सततच्या पावसाने कृष्णा व पंचगंगा नद्यांना महापूर येऊन सांगली व कोल्हापूर ही दोन शहरे संकटात अडकली आहेत. बुधवारी पंचगंगा नदीची पाण्याची पातळी ५५ फूट ४ इंच इतकी वर गेल्याने पूरस्थिती अधिक गंभीर झाली आहे. शहराच्या बाहेरून जाणाऱ्या पुणे –बंगळुरू महामार्गावर १० फुटाहून अधिक पाणी वाढले आहे.
सांगली व कोल्हापूर, या दोन जिल्ह्यांतली अनेक धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने व धरणातून पाण्याचा होणारा विसर्ग व संततधार पावसाने दोन्ही शहरांचा अर्धा भाग पाण्याखाली व्यापला आहे. बुधवारी दुपारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी कोल्हापुरात येऊन पुराची पाहणी केली. स्थानिक प्रशासन, पोलिस, एनडीआऱएफ, लष्कर व नौदलाच्या मदतीने पुरात अडकलेल्यांना वाचवण्यात येईल असे या दोघांनी सांगितले. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहनही त्यांनी केले. वेळप्रसंगी केंद्राची मदत घेणार असल्याचेही ते म्हणाले.
एकट्या कोल्हापूरात ५१ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. शहराचा मुख्य भाग व नदीकाठच्या भागात पुराचे पाणी प्रचंड वाढल्याने शहरात येणारे सर्व मार्ग बंद झाले आहेत. नदीकाठची खेडी पाण्याखाली गेली आहेत. एकूणच शहर व नजीकच्या खेड्यांमधील जनजीवन विस्कळीत झाले असून दूध, भाजीपाला, पेट्रोलसह अन्य अत्यावश्यक सुविधांवर परिणाम झाला आहे. शहरातील अनेक भागात वीज व पाणी पुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांच्या हालाला पारावार उरलेला नाही.
त्याचबरोबर जिल्ह्यातल्या हातकणंगले, शिराळा तालुक्यातील ३८ हजार नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. शिरोळ तालुक्यातील १७ गावांना पुराचा तडाखा बसला आहे. दत्त देवस्थान असलेले नृसिंह वाडी गाव पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. तर हातकणंगले तालुक्यातील १५ हजार नागरिकांना स्थलांतरित केले आहे. या तालुक्यातील बहुसंख्य मार्गावरची वाहतूक पुरामुळे बंद आहे. रेल्वेमार्गही पाण्याखाली गेल्याने परिस्थिती बिकट झाली आहे.
इचलकरंजी शहरालाही पुराचा फटका बसला असून तेथील ७०० हून अधिक कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.
सांगलीत महापुराने २००५ चे रेकॉर्ड मोडले
सांगलीतही पुराने थैमान घातले आहे. येथील पूरस्थिती हाताळण्यासाठी एनडीआरएफ, पुणे-चिंचवड महापालिकेचे पथक, जिल्हा प्रशासन, लष्कर यांची मदत घेतली जात आहे. जिल्ह्यातील ७० हजारहून अधिक नागरिकांचे पुनर्वसन करण्यात आले आहे.
कोयना, वारणा या धरण क्षेत्रात ३ ऑगस्टनंतर अतिवृष्टी झाल्याने सांगलीत पूर आला आहे. शहरात आयर्विन पुलाची इशारा पातळी ४० फूट तर धोका पातळी ४५ फूट आहे. बुधवारी ७ ऑगस्टला सकाळी ११पर्यंत ही पातळी ५४.४ फूट झाली होती. ही पातळी २००५च्या तुलनेत सर्वोच्च ठरली आहे. जिल्ह्यातील २२ राज्य मार्ग, २९ प्रमुख जिल्हा मार्ग बंद आहेत. कोल्हापूर-मुंबई रेल्वे सेवा बंद आहे. एसटी महामंडळाचे २० मार्ग बंद आहेत.
कोल्हापूर परिसरातील सर्व छायाचित्रे – अभिजित गुर्जर
COMMENTS