जागतिक साथींचा इतिहास – देवी

जागतिक साथींचा इतिहास – देवी

देवीचे निर्मूलन हे मानवी सार्वजनिक आरोग्याच्या  इतिहासातील अभूतपूर्व आणि एकमेव उदाहरण आहे. देवीच्या आजाराचा सगळ्यात जुना पुरावा तीन हजार वर्षांपूर्वी इजिप्तचा फॅरो पाचवा रॅमसेस याच्या ममी (मृतदेहाच्या अवशेषातून) च्या चेहऱ्यावरील व्रणातून मिळाला आहे. 

साथींचा इतिहास – फ्ल्यू
साथींच्या रोगात मुंबईचा साथी- कस्तुरबा रूग्णालय
जागतिक साथींचा इतिहास – कॉलरा

८ मे २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रॉस म्हणाले, “४० वर्षांपूर्वी याच दिवशी जागतिक आरोग्य संघटनेने जगातून देवीच्या आजाराचे निर्मूलन झाल्याचे जाहीर केले होते. आज ‘कोव्हीड -१९’च्या साथीला तोंड देत असताना एखाद्या आरोग्यविषयक प्रश्नावर जगातील सगळे देश एकत्र आले की त्यावर विजय कसा मिळवता येतो, याचे देवीचे निर्मूलन हे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील उत्तम उदाहरण आहे.”

देवी हा कदाचित जगातला सगळ्यात जुना आणि घातक असा संसर्गजन्य आजार होता. देवीचे निर्मूलन हे मानवी सार्वजनिक आरोग्याच्या  इतिहासातील अभूतपूर्व आणि एकमेव उदाहरण आहे.

देवीचा आजार आणि माणूस –  बारा हजार वर्षांचा संघर्ष

१२ हजार वर्षांपूर्वी शेतीची सुरुवात झाली आणि माणसे भटके आयुष्य सोडून एकत्र राहायला लागली तेव्हापासून, देवीचा आजार साधारणपणे सुरू झाला असे मानले जाते.

देवीच्या आजाराचा सगळ्यात जुना पुरावा तीन हजार वर्षांपूर्वी इजिप्तचा फॅरो पाचवा रॅमसेस याच्या ममी (मृतदेहाच्या अवशेषातून) च्या चेहऱ्यावरील व्रणातून मिळाला आहे.

साधारण इसवी सनाच्या चवथ्या शतकात चीनमधील पुरातन लिखित साहित्यात  देवीच्या रोगाचा उल्लेख आढळतो. भारतीय वैद्यकशास्त्राच्या ग्रंथातही ‘शितला’ या नावाने देवीचा उल्लेख आढळतो.

सहाव्या शतकात अरब वैद्यकातील विद्वान अल राझी याने सर्वप्रथम देवीचा आजार व गोवर यातील स्पष्ट फरक नोंदवला आहे.

अरब साम्राज्याच्या विस्ताराबरोबरच हा आजार इतर खंडात पसरला. भारत, चीन, जपान, कोरिया या आशियातील देशांपासून ते आफ्रिकेचा किनारी भाग, युरोप सगळीकडे देवीचा आजार पोचला.

भारतात तर ‘शितला’ ही चेचक किंवा देवीच्या आजाराची देवता मानली जाई. ही देवता आजाराचे कारण आणि उपचार दोन्हीही मानले जाई.  ‘शितला’ देवीच्या  प्रकोपाने आजार होतो आणि तिच्याच  प्रार्थनेने तो बरा होतो अशी समजूत होती. चीनमध्ये लाल रंगाचे कपडे किंवा लाल रंगाच्या खोलीत देवीच्या रुग्णाला ठेवल्यास त्याचे संरक्षण होते असे मानले जाई.

आशिया आणि युरोपमधील वाढत्या व्यापाराबरोबर आणि वर्षानुवर्षे चाललेल्या कृसेड (धर्मयुध्द) ने देवीचा  आजार १३ व्या शतकाअखेर संपूर्ण युरोपात पसरला. त्यानंतर पुढील दोन शतकात तो मध्य आणि पश्चिम आफ्रिकेत युरोपीय आक्रमणातुन पोचला.

