नवी दिल्लीः माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या निर्घृण हत्या प्रकरणातील एक दोषी ए. जी. पेरारिवलान यांना बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.
नवी दिल्लीः माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या निर्घृण हत्या प्रकरणातील एक दोषी ए. जी. पेरारिवलान यांना बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. पेरारिवलान गेली ३२ वर्षे तुरुंगात आहे. त्यांना या पूर्वी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती पण नंतर ती बदलून आजन्म कारावास अशी करण्यात होती. २०१६मध्ये पेरारिवलान यांनी आपल्या शिक्षेत सूट द्यावी अशी याचिका मद्रास उच्च न्यायालयात दाखल केली होती. पण न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती. पेरारिवलान याच्या शिक्षेत सूट देऊ नये अशी भूमिका केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात घेतली होती. पेरारिवलान याच्या शिक्षेवर राष्ट्रपती निर्णय घेऊ शकतात असा युक्तिवाद केंद्र सरकारचा होता. त्यामुळे गेली ५ वर्षे हे प्रकरण प्रलंबित होते.
बुधवारी पेरारिवलान यांना जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण जामीन देण्यायोगे असल्याचे मत व्यक्त केले. गेल्या ३० वर्षाच्या तुरुंगवासात आजारी प्रकृती असूनही पेरारिवलान याने चांगली शैक्षणिक पात्रता मिळवली असून कौशल्याचे कामही त्यांनी आत्मसात केले आहे. त्यामुळे त्यांना जामीन देणे योग्य ठरेल असे मत न्यायालयाने व्यक्त केले. पेरारिवलान यांना या पूर्वी तीनवेळा जामीन देण्यात आला होता, याकडेही न्यायालयाने लक्ष वेधले. आता या जामीनादरम्यान पेरारिवलान यांना प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जोलारपट्टाई येथे पोलिस ठाण्यात हजेरी लावण्यास सांगितले आहे.
राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी पेरारिवलान यांना १९९१मध्ये अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्यांचे वय १९ वर्षे होते. २१ मे १९९१साली तामिळनाडूतील श्रीपेरूमबुदूर प्रचारादरम्यान राजीव गांधी यांची हत्या धानू नावाच्या एका महिलेने मानवी बॉम्बद्वारे केली होती. धानूने आपल्या कंबरेला स्फोटकांचा एक बेल्ट लावला होता. या बेल्टसाठी लागणाऱ्या ९ व्होल्ट क्षमतेच्या बॅटऱ्या पेरारिवलान याने खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. या आत्मघाती हल्ल्यात राजीव गांधी यांच्यासह धानू व अन्य १४ जण ठार झाले होते.
या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने मे १९९९ पेरारिवलान, मुरुगन, संथम व नलिनी या अन्य चौघांना फाशीची शिक्षा सुनावली होती.
१८ फेब्रुवारी २०१४मध्ये सर्वोच्च न्यायालयाने पेरारिवलान, मुरुगन व संथान यांची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती.
मूळ बातमी
COMMENTS