‘फेसबुक’चा फसवा चेहरा

‘फेसबुक’चा फसवा चेहरा

फेसबुक व भाजपचे साटेलोटे असल्याचे वृत्त वॉल स्ट्रीट जर्नलने नुकतेच दिले. पण फेसबुकवरचा हा आरोप पहिला नाहीच. या पूर्वी अमेरिका, ब्रिटनपासून श्रीलंका, फिलिपिन्स सारख्या देशात या कंपनीने राजकीय ढवळाढवळ दृश्य किंवा अदृश्य स्वरुपात केल्याची उदाहरणे आढळली आहेत.

भाजप हा संपूर्ण भारताचा पक्ष नाही
‘रेड राज’ सुरूच – काँग्रेसने  
रजनीकांत यांचा राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय

१५ ऑगस्टला अमेरिकेतील वॉल स्ट्रीट जर्नलने फेसबुकविरोधात वादळ उठवणारे वृत्त दिले होते. या वृत्तात भाजपच्या काही राजकीय नेत्यांची विशिष्ट समुहांवरील विद्वेषपूर्ण भाषणे तसेच प्रक्षोभक वक्तव्ये फेसबुकवरून हटवली नाहीत असा ठपका ठेवण्यात आला होता. वॉल स्ट्रीट जर्नलमधील बातमीत असाही आरोप होता की फेसबुक इंडियाच्या दिल्लीतील एक उच्चपदस्थ अधिकारी आंखी दास यांच्या सांगण्यावरून भाजपला झुकतं माप दिलं तसेच व्यावसायिक संबंध बिघडतील या भीतीने प्रक्षोभक भाषणे, मजकूर गाळू नये असा त्यांचा दबाब होता.

फेसबुकवरच्या या वृत्ताने भारतात राजकीय वादळ उठणं साहजिकच होतं. फेसबुकने तो सगळा आक्षेपार्ह मजकूर काढला आणि कंपनीने शुक्रवारी या वादावर अधिकृत स्पष्टीकरण दिले.

कंपनीने आंखी दास प्रकरणात आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना फेसबुक हे खुले व पारदर्शी प्लॅटफॉर्म असल्याचा दावा केला. फेसबुक इंडियाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजित मोहन यांनी शुक्रवारी आपल्या ब्लॉगमध्ये फेसबुक कोणत्याही विचारधारेचे समर्थन करत नसून येथे सर्वांना आपले विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे. आमच्यावर झालेल्या पक्षपाताच्या आरोपाची आम्ही गंभीर दखल घेतली असून कोणत्याही धर्माविषयीच्या द्वेष व कडवेपणाचा आम्ही नेहमीच निषेध करत आलो आहोत, असे स्पष्ट केले. अजित मोहन यांनी फेसबुककडून कम्युनिटी स्टँडर्डचे पालन केले जात असल्याचाही दावा केला. यात राजकीय परिस्थिती, धार्मिक वा सांस्कृतिकेचे विचार केला जात नाही, असे स्पष्ट केले. मोहन यांनी भारतातील राजकीय नेत्याकडून प्रसिद्ध केलेला आक्षेपार्ह मजकूरही हटवल्याचे सांगितले.

 फेसबुकची दुतोंडी तसेच वादग्रस्त भूमिका

जेव्हा असे वाद निर्माण होतात तेव्हा फेसबुकने नेहमी दावा केला आहे की त्यांचं कामकाज निष्पक्ष, स्वायत्त व स्वतंत्र आहे. ते कुठल्याही प्रकारचा पक्षपातीपणा करत नाहीत. (!) वास्तविक यात तथ्यांश कमी आहे.

फेसबुकने या पूर्वी अमेरिका, ब्रिटनपासून श्रीलंका, फिलिपिन्स सारख्या  देशात राजकीय ढवळाढवळ दृश्य किंवा अदृश्य स्वरुपात केल्याची उदाहरणे आढळली आहेत. आणि तसे पुरावेही वेळोवेळी सोशल मीडियाच्या दिले आहेत.

