आकळण्यापलीकडच्या लीलाताई…

आकळण्यापलीकडच्या लीलाताई…

कोल्हापूरातील मुक्त सैनिक वसाहतीत ११ जून १९८५ साली ‘आंतरभारती शिक्षण मंडळातर्फे’ ‘सृजन-आनंद विद्यालय’ सुरू झालं. लीलाताईंचं एक स्वप्न पूर्ण झालं. त्यांच्या एकंदरीत शिक्षण प्रयोगांची पाउलवाट महाराष्ट्रातील अनेक प्रयोगशील शाळांसाठी एक दिशादर्शक हमरस्ता बनली.

काश्मीरमध्ये न्यायव्यवस्था विस्कळित
दलित तरुणाने मूर्तीला हात लावल्याने कुटुंबाला साठ हजार रुपयांचा दंड
हरसिमरत कौर यांचा मंत्रिपदाचा राजीनामा

“तुम्ही अकरा वाजता येणार होता. आत्ता साडेदहा झालेत.” एक कडक शिस्तबद्ध आवाज.

“ह..ह..हो.. बस लवकर आली.”

“बरं, तुम्ही बसा. मी आवरून येते. तुम्हाला काही खायला देऊ का? लांबून आलात.” मंदसं हसून त्या आत गेल्या आणि एका प्लेटमध्ये खायला आणि पाण्याचा ग्लास आणून दिला. मगाशी भेटलेल्या कडक ताई कुठं गायब झाल्या होत्या आणि एक प्रेमळ शिक्षिका माझ्यासमोर उभ्या होत्या.

माझी आणि लीलाताईंची ही पहिलीच भेट. मी जाम घाबरलो होतो. मनावर ताण होता. कारण लीलाताई फार कडक आहेत असं मी ऐकलं होतं. परंतु त्या तितक्याच प्रेमळ आहेत हे प्रत्यक्ष भेटल्यावरच समजलं. आम्ही सांगोल्याला लीलाताईंची कार्यशाळा घेणार होतो. तारखा आणि नियोजन यासाठी मी कोल्हापूरला गेलेलो. त्या दिवशी लीलाताईंनी कार्यशाळेचं जे काही नियोजन माझ्याकडून करवून घेतलं त्याने माझी खूप दमछाक झाली, मात्र एखादं काम करत असताना त्यासाठी किती मेहनत करावी लागते हे लीलाताईंनी काहीही न शिकवता शिकवलं होतं. त्यांच्या शिकण्या-शिकवण्याचा हा प्राणच होता. ज्ञानाविषयी कुतुहल निर्माण करत नाही ते शिक्षणच नव्हे ही त्यांची ठाम भूमिका होती. आणि त्या सतत ती बोलून दाखवत.

सृजन आनंद विद्यालय- स्वप्न जगण्याची सुरुवात.

