पॅरिस: फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये धार्मिक विद्वेषातून शिक्षकाची हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच, नीस शहरातील एका चर्चमध्ये झालेल्या चाकूहल्ल्यात ति
पॅरिस: फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये धार्मिक विद्वेषातून शिक्षकाची हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच, नीस शहरातील एका चर्चमध्ये झालेल्या चाकूहल्ल्यात तिघांची हत्या झाल्यामुळे अवघे जग हादरले आहे. नीस शहरातील चर्चमध्ये घुसून एकाने तिघांची हत्या केली, अशी माहिती फ्रान्समधील पोलिसांनी दिली आहे. चर्चमध्ये प्रार्थनेसाठी आलेल्या एका वृद्ध स्त्रीचे शीर तर अक्षरश: धडावेगळे करण्यात आले. संशयितावर गोळी चालवून त्याला लगेचच ताब्यात घेण्यात आले.
हा इस्लामी दहशतवादाचाच प्रकार आहे, असे फ्रान्सचे अध्यक्ष एमॅन्युएल मॅक्राँ घटनास्थळाला भेट दिल्यानंतर म्हणाले. फ्रान्स आपल्या मूल्यांबाबत कधीही तडजोड करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. चर्चेस व शाळांजवळ सुरक्षिततेसाठी अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
नीसचे महापौर ख्रिश्चियन एस्त्रोसी यांनीही हा ‘इस्लामी फॅसिझम’चाच प्रकार आहे, असे म्हटले आहे. संशयित सातत्याने ‘अल्लाहु अकबर’ (अल्ला सर्वांत शक्तिमान) असे म्हणत होता, असे त्यांनी नमूद केले.
दहशतवादविरोधी पोलिसांनी हत्येची चौकशी सुरू केली आहे आणि फ्रान्समध्ये राष्ट्रीय सुरक्षेचा सर्वोच्च स्तरावरील इशारा देण्यात आला आहे. हल्लेखोर २१ वर्षांचा ट्युनिशिअन स्थलांतरित होता, असे फ्रेंच माध्यमांच्या बातम्यांमध्ये सांगितले जात आहे. मात्र, याची अधिकृत स्रोतांनी याबाबत अद्याप कोणतेही तपशील दिलेले नाहीत.
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला पॅरिसमधील सॅम्युएल पॅटी नामक शिक्षकांची त्यांच्या शाळेबाहेर हत्या करण्यात आली होती. मेयर एस्त्रोसी यांनी या घटनेची तुलना या शिक्षकाच्या हत्येशी केली. मात्र, पोलिसांनी अद्याप नीस हल्ल्यामागील प्रेरणेबाबत कोणतेही स्पष्ट विधान केलेले नाही. मात्र, प्रेषित मुहम्मदांबद्दलच्या कार्टून्सच्या प्रकाशनाची फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्राँ यांनी पाठराखण केल्याप्रकरणी काही मुस्लिम बहुसंख्य राष्ट्रांमध्ये सुरू झालेल्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर या हल्ल्याकडे बघितले जात आहे. काही मुस्लिम बहुसंख्य राष्ट्रांमध्ये फ्रेंच मालावर बहिष्कारही घालण्यात आला आहे.
दरम्यान, गुरुवारी सकाळी आणखी दोन हल्ल्यांच्या घटना झाल्या. त्यातील एक फ्रान्समध्ये तर दुसरी सौदी अरेबियामध्ये झाली. अविग्नाँजवळ माँफावे येथे पोलिसांना हॅण्डगनने धमकावल्यानंतर एका व्यक्तीला गोळी घालून मारण्यात आले. तर सौदी अरेबियातील जेद्दाह येथील फ्रेंच वकिलातीबाहेरील सुरक्षा कर्मचाऱ्यावर हल्ला करण्यात आला. संशयिताला अटक करण्यात आली आहे, तर सुरक्षा कर्मचाऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नाइसमधील घटनेबद्दल अधिक माहिती
हल्ला झालेल्यांपैकी दोघे चर्चच्या आतमध्ये मृतावस्थेत आढळले. यात एका वयोवृद्ध स्त्रीचा तसेच एका पुरुषाचा समावेश होता. पुरुषाचा गळा चिरण्यात आला होता, असे समजते. एक स्त्री वारंवार चाकूने भोसकण्यात आल्यानंतरही निसटून जवळच्या कॅफेत गेली होती पण नंतर तिचाही मृत्यू झाला.
चर्चजवळ राहणाऱ्या प्रत्यक्षदर्शींपैकी एकाने सांगितले: “आम्हाला रस्त्यावर अनेकांचा आरडाओरडा ऐकू आला. आम्ही घराच्या खिडकीतून अनेक पोलिस येता जाताना बघितले, गोळीबाराचे आवाज ऐकू आले.”
