प्रेमकहाणी वजा.. ‘मुग़ल-ए-आज़म’

प्रेमकहाणी वजा.. ‘मुग़ल-ए-आज़म’

लोकांच्या मनात कायमस्वरूपी स्थान करून असलेल्या ‘मुग़ल-ए-आज़म'ला नुकतीच ६० वर्ष झाली .अमरत्वाचे वरदान या चित्रपटाला लाभले आहे. के. आसिफ नावाचा मनस्वी माणूस आणि त्यावर विश्वास, प्रेम , साथ देणाऱ्या सर्व लोकांच्या एकजुटीचा, मेहनतीचा हा सोनेरी इतिहास आहे. या सिनेमावरचा दुसरा लेख..

अलिगढ विद्यापीठात पोलिसांची क्रूर मारहाण, अर्वाच्च शिवीगाळ
सुप्रीम कोर्टाच्या टिप्पणीवर माजी न्यायाधीश, सनदी अधिकारी नाराज
फोन उचलल्यावर ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ म्हणावे: मुनगंटीवार

‘मुग़ल-ए-आज़म’च्या आधी सलीम-अनारकली यांच्या ऐतिहासिक दंतकथेवर सर्वात प्रथम १९२२ मध्ये ‘ताज’ नाटक आले होते, त्यानंतर या नाटकावर आधारित असे सहा चित्रपट येऊन गेले होते. त्यापैकी ‘अनारकली’ला व्यावसायिक यश देखील मिळाले होते. तरीही ‘मुग़ल-ए-आज़म’ निर्मिती झाली. त्याचे वेगळेपण त्याच्या नावापासून जाणवायला सुरवात होते. सलीम-अनारकलीच्या प्रेमकथेच्या माध्यमातून धर्मनिरपेक्ष भारताबद्दलचे सामाजिक भाष्य केले गेले आहे.
सूत्रधाराच्या रूपात हिंदुस्थानच्या नकाशाचे आत्मकथन सुरू होते.

‘‘मैं हिंदोस्तान हूं। हिमालय मेरी सरहदों का निगहबान है। गंगा मेरी पवित्रता की सौगंध है। तारीख की इंत्तिदा से मैं अंधेरों और उजालों का साथी हूं और मेरी खाक पर संगेमरमर की चादरों में लिपटी हुई ये इमारतें दुनिया से कह रही है कि जालिमों ने मुझे लूटा और मेहरबानों ने मुझे संवारा, नादानों ने मुझे जंजीरें पहना दी और मेरे चाहने वालों ने उन्हें काट फेंका। मेरे इन चाहने वालों में एक इंसान जलालुद्दीन मोहम्मद अकबर था। अकबर ने मुझसे प्यार किया। मजहब और रव्वायत की दीवार से बुलंद होकर इंसान को इंसान से मुहब्बत करना सिखाया और हमेशा के लिए मुझे सीने से लगा लिया।’’

चित्रपटाच्या सुरवातीला जो नकाशा पडद्यावर दिसतो, तो स्वतंत्र भारताचा नकाशा आहे, फाळणी नंतरचा. इतर मुस्लिम बांधवांबरोबर बरेच बुद्धिजीवी मुसलमान पाकिस्तानात निघून गेले होते. महत्त्वाची बाब अशी आहे की, या चित्रपटाशी जोडले गेलेले लेखक, दिग्दर्शक उर्दू भाषिक, सुशिक्षित, बुद्धिजीवी व मध्यमवर्गीय मुसलमान होते. ज्यांनी फाळणीनंतर भारतात राहणे पसंत केले. आपल्या पुरोगामी विचारांचा प्रभाव त्यावेळच्या अनेक चित्रपटातून वेळोवेळी त्यांनी व्यक्त केला. ‘मुग़ल-ए-आज़म’चे चित्रीकरणाला सुरवात झाली, तेव्हा स्वातंत्र्य मिळून अवघी चार वर्षे झाली होती. भारताने १९५० साली राज्यघटना स्वीकारली. धर्मनिरपेक्षता व लोकशाही भारताच्या विचारधारेचा पुनरुच्चार करत समाजात सलोख्याचे, आश्वासक वातावरण निर्माण करण्याच्या कार्यात चित्रपटसृष्टीचे मोठे योगदान आहे.