अमेरिका:

फेसबुक कायमच दावा करत आले आहे की बड्या राजकीय नेत्यांची, सेलिब्रिटींची, वा अन्य क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तिंनी केलेली द्वेषपूर्ण विधाने वा मजकूर त्यांनी वगळली आहेत. मात्र २०१५मध्ये अमेरिकेचे सध्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातल्या मुस्लिम देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेश दिला जाऊ नये अशा आशयाचे वक्तव्य केले. या आक्षेपार्ह वक्तव्याचा व्हीडिओ प्रसिद्ध झाल्याने प्रक्षोभ झाला. तेव्हा फेसबुकचे संस्थापक व सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी तो वगळला जाऊ नये अशी भूमिका घेतली होती. त्यावेळी फेसबुकमधील सहकार्‍यांनी त्यांच्या भूमिकेला विरोध दर्शवला होता पण झुकरबर्ग यांनी आक्षेपार्ह व्हीडिओ जेव्हा एक मोठी बातमी होते तेव्हा ते फेसबुकवरून हटवले जाऊ नयेत, अशी पळवाट काढली होती.

झुकरबर्ग यांनी त्यावेळी ठामपणे सांगितले होते, की फेसबुकवर जे काही पोस्ट केले जाते ते सत्य आहे की असत्य याची तपासणी केली जाऊ शकत नाही. त्यामुळे तो मजकूर तपासणीविनाच फेसबुकवर प्रसिद्ध होईल. ते असेही म्हणाले होते की, फेसबुक कंपनी सत्याची बाजू घेणारा कोणता लवाद नाही.

झुकरबर्ग यांच्या अशा या भूमिकेमुळे जगभर त्यांच्यावर आक्षेप घेतला गेला आहे आणि अजूनही घेतला जातो आहे.

पण फेसबुकच्या भूमिकेत त्यावरून फरक पडला नाही. २०१५मध्ये ट्रम्प यांच्या विधानाची पाठराखण करणार्या फेसबुकने २०१९ मध्ये अमेरिकेतील डेमोक्रेटिक पक्षाचे एक नेते (जे आता अध्यक्षीय निवडणुकीतील एक उमेदवारही आहेत) जो बायडेन यांनी भ्रष्टाचार केल्याचा एक व्हीडिओ विरोधी पक्ष रिपब्लिकनने प्रसिद्ध केला होता. त्या व्हीडिओवर वाद झाल्यानंतरही फेसबुकने हा व्हीडिओ वगळण्यास नकार दिला. नंतर अमेरिकेच्या सिनेट सभापती नॅन्सी पेलोसी ज्या ट्रम्पविरोधी आहेत त्यांच्यासंदर्भातील एक खोटा व्हीडिओही काढण्यास नकार दिला होता. गेल्या जुलै महिन्यात युक्रेनमध्ये हिंसाचार झाल्याचा एक व्हीडिओ अमेरिकेत घडल्याचे पसरवण्यात आले होते, तो  व्हीडिओही फेसबुकने काढला नाही.

मध्यंतरी सिलिकॉन व्हॅलीतील बड्या टेक कंपन्यांच्या सीईओवर  अविश्वासदर्शक सुनावणी झाली तेव्हा रिपब्लिकन नेत्यांचे खोटे दावे दाखवणारे व्हीडिओ तुम्ही पोस्ट होऊ देणार का, असे विचारल्यावर झुकरबर्ग विचारात पडलेले दिसले. हेच झुकरबर्ग गेल्या वर्षी व्हाइट हाउसमध्ये ट्रम्प यांनी भोजनास बोलावले होते म्हणून तेथे गेले होते.

२०१६ च्या अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीत खोट्या माहितीचा प्रचार करणे, खोट्या बातम्या (फेक न्यूज)  पसरवणे आणि मतदारांना वळवणे असे गंभीर आरोप फेसबुकवर झाले होते.

पण गेल्या ६ ऑगस्टला ट्रम्प यांनी लहान मुलांना कोरोंना होत नाही  असे म्हटले होते, ती पोस्ट मात्र फेसबुकने वगळली.

