लखनौः उ. प्रदेशातील लखीमपुर खीरी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्र्याच्या मुलाकडून आंदोलक शेतकर्यांच्या अंगावर गाडी घालण्याप्रकरणात मरण पावलेल्या ४ शेतकर्या
लखनौः उ. प्रदेशातील लखीमपुर खीरी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्र्याच्या मुलाकडून आंदोलक शेतकर्यांच्या अंगावर गाडी घालण्याप्रकरणात मरण पावलेल्या ४ शेतकर्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने प्रत्येकी ४५ लाख रु. व कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्याची घोषणा सोमवारी केली. या प्रकरणाची चौकशी उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीशामार्फत करण्यात येईल व या घटनेतील गंभीर शेतकर्यांना प्रत्येकी १० लाख रु.ची मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या प्रकरणाची चौकशी जलदगतीने होईल असेही आश्वासन सरकारने दिले आहे.
तर उ. प्रदेश पोलिसांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशीष मिश्रा व अन्य १३ जणांवर हत्या व दंगल पसरवण्याचा आरोप ठेवत फिर्याद दाखल केली आहे.
सोमवारी भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर प्रशासनाशी त्यांची काही शेतकरी नेत्यांबरोबर चर्चा झाली. या चर्चेनंतर अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४५ लाख रु., स्थानिक पातळीवर सरकारी नोकरी व जखमींना प्रत्येकी १० लाख रु. देण्यात येतील असे स्पष्ट केले. मृत शेतकर्यांवर धार्मिक पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातील असेही स्पष्ट केले. शेतकर्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक समिती स्थापन करून तोडगे काढले जातील असेही कुमार यांनी सांगितले.
प्रियंका गांधींना अडवले
दरम्यान सोमवारी सकाळी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना लखीमपुर खीरी येथे जाण्यास उ. प्रदेश पोलिसांनी रोखले. प्रियंका गांधी यांच्यासमवेत दीपेंद्र हुड्डा व शेकडो काँग्रेस कार्यकर्ते होते. प्रियंका यांना रोखण्यावेळी पोलिसांकडे वॉरंट नव्हते यावरून संतप्त प्रियंका गांधी यांनी पोलिसांच्या वर्तनावर टीका केली. कायदा आपल्यालाही समजतो, आपण वॉरंट आणावे, मंत्र्यांशी चर्चा करावी असे त्यांनी उपस्थित पोलिसांना सुनावले. प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती, त्या कोठडीतील कचरा साफ करतानाचा एक व्हीडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला, त्यानंतरही गदारोळ झाला.
सरकार आपल्याला जोपर्यंत पीडित कुटुंबियांची भेट घेऊ देत नाही तोपर्यंत आपले उपोषण सुरू राहील अशी धमकी प्रियंका गांधी यांनी दिली आहे, सरकारला न्याय नाकारत आहे, आम्ही आमचा संघर्ष कायम ठेवू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
केवळ प्रियंका गांधीच नव्हे तर उ. प्रदेश पोलिसांनी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, बसपाचे एससी मिश्रा, आपचे संजय सिंग यांनाही घटनास्थळी जाण्यापासून रोखले.
नेमके प्रकरण काय आहे?
उ. प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाच्या कारखाली दोन शेतकरी चिरडून मरण पावण्याची घटना रविवारी घडली. या नंतर झालेल्या हिंसाचारात ८ जण ठार तर शेकडो जखमी झाले. संतप्त जमावाने काही गाड्या पेटवून दिल्या. मृतांमध्ये ४ शेतकरी असल्याचे उ. प्रदेश सरकारने सांगितले. अजय मिश्रा यांनी मात्र आपला मुलगा गाडीत नसल्याचा दावा केला.
रविवारी लखीमपूर खेरी जिल्ह्यातील तिकुनिया येथे मोदी सरकारच्या तीन वादग्रस्त शेती कायद्याचा विरोध म्हणून शेतकर्यांचे आंदोलन सुरू होते. या गावात उ. प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य व केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या उपस्थितीत एका सरकारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तिकुनिया हे मिश्रा यांच्या वडिलांचे गाव व त्यांचा लोकसभा मतदार संघ आहे.
केशव प्रसाद मौर्य यांच्या मोटारींचा ताफा रस्त्यावरून निघाला तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूला आंदोलकांनी निदर्शने सुरू केली. ताफा थांबवण्याचा काहींचा प्रयत्न होता. आंदोलकांच्या हाती काळे झेंडेही होते. या दरम्यान मौर्य यांच्या ताफ्यातल्या तीन गाड्या आंदोलकांच्या अंगावर गेल्या. त्यातील एक गाडी मिश्रा यांच्या मुलाची आशिष मिश्रा यांची व नातेवाइकांची होती. या दुर्घटनेत एका शेतकर्याचा जागीच मृत्यू झाला व तर अन्य एकाचा इस्पितळात मृत्यू झाला. ८ जखमींना तातडीने इस्पितळात नेण्यात आले. जखमींमध्ये संयुक्त किसान मोर्चाचे एक नेते तेजिंदर एस. विरक होते.
मंत्र्याच्या मुलाच्या गाडीखाली चिरडून शेतकरी मरण पावल्याची बातमी कळल्यानंतर शेतकरी संतप्त झाले आणि त्यांच्याकडून व काही गाड्यांना आगी लावण्यात आल्या.
काही दिवसांपूर्वी अजय मिश्रा यांनी शेतकरी आंदोलनावर टीका करताना शेती कायद्याला १०-१५ शेतकर्यांचा विरोध असून त्यांना ठिकाणावर आणण्यास दोन मिनिटे पुरेसे असल्याचे वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे शेतकर्यांमध्ये राग होता.
मूळ बातमी
COMMENTS