‘लव जिहाद’ विरुद्ध ‘ढाई आखर प्रेम का’

‘लव जिहाद’ विरुद्ध ‘ढाई आखर प्रेम का’

‘हलाल’ आणि ‘हराम’ खाद्य पदार्थांवरून वाद सुरू असतानाच ‘लव जिहाद’चा मुद्दाही विशिष्ट वर्गाकडून हेतूपुरस्सर तापवला जात आहे. एका सत्तासमर्थक महिला पत्रकाराने हिंदू मुलींना आकर्षित करणाऱ्या मुस्लिम तरुणांचा उल्लेख ‘स्टड बुल्स’ असा केल्याने तर सोशल मीडियावर यावरून नव्याने घमासान सुरू झाले आहे. मुळात, हा सारा संघ-भाजपच्या व्यापक बदनामी तंत्राचा एक भाग राहिल्याचा दावा, एकेकाळचे संघ कार्यकर्ते असलेले दलित लेखक भंवर मेघवंशी यांनी त्यांच्या मधुश्री पब्लिकेशन प्रकाशित आणि शेखर देशमुख अनुवादित ‘मी हिंदू असू शकत नाही...’पुस्तकाद्वारे केला आहे. त्यातील हा लक्षवेधी उतारा...

कोरोना : ट्रान्सजेंडर समुदाय आणि आरोग्यसेवा
लडाख,अक्साई चीनचे राजनैतिक महत्त्व
बंगळुरू दंगलः एसडीपीआय संघटनेची चौकशी सुरू

संघ शाखेत जायचो, तेव्हा एक गोष्ट वारंवार ऐकायला मिळायची. ती म्हणजे, आयुष्यात एकदा तरी हिंदू मुलीशी शय्यासोबत करायला मिळावी, असा म्हणे, परधर्मीय मुस्लिमांचा एक उद्देश असतो. सांगितले जायचे, असे करण्याने त्यांना स्वर्गसुख मिळते, मग याच उद्देशाने हे लोक हिंदू मुलींच्या मागावर फिरत असतात. सुरुवातीला अशा गोष्टींवर विश्वास ठेवणे जरा जड जायचे, परंतु सातत्याने या संदर्भातली उदाहरणे दिली जायची, तेव्हा विश्वास ठेवणे भाग पडायचे. म्हटले जायचे, शाळा असो वा कॉलेज मुस्लिम पोरांकडे पहा, अभ्यासापेक्षा त्यांचे अधिक लक्ष मुली पटकावण्याकडे असते. शाळेत या गोष्टी मी बोलत राहायचो. अंतिमतः याचा परिणाम असा झाला, या गोष्टी मला खऱ्या भासू लागल्या. प्रत्यक्षातही मी बघायचो, मुस्लिम मुले मस्तपैकी सजूनधजून असायची. चित्ताकर्षक कपडे घालायची. पण याकडे फारसे लक्ष नाही द्यायचो, परंतु जसे मला सांगितले गेले, ही मुस्लिम मुले शिकण्यासाठी नव्हे, हिंदू मुलींना नासवण्यासाठी फिरत असतात, तसा माझा मुस्लिम विद्यार्थ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलत गेला.

त्यानंतर सोबत शिकणारा प्रत्येक मुस्लिम मुलगा मला छानछोक भासू लागला होता. त्या काळात ‘लव जिहाद’सारख्या समाजात अस्थिरता माजवणाऱ्या शब्दांचा शोध लागायचा होता. या शब्दावरून राजकारण पेटायचे होते. परंतु, त्या पातळीवरची कुजबूज मात्र वाढू लागली होती. तेव्हा असे सांगितले जायचे, दिवसभर लोखंडावर घण मारून किंवा गॅरेजमध्ये हात काळे करून झाल्यावर हे मुस्लिम तरुण संध्याकाळी सजून बाहेर पडतात, हिंदू मुलींवर लाइन मारत इथे-तिथे-सगळीकडे उंडारत राहतात. आमचे मेळे असोत वा दांडिया सगळ्या सण-उत्सवात घुसखोरी करत असतात. काहींना तर आपल्या हिंदू मुली या मुल्लांमध्ये काय पाहतात नि काय म्हणून त्यांच्याकडे आकर्षित होतात, याचे वैषम्य वाटत राहायचे.

