लोकसभेतील गोंधळात कोळसा विधेयक मंजूर

लोकसभेतील गोंधळात कोळसा विधेयक मंजूर

नवी दिल्ली : कोळसा उत्खननात खासगी, व्यावसायिक देशी व परदेशी कंपन्यांना प्रवेश देणारे विधेयक शुक्रवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले. दिल्ली दंगलीवरून गुरुवारी व शुक्रवारी लोकसभेत विरोधकांकडून गोंधळ घातला जात असताना हे विधेयक सरकारने मंजूर केले. या विधेयकामुळे आता कोळसा खाणीच्या लिलावात व उत्खननात व्यावसायिक देशी व विदेशी कंपन्या सहभाग घेऊ शकणार आहेत. हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय समजला जातो कारण या अगोदर कोळसा उत्खननात खासगी व विदेशी कंपन्यांच्या प्रवेशावर निर्बंध होते.

गुरुवारी लोकसभेत सरकारने हे विधेयक पटलावर आणण्याची तयारी केली होती. त्या दिवशी लोकसभेत राजस्थानमधील एका खासदाराने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व त्यांच्या कुटुंबियांवर टीका करणारे वक्तव्य केल्यानंतर काँग्रेस सदस्यांनी गोंधळ घातला होता. त्या गोंधळात हे विधेयक लोकसभेत मांडले गेले.

शुक्रवारी सकाळी ११ वाजता लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधकांनी पुन्हा दिल्ली दंगलीसंदर्भात सरकारने आपली बाजू मांडावी म्हणून गदारोळ घालण्यास सुरूवात केली. त्यावेळी सभागृहाचे कामकाज काही काळासाठी स्थगित करण्यात आले. पण लगेचच दुपारी १२ वाजता सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर सरकारने हे विधेयक विरोधकांच्या गोंधळाकडे दुर्लक्ष करत त्यांच्या लक्षात येण्याच्या आता बहुमताने मंजूर करून घेतले व त्यानंतर सभागृहाचे कामकाज स्थगित झाले.

मूळ बातमी

COMMENTS