या हल्ल्यानंतर लगेचच घटनास्थळी पोहोचलेल्या टॉम व्हेनीए या पत्रकारितेच्या विद्यार्थ्याने बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, लोक रस्त्यांवरून रडत ओरडत जात होते.
चार वर्षांपूर्वी नीस शहराला लक्ष्य करून दहशतवादी हल्ला झाला होता. १४ जुलै २०१६ रोजी एका ट्युनिशिअन व्यक्तीने बेस्तील दिन साजरा करणाऱ्या गर्दीत ट्रक घातला होता. यात ८६ जणांचा मृत्यू झाला होता.
फ्रान्सला २०१५-१६ मध्ये दहशतवादी हल्ल्यांचा जेवढा धोका होता, तेवढाच धोका आज जाणवू लागला आहे, असे मत बीबीसीचे फ्रान्समधील प्रतिनिधी ह्युग स्कोफिल्ड यांनी व्यक्त केले आहे. चार्ली हेबदो, बाताक्लान, नीसमधील लॉरी हत्या आणि फादर हामेल यांची रौएंमधील चर्चमध्ये झालेली हत्या या भीषण दहशतवादी हल्ल्यांच्या स्मृती जाग्या झाल्या आहेत, असेही स्कोफिल्ड यांनी नमूद केले. त्या काळात परिस्थिती खूप वाईट होती, खूप लोक मारले गेले होते. मग आत्ताच इस्लामिक हिंसाचार एवढा भयावह का वाटत आहे, असा प्रश्न उपस्थित करून स्कोफिल्ड यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. इस्लामी दहशतवाद भयावह वाटत आहे याचे एक कारण सॅम्युएल पॅटी यांची हत्या हे असू शकते. एका साध्या इतिहासाच्या शिक्षकाची हत्या होऊ शकते आणि ती रॅण्डम पद्धतीने होत नाही, तर हत्येसाठी निवडला जातो ही बाब फ्रेंच जनतेसाठी हादरवून टाकणारी आहे. नीसमधील चर्चमध्ये प्रार्थनेसाठी चर्चमध्ये गेलेल्या ख्रिश्चिनधर्मीयांवर झालेला हल्लाही याच प्रकारचा आहे, असे स्कोफिल्ड यांनी नमूद केले आहे.
अध्यक्ष मॅक्राँ यांनी सॅम्युएल पॅटी यांच्या शोकसभेत सेक्युलरिझमची दमदार पाठराखण केल्याची ही प्रतिक्रिया असू शकेल, असेही म्हटले जात आहे.
त्यातच कोविड-१९ साथीच्या दुसऱ्या लाटेमुळे फ्रान्समध्ये गुरुवारी रात्रीपासून लॉकडाउन सुरू होत आहे.
फ्रान्स संसदेत मौन
नीस हत्याकांडाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी फ्रान्सच्या संसदेत एक मिनिटभर शांतता पाळण्यात आली. हा हल्ला पाशवी आणि भ्याड होता, अशी टीका पंतप्रधान जाँ कास्ते यांनी संसदेत केली. राष्ट्रीय सुरक्षेसाठी सर्वोच्च स्तरावरील इशारा दिल्याची घोषणाही त्यांनी केली. फ्रेंच कौन्सिल ऑफ मुस्लिम फेथने नीसमधील हल्ल्याचा निषेध केला आणि त्याला बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.
फ्रान्सच्या पाठीशी ठामपणे उभा आहे अशी ग्वाही ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी इंग्रजी व फ्रेंच अशा दोन्ही भाषांत ट्विट करून दिली आहे.
राष्ट्राध्यक्ष मॅक्राँ यांच्या विधानांमुळे गेल्या काही दिवसांत टर्की व फ्रान्सच्या संबंधांमध्ये कडवटपणा आलेला आहे. मात्र, नीसमधील हल्ल्याचा टर्कीतर्फे तीव्र निषेध करण्यात आला आहे. या चाकूहल्ल्यामुळे “प्रेम व सांत्वनेच्या स्थळी मृत्यूचे आक्रमण झाले आहे” अशा शब्दांत व्हॅटिकनचे प्रवक्ते मॅटीओ ब्रुनी यांनी खेद व्यक्त केला.
मृत्युमुखी पडलेले कोण होते?
बसिलिका चर्चमधील हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले तिघेही जण गुरुवारी सकाळी पहिल्या माससाठी चर्चमध्ये आले होते. यातील स्त्रीचे वय सत्तरीच्या आसपास होते, तर पुरुष ४०-५० वयोगटातील होता. तो चर्चच्या कर्मचाऱ्यांपैकी एक असावा असा अंदाज आहे. चर्चमधून जखमी अवस्थेत निसटलेली पण नंतर दगावलेली स्त्री वयाच्या तिशी-चाळिशीतील होती.
मूळ बातमी
COMMENTS