चिराग पासवानना धक्का, लोजपमध्ये फूट

चिराग पासवानना धक्का, लोजपमध्ये फूट

नवी दिल्ली/पटणाः एनडीए आघाडीतील घटक पक्ष लोक जनशक्ती पार्टी (लोजप)मध्ये फूट पडली असली असून ६ लोकसभा खासदार असलेल्या या पक्षातल्या ५ खासदारांनी स्वतःचा गट वेगळा करत पक्षप्रमुख चिराग पासवान यांचे काका पशुपती कुमार पारस यांना आपले अध्यक्ष निवडले आहे. या राजकीय घडामोडीच्या मागे नितीश कुमार यांच्या जेडीयूचा हात असल्याचा आरोप केला जात आहे. सोमवारी पारस यांच्या नेतृत्वाखाली ५ खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांची भेट घेऊन लोजपचा अध्यक्ष बदलल्याची माहिती त्यांना दिली.

यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना पारस यांनी जाहीररित्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे कौतुक करत त्यांना विकास पुरुष असे संबोधले आहे.

पारस हे हाजीपूर येथील लोकसभा सदस्य आहेत.

पारस म्हणाले, आम्ही खासदारांनी पक्ष तोडला नसून वाचवला आहे. पक्षातले ९९ टक्के कार्यकर्ते चिराग पासवान यांच्या मागे नाही तर ते आपल्यामागे असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

२०२०च्या बिहार विधानसभा निवडणुकांत लोजपची कामगिरी अत्यंत खराब झाली होती, त्यामुळे पक्ष कार्यकर्ते चिराग पासवान यांच्या विरोधात गेले होते, असाही दावा पारस यांनी केला आहे. आपला नवा गट केंद्रातील सत्ताधारी भाजपसोबत काम करेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

पारस यांच्या समवेत प्रिन्स राज, चंदन सिंह, वीणा देवी व मेहबूब अली कैसर हे लोकसभा सदस्य आहेत. चिराग पासवान यांची कार्यशैली आपल्याला पसंत नसल्याचा या सदस्यांनी आरोप केला.

लोजपामधील फुटीमागे नितीश कुमार

लोजपामधील पडलेली फूट ही नितीश कुमार यांनी पाडल्याचे आरोप सोमवारी दिल्लीत केले जात होते. बिहार विधानसभा निवडणुकांत चिराग पासवान यांनी नितीश कुमार यांच्याविरोधात मोठी आघाडी उघडली होती. त्यांनी सर्व विधानसभा मतदारसंघात जेडीयू उमेदवारांविरोधात आपले उमेदवार उभे केले होते. त्यामुळे मतविभागणीचा जोरदार फटका बसून जेडीयूची संख्या ७१ वरून ४३ इतकी घसरली होती व जेडीयूला भाजपच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन करावी लागली होती. लोजपामुळे ३५ जागांवरील उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला असा आरोप जेडीयूकडून होत होता. त्या सर्व पराभवाचा वचपा नितीश कुमार यांनी जेडीयू पक्ष फोडून काढल्याचे बोलले जात आहे.

मूळ बातमी

COMMENTS