महेंद्रसिंग धोनीः कल्पक कप्तान, ‘ग्रेट फिनिशर’

महेंद्रसिंग धोनीः कल्पक कप्तान, ‘ग्रेट फिनिशर’

महेंद्रसिंग धोनी ‘गट फिलिंग’वर धाडसी निर्णय घेणारा कप्तान होता. उपयुक्त व भरवशाची फलंदाजी हे धोनी पॅकेजचे दुसरे शक्तीस्थान होते. तर दर्जेदार यष्टीरक्षण हा धोनीमधला तिसरा महत्त्वाचा विशेष होता.

‘मॅकनाज् गोल्ड’ या गाजलेल्या चित्रपटाचा नायक सोन्याच्या खाणीपर्यंत / दरीपर्यंत पोहोचूनही तेथील सोन्याचा मोह त्याला होत नाही. रिक्त हस्ते परतण्याचे त्या हिरोचे वेगळेपण आपल्याला भावते. क्रिकेट हा खेळ भारतात तरी सोन्याची खाण आहे. या खाणीत उतरलेले तेथून परत जाण्याचा विचारच करीत नाहीत. प्रसिद्धीच्या झगमगाटात, अर्थार्जनाच्या स्पर्धेत स्वत:लाही विसरून जातात. त्या प्रवृत्तीला एक अपवाद होता. महेंद्रसिंग धोनी हे त्याचे नाव.

रांचीसारख्या एका छोट्या शहरातून आलेला. क्रिकेटमध्ये कुणीही ‘गॉडफादर’ नाही. भारतीय क्रिकेट संघांत शिरतानाची कामगिरी स्फोटक वगैरे नाही. तरीही तो दीड दशकाची क्रिकेट कारकीर्द आपल्या टर्म्स आणि कंडिशन्सवर जगला. कुणापुढेही झुकला नाही. प्रसिद्धी माध्यमांपासून कायम दूर राहीला. स्वत:च्या निर्णयावर अखेरपर्यंत ठाम राहीला. त्यापासून परावृत्त करण्याची क्षमता क्रिकेट बोर्डाच्या सर्वोच्च पदाधिकाऱ्यांमध्ये नव्हती. व्यावसायिक क्रिकेटमध्येही संघमालक देखील त्याच्यावर प्रभाव पाडू शकले नाहीत. क्रिकेटच्या मैदानावर ना प्रतिस्पर्धी गोलंदाज ना प्रतिस्पर्धी कप्तान त्याच्या डावपेचांच्या बाबतीत मुकाबला करू शकले. कोणतीही कृती अनाकलनीय असलेल्या या अवलियाने अपेक्षेप्रमाणे निवृत्तीही अनपेक्षितपणे जाहीर केली.

कसोटी क्रिकेटचा राजदंड त्याने चक्क ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना, अचानकपणे चालू कसोटी मालिकेच्या मध्येच खाली ठेवला. भारताचा भावी कप्तान असे संबोधून त्याने संघाच्या नेतृत्वाची धुरा विराट कोहलीकडे सोपवली. मात्र कप्तान म्हणून कामगिरी चांगली होत नसताना तो अविचल राहीला. एन. श्रीनिवासन नावाचा ‘गॉडफादर’ जो त्याच्या चेन्नई सुपरकिंग संघाचा मालक होता, तो पाठीशी उभा राहीला.

पार्थिव पटेल आणि कार्तिक या दोन यष्टीरक्षकांना मागे सारून पुढे येतानाही त्याला अशाच दिव्यातून पार व्हावे लागले. प्रारंभीच्या काळात यष्टीरक्षणापेक्षाही त्याला त्याच्या झुंजार व चिवट फलंदाजीने हात दिला. इंग्लंड दौऱ्यात लॉर्ड्स कसोटीतील पराभव टाळतानाचे त्याचे अर्धशतक त्याच्या कसोटी कारकिर्दीला नवसंजीवनी देणारे ठरले. २००७ च्या वेस्ट इंडिजमधील दारुण अपयशानंतर खचलेला भारतीय संघाला त्याच्या नवनेतृत्वाने नवा हुरुप दिला. २००७ च्या दक्षिण आफ्रिकेतील पहिलावहिला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत केवळ सहभागाचा सोपस्कार म्हणून नवोदितांचा संघ देऊन त्याला रवाना करण्यात आले. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आदी बलाढ्य प्रतिष्ठीत संघाना पराभवाचे धक्के देत त्याच्या नेतृत्वाने भारताला ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकून दिला.

