कोसी मच्छिमारांच्या ‘संरक्षणा’चे उपाय तारक नव्हे मारक

कोसी मच्छिमारांच्या ‘संरक्षणा’चे उपाय तारक नव्हे मारक

१९६०च्या दशकात, सरकारी अभियंत्यांनी पूर रोखण्यासाठी कोसी आणि कमला नद्यांभोवती बंधारा बांधला होता. इथल्या भागातील जनजीवनच पूरावर अवलंबून असल्याचे अर्थातच त्यांना माहित नसणार हे उघड आहे.

नेपाळ पोलिसांच्या गोळीबारात १ भारतीय ठार
भारताचे ‘नेबरहूड फर्स्ट’ परराष्ट्र धोरण
नेपाळच्या दोन्ही सभागृहांची वादग्रस्त नकाशाला मंजुरी

नेपाळच्या बाजूनं असणार्‍या हिमालयांच्या तळाशी कोसी-कमलाच्या पूरप्रवण भागात राहणार्‍या लोकांचं जनजीवन मासेमारी आणि शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे नदी व दलदलीच्या प्रदेशाभोवती त्यांचे आयुष्य केंद्रीत आहे. उन्हाळ्यात शेती पावसाच्या पाण्यावरच केली जाते तर हिवाळ्यात भूगर्भातील पाणी सिंचनाद्वारा व दलदलीतून पंपाद्वारे पाणी उपसून त्यावर शेती केली जाते.
ऐतिहासिकदृष्टया कोसी क्षेत्र सपाट आणि समुद्रसपाटीपासून कमी उंचीवर आहे. थोडक्यात पूरप्रवण भूप्रदेश आहे. मात्र परिसरातील समुदायाने कोसी आणि कमला नद्यांना मिळणार्‍या छोट्या नद्यांचा मार्ग बंद करून पूरनियंत्रणाच्या प्रतिबंधात्मक उपायावरच घाला घातला. परिणामी कोसी आणि कमला नदीच्या बंधार्‍याभोवती असणार्‍या दलदलीला पुरेसे पाणी मिळेनासे झाले. नद्यांभोवती १९६० मध्ये बंधारा घालण्यात आला होता, तेव्हापासून कोसीच्या पूरस्थितीत अपरिवर्तनीय बदल झाले आहेत. अलीकडेच कोसीमध्ये येणारा वार्षिक; पूर-मुख्यत्वेकरून उत्तर बिहारच्या दरभंगा जिल्ह्यात येणारा पूर फारच अनियमित झाला आहे. इतकेच नाही तर एकदा, बारमाही दलदलीचा भूप्रदेशही कोरडा पडला आहे.
इथला दलदलीचा काही भाग हा देशातील अशा काही भूभागांपैकी आहे, जिथे ताज्या पाण्यातील स्थानिक माशांच्या प्रजाती अद्यापही टिकून आहेत. इथल्या मच्छीमारासाठी ह्या प्रजाती उपजीविकेचा स्त्रोत आहे. शिवाय ह्या दलदलीच्या भूभागात अनेक स्थलांतरित पक्षी येतात. खराब हंगामात, शेतकरी या दलदलीतून पाणी काढून पिकं जगवतात व याची मदत पूराचा जोर कमी करण्यासही होते. दलदलीच्या भूप्रदेशाला भरपूर महत्त्वं असलं तरी वास्तवात असे भूभाग कमी झाले आहेत.

