जातप्रथा आणि स्त्रीमुक्ती – डॉ. आंबेडकरांचे विचार

जातप्रथा आणि स्त्रीमुक्ती – डॉ. आंबेडकरांचे विचार

जातीतच लग्न करण्याची ही प्रथा तेव्हाच नष्ट होऊ शकते जेव्हा जातीचे मूळ कारण नष्ट होईल. बहुतेक उच्चवर्णीय विचारवंतांनी या मुद्द्याकडे पुरेसे लक्ष दिले नाही हे आश्चर्याचे आहे, अथवा जाणूनबुजून केलेले आहे.

सवर्णांचे पाणी प्याले म्हणून दलित विद्यार्थ्याचा मारहाणीत मृत्यू
‘सिरीयस’, ‘कॅज्युअल’ आणि जातीची जाणीव
जात प्रमाणपत्र, जातपडताळणीची प्रक्रिया एकत्रितपणे होणार

भारतातील जातीभेद आणि स्त्रियांचे प्रश्न ह्या वेगवेगळ्या सामाजिक समस्या आहेत असंच सर्वसाधारणपणे मानलं जातं. बहुतेक सवर्ण समाजसुधारकांनी, विचारवंतांनी या विषयांची स्वतंत्रपणेच मांडणी केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र या समस्यांचा एकत्रितपणे विचार केला आहे.

महिला हक्कविषयक चळवळी युरोपमध्ये १९५० च्या दशकात सुरू झाल्या. भारतातही महिला चळवळ याच सुमारास सुरू झाली. त्याआधी जवळपास शंभर वर्षांपासून देशात जातीविरोधी चळवळी चालू आहेत. भारतातील स्त्रियांच्या समस्या जातीव्यवस्थेशीही संबंधित आहेत. स्त्रीसमस्या संपूर्ण जगात आहे, पण जातप्रथा संपूर्ण जगात नाही. हे भारतीय परिस्थितीचं वेगळेपण आहे.

भारतीय समाज व्यवस्था पुरुषप्रधान आहे. म्हणूनच अशा समाजात पुरुषाचे प्राबल्य असते. स्त्रीचे स्थान त्याच्या खाली आहे. मुलीकडे कनिष्ठतेने पाहिले जाते. हिंदू धार्मिक ग्रंथ, कथा, म्हणी आणि वाक्प्रचार यामध्येही मुलींचे वर्णन एक ओझे म्हणून केले गेले. मुलगी म्हणजे परक्याचे धन आणि स्त्री म्हणजे नरकाचे द्वार! अशी समजूत कशी निर्माण झाली असेल?

असं नक्कीच म्हणता येईल की हे सगळं स्त्रियांचं शोषण करण्यासाठीच निर्माण करण्यात आलं.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील जातीपाती आणि स्त्रियांच्या समस्या यांचा पहिल्यांदाच एकत्रितपणे अभ्यास करून जगापुढे मांडला. त्यांनी कोलंबिया विद्यापीठात १९१६ मध्ये ‘भारतातील जाती – संरचना, मूळ आणि विकास’ या शीर्षकाचा एक शोधनिबंध सादर केला. यामध्ये त्यांनी दाखवून दिले की जातीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे स्वतःच्या जातीमध्ये लग्न करणे – ‘सजातीय विवाह’. येथे कोणीही स्वतःच्या मर्जीने लग्न करू शकत नाही. त्याला समाजमान्यताही नाही. म्हणून सनातन परंपरेनुसार प्रेमावरही बंदी आहे. या शोधनिबंधात बाबासाहेब पुढे लिहितात की – ‘ऐतिहासिकदृष्ट्या आणि परंपरेत भारतात अनुलोम संबंध समाजमान्य आहेतच. म्हणजेच, तथाकथित उच्च जातीचा पुरुष खालच्या जातीच्या स्त्रीशी विवाहबाह्य शारीरिक संबंध ठेवत आला आहे आणि ही समाजमान्य प्रथा आहे. पण प्रतिलोम संबंधांना परवानगी नाही. म्हणजेच उच्च जातीच्या स्त्रीला स्वतःपेक्षा कमी जातीच्या पुरुषाशी शारीरिक संबंध ठेवता येत नाही. तसे करणे पाप आहे’.

भारतातील स्त्रियांच्या समस्या जसे की सती प्रथा, बालविवाह, विधवा विवाहावर बंदी, प्रेमविवाहावर बंदी, ऑनर किलिंग, दुय्यम वागणूक इत्यादी सर्व कुप्रथा यामधून निर्माण झाल्या. यापैकी अनेक वाईट प्रथा अजूनही भारतीय हिंदू समाजात चालू आहेत.

‘पुरुषांपेक्षा जास्त संख्येने महिला’ ही धर्म आणि जातीव्यवस्थेसमोरील मोठी समस्या आहे.

