. चाकोरीबद्ध आयुष्य जगत असताना विरंगुळ्याचे चार क्षण म्हणून याकडे बघणे, इतकीच पचनी पडणारी मानसिकता. त्यासाठी आख्खे आयुष्य पणाला लावणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा! संकुचित मध्यमवर्गीय मनोवृत्तीच्या दबावाला प्रवीणची जिगरबाज प्रवृत्ती कधीही बळी पडली नाही. ज्यांनी त्याच्या या धडपडीकडे अवहेलनेने बघितले. त्याच मध्यमवर्गीयांना त्यांच्या आवडत्या आणि येता जाता फेकत असलेल्या ‘खुदी को कर बुलंद इतना..’ या शेराचा संदर्भासहित अर्थ प्रवीणमुळे स्पष्ट झाला असेल.
आपल्या या क्रिकेट भक्तीसाठी प्रवीणने काय, काय नाही केलं, किती वेळा मोडून परत स्वतःला उभं केलं. हे सर्व आपल्याला चित्रपटातून कळतं. ते सर्व थक्क करणारे आहे. प्रवीण तांबेची भूमिका श्रेयस तळपदेने इतकी समरस होऊन केली आहे, हे बघतांना आधीच्या त्याच्या कोणत्याही भूमिकेची छाप आपल्याला आढळत नाही. दिसत असतो तो फक्त प्रवीण तांबेच! त्याला स्वतःला ही भूमिका त्याच्या जवळ जाणारी वाटते. त्याचाही प्रवास असाच संघर्षमय आहे. त्यामुळे या भूमिका त्याने जीव तोडून साकारली आहे.

काही लोक एकदम पारदर्शक असतात, त्याच्या समोर उभे राहिले तर अगदी आरपार दिसावे इतकी पारदर्शक. प्रवीण तांबे हे व्यक्तिमत्व असेच. जगण्याबद्दलचा कमीतकमी गोंधळ मनात असलेला. आपल्या मनाच्या होकायंत्राच्या निर्देशानुसार चालणारा. आपल्याला नेमकं काय हवे, याची सुस्पष्टता असणारा.

चित्रपटाचा सूत्रधार रजत संन्याल हा एक क्रीडा – पत्रकार आहे. त्याच्या व्यक्तिमत्वात असलेली एक प्रकारची नकारात्मकता प्रवीणला बघून अधिक उफाळून येत असते. टाइम्स शिल्ड मॅचमधील प्रवीणला मिळालेलं यश हे लक बाय चान्स आहे, तो गल्ली क्रिकेटर आहे. असा त्याचा पक्का समज. आपल्या म्हणण्याला खरं ठरवण्यासाठी प्रवीणचा पाणउतारा करण्याची एकही संधी सोडत नसे. कायम उपहासात्मक हास्य त्याच्या चेहऱ्यावर खेळत असते. प्रवीण म्हणजे त्याची पंचिंग बॅग असल्यासारखा वागत असतो. का काही माणसं घेणं-देणं नसताना एखाद्याशी सूड उगवल्यासारखी वागतात? वैयक्तिक असमाधान हे कारण त्याच्या मुळाशी असते. आपल्यातल्या कमतरतेची जाणीव एखाद्या व्यक्तीमुळे प्रखरतेने जाणवते. म्हणून सुद्धा त्यांचा रागराग अशी माणसं करतात. रजतचा त्रागा स्वतःच्या अयशस्वी क्रिकेट कारकिर्दीबाबत आहे की, प्रवीणसारखा पेशन्स आपल्यात नाही, ही वैफल्याची बोच आहे. हे त्याचे त्यालाच कळत नसते. गंमत बघा, अशा कोत्या मानसिकतेच्या लोकांच्या मताला किंमत असते. आपल्या प्रतिमेला घडवण्याचा, तोडण्याचा अधिकार त्यांना एका हुद्द्यामुळे मिळालेला असतो. आणि अशा लोकांची मत बदलण्यासाठी आपल्याला विनाकारण धडपडावे लागते. स्वतःचे टायमिंग कायम चुकणाऱ्या रजतला प्रवीणचे टायमिंग कसे चुकेल, याबद्दल अधिक रस असतो.