पंधराव्या शतकात स्पॅनिश वसाहतवादी आक्रमणातून आणि आफ्रिकन गुलामांच्या व्यापारातून देवीचा रोग कॅरिबीअन बेटे आणि अमेरिका खंडात पोहोचला. या भागातील लोकसंख्या देवीच्या विषाणूला एकदम नवीन होती. त्याविरुद्ध कसलीच रोगप्रतिकारक शक्ती या भागात नव्हती. परिणामी अॅझटेक, इंका अशी साम्राज्ये अक्षरशः लयाला गेली. अवघ्या ५०० इतक्या कमी प्रमाणात असलेल्या स्पॅनिश सैनिकांनी लाखो लोकांचे अॅझटेक साम्राज्य संपविले. देवीच्या साथीमुळे काही महिन्यातच राज्यकर्त्यांसह लाखो नागरिक मृत्युमुखी पडले. जे वाचले त्यात अनाथ मुलांची संख्या जास्त होती. याउलट स्पॅनिश सैन्यातील बरेचसे लोक देवीच्या आजारातून वाचलेले होते. परिणामी स्थानिकांना देवीचा आजार हा नैसर्गिक शक्तींचा प्रकोप असून तिनेच युरोपियन लोकांना आपल्यावर राज्य करायला पाठवले आहे असा समज झाला. याचप्रमाणे अमेरिका खंडातील मूळ रहिवासी साम्राज्यांच्या विनाशाला मोठ्या प्रमाणात देवीचा आजार कारणीभूत ठरला. देवीमुळे या मूळ रहिवाशांची लोकसंख्या जवळपास ९० टक्क्यांनी कमी झाली.

सतराव्या आणि अठराव्या शतकात देवीचा आजार हा सगळ्या जगाला हादरवून टाकणारा आजार होता. फक्त युरोपात दरवर्षी अंदाजे ४ लाख लोक देवीच्या आजाराला बळी पडत असत.

देवीचा हा आजार गरीब, श्रीमंत, राज्यकर्ते सर्वानाच संसर्गित करणारा होता. जॉर्ज वॉशिंग्टन, अब्राहम लिंकन हे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष देवीच्या आजारातून वाचले तरी त्यांचे निकटवर्तीय बळी पडले. फ्रान्सचा राजा पंधरावा लुई, रशियाचा झार पीटर दुसरा,  इंग्लंडची राणी मेरी ही काही देवीच्या बळींची उदाहरणे आहेत.

देवी – उत्तराच्या शोधात

देवी हा व्हेरिओला या ऑर्थोपॉक्सव्हायरस या गटातील विषाणूमुळे होणारा आजार आहे.  हा विषाणू फक्त मानवी शरीरातच जगू शकतो. त्यामुळे इतर कोणत्याही प्राण्यांमध्ये हा आढळत नाही.

एकदा शरीरात हा विषाणू गेल्यावर लक्षणे दिसायला ८ ते १७ दिवस लागतात. हा आजार नाक – तोंडातून बाहेर पडणाऱ्या स्त्रावातून, हवेतून पसरतो. साधारण दहाव्या दिवशी थकवा, अंगदुखी, तीव्र ताप ही लक्षणे दिसतात. त्यानंतर आठवडाभरात प्रथम चेहरा, हात, पाय या क्रमाने संपुर्ण शरीरावर पू भरलेले फोड यायला लागतात. त्यानंतर एक – दोन आठवड्यात जर रुग्ण वाचलाच, तर खपल्या येऊन फोड सुकू लागतात व रुग्ण बरा होतो. परंतु त्वचेवर देवीचे व्रण कायमचे राहतात. वाचलेल्यापैकी जवळपास १/३ लोकांना अंधत्व येते. तथापि, नव्याने संसर्गित झालेल्या लोकांपैकी ३० टक्के लोक आजाराच्या दुसऱ्या आठवड्यातच मृत्युमुखी पडतात. लहान मुलांना देवीचा संसर्ग होण्याचा आणि मृत्युदर दोन्हीही अधिक होते. नवीन प्रदेशात जिथे देवीचा आजार पहिल्यांदा जाई तिथे मृत्युदर ३० टक्क्यांपेक्षा कितीतरी जास्त असे. देवीचे व्हेरिओला मेजर आणि व्हेरिओला मायनर असे २ प्रकार आहेत. व्हेरिओला मायनर हा तुलनेने सौम्य आणि मृत्युदर जवळपास १ टक्का इतका कमी असणारा आजार होता.