मरगळलेल्या भारतीय क्रिकेटमध्ये नवी जान आली. भारतीय क्रिकेटरसिक सुखावले. नव्या कल्पनांनी डावपेचांनी नेतृत्व करण्याची त्यांची रांगडी नेतृत्वशैली तमात क्रिकेटविश्वाला पसंत पडली. धोनीच्या २००७ च्या विश्वचषक विजयाचा प्रभाव तमाम भारतीयांवर पडला. आयुष्यातील दु:खे काही काळापुरती का होईना, त्या यशाने विसरायला लावली.

धोनीच्या हाती, दिलीप वेंगसरकर यांच्या अध्यक्षतेखाली काम करणाऱ्या निवड समितीने नेतृत्वाची धुरा सोपवली. त्यावेळी सचिन, द्रविड, गांगुली हे दिग्गज फार काळ पुढे खेळू शकणार नाहीत असे चित्र दिसत होते. त्यामुळे त्या काळातील नवोदितांना घेऊनच धोनीला पुढे जावे लागले. त्याची नेतृत्व करण्याची स्वत:ची वेगळी शैली होती. तो खेळाडूंचा कप्तान होता. गोलंदाजी फोडून काढल्यावर कप्तानाच्या चेहऱ्यावर नेहमीच नाराजी दिसते. धोनीच्या गोष्टीला अपवाद होता. तो गोलंदाजावर चिडायचा नाही. उलट गोलंदाजाच्या जवळ येऊन, चार शब्द बोलून त्याला धीर द्यायचा. गोलंदाजाची चूक दाखवण्याऐवजी फलंदाजाला कसे अडचणीत पकडता येईल, याबाबत सांगायचा. त्यामुळेच नवोदितांना तो आपला कप्तान वाटायचाय.

कधी कधी प्रेक्षक आणि टेलिव्हिजनवर सामना पाहणारे क्रिकेट रसिकही चुका करणाऱ्या फलंदाज, गोलंदाज किंवा क्षेत्ररक्षकांवर चिडायचे. धोनी मात्र अविचल उभा असायचा. अक्षम्य चुकांचे, रागाचे ते हलाहल निमूटपणे पचवायचा. त्याने कप्तानपदाच्या कारकिर्दीत ते कसे केले हे एक आश्चर्य आहे. तो देखील आपल्यासारखाच होता. आपल्या भावना तो किती वेळ अशा लपवू शकतो? हे एक कोडे आहे. मात्र मैदानावर त्याचे सूक्ष्म अनुकरण केल्यास आणि पडद्यामागे डोकावल्यास काही गोष्टी आपल्यालाही कळू शकतील.

महेंद्रसिंग धोनी बऱ्याचवेळा खेळताना गॉगल्स वापरायचा. ‘बेल्स पासून डोळ्यांचे संरक्षण व्हावे हा मूळ हेतू होता. मात्र त्या काचेच्या आत त्याच्या डोळ्यांतील अंगार लपला जायचा. त्याची धारदार नजर त्याक्षणी चुका करणाऱ्या खेळाडूच्या नजरेचा ठाव घेऊ शकायची नाही. मात्र मैदानावरच्या पंचांनी आणि तिसऱ्या पंचांनी त्याचे गुपित निश्चितच जाणले होते. दोन षटकांदरम्यान खेळाडू जेव्हा दुसऱ्या टोकाकडे जायचे आणि त्यावेळी टेलिव्हिजनवर जाहिराती सुरू असायच्या. मैदानावरचा तो क्षण क्षणापुरता झाकला जायचा. त्या कालावधीत धोनीच्या संयमाचा बांध फुटायचा. डोळ्यावरचा गॉगल काढून आणि तोंडाला लागलेले कुलूप तोडून तो चुका करणाऱ्या खेळाडूंचा व्यवस्थित समाचार घ्यायचा. ड्रेसिंग रुममध्ये तर चुका करणाऱ्या खेळाडूंची ‘चंपी’ व्हायची.

त्या गोष्टी कुणाच्याही नजरेला पडणार नाहीत, याची त्याने कायम खबरदारी घेतली. त्यामुळे धोनी तमाम विश्वाच्या नजरेला ‘कूल कॅप्टन’ म्हणूनच दिसत राहिला. पण नेतृत्व करण्याची त्याची ती स्वत:ची पद्धत होती. चारचौघात तो कुणाचाही अपमान करत नसे, परंतु एरव्ही कुणालाही सोडत नसे. क्रिकेट बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांच्या आदेशांचाही तो गुलाम नव्हता. मात्र आपल्या खेळाडूंच्या तो सतत पाठीशी असायचा. खेळाडूंना दौऱ्यादरम्यान सिनेमा पहायचा असेल, डिस्कोला जायचे असेल.. धोनीने कुणालाही अडविले नाही. उलट खेळाडूंच्या मानसिकतेला जपले.

