त्या व्यक्तीची मनस्थिती आपण समजून घ्यायलाच हवी. घडले त्यात तिची काही चूक नव्हती व पुन्हा असे कधीही घडणार नाही. घडू लागले तर आपल्या बाजूने उभे राहणारे, विचार करणारे अनेक लोक आहेत, हा विश्वास आपल्या सर्व लहानथोर मित्रमंडळींना आपण द्यायला हवा. त्यामुळे कुठल्याही व्यक्तीला होणाऱ्या त्रासातून बाहेर पडण्यास मदत होईल. कुणीतरी आपल्यावर विश्वास टाकणारे आहे, आपल्या बाजूने बोलणारे आहे, आपले ऐकून घेणारे आहे, याची त्या व्यक्तीला पुन्हा रस्ता चालू लागायला मदत होते, हे मात्र त्रिकालाबाधित म्हणावे असे सत्य आहे.
लैंगिक छळ झालेल्या व्यक्तीच्या मनात ते प्रसंग घर करून राहतात. त्याचे परिणाम अनेक वर्षे होऊ शकतात. त्या परिणामांमध्ये काही वेळा शारीरिक त्रास असतो, मानसिक-भावनिक त्रास असतो. समाजाशी असणाऱ्या नात्यावर तसाच स्वतःच्या लैंगिक आरोग्यावर – लैंगिक इच्छेवरही वेगवेगळा परिणाम होऊ शकतो.
आम्ही एका ठराविक वयोगटातल्या (२० ते २९ ) अविवाहितांशीच बोललो. तरी त्या १२४० सहभागींपैकी (मुलगे, मुली, ट्रान्स व्यक्ती सर्व धरून) ९१७ जणांनी त्यांना आयुष्यभरामध्ये कुठल्या ना कुठल्या लैंगिक छळास सामोरे जावे लागल्याचे सांगितले.
मनापासून संमती न देता घडलेली कोणतीही लैंगिक कृती म्हणजे लैंगिक अत्याचार किंवा लैंगिक छळ होय.
या संशोधनामध्ये लैंगिक छळाची विविध रूपे समोर आली.
अपमानास्पद, अश्लील पद्धतीने लैंगिक शेरे मारले जाणे हे २५% मुलग्यांनी व ५१ % मुलींनी त्यांच्याबाबतीत घडल्याचे नोंदवले.
नको असलेल्या पद्धतीने लैंगिक स्पर्श केले जाणे हे ३५% मुलग्यांनी व ७६ % मुलींनी नोंदवले.
समोरील व्यक्तीने लैंगिकदृष्ट्या स्पर्श करण्यास भाग पाडणे हे ११% मुलग्यांनी व १५% मुलींनी नोंदवले.
असा लैंगिक छळ झाला तेव्हा त्यांपैकी ८७% जण अठरा वर्षांहून कमी वयाचे म्हणजे बालवयात होते आणि त्यांचा छळ करणारे सहसा प्रौढ तर होतेच, पण त्यात पुरुषांचे प्रमाण कमालीचे जास्त होते. छळ करणाऱ्यांत ८४% पुरुष व १६% स्त्रिया होत्या. ३५% वेळा छळ करणारी व्यक्ती घरातली किंवा कुटुंबातीलच होती.
मागे लागणे, पाठलाग, छेड काढली जाणे, असे अनुभव १०% मुलग्यांनी तर ४०% मुलींनी नोंदवले.
मोबाईल किंवा इंटरनेटच्या माध्यमातून लैंगिक छळ झाल्याचे ४% मुलग्यांनी तर ३५% मुलींनी सांगितले. ५% मुलांना आणि ४% मुलींना जबरदस्तीने पोर्नोग्राफिक साहित्य पाहायला लावले गेलेले होते.
समोरच्या व्यक्तीने मनाविरुद्ध आपले लैंगिक अवयव दाखवले गेलेल्यांची संख्या ९% मुलगे तर ३२% मुली इतकी होती.
इतकेच नाही तर मुलग्यांपैकी ७% व मुलींपैकी ८% टक्के सहभागींवर बळजबरीने लिंगप्रवेशी संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला गेलेला होता. त्यातले ७५% त्यावेळी अठरा वर्षांहून कमी वयाचे होते. बळजबरी करणारी व्यक्ती बहुतेक वेळी (९२%) पुरुष तर ८% वेळेस स्त्री होती. २९% वेळा ही व्यक्ती कुटुंबियांपैकीच एक होती.
३% मुलगे आणि ३% मुली यांच्याबाबत जबरदस्तीने लिंगप्रवेशी संबंध ठेवले गेले होते. यासाठी धमकी, आमिषे किंवा बळाचा/सत्तेचा वापर केला गेलेला होता. (एकूण सहभागींपैकी ३७ जणांनी हे नोंदवले.) यापैकी ३० जण त्यावेळी अठरा वर्षांहून लहान वयाचे होते.
बळजबरी करणाऱ्या व्यक्ती मोठ्या प्रमाणात – ९५% वेळेला – पुरुष तर ५% वेळेस स्त्री होती. सामान्यपणे तीनात एक या प्रमाणात, ही व्यक्ती कुटुंबियांपैकीच होती. बहुतेक सर्व लैंगिक छळाच्या घटनांमध्ये छळ करणारी व्यक्ती सहभागीपेक्षा वयाने मोठी होती.
या सगळ्या आकडेवाऱ्या नुसत्या आकडेवार्या नाहीत. त्यात सामाजिक परिस्थितीचे, सत्ताकेंद्राचे प्रतिबिंब पडलेले आहे. आपण ज्या समाजात जगलो, वाढलो आणि वावरतो आहोत, त्याच समाजाचे हे अत्यंत बिभत्स रूप आहे. त्यावर आपली प्रतिक्रिया काय, आपण या प्रश्नाशी दोन हात कसे करणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
या प्रश्नाची आणखी एक बाजू अशी आहे, की यांतील बहुतेक सर्व लोकांनी आपला लैंगिक छळ झाला, तेव्हा कुणाला त्याबद्दल सांगितलेले नव्हते आणि बहुतेकांनी असेही म्हटले, की ते आत्ता देखील पहिल्यांदाच याबद्दल कोणाशी तरी बोलत होते. त्यांनी कधीच याबद्दल कोणाच्याही समोर वाच्यता केलेली नव्हती.
‘रॉंग’ नंबर वर भेटलेली व्यक्ती ओळख वाढवून घरी आली आणि आपण शाळेत जाण्याच्या वयाचे असताना शारीरिक जवळीक वाढवून बळजबरी केली आणि त्यामुळे आपण इतके थिजून गेलो की कशालाच विरोध करता आला नाही, हा प्रसंग असो, की घरातील काका, मामांनी बळजबरी केल्यावर, आईला त्याबद्दल कळल्यावर तिने आपल्यालाच रागावल्याची घटना असो.
राजकारणी आजोबा आपले लिंग धरून झोपायला सांगत असण्याची गोष्ट असो किंवा एखाद्या पार्टीमध्ये दारूच्या नशेत असताना मित्रानेच बळजबरी करून, त्याचा व्हिडीओ काढल्याचा प्रसंग असो.
कधी धार्मिक शिकवणीसाठी गेलेलो असताना तिथल्या धर्मगुरूंनी लैंगिक स्पर्श केल्याची घटना, तर कधी खुद्द आईवडिलांनी आपल्यावर नजर ठेवण्यासाठी झोपण्याच्या खोलीमध्ये कॅमेरा लावून ठेवण्याची घटना असो.
एकंदरीने आपल्याला समजून घेतील, असे इथे कोणीही नाही आणि आपल्या त्रासाला इथे काहीही किंमत मिळण्यासारखी नाही, किंबहुना कदाचित ही आपलीच काहीतरी चूक असावी, असे अनेकांना वाटलेले होते.
तुमची यात काहीच चूक नव्हती, असे आम्ही म्हटल्यावर देखील, ‘पण मीच काही विरोध केला नाही, करूच शकले नाही.’
‘कोणाला सांगणार? त्याने माझीच नाचक्की झाली असती.’ “कसे सांगायचे? त्याने काय होणार?’
हे प्रश्न अद्यापही समोर होते.
आपल्याकडे बऱ्याचदा लैंगिकतेबद्दलच बोलणेच होत नसल्याने, लैंगिक शोषण झाल्यास त्याविषयी कसे बोलावे, हे ना बालकाला कळते ना प्रौढांना.
संशोधनामध्ये हे प्रसंग सांगितल्यावर अनेक जणांनी खूप हलके, मोकळे वाटल्याचे सांगितले. आपली यात काहीही चूक नाही – नव्हती; हे समजल्यावर रात्रीची शांत झोप लागेल असे सांगितले. पण सांगत असतानाही काहीजणांना हे सर्व बोलण्याचा त्रासही झाला, त्या जुन्या आठवणी वर आल्या, मुलाखतीच्या दिवशी घरामध्ये पाऊल टाकता आले नाही.
