चित्रकारांच्या नशिबी आरसे तडकलेले…

चित्रकारांच्या नशिबी आरसे तडकलेले…

लॉकडाऊन काळात जी अवस्था मराठी प्रकाशकांची, तीच अवस्था थोड्या फार फरकाने चित्रकारांची आहे. मराठी प्रकाशकांची निदान संघटना तरी आहे, चित्रकारांची दबावगट म्हणता येईल, अशी प्रभावी संघटना नाही की एकी नाही. त्यामुळे कलादालनांना टाळे लागले असताना, अस्तित्वाच्या प्रश्नावरही चर्चा नाही...

कोरोना महासाथीची सुवर्णसंधी साधून देशोदेशीच्या राज्यकर्त्यांनी आपली अधिकारशाही-हुकुमशाही पकड मजबूत केली. ही पकड जशी मजबूत होत गेली, भारतासारख्या हातातोंडाशी सहज गाठ न पडणाऱ्यांच्या तिसऱ्या जगातल्या देशात काय जीवनावश्यक नि काय अनावश्यक याचीही आपसूक विभागणी झाली. यामुळे जीवनावश्यक गटात मोडणाऱ्या उद्योग-व्यवसायांचे दिनचक्र वेगाने सुरू राहिले. अनावश्यक असा शिक्का बसलेल्यांच्या नशिबी रुतलेपण आले.

या ‘अनावश्यक’ क्षेत्राच्या यादीत आपल्याकडे पुस्तक प्रकाशन व्यवसाय, चित्र-शिल्प-नाट्य-नृत्य-गायन-वादन आदी कलांना ढकलले गेले. त्यामुळे लॉकडाऊनच्या पहिल्या दोन-तीन महिन्यांत कसाबसा तग धरल्यानंतर विशेषतः नाट्यक्षेत्रातल्या तंत्रज्ञ आणि बॅकस्टेज आर्टिस्टांवर उदरनिर्वाहासाठी लोणची-पापड-सुकामेवा-मासळी विकण्याची वेळ आली. त्यांची ही कहाणी आपण आवंढे गिळत ऐकली आणि पुढच्या क्षणी सोशल मीडियाच्या नित्याच्या व्यसनात स्वतःला गुरफटून घेतले.

गेल्या सहा महिन्यात क्रिमी लेअर सोडला तर सिने-नाट्य आणि प्रकाशन व्यवसायात कार्यरत तंत्रज्ञ, कलावंतांच्या जीवनाची घडीच विस्कटून गेली. तशीच किंबहुना, त्याहूनही वाईट अवस्था सध्या चित्रकारांवर आलेली आहे. एरवी, कला या समाजाचा आरसा मानल्या जातात. या आरश्यात समाजाने आपले रुप न्याहाळावे, गरज भासल्यास ते सावरावे, स्वतःला उन्नत करत जावे, जाणिवा विस्ताराव्या, स्वतःसाठी आनंदाच्या जागा तयार कराव्यात अशी साधारण अपेक्षा असते. चित्रकलेच्या संदर्भाने बोलायचे झाल्यास, ही कला जो आरसा समोर धरते, त्यातून तर समाज स्वतःला आरपार पाहू-बघू शकतो. इतकेच नव्हे, तर विखारी चेहऱ्यावर चढलेला सभ्यतेचा मुखवटा उतरवण्याचे काम हा आरसा नकळतपणे करत असतो. आत्मप्रेमात बुडालेल्यांचे भरजरी वस्त्रांआडचे नागडेपण हा आरसा उघड करत असतो.

मात्र, हा आरसाच आता अनावश्यक ठरवला गेला आहे किंवा ठरला आहे. एका पातळीवर हे तर खरेच की, आरसा ही काही कुणासाठी जीवनावश्यक बाब असू शकत नाही. आरसा नाही म्हणून कुणाचा श्वास थांबत नाही. आरश्याकडे पाहून कुणाचे पोट भरत नाही. म्हणजेच तो नाही, म्हणून कोणी माणूस वा माणसांनी बनलेला समाज मरत नाही. पण, तसा तो शुद्धीतही राहात नाही. आपलाच विद्रुप चेहरा त्याला दिसत नाही. आपल्या कपड्यांवर उडालेले डाग त्याला नजरेस पडत नाहीत.