देवीच्या आजारावर बरे करणारे कोणतेही औषध नव्हते. तथापि एकदा देवीचा रोग होऊन गेला की त्या व्यक्तीला परत कधीही देवी होत नाहीत, हे शेकडो वर्षांपासून माहिती होते. याचाच उपयोग करून चीनमध्ये ‘व्हेरिओलेशन’ची सुरुवात झाली. या प्रक्रियेत, देवीच्या रुग्णाच्या फोडातून पू बाहेर काढून तो वाळवून नाकाद्वारे किंवा त्वचेवर टोचून विषाणू स्वस्थ व्यक्तीच्या शरीरात घातला जाई. त्यामुळे त्या व्यक्तीला ८ – १० दिवसांत देवीची सौम्य लक्षणे, स्थानिक फोड इ. येत असत. मात्र त्यामुळे रोगप्रतिकारक  शक्ती निर्माण होऊन त्या माणसाला नंतर देवीचा आजार होत नसे. क्वचित काही वेळा ‘व्हेरिओलेशन’नंतर व्यक्तीमध्ये देवीची संपूर्ण लक्षणे निर्माण होऊन मृत्यू येत असे. पण यामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण खूपच कमी होते.  चीनमधून हा प्रतिबंधात्मक उपाय भारतात व भारतातून ऑटोमन साम्राज्यामार्गे लेडी मेरी वॉटरली मोन्टेगू हिच्या पुढाकाराने युरोपात पसरला.

एडवर्ड जेन्नर या डॉक्टरने १७९६ ला इंग्लंडमध्ये एक अफलातून प्रयोग केला. ‘जेन्नर’ने असे ऐकले होते की ‘काऊपॉक्स’ हा गायीच्या स्तनांना होणारा देवीसारखाच  आजार गवळणींना एकदा होऊन गेला की कधीच त्यांना देवी होत नाही.

‘काऊपॉक्स’ हा देवीसारखाच पण सौम्य आणि फक्त संपर्कात आलेल्या शरीराच्या भागातच होणारा आजार आहे. ‘जेन्नर’ने सारा नेम्स या गवळणीच्या बोटावरील पुरळातील पू काढून तो ‘जेम्स फिप्स’ या आठ वर्षीय मुलाच्या त्वचेवर टोचला. आठवडाभराने त्याला ताप व टोचलेल्या जागी छोट्या पुटकुळ्या अशी लक्षणे दिसली. काही दिवसातच ती लक्षणे कमी झाली. नंतर ‘जेन्नर’ने त्या मुलाला देवीच्या विषाणूच्या संपर्कात नेले. तरीही त्याला देवी झाल्या नाहीत. नंतरच्या देवीच्या साथीत ‘जेम्स फिप्स’ला देवीची लागण झाली नाही. या यशानन्तर ‘जेन्नर’ने स्वतःच्या मुलासह आणखी काही लोकांवर हे प्रयोग केले. सगळ्यांनाच देवीपासून संरक्षण मिळाले. आपले प्रयोग त्याने एक पत्रक काढून प्रसिद्ध केले. ‘जेन्नर’ने याला ‘व्हॅक्सीनेशन’ असे नाव दिले. व्हॅक्सा म्हणजे लॅटिन भाषेत गाय. थोड्याच दिवसात ‘जेन्नर’ची लसीकरणाची ही पद्धत युरोपभर रूढ झाली. सुरुवातीला विरोध केला असला तरी रॉयल सोसायटीने नंतर ‘जेन्नर’च्या लसीकरणाच्या कार्यक्रमाला भरघोस आर्थिक मदत केली. हळूहळू देवीला प्रतिबंधात्मक लसीकरण जगभर पोचले.

देवी निर्मूलन – आव्हाने आणि मात

‘जेन्नर’ने शोधून काढलेली देवीची लस अमेरिकेत पोचली. त्याने लाखो लोकांचे प्राण वाचले. ‘थॉमस जेफेरसन’ने ‘जेन्नर’ला लिहिलेल्या प्रशंसापर पत्रात म्हंटले, “देवी नावाचा अतिशय गंभीर असा आजार अस्तित्वात होता पण  तुझ्या लसीमुळे त्याचे जगातून निर्मूलन झाले. यासाठी भविष्यातील अनेक देश व त्यांच्या पिढ्या तुला मोठ्या आदराने लक्षात ठेवतील.”

