हेलिकॉप्टरमधून सभेच्या स्थळी उतरायचं, वेळ वाचवण्यासाठी धावत स्टेजपर्यंत पोहचायचं, प्रचंड उत्साहाच्या गर्दीत माईक हातात घ्यायचा आणि ‘कमाई, पढाई, सिंचाई आणि दवाई’ याचा नारा देत बेरोजगारीनं पिचलेल्या जनतेच्या मनाला साद घालणारा संवाद साधायचा. तेजस्वी यादव यांचं वादळ बिहारमध्ये घोंगावताना दिसत आहे.
बिहार निवडणुकीचे निकाल काहीही येवोत, पण या निवडणुकीनं बिहारमध्ये पुढच्या पिढीचं एक मजबूत नेतृत्व तयार केलंय. तेजस्वी यादव हे सध्या बिहारमध्ये ‘मॅन इन अँक्शन’ आहेत आणि त्यांच्या प्रचारसभांना मिळणारा जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद हा सध्या जिकडे तिकडे चर्चेचा विषय बनला आहे.
शनिवारी तर एका दिवसात १९ झंझावती सभा करत त्यांनी एक अनोखा विक्रमच केला. हेलिकॉप्टरमधून सभेच्या स्थळी उतरायचं, वेळ वाचवण्यासाठी धावत स्टेजपर्यंत पोहचायचं, प्रचंड उत्साहाच्या गर्दीत माईक हातात घेत ‘कमाई, पढाई, सिंचाई आणि दवाई’ याचा नारा देत बेरोजगारीनं पिचलेल्या जनतेच्या मनाला साद घालणारा संवाद ते साधतात. भाषण संपलं की अक्षरशः धावत पळत पुन्हा दुसऱ्या सभेच्या ठिकाणी. गेले काही दिवस तेजस्वी यादव यांच्या या दिनक्रमानं बिहारचं राजकारण ढवळून काढलं आहे.
या सभेचा माहौलही कुठल्याही नेत्याला हेवा वाटावा असा. म्हणजे इथे कडक इस्त्रीचा मंडप, नेत्यांपासून काही मीटर अंतरावर बसलेली गर्दी, शिस्तबद्ध पद्धतीनं स्टेजवर बसलेले नेते असा मामला नसतो. गप्पा ऐकायला बसावी अशा पद्धतीनं अगदी स्टेजपासूनच ही गर्दी सुरू होते. तेजस्वी यादव यांच्या स्टेजवर नेत्यांची खचाखच गर्दी असते. सर्वच्या सर्व मतदारसंघात सभांचं उद्दिष्ट असल्यानं अगदी तिथल्या उमेदवारालाही फारसं बोलू न देता त्याची माफी मागून तेजस्वी माईक हातात घेतात. भाषण सुरू असतानाच मागे स्टेजवर सत्काराचे कार्यक्रम सुरू झाल्यावर ते भाषणाच्या मध्येच त्यांना हटकायला कोपऱ्यात जात सत्कार वगैरे करत बसू नका, इतका वेळ नाही असं प्रेमानं दटावतात.
भाषणात दोन गोष्टी सगळीकडे समान दिसतात. एक म्हणजे राजद हा काही केवळ मुस्लीम आणि यादवांचा पक्ष नाही हे पटवून देण्यासाठी ‘सबको साथ लेकर चलेंगे, चाहे वो सवर्ण हो, दलित हो, महादलित हो, पीछडा हो, अल्पसंख्यांक हो’, असं सांगतात. प्रत्येकच ठिकाणी सुरुवात मात्र सवर्णांपासून असते ही बारीक गोष्ट लक्षात येण्यासारखी. राजदचा पारंपरिक मतदार हा ओबीसी आहे. पण त्याची व्याप्ती वाढवण्यासाठीची ही मेहनत. अंगावर नेहमी फुल बाह्याचा पांढरा कुर्ता. त्याच्या डाव्या खांद्यावर पक्षाचं निवडणूक चिन्ह कंदील कोरलेलं. भाषणात अधूनमधून भोजपुरी बोलीचा वापर करत ‘अरे हम ठेठ बिहारी हैं, जो बोलते हैं वो करते हैं’ असं दमदारपणे सांगत गर्दीच्या काळजाला हात घालण्याची कला
तेजस्वी यादव हे काही राजकारणातलं स्वयंभू नेतृत्व आहे असं अजिबातच म्हणता येणार नाही. लालू प्रसाद यादव यांचा वारसा त्यांना आहे. पण कधी कधी राजकारणात असा वारसा पाठीवरच्या ओझ्यासारखा असतो. तो सांभाळून पुढे वाट चालणं अधिक अवघड ठरू शकतं. लालू यादव यांच्या १५ वर्षाची कारकीर्द ही कशी ‘जंगल राज’ होती यावर आजही विरोधकांच्या प्रचाराचा भर आहे. आणि या सावलीतून बाहेर पडत तेजस्वी यांना प्रचार करायचा आहे. त्यामुळेच अतिशय जाणीवपूर्वक पद्धतीनं लालू प्रसाद यादव यांच्याऐवजी केवळ तेजस्वी यादव यांच्याच पोस्टरवर राजदनं भर दिला आहे. पक्षाच्या जाहीरनाम्यातही लालू प्रसाद यादव यांचा फोटो दिसत नाही. शिवाय प्रचाराच्या सुरुवातीलाच त्यांनी आपल्या वडिलांच्या काळात काही चुका झाल्या असतील तर आपण त्याबद्दल माफी मागतो असं जाहीरपणे सांगून टाकलं आहे. पण त्यानंतर सगळा प्रचार ते केवळ रोजगार, शिक्षण, आरोग्य या मूलभूत मुद्द्यांवरच केंद्रीत करताना दिसतात.
