खशोगी हत्या : ‘सौदीच्या युवराजांची चौकशी करा’

खशोगी हत्या : ‘सौदीच्या युवराजांची चौकशी करा’

तपास समितीच्या प्रमुख कलामार्ड यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांना एक पत्र लिहून या प्रकरणी सलमान यांच्यावर आंतरराष्ट्रीय निर्बंध घालावेत व आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांतर्गत त्यांची चौकशी करावी अशी मागणीही केली आहे.

२०२०मध्ये जगभरात ५३ पत्रकारांच्या हत्या
पिगॅससः हंगेरीतल्या पत्रकाराचा सरकारवर खटला
पत्रकारितेसाठी भारत धोकादायक

सौदी पत्रकार जमाल खशोगी यांच्या हत्येत सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांचा हात असल्याचा खळबळजनक अहवाल संयुक्त राष्ट्र मानवाधिकार समितीने बुधवारी प्रसिद्ध केला.

या अहवालात खशोगी यांचे इस्तंबुल येथील सौदीच्या दुतावासात जाण्यापासून त्यांची हत्या या दुतावासात कशाप्रकारे करण्यात आली इथपर्यंत अत्यंत काटेकोर माहिती आहे.

हा अहवाल तुर्कस्तानच्या गुप्तहेर खाते व तपास यंत्रणेने सादर केलेल्या पुराव्यांवरून आधारित असून सौदीचे युवराज सलमान व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची या प्रकरणात कसून चौकशी व्हावी अशी मागणी हा अहवाल तयार करणाऱ्या महिला अधिकारी अॅग्नेस कल्लामार्ड यांनी केली आहे.

खशोगी यांची हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले व ते वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये भरण्यात आले. खशोगी हा ‘बळीचा बकरा’ (Sacrificial Animal) असे संवाद मारेकऱ्यांच्या तोंडातून आले होते, आणि खशोगी यांच्या मृतदेहांचे तुकडे पिशव्यांमध्ये कसे भरावे याची माहिती या अहवालात नमूद करण्यात आली आहे. खशोगी यांची हत्या सुनियोजित, कट-कारस्थानाचा भाग असून सौदी राजे सलमान यांच्यासह प्रशासनातले बडे अधिकारीही या प्रकरणात सामील असल्याचे मत तपास समितीने व्यक्त केले आहे.

तपास समितीच्या प्रमुख कलामार्ड यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांना एक पत्र लिहून या प्रकरणी सलमान यांच्यावर आंतरराष्ट्रीय निर्बंध घालावेत व आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांतर्गत त्यांची चौकशी करावी अशी मागणीही केली आहे.

मूळचे सौदी अरेबियाचे पत्रकार जमाल खशोगी हे अमेरिकेतील वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टमध्ये स्तंभलेखन करत होते. त्यांच्या स्तंभात सौदीच्या राजघराण्यावर टीका केली जात होती. त्यामुळे ते सौदीच्या रोषास कारण झाले होते.

गेल्या ऑक्टोबर महिन्यात खशोगी इस्तंबुल येथील सौदी दुतावासाच्या कार्यालयात गेले असताना ते बेपत्ता झाले नंतर त्यांच्या हत्येचे वृत्त आले होते. खशोगी यांच्या हत्येचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर जगभर खळबळ उडाली होती. कारण ही राजकीय हत्या असल्याचे मानले गेले आणि जगभरातल्या मीडियाने सौदीच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पण सौदीने या हत्येशी आपला संबंध नसल्याचे कारण सांगून हात झटकले होते. पण तुर्की तपास यंत्रणेने सौदीच्या कथित सहभागाबद्दल शंका व्यक्त केल्यानंतर सौदी अरेबियाने खशोगी यांची हत्या झाल्याचे मान्य केले. नंतर संयुक्त राष्ट्र मानवाधिकार समितीने खशोगीच्या यांच्या हत्येचे गूढ उलगडण्यासाठी एक तपास पथक तयार केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: