लैंगिक अत्याचाराचा लपलेला चेहरा

लैंगिक अत्याचाराचा लपलेला चेहरा

नातेसंबंध आणि लैंगिकता - ज्याप्रमाणे लैंगिकतेच्या असमान जाणिवा स्त्रियांवर योनिशुचितेचे ओझे टाकतात त्याचप्रमाणे त्या पुरुषांवर कुठल्याही लैंगिक कृतीसाठी नेहमी तयार असण्याचे ओझेही टाकतात. त्यांची ‘मनापासून दिलेली संमती’ विचारली, लक्षात घेतली जातेच असे नाही. होय, लग्नाच्या नात्यामध्ये देखील.

अविवाहित-विवाहित स्त्री-पुरुष लिव्ह इन अवैध
‘सिरीयस’, ‘कॅज्युअल’ आणि जातीची जाणीव
युवकांना स्थित्यंतरात समजून घेण्याचा ‘प्रयास’

१. “मी तेव्हा सहावीत होतो. शाळेसमोर सौऱ्या राहायचा. माझ्याहून वयाने फार मोठा नव्हता तो. त्या काळी सीडीज होत्या. अर्थात गोष्ट खूप जुनी नाही पण मलाच आता काळ लोटल्यासारखा वाटतो. एकदा शाळा सुटल्यावर मी आणि सौऱ्या त्याच्या घरी गेलो. घरी कोणीच नव्हतं. आम्ही त्याच्या घरी कोणी नसताना हाफ फ्राय किंवा ऑम्लेट बनवून खायचो. पण त्यादिवशी तो म्हणाला की त्याऐवजी एक वेगळीच गंमत करू. मला वाटलं एखादा नवीन कंप्यूटर गेम असेल, पण त्याने टीव्ही लावला. एक सीडी काढली आणि म्हणाला, “ये मुव्ही तुम्हारा लाईफ बदल देगीl”

मी म्हणालो, होऊन जाऊद्या!

सीडी सुरु झाली. त्यामध्ये एक स्त्री व एक पुरुष होता. दोघे वाळवंटाच्या मधोमध उभे होते. ते ज्या वेगवेगळ्या गोष्टी करत होते, त्या मी कधीच बघितल्या नव्हत्या. माझी उत्सुकता वाढली.. खूप गरम होत होतं म्हणून, आम्ही हळूहळू कपडे काढायला सुरुवात केली.. सौऱ्याने तसे केले म्हणून मीदेखील केले. अचानक तो माझेच कपडे काढण्यास मदत करू लागला. मला थोडं थोडं काहीतरी विचित्र जाणवायला लागलं होतं. असं करत त्यानी माझे वरचे सर्वच कपडे काढले. तो नववीत होता, माझ्याहून मोठा होता, तरीदेखील गणपतीसाठी एकाच पथकात असल्यामुळे आमचं चांगलं जमायचं. तो खूप मोठा दिसायचा नाही पण त्याला हल्लीच मिश्या येऊ लागल्या होत्या.

“काय? मजा आहे ना?”

माझं त्याच्या प्रश्नाकडे, त्याच्या आवाजाकडे, कशाकडेच लक्ष नव्हतं. माझ्याही शरीरात काहीतरी होतंय, हे मला जाणवू लागलं होतं. पण माझ्यापर्यंत पोचणारी सगळीच माहिती ब्रँड न्यू होती. काही काळाने लक्षात येण्याइतपत सौऱ्याची हालचाल होऊ लागली. तो लोडाला रेलून मागे बसला होता. एक हात त्याच्या स्वतःच्या मांडीवर होता आणि दुसरा माझ्या. माझं पूर्ण लक्ष आपलं स्क्रीनमध्ये!