बाबासाहेबांचे स्पष्टीकरण आहे की कोणत्याही समाजात निसर्गतः स्त्री-पुरुष गुणोत्तर जवळजवळ समान असते. जर गुणोत्तर समान नसेल आणि पुरुष किंवा महिला अतिरिक्त असतील, तर त्यापैकी काहींचे लग्न होऊ शकणार नाही. ज्यामुळे अशा जास्तीच्या अविवाहित राहिलेल्या व्यक्ती अनैतिक संबंध करतील अशी शक्यता आहे. हे टाळण्यासाठी आणि सामाजिक संतुलन राखण्यासाठी स्त्री आणि पुरुषांची संख्या जवळजवळ सारखीच असणे आवश्यक आहे.

जातव्यवस्था कायम ठेवण्यासाठीसुद्धा पुरुष आणि स्त्रियांची संख्या समान असावी लागेल. ही पण एक समस्या सनातन समाजधर्मासमोर आहे. जातीनिहाय लिंग गुणोत्तर बिघडले तर सजातीय विवाहांची व्यवस्थाच कोलमडून पडेल. बाबासाहेब लिहितात की – जर एखादा माणूस मेला तर त्याची पत्नी विधवा बनते. जर तिला त्या जातीत पुनर्विवाहासाठी योग्य जोडीदार मिळाला नाही तर ती शारीरिक गरजेपोटी किंवा सुरक्षिततेच्या दृष्टीने जातीबाहेरील पुरुषाशी शारीरिक संबंध ठेवू शकते, लग्न करू शकते, त्यामधून संतती होऊ शकते आणि जातिव्यवस्थेला तडे जाऊ शकतात.

‘हे टाळण्यासाठी धर्मलंडमार्तंडांनी दोन क्रूर युक्त्या केल्या. ‘सती प्रथा आणि विधवा विवाहावर बंदी.’ वाचकांना कदाचित हे फार बटबटीत वाटेल. हिंदू धर्मावर केलेली निराधार टीका आणि काल्पनिक, हेतुपुरस्सर आरोप वाटतील. अशा लोकांनी सती प्रथा आणि विधवा विवाहावर बंदी या प्रथांचं यापेक्षा वेगळं तार्किक स्पष्टीकरण सापडलं तर नक्की द्यावं. सनातन धर्माच्या नावाखाली वर्णवर्चस्ववादी लोकांनी सती सारख्या अमानुष प्रथा निर्माण केल्या. सती म्हणजे महान पतिव्रता, पुण्यवान, स्वर्गाचीच नव्हे तर मोक्षाची हमी, या समजुती समाजात आहेत. जागोजागी असलेल्या सतीमातेच्या मंदिरातील गर्दी याचा पुरावा आहे. जे लोक मनातल्या मनात सती प्रथेचं समर्थन करतात त्यांनी एकदा स्वतःच्या तळहातावर धुमसणारी अगरबत्ती फक्त एक मिनिटभर टेकवून बघावी.

सती प्रथेमध्ये स्त्रीला मृत पतीच्या चितेवर जिवंत जाळलं जायचं. किंवा विधवा म्हणून तिला आयुष्यभर नरकयातनाने भरलेलं दुय्यम जीवन जगावे लागतं. सध्या सतीची प्रथा अस्तित्वात नाही. मुघल काळातही या नीच प्रथेवर बंदी घातली गेली होती. राजा राममोहन राय आणि ब्रिटिश गव्हर्नर विल्यम बेंटिंक यांच्यामुळे १८२९ मध्ये सतीप्रथेवर कायद्याने बंदी घातली गेली. परंतु विधवा स्त्रीकडे मात्र अजूनही आदराने पाहिले जात नाही. तिला धार्मिक कार्यक्रमात सहभागी होता येत नाही. हळदीकुंकू, पूजा, मंगळागौर अशा सामाजिक प्रसंगी बोलावले जात नाही.

जात मोडू नये यासाठीच बालविवाहाची प्रथा आजही आहे. नकळत्या वयातच लहान मुलीचे लग्न लावण्यात येते, जेणेकरून ती कोणाच्याही प्रेमात पडू नये. जेव्हा ती प्रेम म्हणजे काय हे समजण्याच्या वयात येईल तेव्हा तिने कोणावर प्रेम करावे हे तिला स्पष्टपणे माहित असले पाहिजे. इथेच जात आणि स्त्रियांच्या समस्या एकमेकांशी जोडल्या जातात. समाजात जात टिकवायची असेल तर पितृसत्ता टिकवावी लागेल. जाती व्यवस्था प्रेमविरोधी आहे. स्त्री जन्माला आली त्या जातीमध्येच तिने लग्न केले पाहिजे यावर समाज अजूनही आग्रही आहे, पण यामुळेच जातिव्यवस्था टिकून आहे.

धर्माचरणाच्या नावाखाली पुरोहितवर्गाने समाजात अशा प्रथा, अशी मूल्ये जाणूनबुजून निर्माण केली. लहान वयात मुलीचे लग्न करणे म्हणजे धर्माचे, रूढीसंमत आणि चांगले सामाजिक सन्मानाचे काम मानले गेले. मुलगी वयात आल्यावर तिचा ऋतू वाया घालवणे म्हणजे अधर्म. अशा पित्याला नरकाची खात्रीच. प्रेमात न पडता निमूटपणे पित्याने ठरवलेल्या वराशी लग्नाला उभे राहणे हे चांगल्या संस्कारीपणाचे लक्षण मानले गेले. हे मुलींच्या मनातही सांस्कृतिकदृष्ट्या रुजवलं जातं की प्रेमात पडणं चुकीचे आहे.