१९६० सालच्या दरम्यान काही उल्लेखनीय चित्रपट निर्माण झाले होते राजकपूर – ‘जिस देश में गंगा बहती है’, गुरुदत्त- ‘चौदहवीं का चांद’, बी.आर. चोप्रा- ‘कानून’, मनमोहन देसाई -छलिया’, विजय आनंद-  ‘काला बाजार’, राज खोसला – ‘बंबई का बाबू,’ ऋषिकेश मुखर्जी – ‘अनुराधा’, सत्यजित राय – ‘देवी’ व ऋत्विक घटक – ‘मेघे ढाका तारा.’ या सर्व चित्रपटांचा विचार केला तर यात आदर्श आणि वास्तव, भावना आणि कर्तव्य, परंपरा आणि प्रगती यांच्यातील संघर्ष स्पष्ट स्वरूपात जाणवतो. त्या काळात हे मुद्दे केवळ महत्त्वपूर्णच नव्हते तर राष्ट्र नवनिर्मितीबद्दलच्या विचारधारेसंबधित असलेल्या अपेक्षा, प्रश्न, मत, सूचना, अपेक्षित परिवर्तन या सर्वाचा उहापोह त्यात जाणवतो.
‘मुगले आज़म’मध्ये देखील अशी बीजे आढळतात.

‘मुगले आज़म’ च्या कथानकात प्रेमकहाणी हा एक धागा आहे, त्यात सामाजिक, सांस्कृतिक,राजकीय असे इतर महत्त्वाचे धागे देखील गुंफले आहेत. या ऐतिहासिक दंतकथेत आधुनिक भारताचे संदर्भ जागोजागी पेरले आहेत.

कथानकात अकबर ज्या मूल्यांना विशेषतः महत्त्व देत असतो ते धार्मिक सहिष्णुता, हिंदु-मुस्लिम एकता, समान न्याय, आणि जनतेच्या हितासाठी झटणे. या चित्रपटाद्वारे स्वातंत्र्यानंतर भारताने स्वीकारलेल्या राष्ट्रवादाच्या संकल्पनेची व अकबराची उदारता, सहिष्णुतेशी सांगड घातली आहे. या चित्रपटात अकबर हा परकीय हल्लेखोराच्या भूमिकेत नसून, तो मुळात इथला धरतीपुत्र नसला तरी त्याला या भूमीबाबत ममत्व वाटत असते. कोणत्याही धर्माचा असला तरी त्याला या धरतीवर प्रेम करण्याचा समान अधिकार आहे. ही गोष्ट अतिशय अधोरेखित करून सांगितली आहे. अकबरला हिंदुस्तानशी जोडल गेलं आहे केवळ शासक म्हणून नव्हे तर गौरव, अभिमान, वैभवशाली परंपरा, मर्यादांची जपणूक करणाऱ्या रक्षणकर्ताच्या स्वरूपात. सलीम-अनारकलीच्या प्रेमकहाणी इतकेच अकबराला वाटणारी हिंदुस्थानबद्दलची आत्मीयता हा या कथानकातील महत्त्वाचा मुद्दा आहे. संपूर्ण चित्रपट भारताबद्दल व्यापक भूमिका कथन करताना दिसतो.

प्रश्न असा पडतो की अकबर इतका उदारमतवादी आणि न्यायप्रिय होता तर या प्रेमाला विरोध का? त्याचे उत्तर कथानकात खुबीने पेरले आहे. मोठ्या मन्नतीने (नवसाने) झालेल्या सलीम शेहजाद्याची बालपणापासून विलासी वृत्ती बघून, अकबराला पुढील धोके जाणवतात. हिंदुस्थानचा भावी राजा बनविण्यासाठी आवश्यक ती गुण -कौशल्ये सलीममध्ये निर्माण करण्याची जबाबदारी मानसिंगवर सोपवली जाते. सलीम तिथेही स्वतःला झोकून देतो. त्याचा एकंदरीत स्वभाव चटकन टोकाची भूमिका घेणारा. सारासार संयमित भूमिकेत तो शेवटपर्यंत दिसत नाही. अनारकलीच्या प्रेमात आकंठ डुबलेला सलीम महत्त्वाच्या दस्तऐवजावर दस्तखत (सही) करत नाही. सलीम इतका कशात गुंतला? याचा शोधामुळे अनारकली आणि सलीमचे प्रेम उघडकीस येते. सलीमचे परत बहकलेले स्वरूप हे शहेनशहा अकबरालाच काय, पण एका पित्यासाठी देखील चिंतित करणारे असते. दासीसाठी केलेली ‘बगावत’ या दोघांच्या अहंकाराची लढाई बनते. जात-धर्म हे विरोधाचे कारण निश्चितच नाहीये. स्वतः अकबराने राजपूत जोधाबाईशी लग्न करून, तिला महाराणीचा दर्जा दिला होता. पण एक नाचणारी-गाणारी दासी हिंदुस्थानची महाराणी बनवल्यावर, तिच्या नादाने मुळात चंचल, अस्थिर सलीम कोणत्या पद्धतीचा कारभार करेल, याची चुणूक सहीसाठी झालेल्या दिरंगाईमुळे लक्षात येते. हिंदुस्थानच्या भवितव्यासाठी हे उचित नाही, अशी वाक्य वारंवार अकबराच्या तोंडी येतांना आढळतात. या प्रेमप्रकरणाला विरोध हा अभिजन वर्ग आणि कनिष्ठ वर्ग हा मुद्दादेखील प्रखरपणे समोर येतो.