आपण कुत्र्याला कसं मानेला कुरवाळतो, तसं तो मला करू लागला. माझं फायनली टीव्हीवरून लक्ष उडालं. आधी वाटलं, हे बहुतेक चुकीचं आहे, पण त्याला कसं आणि काय बोलणार? तो काय करतोय, हे ही धड कळत नव्हतं. बऱ्याच वेळाने मग त्याने माझा डावा हात आपल्या हातात घेतला आणि स्वतःच्या… आम्ही तेव्हा त्या गोष्टीला वेगळाच शब्द म्हणत असू…  तो माझ्याकडे बघत माझा हात वर खाली फिरवत होता.

तो प्रसंग तिथेच संपला

त्यानंतर मी सौऱ्याशी स्वतःहून कधीच बोललो नाही, पण तो शाळेत दिसला की कसंतरी व्हायचं. सातवीत माझी शाळा बदलली. पुन्हा तसा त्याचा आणि माझा काहीच संबंध आला नाही. त्याला मी पुन्हा कधी भेटलोच नाही.

बऱ्याचदा वाटलं की कुणाशी तरी याबद्दल बोलावं. पण काय बोलणार म्हणजे त्यानी जे केलं ते नक्की चुकीचंच होतं का? असेल तरी माझी त्याला नक्की संमती होती का? म्हणजे मी काही त्याला थांबवलं नाही. प्रयत्नही केला नाही. कसा करू शकलो असतो, तेही माहीत नाही. भीती वाटत होती, दातखीळ बसली होती, गोठून गेलो होतो.”

२. “मला वाटतं की या जगामध्ये प्रेम सर्वांच्या वाट्याला येत नाही. कदाचित त्यांची लायकीच नसते ती… असो! बहुतेक तो मुद्दाच नाही! मी काय म्हणत होतो? तर मला नेहमी असं वाटतं, की मी आजवर माझ्या कुठल्याच नात्यात मनापासून नव्हतो. माझी खूप नाती झाली आहेत, असा ह्याचा अर्थ नाही. पण जेव्हापासून त्याने तसं केलं तेव्हापासून… थांबा, मी पहिल्यापासून सुरू करतो.

माझ्या हे सगळं लक्षात आलं, तेव्हा मी पंधरा वर्षांचा होतो. माझ्या मित्रांनी शाळा चुकवून मला त्यांच्यासोबत ओढून नेलं.  मोबाईल रिपेअर करणाऱ्या एका दुकानापाशी ते मेमरी कार्ड की काय ते मिळायचं. ते घेऊन आम्ही एका वडाच्या झाडापाशी आलो. तिथे सगळे तिथे गोल करून बसलो. आमच्यासमोर फोनवरचा दोन इंचांचा डिस्प्ले होता आणि मग त्यावर त्या गोष्टी सुरु झाल्या. मी माझं डोकं आवळून, डोळे अर्धवट मिटून बघत होतो. इतर मित्र डोळे फाडफाडून बघत होते. मी थोड्या वेळाने बघणे सोडून दिले, माझी छाती धडधडत होती आणि माझ्यात घशामध्ये आवंढा जमला होता. मला अचानक सगळे डोळ्यासमोर आले आणि आदीची आठवण झाली.