कमला नदीवरील बंधारा. स्त्रोत- लेखक

कमला नदीवरील बंधारा. स्त्रोत- लेखक

खरंतर, कोसी-कमला नद्यांना घातलेला बंधारा आणि कोसीला येणारा अनियमित पूर याचा मासेमारीच्या पद्धतीवर परिणाम झाला. मच्छिमारांना पारंपरिक मासेमारीऐवजी ‘उपछा’सारख्या असुरक्षित मासेमारी पद्धतीचा अवलंब करणं भाग पडलं. या पद्धतीत पोर्टेबल पंपाने दलदलीतून पाणी उपसले जाते. या पद्धतीने मासे आणि दलदलीचा भाग नष्ट होतो आणि त्याचा परिणाम त्या भूभागातील इतर माशांच्या जातींवर होतो.
मच्छिमार जेव्हा दलदलीच्या उथळ भूभागातून पाण्याचा उपसा करत असतात नेमक्या त्याचवेळी माशांची प्रजननाची वेळ असते. त्याच कालखंडात मासे अंडी घालतात.
बनपर गावाची मच्छिमारांची मासेमारी पद्धत नद्यांवर घातलेला बंधाऱ्यापेक्षा कितीतरी अधिक हानिकारक आहे.  माशांचं पर्यावरणशास्त्र, स्थलांतराचा मार्ग आणि प्रजनन चक्र यांबाबत मच्छिमारांना चांगले ज्ञान आहे . निरनिराळ्या प्रजातींसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या जाळी लागतात ही माहितीही त्यांना व्यवस्थित आहे. या ज्ञानाचा वापर करून हे मच्छिमार मासेमारी करतात.
माझे वडिल मच्छिमार समुदायातील आहेत. माझ्या पीएचडीसाठी मी उत्तर बिहारमधील काही दलदलीच्या भूप्रदेशांना भेटी दिल्या व तिथल्या बनपर समाजातील लोकांशी संवाद साधला. दलदलीतून पाणी उपसण्याबाबत ते काय विचार करतात आणि त्याचा माशांवर कसा परिणाम होतो याबाबतही मी त्यांना विचारले.
मच्छिमार क्षणभर शांतच झाले. मग थोड्यावेळाने एक मच्छिमार म्हणाला, “दलदलीतून मासे काढणं सोपं आणि स्वस्त आहे, कारण बंधार्‍याच्या बाहेरच्या बाजूला पूर येत नाही. त्यामुळं पावसाळा नसतो तेव्हा पाण्याची पातळी घटते.”
त्याने पुढे सांगितले, “पण हे असं नेहमी घडत नाही. नद्यांना बंधारा घातल्यापासून दलदल उपसण्यास सुरूवात झाली. आता तर कमला नदीच्या भोवती म्हणजे उत्तरेकडे नेपाळपर्यंत ते खगारिया जिल्ह्यातल्या बैठनपर्यंत बंधारा घालण्यात आला आहे. सरकारचं म्हणणं आहे की आता आमचं पूरापासून संरक्षण झालं आहे. मात्र मच्छिमार आणि शेतकरी म्हणून आम्हाला हे माहित आहे की या कथित ‘संरक्षणा’मुळं आमचं फार नुकसान झालं आहे. पूरामुळं संसाधनं आणि जोखिम दोन्हीही आहेत. पण मासेमारी व शेतीसाठी दलदलींमध्ये ओलसरपणा हवा आणि तो येण्यासाठी वार्षिक पूराची आम्हाला आवश्यकता आहे.”
एका मच्छिमारांनं आपलं मनोगत मांडल्यानंतर इतरही नागरिक बोलू लागले.