या विषयावर बोलणे सोपे नव्हते.
लैंगिक छळाचा आणि त्यामध्येही मोठ्या प्रमाणावर घडणाऱ्या बाल लैंगिक अत्याचाराचा प्रतिबंध कसा करायचा, बालकांना त्याविषयी कोणती माहिती द्यायची, सुरक्षित स्पर्श-असुरक्षित स्पर्श, ओरडणे, पळून जाणे, विरोध करणे, विश्वासाच्या माणसाला जाऊन सांगणे, याविषयी अनेक पालक, शाळा व सामाजिक संस्था काम करत आहेत. बाल लैंगिक अत्याचाराच्या विरुद्ध भारतामध्ये POCSO (Protection of Children from Sexual Offenses Act, 2012) हा कायदाही आहे. त्याचे ज्ञान सर्वसामान्य लोकच नाही, तर सामाजिक व्यवस्थांमधील लोकांपर्यंत पोचलेले नाही. ते पुरेशा प्रमाणात पोचणेही गरजेचे आहे.
काही व्यक्तींमध्ये दुसऱ्या व्यक्तीच्या संमतीशिवाय संबंध ठेवण्याची इच्छा होण्याचा किंवा पौगंडावस्थेखालील बालकांसोबत लैंगिक कृती करण्याची इच्छा होण्याचा (पीडोफिलिया) मानसिक आजार असतो. बालकांसोबत लैंगिक कृती करण्याच्या उर्मी निर्माण होत असल्याने तसे करू नये, हे कळत असूनही त्यांचे स्वत:वर नियंत्रण राहत नाही. त्याबद्दलही त्यांना उपचार घेता येणे शक्य आहे, पण त्याबद्दल बोलायची तयारी नसते.
हेच नाही तर सत्ता, नियंत्रण, राग, सूड, अज्ञान यापैकी कशाही विषयी बोलण्यासाठीही आपल्या परीघ परिसरात जागा नसते. यामुळे शोषण होतच राहाते.
पण तुम्ही आणि मी, आत्ता, याक्षणी त्याबद्दल काय करायचे?
आपल्या पाल्याच्या, विद्यार्थ्यांच्याबाबत, मित्र- मैत्रिणींसोबत लैंगिक छळ घडत असता काय करायचे? आपल्या डोळ्यांदेखत काही घडत असता काय करायचे? आपल्याकडे सामाजिक संस्थेत काम करणारी व्यक्ती म्हणून, पोलीस म्हणून किंवा एक जबाबदार नागरिक म्हणून कोणी मदत मागण्यास आले असता काय करायचे?
त्याची आपल्याला स्पष्टता नसणे आणि आसपासच्या कुणालाही काही माहीत नसणे हीदेखील एक गंभीर गोष्ट आहे.
तुझ्यावर लैंगिक अत्याचार झाला, कुणी तुझा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला, तर आम्हाला सांग, हे बालकांच्या वयानुरूप शब्दांमध्ये पालकांनी सांगायला हवे आणि फक्त शब्दांमध्ये सांगून पुरेसे नाही, तर तुझ्या भावनांचा, तुझ्या नकाराचा आम्ही आदर करतो आणि तुला केलेला प्रत्येक स्पर्श हा सुरक्षितच असेल याची ग्वाही देतो, हे कृतीतूनही बालकापर्यंत पोचायला हवे. पण बऱ्याचदा ते साधतेच असे नाही अशावेळी, लैंगिक अत्याचाराविषयी, दुसऱ्या व्यक्तीला कसे सांगायचे, याविषयी बालकास अजिबात माहिती नसणार, हे गृहीत धरूनच तसे काही घडते आहे का, याबद्दल सतर्क रहायला हवे. त्यामध्ये बालकाला नेमके काय हवे आहे याचे भान ठेवणे, खोदून-खोदून गोष्टी न विचारणे आणि तुमच्यावर ठेवलेला विश्वास कधीही तुटू न देणे ही काळजी घ्यायलाच हवी.