लीलाताई त्यांच्या पुस्तकांतून उलगडत राहिल्या. परंतु त्याहून अधिक त्यांच्या भेटीतून ज्या गप्पा होत त्यातून त्या जास्त उलगडत गेल्या. प्राचार्य म्हणून काम करत असताना व्यवस्थेच्या चौकटीत राहूनच त्यांनी अनेक नवीन प्रयोग करून पाहिले. वेळप्रसंगी रोषही पत्करला. मात्र आपला स्वाभिमान आणि आपली भूमिका यांना मुरड घातली नाही. सेवेतून निवृत्त झाल्यानंतर सृजनशील शिक्षणाची आस त्यांना शांत बसू देईना. त्यांनी ‘बालकेंद्री आनंददायी शिक्षणाचा’ ध्यासच घेतला. ‘केवळ पुस्तकी अभ्यासक्रमातून मुले यंत्रवत बाहेर पडत आहेत. त्यांच्या संवेदनांना धुमारे फुटतच नाहीत.’ ही जाणीव त्यांना अस्वस्थ करत होती. असं जिज्ञासा वाढवणारं, कुतुहल निर्माण करणारं शिक्षण देण्यासाठी त्यांच्या मनात एक अभिनव शाळेची कल्पना आकार घेऊ लागली. एखादी गोष्ट मनात आलीय आणि ती पूर्ण केली नाही असं लीलाताईंच्या बाबतीत कधीच घडलं नाही. जे ठरवतील ते पूर्णच करतील. आणि कोल्हापूरातील मुक्त सैनिक वसाहतीत ११ जून १९८५ साली ‘आंतरभारती शिक्षण मंडळातर्फे’ ‘सृजन-आनंद विद्यालय’ सुरू झालं. लीलाताईंचं एक स्वप्न पूर्ण झालं. “सृजन आनंदची सुरुवात ही स्वप्न जगून पाहण्याची सुरुवात होती” असं त्या म्हणाल्या आणि त्यांच्या एकंदरीत शिक्षण प्रयोगांची पाउलवाट महाराष्ट्रातील अनेक प्रयोगशील शाळांसाठी एक दिशादर्शक हमरस्ता बनली.

ताई सृजन आनंद विद्यालयाला ‘शाळा’ म्हणत नसत. मलाही त्यांनी अनेकदा टोकलं होतं. ‘हे विद्यालय आहे. शाळा नव्हे.’ त्याचं कारण त्यांच्याच ‘सृजन आनंद शिक्षण एक प्रयोग’ या पुस्तिकेत पाहायला मिळतं.

‘सर्वसाधारण प्राथमिक शाळेतले परवलीचे शब्द ‘हाताची घडी, तोंडावर बोट’ हे आहेत. जी मुलं नवं हे सारं ‘आपलसं’ करावया उत्सुक असतात त्यांचे हात घडीबंद करून आणि त्यांचे ओठ मिटवून तथाकथित प्रवासाला सुरुवात होते. या शिक्षणाच्या प्रसारात आवाहनं नसतात आणि आव्हानंही नसतात ! ज्या तुटपुंज्या संवेदना मुलांपर्यंत पोचतात त्यांचे अनुभवात रुपांतर करण्याची कुणाला आवश्यकता वाटत नाही आणि त्यासाठी उसंतही नसते! क्रमिक पुस्तकं आणि परीक्षा यांच्या आवर्तात भिरभिरताना प्राथमिक शाळेतील पोरांना मनातलं सारं औत्सुक्य कोंडून ठेवावं लागतं.’

हे वाचल्यावर त्यांच्या मनातील सृजन आनंद विद्यालयाच्या जन्मामागची भूमिका अधोरेखित होते.

स्वातंत्र्य घ्यावं आणि भरपूर करून बघावं.

भाषा शिक्षण हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. सृआविमध्ये त्यांनी अनेक प्रयोग करून पाहिले. ‘स्वातंत्र्य घ्यावं आणि भरपूर करून बघावं’ हे त्यांना उमजलं होतं. महाराष्ट्राबाहेरील काही शाळांचा अभ्यास दौरा करून आल्यावर त्यांनी नव्याने काही प्रयोग अवलंबले. ‘शिक्षणातील लावण्य’ या पुस्तकात त्यांनी जे गवसलं त्याची मांडणी केली आहे. ते पुस्तक मुळातून वाचणे हा एक वेगळा अनुभव ठरेल.