मात्र मीडिया आणि क्रिकेटच्या आडमुठ्या पदाधिकाऱ्यांच्या मग्रुर मानसिकतेलाही ठेचण्याचे काम त्याने केले. क्रिकेट बोर्ड किंवा पुरस्कर्त्यांच्या आदेशांव्यतिरिक्त धोनीने कुणालाही मुलाखत दिली नाही. प्रतिथयश पत्रकारांच्या विनंतीवजा आग्रहालाही वाटाण्याच्या अक्षता लावल्या.

त्यासाठीचा कठोरपणा, मग्रुरी, आत्मविश्वास त्याच्यात कुठून आला. त्याच्यासोबत खेळलेले आणि काम केलेले सांगतात, यापूर्वी तो तसा नव्हता. मात्र संघातील त्याचे स्थान बळकट झाल्यानंतर त्याच्या मूळ स्वभावाला अंकुर फुटले. आयपीएलनंतर श्रीनिवासन यांचे पाठबळ लाभल्यानंतर तो आपल्या तालावर संबंधितांना नाचवायला लागला.

मात्र त्यासाठी त्याचे मैदानावरचे कर्तृत्वही पाठबळ देणार ठरले. ‘गट फिलिंग’वर धाडसी निर्णय घेणारा तो कप्तान होता. अशा धाडसी कप्तानाबरोबरच त्याची उपयुक्त व भरवशाची फलंदाजी हे धोनी पॅकेजचे दुसरे शक्तीस्थान होते. दर्जेदार यष्टीरक्षण हा धोनीमधला तिसरा महत्त्वाचा दुवा होता. त्याची यष्टीला खेटून उभी राहण्याची शैली आगळीवेगळी होती. कधीकधी वादग्रस्तही वाटायची. कारण तो कधीकधी पायाने स्टम्पला हलवून बेल्स पाडतो, अशीही शंका होती. विंडीजच्या माजी यष्टीरक्षक अलेक्झांडरबाबतीतही तो जिभेने बेल्स उडवितो अशी वदंता होती.

मात्र कल्पक कप्तान, सामना एकहाती जिंकण्याची क्षमता असलेला फलंदाज आणि चपळ यष्टीरक्षक अशा त्रिवेणी गुणसंगमाचा क्रिकेटपटू सापडणे दुर्मीळ आहे.

आजच्या बहुउद्देशीय क्रिकेटमध्ये एका क्रिकेटपटूमध्ये परिपूर्ण गुणवत्ता सापडणे कठीण आहे. छोट्या शहरातून आलेला क्रिकेटपटू या स्तरापर्यंत पोहोचला कसा हेही जाणे औत्सुक्याचे ठरेल.

रांचीमध्ये तो फुटबॉल, बास्केटबॉल आदी खेळही खेळायचा. मात्र त्या सर्वांमध्ये क्रिकेट अधिक जवळचे होते. सॉफ्टबॉल क्रिकेटचा तो किडा होता. मात्र त्याची जडणघडण त्याच चेंडूच्या क्रिकेटमध्ये घडली. प्रथम दर्जाच्या क्रिकेटमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो म्हणूनच सहज रुळला.

त्याला स्वतःच्या मर्यादा ठावूक होत्या. त्यामुळे त्यामध्ये राहूनच त्याने प्रयोग केले. तो खेळाशी प्रामाणिक होता. त्यामुळे त्याच्यावरील अनेक प्रकारच्या आरोपांचाही त्याने पर्वा केली नाही. सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या बंद लिफाफ्यातील १३ नावांमध्ये त्याचे नाव असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. पण त्याने त्यावेळीही संयम सोडला नाही. प्रत्येक वेळी आपल्या इच्छेनुसार आणि अटींवरच त्याने निर्णय घेतले. कुणाच्याही आग्रहावरून, टीकेवरून त्याने कोणतेही पद सोडले नाही. मात्र स्वतःचा निर्णय आल्यानंतरही तो कुणासाठी थांबला नाही.