अशा घटनेनंतर बालकांच्या वागण्यामध्ये अचानक बदल होऊ शकतो. ते मूल अचानक प्रौढांप्रमाणे वागू शकते, वेगळेच शब्द बोलू लागते, आसपासच्या लोकांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करू लागते, असे काही घडत असेल, तर असे केलेले त्याने/तिने कुठे पाहिले हे विचारून घेता येईल. आपल्यापाशी येऊन बालकाने मोकळेपणाने बोलावे इतके सुरक्षित त्याला /तिला वाटावे असे प्रयत्न आपल्यालाच अगदी जाणीवपूर्वक करावे लागतील. बालकांना अत्यंत आधार वाटेल, सोबत वाटेल, सक्षम वाटेल असे वातावरण सर्वत्र असणे खरेतर अत्यंत गरजेचे आहे.
व्यक्ती बालकवयातली असो की नसो, स्वतःसोबत झालेला छळ नोंदवणाऱ्या व्यक्तीस कधीही दोष देता कामा नये.
समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर ‘व्हिक्टीम ब्लेमिंग’ म्हणजे बळी गेलेल्या व्यक्तीसच दोष देणे घडते.
‘ही लहानशी गोष्ट आहे, त्याचा बाऊ कशाला करायचा?’ ‘तुला वाटतं सर्वजण तुझ्याकडेच पहातात.’ अशा गोष्टी तुझ्या बाबतीतच कशा घडतात?’ ‘तुझे कपडे असे असतात म्हणून हे तुझ्याबाबत घडते, ‘तू आधी का सांगितलं नाहीस’, ‘इतक्या उशिरा बाहेर कशाला जायचं’, ‘गर्दीत हे होणारच’, ‘एवढा त्रास होत असेल तर दुसरं काही करावं’, ‘इतक्या दिवसांनी तेच उकरून कशाला काढले’ इत्यादी अनेक व्हिक्टीम ब्लेमिंगची उदाहरणे आहेत. ‘असे अनेकच लोक वागतात’, ‘नेहमीच असे घडते’, असे कुठलेही कारण किंवा सबब लैंगिक छळाचे कारण म्हणून सांगणे योग्य नाही. छळाला बळी पडलेल्या व्यक्तीचा आवाज तर या गोष्टी बंद करतातच व त्याशिवाय तीस अधिक असहाय्यदेखील करतात. व्यक्तीचा किमान आदर आणि हक्क डावलणाऱ्याच या घटना आहेत.
त्या व्यक्तीची मनस्थिती आपण समजून घ्यायलाच हवी. घडले त्यात तिची काही चूक नव्हती व पुन्हा असे कधीही घडणार नाही. घडू लागले तर आपल्या बाजूने उभे राहणारे, विचार करणारे अनेक लोक आहेत, हा विश्वास आपल्या सर्व लहानथोर मित्रमंडळींना आपण द्यायला हवा. त्यामुळे कुठल्याही व्यक्तीला होणाऱ्या त्रासातून बाहेर पडण्यास मदत होईल.
त्या व्यक्तीसमोर त्या घटनेची सारखी-सारखी चर्चा न करणे, पालकांनी शांत व समंजस राहणे गरजेचे आहे. त्यातही त्या व्यक्तीच्या बोलण्या-रडण्याच्या-भावनांना गप्प करत राहून, सर्व सुकाणू स्वतःच्या हातात घेतल्यासारखेही वागू नये. त्यातून त्रास झालेल्या व्यक्तीला मदत मिळेल याची, आपल्या भावनांचा आदर केला जातो आहे, याची खात्री वाटतेच असे नाही.
काही घटना संपूर्णपणे काळ्यापांढऱ्या रंगात नसतात. त्यातल्या मिश्रछटा समंजसपणे समजून घेण्याऐवजी पटकन दोषारोप करणे, संबंधितांस चुकीचे किंवा बरोबर ठरवून मोकळे होणे, सूड, राग, द्वेष, दया, अपराधीपणा यांच्या अंमलाखाली निर्णय घेणे, हे तर कधीही योग्य ठरणार नाही. त्यामुळे अशा घटनांच्या बाबतीत शांतपणे, विवेकाने व विचारपूर्वक निर्णय घ्यायला हवा. आजच्या सामाजिक वा कायदेव्यवस्था सर्व सुरळीत आहेत असे नाही, परंतु त्यांतील खिंडारे बुजवायची असतील तर त्यांचे ज्ञान असणे व त्यांच्या जोडीने काम करणे हे आवश्यक आहे.