सृआविमध्ये सर्वच उपक्रमांना लिखित रूप देण्याची पद्धत आहे. त्यामुळे केवळ परिणाम नव्हे तर प्रक्रियाही किती महत्त्वाची असते याची खात्री पटायला लागते. विशेष म्हणजे २००५ च्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात प्रक्रियेवरच अधिक भर दिला गेला आहे. शिक्षण आणि त्याच्याशी निगडीत अनेक गोष्टींबाबत लीलाताईंची ही दूरदृष्टीच म्हणावी लागेल. त्यांच्या पुस्तकातून आणि त्यांच्या लेखांतूनही अशा उपक्रमांची भेट आपणास होत राहते. त्यातलं नाविन्य आणि एकंदरीत मुलांशी असलेला जिव्हाळा जाणवायला लागतो. ‘स्मशानाची सहल’ हा आजवर कधीच न ऐकलेला आणि कुणी करूनही न पाहिलेला अभिनव उपक्रम त्यांनी करून पाहिला. जगण्याशी शिक्षण जोडलं तर ते जीवन शिक्षण बनतं. सृआविमधील अनेक प्रयोग याची साक्ष देतात. आजही लीलाताईंच्या पश्चात सुचिता पडळकर ताई आणि त्यांच्या विद्यालयातील ताई-दादा ही भूमिका त्याच ताकदीने पेलत आहेत.

मोठमोठ्या लेखकांपासून ते आपणास रोज मदत करणाऱ्या कुशल कारागीरांपर्यंतच्या व्यक्ती शाळेत प्रमुख पाहुणा म्हणून बोलावल्या जातात. त्यातून मुलांनी प्रश्न विचारावेत, गप्पा माराव्यात हे अपेक्षित होतं. त्यातून मुलांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होत होती. मुलांच्या वृत्तीतील बदल हे उद्दिष्ट सफल होत होतं. मी स्वत: जेव्हा हा अनुभव घेतला तेव्हा वर्गातील मुलांना दिलं गेलेलं स्वातंत्र्य ही बाब मला सर्वाधिक भावली होती. इतर शाळांतून असं स्वातंत्र्य मुलांना घेताच येत नव्हतं.

सृआविमध्ये मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात मुलांना महागडे कपडे कधीच आणावे लागत नाहीत. कारण सर्वच मुलं महागडे कपडे आणू शकत नव्हती. उपलब्ध साधनं, वर्तमान पत्राचा कागदही तुमचा वेश होऊ शकतो याचा वस्तूपाठ लीलाताईंनी घालून दिला. नानाविध विषयांवर लेखन करणं, जे चूक आहे त्याला चूक म्हणणं’, ‘न्यायासाठी प्रसंगी लढा देणं’ या गोष्टी मुलांच्यात रुजवण्याचं काम त्या वेळोवेळी करत आल्या. मुलामध्ये हे सर्व रुजवताना ‘आपणाला छोट्या छोट्या लढाया जिंकाव्या लागतील, त्या नाही लढलो तर मोठ्या लढायांची तयारी कशी होणार?’ या त्यांच्या भूमिकेतच सर्व काही सामावलेलं दिसून येतं.

शिक्षिकेच्या आत लपलेली एक ‘आई’.

लीलाताईंचं बालपण फारसं सुखात नाही गेलं. तरुणपणी चळवळी आणि पुढे दलितमित्र बापूसाहेबांशी लग्न. बापूसाहेब समाजसेवक. त्यामुळे घराचा सर्व भार लीलाताईंनी उचलला. बापूसाहेबांच्या कार्यात त्याही सामील झाल्या. पुढे श्रीरंगचा जन्म ही त्यांच्या जीवनातील महत्त्वाची घटना. श्रीरंगला आपण आपल्या जबाबदाऱ्यांतून जास्त वेळ नाही देऊ शकत याची बोचणी त्यांना लागून राहिलेली असायची. अशात तरूण श्रीरंग अपघातात गेला आणि लीलाताई मोडून पडल्या. पण त्यांनी तसं कुणाला जाणवू दिलं नाही. तरीही त्यांच्याशी बोलताना श्रीरंगचा विषय निघायचाच. ते सर्व ऐकताना गलबलून यायचं. एवढ्या कणखर लीलाताई अचानक हळव्या होऊन जायच्या. श्रीरंगचं जाणं त्यांच्या किती जिव्हारी लागलेलं हे जाणवू लागायचं.