व्यावहारिक जगाचा आणि आपल्या क्रिकेट प्रेमाचा तोल सांभाळत प्रवीण दिवसा क्रिकेट प्रॅक्टिस आणि रात्री एका बियरबारमध्ये काम करत असतो. एकदा नेमका त्याच बारमध्ये रजत मित्रांसोबत येतो. प्रवीणला वेटरच्या रुपात बघून त्याला आसुरी आनंद मिळतो. माकडाच्या हातात कोलीत मिळाल्याप्रमाणे तो प्रवीणशी वागतो. जास्तीत जास्त मानहानी करत, प्रवीणला घायाळ करतो. अपमानाने व्यथित झालेला प्रवीण डान्सरच्या मेकअप रूममध्ये जातो. कधी नव्हे ते कोलमडून गेलेला प्रवीण टिप म्हणून रजतने दिलेले पैसे फेकून, जोरात ढसाढसा रडतो. पोटापाण्यासाठी हा व्यवसाय पत्करलेल्या बारबाला आपले दुःख मेकअपच्या आड लपवून नाचत असतात, लोक खुश होऊन पैसे देण्याच्या निमित्याने जवळीक करू बघतात. तसाच प्रवीण नियतीच्या तालावर नाचत असतो. मानहानीच्या वेदना त्यांच्या खेरीज कोणाला अधिक समजणार ! अगदी काही सेकंदाचा हा प्रसंग अतिशय परिणामकारक घेतला आहे.

वास्तव आणि स्वप्न यातील फरक वेळोवेळी आजूबाजूची लोक करून देण्यात तत्पर असतात. जीवनामध्ये छोटी मोठी वादळे प्रत्ययी येतच असतात. या सर्वाचा नेटाने सामना करत जीवनाचे विरोधीभासाने भरलेले अंतरंग बघून जीव मेटाकुटीला येतो. अवघड असते इतक्या दबावाखाली मनोधैर्य टिकवून ठेवणे. स्वतःवरचा विश्वास डगमगू न देणे. पण कधी कधी हा आत्मविश्वास देखील चकवा देतो. ओरिएंटचे नवे कोच म्हणून विद्या पराडकर सूत्र हातात घेतात. पारखी नजरेच्या पराडकर सरांना प्रवीणच्या बॉलिंगमध्ये बदल करावासा वाटतो. प्रवीणने आपला वेळ मीडियम पेस वर न घालवता स्पिन बॉलिंग करावी, असा आग्रह ते धरतात. सांगितलेला बदल प्रवीणला फारसा रुचत नाही. साशंक मनाने प्रवीण आपल्या नैसर्गिक खेळाबद्दल ठाम राहतो.

पण तिथे मात्र प्रवीण चुकतो. सरांच्या अनुभवी सल्ल्याची प्रचिती त्याला बऱ्याच काळानंतर लक्षात येते. तसा तो परत पराडकर सरांना शरण जातो. हा प्रसंग खूप हृदयस्पर्शी आहे. सपक चव असलेली भेंडीची भाजी पराडकर सर बनवत असतात. त्यात योग्य प्रमाणात मसाले, मीठ घालून प्रवीणला चव चाखायला देतात. ती चविष्ट झाल्याचे तो सांगतो. चवीचे गणित सराईतपणे जमलेले सर त्याला सांगतात, “आयुष्य असो वा क्रिकेट तुला फक्त एका चांगल्या ओव्हरची गरज आहे.” आणि जेव्हा आयपीलमध्ये त्याच्या हातात बॉल सोपवला गेला तेव्हा त्याने त्याच्या आयुष्यातील सर्वात बेस्ट ओव्हर टाकत इतिहास घडवला. अर्थात पराडकर सरांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःला झोकून दिल्याने हा करिश्माला घडला होता.