लैंगिक अत्याचार करणारी व्यक्ती जरी मानसिक रुग्ण नसली, तरीदेखील स्वतःच्या इच्छा, भावना वा वागणुकीवर बंध न घालता आल्यामुळे, सत्ता व नियंत्रणाच्या भावनेतून तिच्या हातून घडणारी ती कृती आहे. त्यासाठीही मदत घेता येऊ शकते, घ्यायला हवी. पोलीस यंत्रणेसकट सर्वांनीच याबाबतीत त्या व्यक्तीस संवेदनशीलतेने मदत करणे गरजेचे आहे.
लैंगिक छळ करणारी व्यक्ती असो वा स्वतःबाबत झालेली घटना – वैद्यकीय मदत, समुपदेशन, थेरपी या सगळ्याची मदत घेण्याची गरज दोहोंनाही भासू शकते.
लैंगिक छळाबद्दल बोलताना रस्त्यावर होणारी छेडछाड, टक लावून बघणे, या ‘किरकोळ’ वाटणाऱ्या घटनांकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया डोकेदुखीची आणि सरतेशेवटी हाती काही लागण्याची शक्यताही कमीच, असे म्हणून या घटना स्वतःच्याही बाबतीत आपण ‘सोडून देतो’ आणि इतरांच्याही. या घटना घडतच राहाणार किंवा त्याविषयी काही करता येणार नाही, अशी सतत स्वतःची समजूत काढत, त्या सहज डोळ्याआडही केल्या जातात.
परंतु यासारख्या अनुभवांमुळे मोठ्या प्रमाणावर मनस्ताप भोगावा लागतो आणि तुमची संमती, तुमची शारीरिक-मानसिक स्वायत्तता ही सहजपणे डावलण्याची बाब आहे, त्याला फारशी किंमत नाही हेच तुमच्यापर्यंत अप्रत्यक्षपणे पोचते.
अशावेळी लिंगभाव, वय दूर ठेवून कुठल्याही व्यक्तीने कुठल्याही व्यक्तीस पूर्णतः सोबत देणे आवश्यक आहे. मात्र जसे व्हिक्टीम ब्लेमिंग करू नये तसेच रक्षकाची भूमिकाही घेऊ नये. पुरुषाने स्त्रीचे, भावाने बहिणीचे रक्षण करणे, याला आपल्या संस्कृतीत फार महत्त्व आहे. परंतु त्यामध्ये ‘मी सांगतो, असे वाग, असे वागू नकोस’, ही वृत्तीदेखील आपसूक येते. तीमध्ये मूलभूत असमानताच वास करते.
अश्या घटना दूरवरूनही दिसणे, ओळखता येणे गरजेचे आहे. शक्य त्या प्रकारे त्या नाकारायलाही हव्यात.
पण बाकी काहीच सुचले, ताकदीने साधले नाही तरी त्या व्यक्तीस किमान ती ठीक आहे का हे विचारणे, ती जे सांगेल ते पूर्णपणे ऐकणे, त्यावर पूर्णपणे विश्वास ठेवणे, तिला धक्का बसलेला असू शकतो, याची जाणीव ठेवणे, हे तरी प्रत्येकास नक्कीच करता येईल.
(लेखाचे छायाचित्र प्रातिनिधिक स्वरूपाचे)
या अभ्यासाशी संबधीत वेब सिरीज सेफ जर्नीज, येथे पाहता येईल
क्रमशः
मैत्रेयी, तरुण मुलामुलींसमवेत त्यांच्या लैंगिक व मानसिक स्वास्थ्यासाठीचे काम करतात.
‘नातेसंबंध आणि लैंगिकता’, या मालिकेतील सर्व लेख वाचण्यासाठी मैत्रेयीअसा सर्च द्या, किंवा नावावर क्लिक करा.
(‘प्रयास आरोग्यगट’ या संस्थेद्वारे ‘युथ इन ट्रान्झिशन’ संशोधनाच्या अनुभवावर आधारित ‘नेस्ट्स’ (Non-judgemental, Empowering, Self-reflective, Technology-assistes Spaces) अशी मोफत व्यवस्था सुरु केलेली आहे, जेथे तरुणांना आपल्या प्रश्नांबद्दल बोलता येईल. हे बोलणे पूर्णपणे गोपनीय असेल व नेस्टर (संवेदनशीलपणे ऐकून घेणारी व्यक्ती) त्यांचे प्रश्न सोडवण्यास मदत करेल, गरज पडल्यास त्यांना एखाद्या आरोग्यसेवेशी जोडून देता येईल. 7775004350 हा भेटीची वेळ ठरवण्यासाठीचा संपर्क क्रमांक आहे.)
COMMENTS