या उलट जाती-धर्माच्या सलोख्याचे सौहार्दपूर्ण प्रसंग चित्रपटात अनेक ठिकाणी आले आहेत. त्यातील मुख्यतः किल्ल्यात जन्माष्टमीच्या वेळी अकबराची पत्नी जोधाबाईच्या हिंदू धर्माचा सन्मान करतांना दाखविले आहे. जोधाबाईंनी लग्नानंतर देखील आपली पारंपरिक राजपूत वेशभूषा कायम ठेवलेली आहे. व्यक्तिस्वातंत्र्य, इतर धर्माचा आदर, सन्मान याहून अधिक काय असू शकतो? कृष्णजन्माष्टमीच्या वेळी जोधाबाई अकबराला टिळा लावून, प्रसाद देते. अकबर श्रीकृष्णाच्या पाळण्याला झोके देताना दिसतो. ‘मोहें पनघट पें नंदलाल छेड गयो रे’, हे गाणं अकबराच्या दरबारात अनारकली गाते. तिची वेशभूषा राधेसारखी आहे. धर्माबद्दलचे इतके मोकळं, सुदृढ वातावरण केवळ चित्रपटापुरतं मर्यादित नाहीये. तर या गाण्याचे नृत्यदिग्दर्शक पं. लच्छू यांचे वडील ‘मोहें पनघट पें नंदलाल छेड गयो रे’, ही अस्थाई वाजीद अली शहाच्या दरबारात गात असे. “ऐ मुहब्बत जिन्दाबाद!” या गाण्यात बासरीची धून, मस्जिदची अजान यांचा सांस्कृतिक एकीकरणाचा अप्रतिम नादमेळ ऐकायला येतात. अकबर युद्धासाठी तयार होत असताना दरवेशी दंडावर ताविज बांधतात. आणि पुजारी मंत्र म्हणत टिळा लावताना दाखविले आहे.

पण केवळ अकबराचा उदो उदो असा एकतर्फी मामला चित्रपट दाखवला नाहीये. न्यायप्रिय, उदार राजालाही मर्यादा आहे. त्याचे हुकूम, फर्मान त्याला योग्य वाटत असले तरी प्रत्येक वेळी ते जनतेच्या भल्यासाठी असू शकत नाही. त्यासाठीचा जनतेचा आवाज म्हणून समोर येतो तो संगतराश (मूर्तिकार). नाव आडनावरहित या पात्राला शिल्पकार दाखविणे, हे कित्ती कल्पक आणि प्रतिकात्मक आहे!