‘जेफेरसन’ची भविष्यवाणी प्रत्यक्षात आली पण त्यांनतर जवळजवळ १८० वर्षांनी.

२० व्या शतकाच्या पहिल्या २ दशकांपर्यंत युरोप आणि उत्तर अमेरिकेतून देवीच्या साथीचा संसर्ग आणि मृत्युदर बराच कमी झाला.

तरीही आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतील अनेक देशात देवीचा आजार इंडेमिक म्हणजेच कायमचा झाला होता. नियमितपणे देवीच्या साथी येत, हजारो लोकांचे बळी जात तर शेकडो लोक आंधळे होत. बाकीच्यांना आयुष्यभर देवीच्या कुरूप व्रणांसह जगावे लागे.

फक्त विसाव्या शतकात देवीने जगभरात ३० कोटी लोकांचा बळी घेतला.

१९६७ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने देवी निर्मूलनाचा कार्यक्रम आखला. अनेकांना ते अशक्य वाटले.

पण देवी निर्मूलनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख डी. ए. हँडरसन व त्यांच्या जगभर पसरलेल्या हजारो सहकाऱ्यांनी ते साध्य केले.

लसीकरण, आजाराचे सर्वेक्षण, रुग्णांचे विलगिकरण, त्याचा संपर्क इतिहास, त्यांचे विलगिकरण आणि लसीकरण अशा वेळखाऊ पण पद्धतशीर मार्गाने हा कार्यक्रम राबवला गेला.

१० वर्षांच्या या कालावधीत अनेक नाविन्यपूर्ण मार्ग शोधणे गेले. जगभरातील जागतिक आरोग्य संघटनेच्या विभागानुसार सर्वेक्षण करून प्रत्यक्ष देवीच्या साथी आणि रुग्णसंख्या यांचे नियमित अहवाल बनवले गेले. लसीकरण किती प्रमाणात झाले यापेक्षा ‘टार्गेट झिरो’ म्हणजे एकही देवीचा रुग्ण सापडू नये हे ध्येय ठेवले होते. त्यासाठी ‘रिंग व्हाक्सिनेशन’ म्हणजेच देवीच्या रुग्ण सापडला, की त्या भागात आधी लसीकरण केलेले असो किंवा नसो पुन्हा एकदा  वरील पद्धत वापरून कठोर लसीकरण केले जाई. त्यामुळे आफ्रिकेतील आणि आशियातील अगदी दुर्गम भागात सुद्धा साथीची नोंद घेऊन तिथे त्याचे निर्मूलन केले गेले.

सुरुवातीला उपलब्ध लसीची गुणवत्ता चांगली नसल्याने व उष्ण प्रदेशात लस टिकत नसल्याने लसीच्या उपयोगीतेवर मर्यादा होत्या. मात्र त्या गोठवून वाळवलेल्या (freeze dried) लसीच्या शोधाने व प्रत्येक लसीच्या बॅचच्या  गुणवत्तेचे प्रमाणीकरण जागतिक आरोग्य संघटनेच्या लॅब मधून करून घेणे बंधनकारक करण्याने हा प्रश्न सुटला.

दुर्गम भागात टिकवून ठेवण्यासाठी आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी या व बायफरकेटेड नीडल या विशेष प्रकारच्या सुईचा खूप उपयोग झाला.

शिवाय ‘झिरो टार्गेट’ पूर्ण करण्यासाठी स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यपद्धतीत स्वातंत्र्य दिले होते. उदा. भारतात ‘देवीचा रोगी कळवा आणि १०० रुपये मिळवा’, अशी मोहीम चालवली होती. त्यामुळे १९७४ च्या बिहारच्या अतीदुर्गम  जिल्ह्यातील साथीत रुग्णांची आणि साथीची माहिती मिळवणे आणि त्यानुसार त्या त्या भागात कृती करणे शक्य झाले. काही ठिकाणी तर लहान मुलांना लसीकरणासाठी एकत्र यावे, म्हणून हत्तींची मिरवणूक काढण्यात आली.

दर आठवड्याला जागतिक आरोग्य संघटनेकडून देवी निर्मूलन कार्यक्रमाचा सविस्तर अहवाल प्रकाशित केला जाई. त्यामुळे कुठे कोणत्या कमतरता आहेत, याचा आढावा घेऊन त्या तात्काळ दूर केल्या जात.