आमच्या परिसरातल्या त्या काळातल्या एका तरण्याबांड युवा नेत्याच्या मते, याचे खरे कारण, आपले हिंदूचे शाकाहारी असणे आणि मुस्लिमांचे मांसाहारी असणे, यात दडलेले असते. ‘नॉनव्हेज’ हा लैंगिक ताकद वाढवणारा असतो. उलट हिंदू नुसताच सात्विक आहार घेत राहतात, त्यामुळे ‘सेक्शुअली ठंडे’ राहात असतात. एकदा तर एका संघवाल्या वकिलसाहेबांनी, या सगळ्याच्या मुळाशी मुस्लिमांची होत असलेली सुंता असल्याचे जाहीर करून टाकले. त्यांचे म्हणणे, यामुळे सुद्धा हिंदू मुली मुस्लिम मुलांच्या जाळ्यात अडकतात, नि एकदा अडकल्या की, त्यातून बाहेर पडू शकत नाहीत. एका टप्प्यानंतर या गोष्टी माझ्या आकलनापलीकडच्या होऊन जायच्या. नंतरच्या काळात या तर्क-वितर्कांचा खरा अर्थ मला लागला, परंतु लहानपणी या असंबद्ध गोष्टी, अशा काही डोक्यात शिरल्या, की त्याचे नाव ते.

मला आठवतेय, मुस्लिम मुलांबद्दल जे ऐकायचो, त्यावर शाखेमध्ये आम्ही चर्चा करायचो. एकदा असा विचार पुढे आला, मुस्लिम मुलांच्या या कूकर्माचा बदला घेण्यासाठी आपल्यालाही काहीतरी मूल्य रचले पाहिजे. त्यानुसार असे ठरले, ज्याप्रमाणे हिंदू मुलींशी शय्यासोबत केल्याने मुस्लिमांना ‘जन्नत’ मिळते म्हणतात, त्याचप्रमाणे आपणसुद्धा ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे की, एका मुस्लिम मुलीशी शय्यासोबत केली, तर हिंदू मुलास शंभर गायींना चारा खाऊ घालण्याचे पुण्य पदरात पडेल. जी मुले अशा पद्धतीने मुस्लिम मुलींना पटवतील, त्यांचा आपण सन्मान केला पाहिजे. फिट्टमफाट करण्याचा हा नामी उपाय यथावकाश आमच्या कानी पडला. तो बराच काळ प्रभाव टाकत राहिला आणि कालांतराने विरूनही गेला.

या घटकेला ‘लव जिहाद’ची तशीही उच्च स्वरांत चर्चा होतेच आहे, त्यामुळे जुन्या गोष्टी सहज आठवल्या. पण मग मी विचार करतो, नेमके बदलले तरी काय ? तर काहीच नाही बदलले. तोच गलिच्छ विचार आजही कायम आहे. किंबहुना, आधीच्या तुलनेत हा विचार आता अधिक पक्का होऊन हिंसक राजकारणाला धग देतो आहे. दोन समाजांमध्ये विष कालवण्याच्या कामास या लव जिहाद’मुळे विलक्षण गतीसुद्धा आलेली आहे. देशातल्या गंगा-जमनी सभ्यतेस सुरुंग लावण्याचे काम तसेही कितीतरी वर्षांपासून आपल्याकडे बिनबोभाट सुरूच आहे. जे आजवर छुप्या पद्धतीने घडत होते, ते आता जाहीरपणे दिसू लागले आहे. माझे म्हणणे आहे, संघवाल्यांच्या अजेंड्यामध्ये ‘लव जिहाद’चा मुद्दा पहिल्यापासूनच राहिलेला आहे. आता ही जखम अधिकच चिघळली आहे.