जर कोणी जातीचे बंधन तोडले, म्हणजेच जर कोणी जातीच्या बाहेर लग्न केले तर त्याला जातीतून काढून टाकले जाते. जातपंचायत दाम्पत्याला आणि त्यांच्या कुटुंबियांना वाळीत टाकते किंवा जबर आर्थिक दंड वसूल करते. किंवा बंडखोर प्रेमिकांना अधिक हिंसक अशी ऑनर किलिंगची शिक्षाही दिली जाते. समाजाला गतिहीन, स्थितिवादी, गतानुगतिक आणि सुधारणांच्या विरोधी बनवण्यासाठी अशा प्रथा निर्माण केल्या गेल्या. त्यांना धर्माचे, पाप-पुंण्याचे कारण देऊन समाजमान्य बनवले गेले, जेणेकरून कोणीही प्रथा परंपरांना तोडू शकणार नाही. जातव्यवस्था टिकवण्यासाठी सजातीय (एंडोगॅमस) विवाह पद्धतीचे धार्मिक उदात्तीकरण करून समाजमान्य प्रथा बनवण्यात आले.

जातीतच लग्न करण्याची ही प्रथा तेव्हाच नष्ट होऊ शकते जेव्हा जातीचे मूळ कारण नष्ट होईल. बहुतेक उच्चवर्णीय विचारवंतांनी या मुद्द्याकडे पुरेसे लक्ष दिले नाही हे आश्चर्याचे आहे, अथवा जाणूनबुजून केलेले आहे. जातीविरोधी चळवळ आणि महिला चळवळ एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, दोन्ही एकत्र चालूनच यशस्वी होऊ शकतात.

भारतात देवदासी व्यवस्था बऱ्याच काळापासून चालू आहे. देवदासी पद्धतीमध्ये एका तथाकथित निम्न जातीच्या मुलीचे लग्न मंदिरातील मूर्तीशी केले जाते. मूर्तीच्या नावाने पुजारी, उच्चवर्णीय तिचे लैंगिक शोषण करतात. त्या मुलीला जन्मलेल्या संततीला देवाचे अथवा माता देवीचे मूल म्हणतात. कोणतीही उच्चवर्णीय स्त्री देवदासी बनत नाही, म्हणून त्यांना या भयंकर प्रथेचा प्रत्यक्ष अनुभव येऊच शकत नाही. समाजातील उच्च जातीच्या स्त्रियांची स्थिती आणि दलित महिलांची स्थिती यातील फरक यावर संयुक्त राष्ट्रांचा एक अहवाल आहे. ज्यानुसार दलित महिलेचे आयुर्मान सरासरीपेक्षा १४ वर्षे कमी आहे म्हणजे एक दलित स्त्री, उच्च जातीच्या स्त्रीच्या १४ वर्षा आधीच मरण पावते.

महिला चळवळीचा खरा नायक आणि नायिका कोण आहे.

भारतातील महिलांच्या शिक्षणाची पहिली चळवळ सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांनी सुरू केली. ज्योतिबा फुले यांनी शाळा उघडली होती ज्यात सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख मुलींना सगळे त्रास, अत्याचार आणि अवहेलना सोसून मोफत शिक्षण देत असत.

बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना कायदेशीर हक्क देण्याविषयी आणि विशेषतः वडिलोपार्जित संपत्तीत वाटा देण्याविषयी आग्रही होते. बाबासाहेबांनी यासाठी हिंदू कोड बिल बनवले, जे मूळ स्वरूपात पास होऊ दिले गेले नाही. हिंदू कोड बिलामध्ये लग्न, वारस, दत्तक इत्यादी संबंधी समान कायदे होते. सावित्रीबाई आणि जोतीराव फुले, फातिमा शेख, डॉ आंबेडकर हे भारतीय महिला चळवळीचे प्रतीक आहेत. पण त्यांना आजपर्यंत हा दर्जा मिळालेला नाही.

प्रथा परंपरांच्या नावाखाली सामाजिक स्तर आणि प्राधान्य उपभोगणाऱ्या तथाकथित उच्चवर्णीयांचा तर फायदाच आहे. पण त्यांच्या बरोबर बहुजन समाजही अशा प्रथांमध्ये आपली मान स्वतःहून अडकवून जातिव्यवस्थेचा फासच स्वतःच्याच गळ्याभोवती आवळत आहे. हे सर्व बहुजन समाजाला हळूहळू समजू लागले आहे. तरुण पिढी चुकीच्या निरर्थक प्रथा झुगारून जगण्याचे धाडस करू लागली आहे. जातीअंताच्या चळवळीमध्येच स्त्रीसबलीकरणाची शक्यता आहे.

संदर्भ: – डॉ. भीमराव आंबेडकर तसेच श्री. संजय बंजारे यांचा फेसबुकवरील हिंदीमधील लेख.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0