तो माझा सख्खा मोठा आत्तेभाऊ होता. आम्ही सर्व सुट्ट्या आजीकडे एकत्रच घालवल्या होत्या. मी खूप लाजाळू मुलगा होतो. मला कोणीच मित्र नव्हते. आजी दुपारचं औषध घेऊन ढाराढूर झोपायची आणि मग आम्ही टीव्ही बघायचो किंवा कागद आणि स्केचपेनं घेऊन चित्रं काढत बसायचो. माझ्याकडे अल्लाउद्दीनच्या कार्टून्स रंगवण्याचं एक मोठं पुस्तक होतं. मला आदीसोबत चांगलं वाटायचं. माझ्या कुटुंबाला माझं वागणं समजत नसेल, तरी पण त्याला मात्र मी पूर्णपणे कळतो असं मला वाटायचं आणि मग एका उन्हाळ्याच्या सुट्टीत त्यानं हा खेळ सुरू केला. तो त्याला कुस्ती म्हणत असे. पण या कुस्तीमध्ये तो खूप हळुवारपणे माझ्याशी वागायचा. मला आठवतं तेव्हा मे महिन्याचे दिवस होते. मी सहा वर्षांचा होतो. खूप गरम होत होतं. आम्ही खेळतेवेळी आमचे कपडे काढले. मला यामध्ये काही अडचण वाटली नाही. नवी संवेदना, स्पर्श सगळी गंमतच वाटत होती. त्याने माझ्या कानात अत्यंत मृदू आवाजामध्ये सांगितले, की “हे आपले दोघांचे गुपीत असणार आहे. ओके भैया?” मला तो जसे भैय्या म्हणायचा ते खूप आवडायचे. त्याने जो खेळ मला सांगितला, त्यात सुरुवातीला थोडे दुखायचे. पण त्यानं सांगितलं होतं की तो खेळाचा भागच आहे. आमचं खेळून झालं की तो घरी जाताना नेहमी मला पेप्सीकोला आणून द्यायचा.

आत्ता आम्ही सगळे एका मोकळ्या मैदानावरील एकाच वडाच्या झाडाखाली उभे होतो. मुले जोरजोरात श्वास घेत होती. माझ्या पाठीच्या कण्यामधून एक लहर सरकली.

खरंतर पूर्ण प्रामाणिकपणे सांगायचं तर मला नेहमीच माहीत होतं, की जे घडत होतं ते पूर्णपणे योग्य नाहीये.

मला आत्ता हे सर्व सहनच होईना. मी तिथून पळून गेलो. कुठे जातो आहे हे माझं मलाही कळत नव्हतं, पण मला खूप राग आला होता. मी स्वतःलाच फसवलं होतं.

मला यातून बाहेर पडण्यासाठी खूप खूप वेळ लागला. मी स्वतःला माफ करू शकलो नाही. मी स्वतःचा तिरस्कार करत राहिलो. मला स्वतःची लाज वाटली. त्यानंतर मला कुठल्याही नात्यात काहीच करता आलं नाही, मला आदी आठवायचा आणि मग ते सगळं … म्हणजे संपलंच.

त्यानंतर बऱ्याचदा मला आदी भेटला. पण मी त्यापासून दूर दूर राहू लागलो. त्याला ते नक्कीच कळलं असणार. आमचा खेळही तिथेच संपला.

या सगळ्या प्रकाराला किती बारा वर्ष झाली. त्याच्यापासून पूर्णपणे दूर होणं शक्यच नव्हतं. आम्हाला त्यांच्या घरी जावं लागतं, कुटुंबाच्या भेटीगाठी होत राहातात. मी जेव्हा जेव्हा त्याच्या घरी जातो तेव्हा तेव्हा बेल वाजवण्यासाठी हात उचलल्यावर मला ती सगळी दृश्य डोळ्यासमोर येऊन जातात. त्याचा धाकटा मुलगा पाच वर्षांचा आहे.  जेव्हा जेव्हा मी त्याला त्याच्या मुलांशी त्याच मृदू आवाजामध्ये बोलताना पहातो तेव्हा तेव्हा माझ्या मनात येतं की मी त्याच्या मुलाच्या बाबतीत तेच केलं तर? सतत रोज रोज नाही पण एकदा तरी? ते बरोबर ठरेल का? जशास तसे या न्यायानं? पण मी यापैकी काहीच करत नाही. मी त्या मुलाशी प्रेमाने बोलतो, त्याच्या बायकोला भांडी घासण्यासाठी मदत करतो आणि काहीच न घडल्यासारखा त्याच्याशी हवा-पाणी, राजकारण आणि क्रिकेट याविषयी बोलतो. त्याच सहा वर्षांच्या लहान पोराप्रमाणे, ज्याला एक साधं नाही म्हणता आलं नाही.”