या शिल्पकारांची तीन शिल्पे दाखविली आहेत. पहिल्या शिल्पात बादशहा दरबारात न्याय करताना दिसतो. त्यावर संगतराश म्हणतो, “शहेनशहाच्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द ‘न्याय’ असतो, त्याबद्दल तक्रार करायची नसते.” दुसरे चित्र रणसंग्रामाचे असते. त्यावर टिप्पणी देत म्हणतो, “हे रणांगण… इथे लाखो निर्दोष लोक मरतात आणि कोणा एकाचा विजय होतो.” तिसरे चित्र आहे, माणसाला हत्तीच्या पायदळीची शिक्षा देतानाचे. त्यावर संगतराश म्हणतो, “आणि ही बघा खरे बोलण्याची शिक्षा…मरण ! माझी शिल्पे बादशहाला आवडणार नाही कारण ती खरे बोलतात.” अजून एक त्याचे वक्तव्य बघा. “बादशहाच्या न्याय आणि अत्याचार यात फारसे अंतर नसते.” सरंजामशाहीत सारे निर्णय एका व्यक्तीच्या विवेकावर किंवा अविवेकावर निर्भर असतात. संगतराश हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता म्हणून समोर येतो. त्याने तानसेनसारखी आपली कला राजदरबाराच्या पुरती सीमित ठेवलेली नाही. शासनाचे मिंध्ये न बनता, विवेकी आवाज उठविण्याची ताकद कलावंतात असते. लोकजागृती कलेमार्फत करण्याचा वसा कलावंतांनी घ्यायचा असतो, हे चित्रपटातून अचूक मांडले आहे.

सर्वात महत्त्वाचे प्रतीक म्हणजे न्यायाचा तराजू. तो किल्ल्याच्या ‘मोकळ्या प्रांगणात’ दाखवला आहे. त्याचा भव्य आकारापुढे बादशहा देखील ठेंगणा दिसतो. कोणतीही सत्ता ही न्यायापुढे छोटी आहे किंबहुना असलीच पाहिजे, याचे प्रतीक. कथानकाच्या प्रत्येक महत्त्वाच्या वळणावर अकबराच्या मनोभूमिकेबाबतचे स्पष्टीकरण तराजूच्या मार्फत दिले गेले जाते. शेवटी जगासाठी अनारकली मरते, हिंदुस्थानच्या भवितव्यासाठी तिच्या हत्येचा कलंक अकबर स्वीकारतो.

अनारकली या सर्व खेळातील खेळणं बनते. सरंजामशाहीच्या सारीपाटावरील एक सोंगटी ठरते. ‘जळतो पतंग त्याचा ज्योतीस दोष का रे, त्या ज्योतीने कधी का बोलाविले पतंगा’ अशी तिची गत होते. तितकेच काय सलीमचा राजपूत मित्र दुर्जन सिंह, जो मानसिंहचा मुलगा आहे. तो सलीमला साथ देतो, त्याचे कारण हे नाही की त्याला सलीमची वागणे मंजूर असते. तो आपल्या मित्रप्रेमाला, वचनबद्धतेला अधिक प्राधान्य देतो. त्या काळच्या जवळपास सर्व चित्रपटात विशुद्ध  मैत्रीचा एक मजबूत धागा दाखविलेला जायचा. तो धागा चित्रपटांतून पुढे हळूहळू विरळ गेला.

चित्रपटाच्या शेवटी परत नकाशा येतो, तो अकबराच्या वेळेचा. त्याच्या सीमा अफगाणिस्तानापर्यंत पसरलेल्या. सत्ता येते, जाते. त्यात अनारकली, दुर्जन सिंह सारख्या सामान्याची परवड होते, हीच वस्तुस्थिती. चित्रपटातील प्रतीकं प्रेमकहाणीच्या व्यतिरिक्त बरेच भाष्य करतात. शेवटी ही ऐतिहासिक दंतकथा आहे. ‘मुग़ल-ए-आज़म’ची ख्याती सीमेपार झाली. पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातून लोक तो बघण्यासाठी भारतात आले होते.

जाता, जाता एक किस्सा नमूद करावासा वाटतो की के. आफिस यांना ‘रामायणा’वर चित्रपट बनवायचा होता, तशी इच्छा त्यांनी विमल राय यांच्याकडे व्यक्त केली होती. त्यावर विमल राय म्हणाले होते की हा माणूस जे रामायण पडद्यावर दाखवेल ते वेगळे आणि अद्भुत असेल…

के. आसिफ यांना बदलत्या भारताचे वारे त्यावेळी जाणवले नसेल. या निमित्ताने आठवली ती नवाझउद्दीनला रामलीलेतून घ्यावी लागलेली माघार आणि असेच बरेच काही प्रसंग…

फाळणी होऊन धर्माच्या आधारे पाकिस्तानची निर्मिती झाली तर भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र …

(काही संदर्भ -सुशीला कुमारी लिखित ‘मुग़ल-ए-आज़म’ पुस्तकांतून)

देवयानी पेठकर, या शॉर्टफिल्म दिग्दर्शक व निर्मात्या आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0