‘लव जिहाद’बद्दल मला विचाराल, तर प्रेम हेच एक युद्धसमान आहे. कोणावर प्रेम करणे, ते प्रेम टिकणे हेसुद्धा धर्मयुद्धाच्या तुलनेत कमी नाही. वाईट तर याच एका गोष्टीचे आहे, विद्वेषी मनोवृत्तीचे लोक प्रेमाच्या नावावरसुद्धा समाजात नफरत फैलावत राहतात. तरीही माझा आशावाद आहे, की ‘लव जिहाद’चे नाव घेऊन कोणी कितीही रान माजवले तरीही, प्रेमाच्या ओढीने मने जुळत राहतील, लोक जात, धर्म, पंथ, आणि देश आदींच्या सीमारेषा ओलांडून प्रेम करत राहतील. प्रेमावरचा धर्मांचा पहारा कधीही मान्य केला जाणार नाही, धर्माने उभ्या केलेल्या भिंती एकदिवस कोसळून पडतील. असो.

वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास, लव जिहादी होण्याची संधी मला माझ्या कुटुंबीयांनीच दिली नाही. प्रथेप्रमाणे लहानपणीच माझा साखरपुडा झाला आणि वयात येईतोवर माझे लग्नही लावून दिले गेले. जेव्हा सज्ञान झालो, पत्नीसोबत राहण्यास सांगितले गेले. लोक माझ्या खासगी आयुष्याबद्दल विचारतात, तेव्हा एक प्रश्न जरुर विचारतात, तुम्ही कोणावर प्रेम केले आहे का, तेव्हा मी त्यांना म्हणतो, अहो मी प्रेमाशीच लग्न केलेले आहे. गेल्या २७ वर्षांपासून हे प्रेम आणि मी जोडीदार होऊन आयुष्य जगतोय. तसे पाहता, माझे आणि पत्नीचे आयुष्य अगदी भिन्न स्वरुपाचे राहिले आहे. माझे जग पुस्तकांमध्ये वसलेले आहे, तर तिचे जगणे शेत आणि कुरणाने व्यापलेले आहे. मी आपला झोळी खांद्यावर टाकून सामाजिक बदलाच्या गप्पा मारत दूरदूर भटकत असतो. ती घराचा-कुटुंबाचा कणा होऊन खंबीरपणे उभी आहे. खरे तर तिच्याचमुळे आमचा संसार टिकून आहे. मी जगाचा विचार करायचा, तिने घर-कुटुंबाकडे लक्ष द्यायचे, ही आम्ही स्वेच्छेने स्वीकारलेली कामाची विभागणी आहे.

आता हासुद्धा एक योगच आहे, आमच्यात आजवर कधीही भांडण-तंटा झालेला नाही. मुळात, इतर नवरा-बायकोप्रमाणे एक-दुसऱ्यावर ओरडण्यासाठी, तारस्वरांत भांडण्यासाठी आम्हाला दोघांना वेळच मिळालेला नाही. आम्ही आजवर ना ‘आय लव्ह यू’ म्हणत आपल्या प्रेमाची साक्ष दिली, ना दोघांत इतका ताण-तणाव निर्माण झाला, की एकमेकांना ‘आय हेट यू’ म्हणण्याची आमच्यावर कधी वेळ आली. जे काही आमच्यातले रागेभरले संबंध राहिले, ते बव्हंशी अव्यक्त स्वरुपाचेच राहिले. मला आशा आहे, अव्यक्तपणा हेच या संबंधांचे वैशिष्ट्य राहावे.