३. “मी नुकताच पाचवीतून सहावीमध्ये गेलो होतो. इंग्रजी आणि गणिताचा अभ्यास थोडा वाढला होता आणि घरामध्ये कुणालाच या विषयांतले काही येत नव्हते. आम्ही शहरामधल्या जुन्या भागातल्या एका छोट्या वाड्यामध्ये रहायचो. घरामध्ये सतत खूप लोक आणि वर्दळ असल्यामुळे, मला अभ्यासाला आमच्या जवळच्याच रिकाम्या फ्लॅटमध्ये पाठवत असत. परीक्षेच्या आधी सुट्टीचे संपूर्ण दिवस मी एकटाच तिथे अभ्यास करत बसायचो. दुपारी एकदा जेवायला आणि रात्री जेवून झोपण्यापुरता घरी येत असे. त्या फ्लॅटच्या समोरच एक कुटुंब राहत होते, त्यांची मुलगी कॉलेजमध्ये होती. दोन्ही कुटुंबांमध्ये घरोबा होता.

ती माझ्यासाठी रोज चहा घेऊन येई.

कधीकधी माझे पुस्तक घेऊन ती माझा अभ्यासदेखील घेत असे. मला तिच्याबद्दल थोडेसे आदरयुक्त कुतूहल वाटायचे. ती खूप अभ्यासू होती. एके दिवशी इतिहासाचा अभ्यास करता-करता, ती माझ्या अगदी जवळ सरकली आणि मला जवळ घेऊन डोके आपल्या छातीमध्ये घट्ट धरून ठेवले. माझी छाती धडधडू लागली. तिने आपले तोंड माझ्या कानापाशी नेले व मला म्हणाली, “इथल्या थिएटरमध्ये लागलेला सिनेमा पाहिलास का तू? त्यामध्ये ते ओठाला ओठ लावतात.” माझी कानशिले कढत झाली होती. तिने माझा हात काहीवेळ हातात घट्ट धरून ठेवला आणि मग आपल्या छातीकडे नेला. खाली वाकून तिने जसे सिनेमात दाखवले होते अगदी तसेच केले आणि ती घरी निघून गेली.

मला त्या रात्री झोपच आली नाही. सारखे-सारखे जे घडले ते आठवत होते. मी वाड्यामध्ये बसूनच पुढचे सर्व दिवस कसाबसा अभ्यास पूर्ण केला.

त्या दिवसाची आठवण माझ्या मनामध्ये काहीतरी संमिश्र भावना निर्माण करत असे. भीती, तिरस्कार आणि विचित्र कुतूहल हे सर्वच एकत्र जाणवे. हे कुणाशी बोलावे हे समजत नसे. खूप पुढे कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये मी मित्रांशी याबद्दल बोललो, तेव्हा माझ्या पाठीवर शाबासकीची थाप पडली. सर्वांमध्ये मी अवलिया निघाल्याचे ते बोलू लागले. परंतु एखादी मैत्रीण चुकूनही माझ्या जवळ आली, अथवा मला आलिंगन देऊ लागली तर एखाद्या दगडाप्रमाणे माझे शरीर घट्ट होऊन जाई.

‘युथ इन ट्रान्झिशन’ अभ्यासामध्ये सहभागी झालेले अनेक तरुण पुरुष, असे लहानपणी झालेल्या लैंगिक त्रासाच्या  अनुभवांबद्दल बोलले. त्यातील अशा काही घटना.  आयुष्यात पहिल्यांदाच ते याविषयी बोलत होते. याबद्दल बोलणे, स्वतःशीदेखील त्यांना सोपे नव्हते.

कितीतरी जण या घटनांना अत्याचार म्हणायचे की नाही या विवंचनेतही होते.