पण, मुळात चित्रकला काय नि शिल्पकला काय हे काही जीवनाचे हुबेहुब प्रतिरुप नसते. तर त्या मागे अनुभवलेल्या जगण्याचे सार एकवटलेले असते. सखोल चिंतन असते. या चिंतनाची एक तात्विक बैठक असते. यातून चित्र बघणाऱ्या प्रेक्षक-रसिकाने आत्मसंवाद साधत माणूसपणाच्या दिशेकडे एक पाऊल पुढे सरकावे, ही माफक अपेक्षा असते.

परंतु, याचेच आपल्याकडचे भान कमालीचे तोकडे असल्याने, ख्यातीप्राप्त ज्येष्ठ चित्रकार सुभाष अवचट म्हणतात तसे शालेय शिक्षणापासून चित्रकला हा विषय ऑप्शनला टाकून माणूस म्हणून समृद्धीकडे नेणारा मार्गच आपण रोखून धरतो. चित्रांबद्दलची निरक्षरता सर्वव्यापी राहिल्याने घराच्या भिंतीवर एक तरी भावलेले चित्र विकत घेऊन कौतुकाने डकवावे, असा संस्कारही रुजत नाही. त्यामुळे जगात कोरोनाची साथ परसली नव्हती, तेव्हा सुद्धा आपल्याकडचे चित्रकार नाकारलेपणाची भावना घेऊन जगत होते, आता करोनाच्या साथीत, समाज आणि सरकारच्यादृष्टीने चित्रकला ही अनावश्यक गोष्ट असल्याने चित्रकला वर्तुळाची सद्यस्थिती सर्वार्थाने शोचनीय आहे, म्हटल्यास वावगे ठरू नये.

जून महिन्यापासून या देशात नट सुशांतसिंग राजपूतची आत्महत्या की खून? बॉलिवूडमधल्या नट्या नशेबाज की निर्दोष, हे दोनच प्रश्न प्राधान्याने चर्चिले जात असताना राज्यातला चित्रकार जिवंत आहे की जिवंतपणी मरण अनुभवतोय, हेच कुणी विचारलेले नाही. कावेबाज राज्यकर्ते या ना त्या निमित्ताने रोज जनतेला अफूची धुरी देत असताना चित्रकार सन्मानाने जगावा, यासाठी कोणी चर्चा घडवून आणलेली नाही की चित्रकारांची बाजू घेऊन कोणी आंदोलने-निदर्शने केलेली नाहीत.

वस्तुतः जेव्हा जग लौकिकार्थाने सुरळीत, सुस्थित असते, तेव्हासुद्धा चित्रकारांपुढे कलादालन उपलब्ध होण्यापासून रसिकांनी चित्रांचा स्वीकार करणे, कला समीक्षकांनी मान्यता मिळणे, संग्राहकांनी ती मान ठेवून विकत घेणे आणि सरतेशेवटी सन्मानाने जगता यावे एवढे पैसे गाठी जमणे इथपर्यंत अनंत आव्हाने उभी असतात. जाणकार तर म्हणतात, यापलीकडेदेखील चित्रकाराचा संघर्ष चाललेला असतो, पण तो समाजापुढे कधी येत नाही. म्हणजे, मुंबईतल्या जहांगीरआदी नावाजलेल्या आर्ट गॅलरींमध्ये जागा उपलब्ध होण्यापासून याची सुरुवात होते. जहांगीरमध्ये साधारणपणे पाच वर्षांची वेटिंग लिस्ट असते. याचा अर्थ, संबंधित चित्रकार पाच वर्षांपासून चित्रप्रदर्शनाच्या तयारीला लागत असतो.