दोन महिन्यांपूर्वी जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवंशीय नागरिकाची हत्या एका पोलिस ऑफिसरने केल्याने अमेरिका पेटून उठली होती. लॉकडाऊन असूनही अमेरिकेतील सर्व राज्यांमध्ये नागरिक रस्त्यावर उतरून निदर्शने करत होते. त्यावेळी काही ठिकाणी दंगली झाल्या आणि लुटालूट देखील झाली. त्यावर प्रतिक्रिया म्हणून ट्रम्प यांनी वादग्रस्त विधान केले. ते म्हणाले की, “जशी लूटमार सुरू होईल तसा गोळीबारही सुरू होईल”.

हे विधान अमेरिका जेव्हा वर्णभेद संघर्षातून जात होती त्या काळातले आहे. हे विधान थेट काळा-गोरा असे वर्णभेद दर्शवणारे असूनही झुकरबर्ग यांनी हे विधान फेसबुकवरून वगळणे योग्य नाही अशी भूमिका घेतली होती. तेव्हा फेसबुकमधील वरिष्ठ अधिकार्‍यांनी व्हाईट हाऊस येथील अधिकार्‍यांना समजावून सांगितले की अध्यक्षांनी जरा सौम्य भाषेत बोलावे.

भारत:  फेसबुक आणि भाजपचे साटंलोटं

काही विश्लेषकांच्या मते जगातील सगळ्यात श्रीमंत पक्ष भाजप आणि एक श्रीमंत कंपनी फेसबुक यांच्यातील साटंलोटं २०११ पासून आहे. माध्यम अभ्यासक व पत्रकार अभिषेक भोसले यांनी २०१८मध्ये त्यांच्या कोलाजमधील दीर्घ लेखात परंजय गुहा ठाकूरता आणि सिरिल सॅम या पत्रकारांनी न्यूजक्लिक वर फेसबुक संबधित लिहिलेल्या पाच लेखांचा गोषवारा दिला आहे.

  • फेसबुक आणि व्हॉट्सअप ही माध्यमे खोटी माहिती आणि द्वेष पसरवणारा मजकूर वायरल करण्यात कसा हातभार लावतात याची माहिती आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्यांना फेसबबुकच्या प्लॅटफॉर्मवरून कसं पद्धतशीरपणे बाजूला करण्यात येतंय, याबद्दल लिहिलं आहे.
  • २०११ला भारतात ऑफिस उघडणार्या फेसबुकला लोकप्रियता आणि यशाच्या उंचीवर पोचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मित्रांची मदत कशी झाली, याचा आढावा आहे.
  • भाजप २०१४च्या लोकसभा निवडणुकीची बांधणी करत होता. पंतप्रधान नरेंद्र मोंदीना ५ कोटी फॉलोअर्स मिळवून देण्यात फेसबुकचं योगदान मोठं असल्याचं या लेखमालेत सिद्ध केलंय.
  • फेसबुकचे उच्चपदस्थ अधिकारी आणि भाजप यांच्यातले संबंध उघड केलेत. तसंच भाजपचा राजकीय अजेंडा सोशल मीडियावरून पसरवण्यात फेसबुकच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या हातभाराचा खुलासा करण्यात आलाय.
  • सध्याचा प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस आणि फेसबुक यांच्या संबंधावर ‘केंब्रिज अॅनॅलिटिका’ प्रकरण केंद्रस्थानी ठेवून भाष्य केलंय.

अभिषेक भोसले यांच्या लेखात २०१४ साली फेसबुकने चालवलं भाजपचं सोशल कॅम्पेन या विषयावरही बरेच मुद्दे मांडले आहेत. त्याविषयी माहिती देतांना ते म्हणतात की, २०१४च्या निवडणुकीच्या वेळेस भाजपचा सोशल मीडिया प्रचार प्रभावी व्हावा यासाठी फेसबुकने भाजपच्या आयटी सेलसाठी कार्यशाळा घेतल्या होत्या.

ब्रिटन :

२०१५ मध्ये अमेरिकेतील टेड क्रूझ यांची रिपब्लिकन पक्षाच्या निवडणुकीची मोहीम केंब्रिज अॅनॅलिटिका (SCL त्यांची parent कंपनी) ही ब्रिटिश कंपनी राबवत होती. या कंपनीने फेसबुकचा वापर मतदारांचा कल कुठे जातो आहे याची माहिती मिळवण्यासाठी केला. त्याचा गैरवापर करून त्यांनी अमेरिका आणि ब्रिटनमधील राजकीय समीकरणे (Brexit) बदलण्याइतकी प्रभावी मोहीम त्यांनी केली. यात फेसबुकचा सहभाग होता हे सिद्ध झाले आहे. तसेच यात अनेक कोर्ट कज्जे झाले त्यात फेसबुकला ५ लाख पाउंडांचा दंड भरावा लागला.

