बंगळुरू ईदगाह मैदानावर गणेश चतुर्थी साजरी करण्यास सुप्रीम कोर्टाची मनाई

बंगळुरू ईदगाह मैदानावर गणेश चतुर्थी साजरी करण्यास सुप्रीम कोर्टाची मनाई

नवी दिल्लीः बंगळुरू येथील चमराजपेट येथील इदगाह मैदानावर गणेश चतुर्थी साजरी करण्याचा कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी स्थगिती दिली. गेली २०० वर्षे या मैदानावर गणेश चतुर्थी साजरी करण्यात आली नव्हती. अशा परिस्थितीत या मैदानावरची परिस्थिती दोन्ही पक्षकारांनी जैसे थे ठेवावी असे तोंडी निर्देश न्या. इंदिरा बॅनर्जी, न्या. ओक व न्या एम. एम. सुंद्रेश यांच्या पीठाने व्यक्त केले. बुधवारी होणारी गणेश पूजा अन्यत्र साजरी करावी असेही न्यायालयाने म्हटले आहे.

इदगाह मैदानावर गणेश चतुर्थी साजरी करण्याचा कर्नाटक सरकारच्या निर्णयाला २६ ऑगस्टला कर्नाटक उच्च न्यायालयाने मंजुरी दिली होती. या निर्णयाविरोधात कर्नाटक वक्फ बोर्डने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.

वक्फ बोर्डाने दावा केला की, ईदगाह मैदानाची मालकी १८७१ पासून त्यांच्याकडे असून ही जागा प्रार्थना करण्यासाठी वापरली जात आहे. घटनेतील कलम २५ व २६ नुसार अल्पसंख्याक समाजाला त्यांच्या मालकीच्या जागी प्रार्थना व धर्माचरण करण्याचा अधिकार असल्याने कर्नाटक सरकारचा गणेश चतुर्थीसाठी मैदान वापरण्याचा निर्णय घटनात्मक दृष्ट्या अवैध असल्याचे वक्फ बोर्डाचे म्हणणे होते.

त्यावर कर्नाटक सरकारने हे मैदान राज्य सरकारच्या मालकीचे असल्याचा दावा न्यायालयात केला. कर्नाटक सरकारची बाजू ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी मांडली. त्यावर न्या. ओक यांनी भूतकाळात ईदगाह मैदानात गणेश उत्सव साजरा केला होता का व त्यासाठी बृहत बंगळुरू महानगर पालिकेने मंजुरी दिली होती का असा सवाल रोहतगी यांना केला. त्यावर रोहतगी यांनी अशी मंजुरी यापूर्वी दिली गेली नव्हती पण आता तशी परवानगी देण्यात काहीच गैर नाही असा युक्तिवाद केला.

वक्फ बोर्डाची बाजू ज्येष्ठ वकील कपिल सिबल यांनी मांडली. त्यांनी ईदगाह मैदान वक्फ बोर्ड कायद्यातील म्हैसूर राज्य वक्फ बोर्ड सेक्शन ५ (२) अंतर्गत मुस्लिम वक्फ बोर्डाकडे येते, त्यामुळे या कायद्याला आव्हान देता येत नाही असा युक्तिवाद केला. तरीही वक्फ बोर्ड कायद्यानुसार या तरतुदीला आव्हान द्यायचे असेल तर ते सहा महिन्यात द्यावे लागते तसे आव्हान आजपर्यंत कोणी दिलेले नाही, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. हा विषय २०२२मध्ये काढण्यात आला, याकडे सिबल यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.

हुबळी ईदगाह मैदानावर गणेशोत्सव होणार

बेंगळुरू : कर्नाटकातील हुबळी येथील ईदगाह मैदानावर बुधवारपासून गणेशोत्सव होणार आहे. रात्री उशिरा झालेल्या सुनावणीत कर्नाटक उच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. हुबळी येथील ईदगाह मैदानावर गणेश चतुर्थी विधीला परवानगी देण्याच्या सरकारी आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर कर्नाटक उच्च न्यायालयात रात्री १० वाजता सुनावणी झाली. न्यायमूर्ती अशोक एस किनगी यांच्या दालनात ही सुनावणी झाली.

मूळ बातमी

COMMENTS