नालाकृती सरोवरातील खोल पाण्यात ताज्या माशांची मासेमारी स्त्रोत- लेखक

नालाकृती सरोवरातील खोल पाण्यात ताज्या माशांची मासेमारी स्त्रोत- लेखक

एक म्हातारा मच्छिमार सांगू लागला, “एकदा का मान्सून सुरू झाला की मासे विस्तृत पसरणार्‍या पाण्याबरोबर जलद रित्या दूर स्थलांतर करतात. बहुतांश मासे हे मान्सूनच्या पहिल्या प्रवाहाबरोबरच स्थंलातर सुरू करतात. अशारितीनं वेगवेगळ्या नद्या आणि दलदलीच्या भूप्रदेशात माशांच्या विविध प्रजाती पसरण्यासाठी पूराची मदत होते. आता मात्र, मासे स्थलांतर करत नाहीत. शिवाय कोसी-कमला यांना घातलेल्या बंधार्‍यामुळं त्यांना येऊन मिळणार्‍या लहान लहान नद्यांचा प्रवाह थांबला आणि परिणामी गंगा ते कोसी-कमला आणि नंतर आमचा दलदलीचा भूभाग इथे मासे वाहून येऊ शकत नाहीत. त्यामुळे या प्रवाहात साठलेल्या माशांमध्ये वैविध्य व ताजेपणा उरत नाही. मी जेव्हा लहान होतो तेव्हा माझ्या वडिलांबरोबर मी कोसी, कमला आणि करेह नद्यांमध्ये मासेमारी करायचो. तेव्हा आम्ही मान्सूनच्या पहिल्याच चार आठवड्यांपासून मासेमारी सुरू करायचो. जेव्हा माशे स्थलांतर आणि प्रजनन सुरू करायचे त्याकाळात मात्र आम्ही मासेमारी करत नसू. ही अतिशय शहाणपणाची पद्धत आहे कारण यामुळं माशांच्या विविध प्रजातींची वाढ ही व्हायची आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा धक्का पोचायचा नाही.”
बोलता बोलता त्यांचा आवाज टिपेला पोहचला. अर्थातच त्याचे कारण स्पष्ट होते. शासनाच्या मर्यादित दृष्टीकोनामुळे आणि त्याचबरोबर सांस्कृतिक अधोगतीमुळे त्यांना आणि त्यांच्या समुदायाची पारंपरिक जीवनपद्धत बाजूला पडली आहे. तरुण मच्छिमार मजा म्हणून करतात, नव्या पिढीच्या या वृत्तीवरही त्यांनी नेमकेपणाने बोट ठेवले. याविषयी ते सांगतात, ‘‘तरूण मच्छिमार कुठली तरी स्वस्तातला मासे पकडण्याचं जाळं त्यांना वाटेल तिथं पसरतात. अनेकदा तर गळाला लागलेले मासेही काढण्याचा प्रयत्न करत नाहीत. पकडलेले मासे वाया घालवतात.’’ याचबरोबर माशांना मारण्यासाठी कीटकनाशकांचा वापर केला जात असल्याचाही त्यांनी आरोप केला. ‘‘या कीटकनाशकांमुळं माशांच्या प्रजातीच मरत नाहीत तर इतरही जलजन्य जीव जसे की खेकडे, लहान कीटकं, पक्षी आणि कासवं यांच्यावरसुद्धा परिणाम होतो.’’ ते सांगत होते.
उपस्थितांमध्ये असणार्‍या एका तरूणांने गप्पांना सुरुवात केली. ‘माशांना पकडण्याचं जाळं आणि इतरही गोष्टी ठीक आहेत. मुलांना जे सोपं जाईल तेच ते करणार, कुणाकडंच वाट पाहण्यासाठी वेळ नाहीये. तसंही मासेच आता कमी झाले आहेत. पूर वेळेवर येत नसल्याने पूर्व मान्सून काळात म्हणजे उन्हाळ्यातही पाण्याची पातळी खालीच असते. वार्षिक पूराचीच काही खात्री नसल्याने जे अधिक फायद्याचं  आहे ते केल जाणार हे लक्षात घेतलं पाहिजे. कोसी आणि कमला नद्यांवर बांधलेला बंधारा आणि लहान नद्यांचा संगम ज्या कालव्यांच्या मुखाशी होतो, त्या भागात वाळू भरलेली आहे.’’ त्याच्या मते, कालव्यांचं मुखपात्र उघडे असले तरी कोसी आणि कमला यांच्या प्रवाहाचा वेग लहान नद्यांपेक्षा जास्त असल्याने त्याचाही उपयोग होत नाही. बंधार्‍यांमुळे होणारा

कोसीच्या दलदली जलपर्णींनं भरल्या आहेत. या जलपर्णींमुळं पाण्याचा प्रवाह रोखला जातो. स्त्रोत- लेखक