श्रीलंका

श्रीलंकेत २०१९ च्या मध्यवर्ती निवडणुकीत राजकीय पक्षांच्या जाहिरातींची कुठलीही खातरजमा न करता त्यांचा प्रचार सुरू झाला. त्यातून सामाजिक फूट, विद्वेषाचे संदेश पसरले जाऊ लागले. त्यावर गंभीर आक्षेप तेथील नागरी हक्क समित्यांनी घेतला आहे. पण तो मजकूर फेसबुकने वगळला नाही.

एका धार्मिक गटाने बुद्धांच्या मूर्तीची तोडफोड केली आहे अशा आशयाच्या पोस्टस फेसबुकवर झळकल्या. पुढे ती घटना घडलीच नाही, असे दिसून आले. २०१८ मध्ये धार्मिक भावना भडकवणारा मजकूर  काही कडव्या बौद्ध धर्मियांकडून येऊ लागला. त्यावर कारवाई म्हणून काही काळ श्रीलंका सरकारने फेसबुकवर बंदी आणली होती.

इतर देश:

ब्राझील, जर्मनी, पोलंड, फिलिपाईन्स, अर्जेंटिना, भारत या देशांमध्ये फेसबुकची कामगिरी तशी संशयास्पदच आहे. एका मुख्य राजकीय पक्षाचे समर्थन करणे व विरोधकांविषयी कंड्या, फेक न्यूज पसरवणे यावरून फेसबुकवर अनेकदा टीका झाली आहे.

फेसबुकचे डावे -उजवे

फेसबुकवर डाव्या विचारसरणीचा प्रभाव आहे असे उजवे म्हणतात. मात्र ते उलटे आहे, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. फेसबुक हे उजवीकडे झुकलेले आहे असे अगदी पुराव्यानिशी माध्यम विश्लेषक दाखवून देतात.

विश्लेषक सांगतात, दुसर्‍या महायुद्धात नाझी भस्मासूर (holocaust) झालाच नाही असे पसरवणे, २०१६च्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी ट्रम्प निवडून यावेत म्हणून वातावरण निर्मिती करणे आणि ब्रिटनने Brexit म्हणजेच EU तून बाहेर पडावे म्हणून तिथे मोहीम राबवणे हे सगळे फेसबुक पूर्णपणे उजवीकडे झुकले असल्याचे द्योतक आहे. अभ्यासक असाही गंभीर आरोप करतात की म्यानमारमधील रोहिंग्या मुस्लिमांचे हत्याकांड फेसबुकवरील फेक न्यूजचा सततचा मारा व विखारी प्रचारामुळे झाले.

फेसबुकवर आणखी एक आरोप आहे की जे पुराणमतवादी (conservative) आहेत त्यांना फेसबुक जाणीवपूर्वक Fact check न वापरण्यास सुचवतात.

डाव्या- उजव्यांच्या वादात न पडता असेही म्हणता येईल की फेसबुक हे तटस्थ वा निष्पक्ष नसून ती कंपनी पूर्णपणे राजकीय भूमिका घेऊनच देशोदेशी काम करत आहे आणि तेथील राजव्यवस्थेशी जुळवून घेऊन स्वत:चा व्यावसायिक फायदा करून घेत आलेली आहे.

भारतातील घटनेवर फेसबुकमधील कर्मचारी नाराज

फेसबुकच्या भारतातील वरिष्ठ अधिकारी आंखी दास यांच्या प्रकरणामुळे खुद्ध फेसबुक कंपनीत काही कर्मचारी नाराज झाले. या नाराज झालेल्यांपैकी ११ कर्मचार्यांनी गेल्या आठवड्यात कंपनी व्यवस्थापनाला पत्र लिहून मुस्लिमविरोधी अप्रचार रोखण्यासाठी कंपनीने कडक पावले उचलावीत व भारतातील फेसबुकच्या चिथावणीखोर भाषणासंदर्भातील धोरणामध्ये सुधारणा आणाव्यात, अशी मागणी केली होती. या कर्मचार्यांनी फेसबुक इंडियाच्या कार्यालयात सर्वधर्मिय कर्मचाऱ्यांचा समावेश व्हावा अशीही मागणी केली होती.