सभांना होणारी गर्दी ही मतात परिवर्तित होतेच असं नाही. याबाबतीत महाराष्ट्रात राज ठाकरे यांचं उदाहरण आपल्या समोर आहेच. ते तेजस्वीबाबत होईल का अशीही शंका काहीजण उपस्थित करतात. पण तेजस्वी यादव यांच्या सभांना होणाऱ्या गर्दीत एक करंटही आहे. १० लाख नोकऱ्या एकाचवेळी एका राज्यात भरणं खरंच शक्य आहे का यावर तज्ज्ञ सावधतेनं मत व्यक्त करताना दिसतात. बिहारचं संपूर्ण बजेट या पगारावर खर्च करावं लागेल असं म्हणत नितीशकुमार या घोषणेची खिल्ली उडवताना दिसतात. पण राजकीयदृष्ट्या हा फासा अगदी अचूकपणानं पडला आहे यात शंका नाही. घोषणा थोडी अवाजवी वाटत असली तरी या अवाजवी आकड्यानेच बेरोजगारी हा मुद्दा चर्चेत आणण्याचं काम केलं आहे. अपरिहार्यतेनं का होईना पण त्यावर उत्तर देणं भाग पडत आहे. भाजपनं तर आपल्या जाहीरनाम्यात १९ लाख रोजगार देण्याचा वादा केला आहे. तेजस्वी यादव यांनी भिडस्तपणे काही मवाळ आकडा दिला असता तर बेरोजगारी हा विषय प्रचारात इतक्या प्रभावीपणे चर्चेत दिसलाच नसता. त्यामुळे या मोठ्या आकडेफेकीमागे त्यांचा राजकीय उद्देश मात्र सफल झालेला दिसतोय.
तेजस्वी यादव एकीकडे बिहारमध्ये दिवसाला १६-१८ सभा करत असताना दुसरीकडे राहुल गांधी मात्र दोन दिवस शिमल्यात विश्रांतीसाठी गेल्याची बातमी आली. पण प्रचारात मोदींचं आवडतं लक्ष्य राहुल गांधीच आहेत. त्यामुळेच ‘डबल इंजिन’ सरकार हवं आहे की ‘डबल युवराज’ असं म्हणत त्यांनी हल्लाबोल केला. प्रादेशिक नेत्याला असा वाढता प्रतिसाद मिळत असताना त्याच्यावर हल्लाबोल करण्याऐवजी राहुल गांधी हे आपलं आवडतं टार्गेट समोर आणत हल्ला करत राहणं हे भाजपसाठी जास्त सोपं आहे. त्यामुळेच मोदींनी अगदी यूपीत अखिलेश आणि राहुल कसे एकत्र आले होते, पण जनतेनं त्यांना रिकाम्या हातांनी माघारी धाडलं, तीच गत बिहारमधल्या दोन युवराजांचीही होईल असा हल्लाबोल केला. त्याआधी त्यांनी तेजस्वी यादव यांचा उल्लेख ‘जंगलराज के युवराज’ असा करत सर्वात मोठा हल्लाबोल केला होता. लालूच्या जंगलराजला प्रचारात सतत ठेवणं ही भाजप-नितीश यांची रणनीती आहे. त्यामुळे ही टीका एकप्रकारे उसकवणारी होती, पण त्यावर तेजस्वी यादव यांनी कुठलंही उत्तर देणं टाळलं. पंतप्रधान आहेत ते, काहीही बोलू शकतात पण त्या ऐवजी त्यांनी बिहारला जाहीर केलेल्या १ कोटी ६० लाख रुपयांच्या स्पेशल पॅकेजचं काय झालं हे सांगितलं असतं तर बरं झालं असतं इतकंच उत्तर त्यांनी दिलं.