चित्रकला हा साधनकेंद्री व्यवसाय आहे, दर्जेदार रंगांपासून कॅनव्हास ते चित्रांचा काळजीपूर्वक सांभाळ करण्यासाठी बराच पैसा आवश्यक असतो. मुंबईतल्या चित्रप्रदर्शनासाठी एका चित्रकारास साधारणपणे ५ ते १० लाख रु.चा खर्च येतो. आता, प्रत्येकालाच एवढी रक्कम परवडत नसते. मग अनेक चित्रकार त्यापायी कर्ज घेतात. आशा एवढीच असते, की आपल्या कलेचे नामांकित आर्ट गॅलरीत प्रदर्शन भरल्यावर समीक्षकांची वाहवा आणि संग्राहकांकडून कर्ज फिटेल एवढा मोबदला मिळेल. पण अनेकांच्या वाट्याला इथेदेखील निराशाच येते. कोणी उघडपणे मान्य करत नसले तरीही गेल्या दोन वर्षांपासून देशात आर्थिक मंदीसदृश जे वातावरण तयार झाले आहे, त्याचा मोठा फटका चित्रांच्या खरेदी-विक्रीच्या प्रक्रियेला बसलेला आहे. तसेही कोणत्याही प्रदर्शनात ३० टक्क्यांवर चित्रांची विक्री सहसा झालेली नाही. अध्येमध्ये दिवंगत वासुदेव गायतोंडेंच्या चित्राला कोट्यवधी रुपये मिळाल्याच्या बातम्या येतात, नाही असे नाही. पण हा सन्माननीय अपवाद असतो. त्यामुळे करोना नसतानासुद्धा चित्रकाराला उतार अनुभवावे लागतात. आता तर अशा संघर्षरत चित्रकारांच्या अवस्थेची कल्पनादेखील करवत नाही.

यासंदर्भात क्षेत्रातले जाणकार चित्रकार सत्यजित वारेकरांचे उदाहरण देतात. वारेकर गेली २० वर्षे या क्षेत्रात आपले नाव राखून आहेत. इतर अनेकांप्रमाणे विपरित परिस्थितीशी झगडत पुढे आलेल्या या वारेकरांची चित्रे गेल्या वर्षी सांगली-कोल्हापूर भागात आलेल्या पुरात नष्ट झाली. पण त्यातूनही सावरत त्यांनी मेहनतीने प्रदर्शनासाठी नवी चित्रे रंगवली. प्रदर्शनात सादर केली. रसिकांनी त्या चित्रांचे तोंडभरून कौतुकही केले. परंतु त्यातली चित्रे विकत घेण्यासाठी किती संग्राहक पुढे आले, तर केवळ दोन.

आपल्याकडे लॉकडाऊनचा कालावधी सुरू होऊन आता ६ महिने पूर्ण झालेत. हवालदिल चित्रकारांना मदत व्हावी म्हणून मुंबईतल्या साक्षी, ताओ, गॅलरी-7 आदी आर्ट गॅलरींच्या संचालकांनी आभासी पद्धतीने चित्र विक्रीचा घाट घालून पाहिला. (संदर्भ- लोकसत्ता २५ सप्टेंबर २०२०) पण या प्रयत्नांनाही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. यावर, देशाचा जीडीपी रेट उणे २३ वर घसरला असताना, या क्षेत्रावर मेहेरनजर होईल, अशी अपेक्षाच करणे मुर्खपणाचे आहे, असे कोणी म्हणेल. परंतु प्रश्न केवळ घसरलेल्या जीडीपीचा वा गाळात रुतलेल्या अर्थव्यवस्थेचा वा करोनाच्या अजूनही आटोक्यात न आलेल्या महासाथीचा नाही, तर समाजाने सभ्यतेकडून असभ्यतेकडे सरकत जाण्याचा, अभिरुचीसंपन्नतेकडून अभिरुचिहिनतेकडे वाटचाल करण्याचा आहे.

दुर्दैवाने ही घसरण थांबावी, असा आजचा राजकीय-सांस्कृतिक पैस नाही. अशात समाजापुढे चित्रकलारुपी आरसा असायचा कुठे? जो काही आहे, तो तडकलेला आहे. या तडकलेल्या आरश्याच्या काचा इतस्ततः विखुरलेल्या आहेत. त्या तुकड्यांमध्ये समाजाला आपले रुप दिसायचे कुठे आणि त्याच्यात माणूसपणाचा अंश साचायचा कुठून ?

राज्याचे सुदैव एवढेच आहे, विद्यमान मुख्यमंत्री स्वतः कलासक्त वृत्तीचे गृहस्थ आहेत. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे माजी सन्माननीय विद्यार्थी आहेत. बाकी याउपर अधिक काय सांगणे?

(लेखाचे छायाचित्र प्रातिनिधिक स्वरूपाचे.)

COMMENTS