श्रीरंग गेला. आई असूनही त्यांनी ते दु:खं बाजूला ठेऊन शिक्षणातील आनंदादायी सृजनशील शिक्षणाची वाट धरली. आपल्या चेहऱ्यावर ते दु:खं, ती वेदना कधीच येऊ दिली नाही. त्यांनी ती वेदना जणू कोंडून ठेवली. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा हा पैलू मला नेहमीच अचंबित करतो. एवढं बळ त्यांनी कुठून मिळवलं असेल? इतक्या कणखर त्या कशा बनल्या असतील? परंतु श्रीरंगाच्या जाण्याची पोकळी सृजन शिक्षणाच्या ध्यासाने घेतली होती.

श्रीरंगच्या जाण्याचं दु:खं त्या सृआविमधील मुलांत रमून विसरून गेल्या. त्या मुलांच्या लाडक्या ‘लीलाताई’  झाल्या. पण ती वेदना त्यांच्या ठायी कायम राहिली. अगदी खोलवर. 

अनवट वाटा तुडवाव्या लागतील…

लीलाताई सातत्याने नाविन्याच्या शोधात असायच्या. मी त्यांचा तो उत्साह पाहून अवाक होऊन जायचो. त्यांच्या जवळचा पुस्तकांचा, मासिकांचा आणि जोडलेल्या स्नेहीजनांचा खजिना त्याची साक्ष पटवतो. प्रचंड वाचन आणि चिंतन. चिंतनातून जे बाहेर पडे ते शाळेत राबवून पाहण्यात येई. सातत्याने त्यातून काही निष्पन्न होते की नाही हे ही पाहिले जाई. आणि शिक्षणातील नवनवे विचार जन्माला येत. पुस्तक रूपाने ते सर्वापर्यंत पोचत असत.

लीलाताईंची इच्छा होती की, महाराष्ट्रात प्रयोगशील शिक्षकांनी एकत्र येऊन नवीन प्रयोग करायला हवेत. अनवट वाटा तुडवल्या पाहिजेत. त्याशिवाय शिक्षणाचं झापडबंद स्वरूप बदलणार नाही. छोटे छोटे तेवणारे दिवे एकत्र आले तर हाच प्रकाश मोठा होईल आणि सर्वांना नव्या वाटा शोधायला मदत करील असं त्या नेहमी म्हणायच्या. त्याचवेळी आमचा अंकुर आणि Active Teacher Forum, Maharashtra असे काही गट कार्यरत होते. सुदैवाने आज महाराष्ट्रात शिक्षकांचे अनेक गट निर्माण होऊन ते शिक्षणाला सृजनशील वाटेवर घेऊन जात आहेत. पारंपरिक शिक्षणात अनेक बदल करून नव्या वाटा निर्माण केल्या जात आहेत. लीलाताईंचं हे स्वप्न ही पूर्ण झालं आहे. काळाच्या पलीकडे जाऊन त्यांची विचार करण्याची क्षमता आणि कृती निश्चितच नवी उमेद निर्माण करणारी होती. कारण आज महाराष्ट्रातील अनेक प्रयोगशील शाळांसाठी सृजन आनंद विद्यालय हे वाटाड्या ठरलं आहे.

‘मूल’ केंद्रस्थानी ठेऊन आपणाला शिक्षणाची मांडणी करावी लागेल. जिथं त्याच्या विचार आणि कृतींना चालना मिळेल. त्यांना शिकण्याचा हेतू आकळेल. ‘बालहक्क’ या पुस्तकात त्यांनी याची सविस्तर मांडणी केलेली आहे. मुलांच्या हक्क आणि अधिकारांसाठी त्या नेहमीच कटिबद्ध राहिल्या. सजग राहिल्या. तसेच त्या स्त्री हक्कांविषयीही नेहमीच आक्रमक राहिल्या. ‘अभिआस’ या उपक्रमाद्वारे त्यांनी स्त्रियांच्या जाणीवांना एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. वाचन, चर्चा, वाद-विवाद, व्याख्याने यांच्या माध्यमातून अभिआस काम करत आहे. वेळप्रसंगी त्या पालक, शिक्षक यांना खडसावत राहिल्या. हेतू हाच की ज्यांच्यासाठी हा शिक्षणाचा अट्टाहास त्या मुलांना त्यांच्या गतीने आणि आवडीने शिकायला मिळावं. त्यांचे स्पर्धेतील घोडे बनू नये. त्यांची शिकण्याची नैसर्गिक उर्मी संपून जाऊ नये म्हणून.