तेजस्वी यादव यांचं वय अवघं ३० आहे. येत्या ९ नोव्हेंबरला त्यांच्या वयाची ३१ वर्षे पूर्ण होतील. निकाल त्यांच्या बाजूनं लागलेच तर देशातले सर्वात तरुण मुख्यमंत्री बनण्याचा विक्रम स्थापित करतील. आसाम गण परिषदेचे प्रफुल्लकुमार महंतो हे ३४ व्या वर्षी आसामचे मुख्यमंत्री बनले होते. ओमर अब्दुल्ला हे ३८ व्या वर्षी काश्मीरचे मुख्यमंत्री बनले होते. तर महाराष्ट्रातही शरद पवार यांनी ३८ व्या वर्षीच मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. अगदीच समकालीन नेत्यांची तुलना करायची तरी अखिलेश यादव यांच्याकडेही ३८ व्या वर्षी मुख्यमंत्रिपद आलं. त्यामुळे वय ही तेजस्वी यांच्या दृष्टीनं सर्वात जमेची बाजू आहे. निकाल विपरीत आले तरीही एक नव्या पिढीचं दमदार नेतृत्व बिहारमध्ये स्थापित झालं आहे हे नक्की.
तेजस्वी यादव यांना मिळणाऱ्या प्रतिसादाची आज चर्चा सुरू असली तरी काही महिन्यांपूर्वी मात्र स्थिती वेगळी होती. बिहारमध्ये काही महिन्यांपूर्वी महापूर आला होता, तेव्हा तेजस्वी यादव आहेत कुठे असा सवाल सगळे विचारत होते. कोरोनाचा लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर जेव्हा मजूर पायपीट करत रस्त्यावर येत होते, तेव्हा तेजस्वी यादव आक्रमकपणे पुढे आले नव्हते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तेजस्वी यादव यांचा दारुण पराभव झाला. राजद-काँग्रेस तेव्हा एकत्र लढले पण राजदला लोकसभेत भोपळाही फोडता आला नाही. काँग्रेसला कशीबशी एक जागा मिळाली. बाकी सर्व जागा एनडीएलला मिळाल्या होत्या. पण बिहार विधानसभा जसजशा जवळ येऊ लागल्या तसतशी परिस्थिती बदलू लागली.
एकतर लॉकडाऊनच्या काळात देशातलं सर्वात मोठं रिव्हर्स मायग्रेशन बिहारमध्ये पाहायला मिळालं. याच काळात नोकरीधंदा गमवावा लागल्यानं घरी परतलेल्यांची संख्याही मोठी. त्यामुळे सर्वात ज्वलंत प्रश्न नोकरीचा, कामधंद्याचा… सुशासनबाबू असा प्रचार करत सत्तेवर आलेल्या नितीशकुमार यांनाही आता १५ वर्षे झालीयत. त्यामुळे त्यांच्या विरोधात एक अँटी इन्कमबन्सीही तयार झालेली आहेच. त्यामुळे परिस्थितीनंच निर्माण केलेल्या या संधीत तेजस्वी यादव आक्रमकपणे समोर आलेत. आणि मिळालेल्या संधीचं सोनं करण्यासाठी अथक मेहनतही करतायत. त्यांच्या नेतृत्वाला आलेली ही झळाळी ही भोवतालची परिस्थिती नेमकेपणानं टिपल्यानं आलेली आहे. देशात बेरोजगारीच्या मुद्द्यावर इतक्या त्वेषानं लढली गेलेली ही पहिलीच निवडणूक ठरतेय. त्यामुळे जर परिणाम तेजस्वी यादव यांच्या बाजूनं आलेच तर मुद्द्यांवर निवडणूक कशी लढावी याचाही तो वस्तुपाठ ठरेलच.
प्रशांत कदम, हे ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीचे दिल्लीस्थित पत्रकार आहेत.
COMMENTS