या कार्यक्रमाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे जग, अमेरिका आणि रशिया यांच्यातील शीतयुद्धाच्या उंबरठ्यावर होते. तरीही दोन्ही देशांनी देवी निर्मूलनाच्या कार्यक्रमाच्या आर्थिक वा इतर कोणत्याही मदतीवर त्याचा परिणाम होऊ दिला नाही. हे एकमेकांचे कट्टर शत्रूदेश मानवजातीला हजारो वर्षे छळणाऱ्या एका समान शत्रूविरुद्ध- देवीच्या आजारविरुद्ध एकत्र आले होते.

परिणामी १९७५ मध्ये बांगलादेशात तर १९७७ मध्ये सोमालियात शेवटचे दोन देवीचे रुग्ण आढळले. दोन्हीही बरे झाले. त्यांनतर जगभरात नौसर्गिकरित्या संक्रमण झालेला देवीचा एकही रुग्ण सापडला नाही. ८ मे १९८० रोजी जागतिक आरोग्य संघटनेने अधिकृतपणे जाहीर केले, की जगभरातून देवीचे निर्मूलन झाले आहे.

देवी आणि जैविक दहशतवाद

जगात फक्त अमेरिका आणि रशिया या दोन देशांच्या प्रयोगशाळेत देवीचे विषाणू ठेवले आहेत. पण अमेरिकेतील ‘अॅन्थरॅक्स’च्या जीवाणू हल्ल्यानंतर व रशियातील छुपे देवी विषाणू संशोधन केंद्राची माहिती जगासमोर आल्यानंतर देवीचा जैविक अस्त्र म्हणून किंवा अपघाताने प्रसार झाला, तर काय ही भीती शास्त्रज्ञांना भेडसावू लागली. जगातल्या अनेक देशांनी परत एकदा देवीच्या लसीचा साठा करण्यास सुरुवात केली. आजही काही अभ्यासकांच्या मते ही भीती प्रत्यक्षात येऊ शकते असे मानले जाते.

शिवाय मंकी पॉक्स हा ऑर्थोपोक्सव्हायरस गटातील विषाणू माणसामाणसांमध्ये संक्रमित होऊ शकत नाही, तरीही मुटेशनच्या प्रक्रियेत त्यात माणसांमध्ये संक्रमित होण्याची क्षमता निर्माण झाली, तर तो देवीसारखाच घातक होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला सतत जागरूक राहावे लागणार आहे.

‘कोव्हीड –१९’ आणि देवीच्या निर्मूलनातुन मिळालेले धडे

पूर, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तीनंतर संसर्गजन्य रोगांच्या साथी हे मानवी अस्तित्वापुढे मोठे आव्हान आहे. त्यांच्यावर नियंत्रण आणायचे असेल तर वैज्ञानिक माहितीची देवाणघेवाण,  सार्वजनिक आरोग्यव्यवस्था या गोष्टीसाठी आपसातले मतभेद विसरून एकत्र यावे लागेल.

सध्या लस उपलब्ध नसली तरी संकुचित ‘लस राष्ट्रवाद’ हा ‘कोव्हीड- १९’ चे संकट वाढवणारा आहे. देवी निर्मूलनाच्या मोहिमेत अमेरिका, रशिया अशा श्रीमंत राष्ट्रांनी मोठ्या प्रमाणावर लसीचा पुरवठा केला होता.

शिवाय देवी निर्मूलनाच्या कार्यक्रमात फक्त लसीकरण नाही, तर देवी सर्वेक्षण, रुग्णांचे विलगिकरण इ. उपाय वापरले होते. आज ४० वर्षानंतर तंत्रज्ञानाची मदत घेऊन आपण सार्वजनिक आरोग्याचे हे उपाय अधिक परिणामकारकपणे वापरू शकतो.

डॉ.तृप्ती प्रभुणे, या डॉक्टर असून, वैद्यकशास्त्राच्या अभ्यासक आहेत.

संदर्भ.

  1. Viruses, plagues, and history Book by Michael B. A. Oldstone
  1. Plagues and Peoples Book by William H. McNeill

3.Smallpox : The death of a disease Book by D.A. Handerson

(लेखाचे छायाचित्र – द. न्यूयॉर्क अॅकॅडमी ऑफ मेडिसीन लायब्ररी)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0