आपण स्वातंत्र्य घ्यायला शिकलं पाहिजे. त्याचा जबाबदारीने वापर केला पाहिजे. असं स्वातंत्र्य घेतल्याचं आठवतंय. ‘तुझ्या गळा माझ्या गळा’ या कवितेऐवजी नवीन कविता घेऊन काम करण्याचं. त्यांनी हे स्वातंत्र्य घ्यायची सवय लावली. आणि मग स्वतंत्र विचारांच्या दिशा खुल्या झाल्या. त्या नेहमी म्हणत “आपण स्वातंत्र्य घ्यायला घाबरतो. ते कुणी कुणाला देत नाही. ते घ्यावं लागतं. स्वत:च्या जबाबदारीवर.”

त्यांची पायवाट हमरस्ता बनेल…

मागील काही वर्षांत लीलाताईंना विस्मरणाचा त्रास सुरू झाला होता. त्यांनी मला ओळखलं नाही तेव्हा खूप वाईट वाटलं. “तुम्ही काझी ना?” असं त्या म्हणताच मला खूप आनंद झाला होता. पण क्षणभरात त्या विसरून गेल्या. ‘प्रार्थना’ या विषयावर त्या पुस्तक लिहित होत्या. आणि मला त्यांनी त्यासाठी काही संदर्भ घेऊन बोलावलं होतं. वयाची ८५ वर्षे उलटली तरी नवीन पुस्तकाचा ध्यास त्यांना शांत बसू देत नव्हता. इतकं बळ, इतकी उर्जा कुठून येत असेल असं मला नेहमी वाटायचं. त्यांचं ते पुस्तक अपूर्णच राहिलं. आणि ती आमची शेवटची भेट ठरली. फोनवर त्या मला ओळखू शकल्या नाहीत. सुचिता ताई, तनुजा शिपूरकर यांच्याकडून त्यांच्या तब्येतीची माहिती मिळत राहिली. आणि अखेर लीलाताई गेल्याची बातमी आली. पोरकं झाल्याची भावना मनात काठोकाठ भरून गेली. एका संघर्षरत अनवट वाटेवरील वाटसरूचा प्रवास थांबला होता. कायमचा.

आज लीलाताई आपल्यात नाहीत. परंतु त्यांच्या शैक्षणिक विचारांचा आणि कृतींचा वारसा जपणारे अनेकजण इथं आहेत. त्यांनी चालून मळत्या केलेल्या पायवाटेचा हमरस्ता जरूर बनेल. लीलाताई पाटील यांची पुस्तके, त्यांचे अनेक लेख आणि कविता ही शिदोरी सोबत घेऊन हे काम नेटाने पुढं नेलं जाईल याबाबत अजिबात शंका नाही. त्यांच्या त्या प्रेमळ हसूला आम्ही सगळेच पारखे झालोत. ही खंत मात्र कायम मनात राहील. त्यांच्या सर्वच कार्याचा आढावा या लेखात घेता आलेला नाही. परंतु लीलाताईंच्या जीवनाचा जो गाभा होता त्याविषयी इथं मांडणी केली आहे. त्यांच्या सहवासात राहूनही त्या मला नेहमीच आकळण्यापलीकडच्या वाटत आल्या. आणि कायमच वाटत राहतील.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0