ज्याप्रमाणे लैंगिकतेच्या असमान जाणिवा स्त्रियांवर योनिशुचितेचे ओझे टाकतात त्याचप्रमाणे त्या पुरुषांवर कुठल्याही लैंगिक कृतीसाठी नेहमी तयार असण्याचे ओझेही टाकतात. त्यांची ‘मनापासून दिलेली संमती’ विचारली, लक्षात घेतली जातेच असे नाही. होय, लग्नाच्या नात्यामध्ये देखील.

पुरुषांचे हे अनुभव त्यांच्या मनावर खोलवर परिणाम करणारे होतेच, परंतु त्याचबरोबरीने अत्याचाराला बळी पडणे म्हणजे कमकुवत ठरणे, अशा गैरसमजामुळे त्यांना स्वतःविषयी अधिक कमीपणा आणि अपराधीपणा निर्माण करणारे होते. एखादया मुलग्यास विशेषतः एखाद्या स्त्रीकडून लैंगिक छळाचा अनुभव आलेला असेल तर त्याचा अर्थ “त्याला काय मजाच आली असेल”, अशा प्रकारची वक्तव्ये अनेकांनी ऐकलेली होती व त्यांच्या अनुभवांतील शोषण, बळजबरी आणि मर्जीचे उल्लंघन होण्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले जात होते.

लैंगिक त्रास किंवा अत्याचाराच्या घटनांचा परिणाम प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळा असला, तरीदेखील त्या कुठल्याही लिंगभावाच्या व्यक्तीसाठी धक्कादायक असतातच आणि त्याचबरोबरीने समाजाच्या असंवेदनशील प्रतिक्रियाही त्यात आणखी भर टाकतात.

रस्त्यावरून जाताना गर्दीत होणारे नकोसे स्पर्श, रात्रीच्या वेळी टॅक्सीमध्ये आलेले लैंगिक अत्याचाराचे अनुभवही  अनेक पुरुषांनी नोंदवले. परंतु बऱ्याच जणांनी ते अगदी कोऱ्या चेहऱ्याने व त्याने अजिबात त्रास न झाल्याप्रमाणे मांडले. हे सर्व त्रासदायकच आहे व पुरुषही त्याबद्दल मोकळेपणाने बोलू शकतो. तसे करण्यात कोणताच कमीपणा किंवा चूक नाही, ही जागा मोकळेपणी बोलत असतानाही बहुतेकजण स्वतःस देऊ शकत नव्हते.

आपल्या मानसिक व शारीरिक स्वायत्ततेमध्ये ढवळाढवळ करणाऱ्या, अस्वस्थ करणाऱ्या असुरक्षित अनुभवाला कसे नाकारायचे, कसा विरोध करायचा, कसा आवाज उठवायचा हा प्रश्न अनेकांना होता. तसेच लैंगिक अत्याचाराविषयी दुसऱ्या व्यक्तीला कसे सांगायचे याही प्रश्नाचे उत्तर आजवर मिळालेले नव्हते. फक्त बालपणीच्याच नव्हे, तर त्यानंतरच्याही!

त्यांच्याशी कधीच याबद्दल बोलले गेले नव्हते.

याविषयीच्या धोक्याच्या सूचना समजून घेण्यासाठी पालक, शिक्षक, नातेवाईक वा मित्रमंडळींही सक्षम नव्हते. अजूनही नाहीत.

व्यक्ती ओळखीची असेल किंवा विश्वास कमावून बसलेली असेल, तर ही परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. ‘खेळ, गुपिते, भेटवस्तू’ ह्या गोष्टी कितीतरी कथांमध्ये उपस्थित होत्या.