भारतामध्ये फेसबुकच्या माध्यमातून मुस्लिमांच्या विरोधात चिथावणी खोर मजकूर व संदेश पसरवले जात असतात. पण त्याला रोखणारे कंपनीचे धोरण पर्याप्त नसून अशा मजकुरावर निर्बंध आणण्याबाबत सक्त पावले उचलली जावीत, असेही या कर्मचार्यांचे म्हणणे आहे.

फेसबुकची व्यापारी अनिभिषिक्त सत्ता आणि त्याचा गैरवापर

फेसबुकची संकल्पना चोरण्यापासून ते त्याची स्थापना, ग्राहकांच्या माहितीचा गैर वापर, स्पर्धकांना बाद करणे किंवा विकत घेणे, आक्षेपार्ह व्यावसायिक चाली करणे तसेच ग्राहकांची प्रचंड प्रमाणावर माहिती गोळा करणे तसेच टॅक्स न भरणे, माहिती सेन्सॉर करण्याचे नियम, कॉपी राइट कायद्याचा भंग, फेक न्यूज, खोटी माहिती आणि इत्यादी अनेक गोष्टींविषयी फेसबुकवर कोर्ट कज्जे होऊन गेले आहेत किंवा सुरू आहेत.

फेसबुकला अनेकदा कोट्यवधी डॉलर्स किंवा पाउंडचा दंड भरावा लागला आहे. जुलै महिन्यात मार्क झुकरबर्ग यांना अ-विश्वास तपासणीला सामोरे जावे लागले. या आठवड्यात देखील त्यांना अशाच एका चौकशीला सामोरे जावे लागते आहे.

त्यांच्यावरील गंभीर आरोपांवरून लेखक Balzac यांचं एक विधान अगदी लागू होते. ते म्हणाले होते की “Behind every great fortune lies a great crime”.

फेसबुकसंदर्भात मनोचिकित्सकांचा असाही आरोप आहे की फेसबुकच्या प्लॅटफॉर्मचे जे स्वरूप आहे त्यामुळे अनेक लोकांमध्ये असूया, ताण तसेच लक्ष केंद्रीत न राहणे अशी मानसिक लक्षणे दिसू लागली आहे. फेसबुक हे व्यसन आहे या निष्कर्षांप्रत अभ्यासक आले आहेत.

फेसबुक नावाचा डॉ. जेकल आणि मिस्टर हाइड

फेसबुकची लोकप्रियता आणि त्याचं जगातील सगळ्यात मोठा सोशल मीडिया म्हणून असलेलं अढळ स्थान बघता फेसबुक हे डॉ. जेकल सारखं वाटतं. मात्र त्यांचं डावं-उजवं बघता, त्यांनी देशोदेशीच्या निवडणूकात बजावलेली निर्णायक भूमिका बघता, त्यांच्यावरील सगळे आरोप तसेच त्यांनी कोट्यवधी ग्राहकांच्या विश्वासाचा, त्यांच्या निरागसतेचा तसेच अज्ञानाचा गैरफायदा घेत त्यांची माहिती विकणे किंवा इतर कंपन्यांना वापरण्यास देणे यासारखे गुन्हे बघता ते मिस्टर हाइड आहे असेही खेदाने म्हणावे लागते.

फेसबुकचा दाखवायचा चेहरा उदारमतवादी, सेक्युलर, लोकशाहीवादी तसेच अगदी निःपक्षपाती आहे. मात्र त्याचा खरा चेहरा हा एका विशिष्ट धर्माचा कट्टर विरोध, जगभरातील उजव्या विचारसरणीच्या नेत्यांशी असणारी जवळीक, तसेच त्यांच्या पक्षांना त्यांनी केलेली मदत (जी अजूनही सुरूच आहे) असा आहे.

गायत्री चंदावरकर,या इन्स्ट्रक्शनल डिझाइन कन्सल्टंट असून पुणे विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापिका आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0