कोसीच्या दलदली जलपर्णींनं भरल्या आहेत. या जलपर्णींमुळं पाण्याचा प्रवाह रोखला जातो. स्त्रोत- लेखक

अनर्थ हा त्याचाच तर पुरावा आहे. समजा, दलदलीच्या भूभागात जर वर्षभर पाणी राहिले तर मच्छिमारांना उथळ भागातून पाणी काढून टाकण्याची गरजच उरणार नाही.
‘‘आम्ही हतबल आहोत. आम्हांला आमच्या कुटुंबांचं पोट भरायचं आहे. त्यासाठी जे करावं लागतं ते आम्ही करतोय.’’ आम्हाला अटक करण्याची भीती घातली तरी आम्ही हे करत राहू असेही त्यांनी सांगितले. आम्ही मासेमारी केली नाही तर आमची कुटुंबे भूकेने मरतील. आम्हांला मासेमारी करणेच माहित आहे. आणि पिढ्यानुपिढ्या आम्ही हेच करत आलोय. पुरामुळे जोखीम निर्माण होते या सरकारच्या अल्पदृष्टीपायी आता आम्ही मासेमारी सोडणं शक्य नाही. असेही ते सांगतात.
बिहारमधील पूर नियंत्रणासाठी बंधारा बांधणे हा अभियांत्रिकी उपाय झाला. त्यांच्यापुढे फक्त एकच उद्दिष्ट होते ते म्हणजे पूर रोखणे. पण हे करत असताना अभियंत्यांनी त्या परिसरात राहणार्‍या माणसांचा आणि जनजीवनांचा विचारच केलेला नाही.
मासेमारीची पारंपरिक पद्धत शिकण्यासाठी आणि टिकवण्यासाठी बनपर समुदायातील तरूणांना प्रोत्साहन दिले जात नाही. याबाबत प्रचंड उदासीनता आहे. याचा परिणाम म्हणजे फक्त त्यांची संस्कृती संपुष्टात येत आहे असे नाही तर ते स्वत:च दलदल नष्ट करत आहेत.  गेली कित्येक दशके याच दलदलींने त्यांची उपजीविका सांभाळली आहे.
उपस्थितांपैकी एकाने तर अशी भीती व्यक्त केली की, आम्ही आमचे ‘पारंपरिक मासेमारीचे शहाणपण आणि पद्धती’ आधीच गमावल्या आहेत. वेगवेगळ्या प्रजातींसाठी जाळे विणणे, तलाव आणि दलदलींच्या पुनर्जिवन करण्यासाटी प्रयत्न करणे, पाण्याच्या प्रवाहात आणि माशांच्या प्रजातींची अदलाबदल करण्यासाठी नद्या आणि दलदलीच्या संगमांची देखभाल करणे यांसारखे म्हत्वाचे पारंपारिक ज्ञान लुप्त होत आहे. हवामानबदलाचा परिणाम मान्सूनवरही झाला आहे. अशीच स्थिती राहिली तर नजीकच्या काळात कोसीच्या आसपासच्या भागात पूर येणेही बंद होण्याची शक्यता आहे. याउलट अधिकाधिक पूराची बनपर मच्छिमारांची गरज आहे. तसे घडले नाही तर एकतर ते स्थलांतर करतील किंवा तिथेच राहून दलदलीचा भूभाग नष्ट करतील.
कोसी कमला पूरग्रस्त भागावरून असे अधोरेखित होते की, पूरपट्ट्यांमध्ये पायाभूत सुविधा देताना, तिथली गुंतागुंत आणि तिथल्या सामाजिक व पर्यावरणीय परिसंस्थेचा विचार अत्यावश्यक आहे.

रणजीत कुमार सहानी हे अशोका ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकॉलॉजी अ‍ॅन्ड द एन्व्हार्यटमेंट इथं पी.एचडी करत आहे.

हा लेख मूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद आहे.

अनुवाद – हिनाकौसर खान-पिंजार

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0