समाजामध्ये अशीही मिथके अस्तित्वात आहेत, की लहानपणी लैंगिक अत्याचार झालेली व्यक्ती मोठेपणी समलिंगी संबंध ठेवणारी किंवा ट्रान्स व्यक्ती बनते. कुठल्याही व्यक्तीने स्वतःस गे, लेस्बियन, बायसेक्शुअल, किंवा कुठल्याही लिंगभावाविषयी लैंगिक आकर्षण न वाटणारी व्यक्ती (एसेक्शुअल) समजण्याशी तिच्यासोबत घडलेल्या अत्याचाराचा खरेतर काहीही संबध नाही. प्रत्येक व्यक्तीचा लैंगिक कल आणि लिंगभावाची ओळख ठरण्याची प्रक्रिया, ही त्या व्यक्तीची जनुकीय धाटणी व व्यक्तिमत्व घडताना घडत गेलेल्या अनेक जटिल घडामोडींच्या परिणामातून घडलेली असते. त्याचा असा ढोबळ संबंध एका गोष्टीशी लावणे अयोग्य आहे.

दुसरा एक गैरसमज म्हणजे, बालपणी लैंगिक अत्याचाराचा अनुभव आलेली व्यक्ती, ही पुढे जाऊन दुसऱ्यावर अत्याचार करेल हा! अनेकदा अत्याचार करणाऱ्या व्यक्ती स्वत:च्या आयुष्यात अत्याचारास बळी पडल्या होत्या असे दिसते, पण त्याचा अर्थ सर्वच बळी पडलेले लोक इतरांवर अत्याचार करतील असा नव्हे. हा विचार निव्वळ त्रासदायकच नव्हे, तर अन्यायकारकदेखील आहे. ‘बळी गेलेल्यालाच दोषी ठरवणे’, या मनोवृत्तीचाच तो एक भाग आहे.

नको असलेल्या कशासही, मग ते सुरक्षित असो वा असुरक्षित, विरोध करता येण्याची जागा बालकास देता येईल का? बालकाची ठाम बाजू घेऊन त्याची/तिची काही चूक नाही, हे पालकांस शब्दांतून, कृतीतून ठसवता येईल का? ‘मर्दानगी’च्या असमान संकल्पनांतून स्वत: बाहेर पडता – आणि इतरांनाही काढता येईल का? आपल्या अनुभवांकडे निर्भेळपणे पहाता येण्यासाठीच्या, त्यातून बाहेर पडण्यासाठीच्या संवादी जागा अधिकाधिक घडतील का?

संशोधनातून समोर आलेले हे प्रश्न  सुन्न करणारे आहेतच, परंतु त्यांची विधायक उत्तरे घडवत, निर्माण करत पुढे जाण्याचाच पर्याय त्यांनी आपल्यासमोर ठेवला आहे.

क्रमशः

मैत्रेयी, तरुण मुलामुलींसमवेत त्यांच्या लैंगिक व मानसिक स्वास्थ्यासाठीचे काम करतात. या लेखासाठी अमर देवगांवकर यांचे लेखन सहाय्य मिळाले आहे.

‘नातेसंबंध आणि लैंगिकता’, या मालिकेतील सर्व लेख वाचण्यासाठी मैत्रेयीअसा सर्च द्या किंवा नावावर क्लिक करा.

(‘प्रयास आरोग्यगट’ या संस्थेद्वारे युथ इन ट्रान्झिशन संशोधनाच्या अनुभवावर आधारित ‘नेस्ट्स’ (Non-judgemental, Empowering, Self-reflective, Technology-assistes Spaces) अशी मोफत व्यवस्था सुरु केलेली आहे, जेथे तरुणांना आपल्या प्रश्नांबद्दल बोलता येईल. हे बोलणे पूर्णपणे गोपनीय असेल व नेस्टर (संवेदनशीलपणे ऐकून घेणारी व्यक्ती) त्यांचे प्रश्न सोडवण्यास मदत करेल, गरज पडल्यास त्यांना एखाद्या आरोग्यसेवेशी जोडून देता येईल. 7775004350 हा भेटीची वेळ ठरवण्यासाठीचा संपर्क क्रमांक आहे. )

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 1