थोडक्यात, आयुष्य प्रेमासोबत नि त्या प्रेमाचा व्यक्त आविष्कार असलेल्या मुलाबाळांसोबत तसेच आई-वडिलांसोबच आनंदाने चालले आहे. कुटुंबाकडून प्रत्येकवेळी आधार आणि मदत मिळत आली आहे, हे सांगणे न लगे. त्यामुळे आज मी जो काही आहे, जे काही थोडेबहुत मिळवलेय, त्यात अर्थातच कुटुंबीयांचा वाटा सिंहाचा आहे. असे शांतचित्त, प्रसन्न स्वभावाचे कुटुंब न मिळते, तर मी विधायक नव्हे, विघातक कामांमध्ये अडकलो असतो, यात जराही शंका नाही.

हे खरे, माझी जीवनसोबती असलेली पत्नी औपचारिक शिक्षण घेण्यासाठी कधी कुठल्या शाळेत गेली नाही. परंतु तिला असलेली उमज आणि घर सांभाळण्याचे तिच्यामध्ये असलेले विलक्षण कौशल्य कोणाही शिक्षित व्यक्तीपेक्षा उजवे आहे. तिच्यात उदारपणा आणि आधुनिकतेचा मनोहारी संगम आहे. तिने कोणत्याही प्रकारचा संशय न घेता, न भांडता मला सामाजिक कार्यात व्यग्र होऊ दिले आहे. ती कधीही शंकेखोर, भांडकुदळ आणि इर्षाळू बनलेली नाही. तिने तर कोणते स्त्रीवादी साहित्यदेखील वाचलेले नाही. स्त्रीवादी संघटनेतही ती कधी गेलेली नाही. परंतु, महिलांच्या अधिकारासाठी ती नेहमीच सजग राहिली आहे. किंबहुना, जेव्हा दलित अत्याचाराची प्रकरणे उजेडात आली किंवा गावांमध्ये डाकीण ठरवून महिलांवर अन्याय-अत्याचार केले गेले, तेव्हा, प्रेमाने त्यात पीडितांच्या बाजूने उडी घेतली आहे. खरे सांगायचे, तर घराची स्वामिनी तीच राहिली आहे. तिनेच संसाराची नवी व्याख्या आकारास आणली आहे. आपल्या सहजसुंदर स्वभावामुळे एक लोभस संसार तिने साकारला आहे.

आपण सारे जाणतोच, आयुष्यातले खेळ अतर्क्य असतात. आयुष्य आपण समजतो तितके सरळसाधे एकरेषीय कधीच नसते. त्यामुळे इतरांप्रमाणेच आमच्याही आयुष्यात चढउतार आले, कधी कधी असेही वाटले, की आपण केवळ नावापुरतेच नवरा-बायको आहोत, पण त्यातही ‘प्रेम’ नावाच्या अडीच अक्षरी ताण्या-बाण्याने जगणे तोलून धरले. त्यानंतर कधीतरी दाम्पत्य जीवन आणि निखळ मैत्री यावर आधारलेली एक कहाणी मी ‘लौट आओ कण्णा’ या कथेत गुंफली. अवचित मनात फुललेली प्रेम ही भावना, या प्रेम भावनेशी एकरूप होऊन झालेला विवाह आणि विवाहानंतरचे बहरत गेलेले प्रेम याची ही अव्यक्त कथा आहे. जी असे सुचवते, आयुष्यात कोणत्याही वळणावर, अकल्पितपणे कुणाशीही आपली गाठभेट होऊ शकते आणि कोणी कधीही आपल्या नकळत आपल्यापासून दुरावू शकतो. विलग होऊ शकतो.

अर्थात, मी मला लाभलेल्या प्रेमभाग्यामुळे सदैव उत्साही असतो. किंबहुना, माझी तर हीच हृदयस्थ भावना राहिली आहे, की आपले संपूर्णत्व एका क्षणी प्रेमामध्ये मिसळून जावे. मी म्हणतो, किमान तो एकरुपतेचा दिवस येईपर्यंत  माझ्या आयुष्यातला ‘लव जिहाद’ सुरु राहिला तर काय वाईट आहे?

मी हिंदू असू शकत नाही…
मधुश्री पब्लिकेशन
भंवर मेघवंशी
अनुवाद – शेखर देशमुख
मूल्य – २५० रुपये.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0