प्रवीण तांबे हे नाव प्रसिद्धीच्या लाटेवर स्वार झालं. याचे बरंच श्रेय राहुल द्रविडला जात. प्रवीणची निवड करण्याचे धाडस दाखवले. आता तसेच श्रेय चित्रपटाच्या लेखक किरण यज्ञोपवीत आणि दिग्दर्शक जयप्रद देसाई यांना द्यायला हवे. नाहीतर त्याची असामान्य धडपड जगासमोर आलीच नसती. त्यांनी प्रवीणला लार्जर दॅन लाईफ न दाखवता, आहे तसा दाखवला आहे. ही विशेष अभिनंदनीय बाब आहे. हा सिनेमा केवळ जोश वाढवण्यासाठी बनवलेला नसल्याने लाऊड सीनचा मारा अजिबात नाही. चित्रपटात अजून उल्लेखनीय अशा बऱ्याच गोष्टी, प्रसंग आहेत. प्रवीणचे कुटुंब, त्याचे भावबंध, त्याचे मित्र मंडळी, चाळीतले, मैदानावरील जीवन याचे अप्रतिम चित्रण दर्शविले आहे. सर्व कलाकारांची उत्तम साथ लाभली आहे. रजत सन्यालचे नकारात्मक नॅरेशन आणि प्रवीणची सकारात्मक वृती यांची सुप्त जुगलबंदी रंगतदार जमली आहे. सई परांजपे यांच्या ‘कथा’ या चित्रपटानंतर खूप वर्षांनी अस्सल चाळीचा फिल अनुभवायला मिळतो.

हा चित्रपट म्हणजे प्रवीण तांबे नामक एका सकारात्मक मानसिकतेचा घेतलेला मागोवा आहे. ‘कौन प्रवीण तांबे?’ याचं उत्तर एका व्यक्तींबद्दल सीमित नसून अनेकांच्या मनात दडलेल्या प्रवीण तांबेबद्दल आहे. ज्यांनी जगण्यातल्या अगदी छोट्याशा अपेक्षा पूर्ण केल्या असतील, इतरांसाठी भले त्या नगण्य असल्या तरी स्वतःसाठी त्या गोष्टी अनमोल आहेत. ज्यांनी आपल छोटं स्वप्नं साकार करण्याची धडपड केली आहे, त्यांच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहात नाही.

श्रेयसने एका मुलाखतीत विचार करायला लावणारी गोष्ट सांगितली. जेव्हा त्याची स्वतःची कारकीर्द डामाडोल झाली होती. नेमकं काय करावे, हे समजत नव्हते. तेव्हा त्याने जॉनी लिव्हर याच्याकडे आपलं मन मोकळं केलं. त्यावेळेस जॉनी लिव्हर यांनी सांगितले, “बेटा ! दुनिया गोल, गोल फिरत असते. तसचं वेळेचे देखील असं चक्र फिरत असतं. २४ तासाचं चक्र पूर्ण झाल्यावर नवा दिवस उगवतो. तू असं समज की तू वर्तुळाच्या मध्ये उभा आहेस. जशी चित्रपटात शुटिंगसाठी वर्तुळाकार ट्रकवर ट्रॉली लावलेली असते. तशी लावलेली आहे. त्यावर एक लाइटमन आहे, त्याने मोठा फोकस लाइट तुझ्यावर टाकला आहे. लाइट ट्रॉलीवरून फिरतो आहे. तो फिरत असताना तुझ्यावरचा लाइट थोड्या वेळाने निघून जाऊन, तुझ्यावर अंधार येईल. तो लाइट आता दुसऱ्या कोणावर असेल. ट्रॉली फिरत असेल आणि फिरता, फिरता तो लाइट पुन्हा तुझ्यावर परत येईल. आता खरी तुमची परीक्षा काय असते की त्या अंधाराचे तुम्ही काय करतात? तिथेच उभे राहता का पळून जाता ? अंधारात उभे राहून काम केलं तर संभव आहे की, परत प्रकाशझोत तुझ्यावर येईल. त्यासाठी तिथे तुझी पाय रोवून उभे राहून प्रकाशाची वाट बघण्याची तयारी हवी. त्यावेळी तुम्ही अंधारात असताना काय काम केलं ते बोलत. कारण अंधारातच कामाबद्दलची तुमची निष्ठा दिसते.”

प्रवीणची, श्रेयसची अंधारातील निष्ठाच खणखणीत नाणं ठरली. आणि अंधाराने झगमगाटावर मात केली…

देवयानी पेठकर या चित्रपटकलेच्या आस्वादक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0