त्याला २०२०चा ऑस्ट्रेलियातील विश्वचषक खेळायचा होता. ती स्पर्धाच रद्द झाली आणि निवृत्तीचा निर्णय त्याच्या ओठावर आला. ऑस्ट्रेलिया दौर्यातील त्याचा अचानक कसोटी कप्तानपद सोडण्याचा निर्णय अकस्मात, तसेच धक्कादायक होता. मात्र ट्वेन्टी-20 क्रिकेटमधील निवृत्तीची कल्पना सर्वांनाच होती. आता उत्सुकता आहे, यापुढे तो काय करणार याची.

खरंतर आता क्रिकेटपटूंसाठी निवृत्तीनंतरही अनेक नवनवी दालने खुली झाली आहेत. चेन्नई सुपर किंग्जची फ्रँचायजीसोबत तो खेळाडू, प्रशिक्षक, सल्लागार किंवा अन्य भूमिकांमधून कायम राहील यात शंका नाही. त्याने आधीपासूनच आपल्या प्रशिक्षण केंद्राचे जाळे विणायला सुरूवात केली आहे. भारताप्रमाणे त्याने केंद्रे परदेशातही प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्याचे ठरवले आहे. लष्करातील सेवेचे वेड त्याला आधीपासूनच आहे. त्यामुळे काही काळासाठी तेथेही तो दिसल्यास आश्चर्य वाटू नये.

मोटार सायकल चालवणे आणि नेमबाजी (शूटींग) हे त्याने जोपासलेले दोन छंद आहेत. जे अधूनमधून डोकं वर काढत असतात. त्याच्या ताफ्यात विविध प्रकारच्या दर्जेदार मोटार बाइक्स आहेत. आणि नेमबाजीत तर अचूक, लक्ष्यवेध करण्याबाबत त्याची खात्री आहे. निवृत्तीनंतर कदाचित हे दोन छंदही त्याला अधिक चांगला प्रकारे जोपासता येतील.

भारतातील नव्हे तर जगातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंसमोर त्याने स्वतःचा आदर्श ठेवला. क्रिकेटची परंपरा नसलेल्या छोट्या शहरातून येणार्या खेळाडूंचेही काहीही अडत नाही. प्रतिष्ठितांच्या स्पर्धेत त्यांनाही अग्रेसर होता येते हा विश्वास त्याने अनेक क्रिकेटपटूंना दिला. तो जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू ठरला आणि गावखेड्यातील क्रिकेटपटूंना त्यांच्या चाहत्यांनाही विश्वास वाटायला लागला की एक दिवस आपलाही मुलगा किंवा आपल्या गावचा खेळाडूही महेंद्रसिंग धोनी बनेल.

रांचीसारख्या छोट्याशा गावातून तो आला. जगातील मोठा क्रिकेटपटू वगैरे होण्याची स्वप्ने उराशी न बाळगता तो क्रिकेटच्या मैदानावर उतरला. क्रिकेट नाहीतर किमान कुटुंबाला हातभार लागेल म्हणून रेल्वेची तिकीट तपासनीसची नोकरीही त्याने पत्करली. क्रिकेटपटू झाल्यानंतरही त्याने आयुष्यात ६३ लाख रुपये कमवण्याचे लक्ष्य समोर ठेवले. तो त्यावेळी रांचीच्या मित्रांना म्हणायचा, ’६३ लाख रुपये जमले की क्रिकेट सोडणार.’ हा ६३ लाखांचा आकडा कुठून आला? हे एक जसे कोडे आहे तसेच महेंद्रसिंग धोनी हेदेखील एक कोडे आहे. तो कधी काय करेल याचा अंदाज कुणालाही बांधता आला नाही. त्याच्या या अनाकलनीय अंकांबाबतचा एक किस्सा त्याचे तत्कालिन प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांनीच सांगितला होता.

विंडिज दौर्यात भारताला एक विभागीय सामना जिंकून देताना तो ग्रेग चॅपेल यांना म्हणाला, मला फक्त १३ चेंडू खेळपट्टीवर टिकू द्या. मग पुढचे मी पाहतो. सामना मग सहज जिंकून देईन. नंतर घडलेही तसेच. धोनीने तो सामना शतक झळकावून सहज जिंकून दिला. मात्र त्या विजयापेक्षाही ग्रेग चॅपेलला अजूनही अचंबा वाटतोय तो धोनीने १३ चेंडूंचा आकडा कुठून काढला याचे.

अशा अनेक अनाकलनीय गोष्टींनी वागणुकीने आणि घटनांनी धोनीची कारकीर्द खच्चून भरली आहे. फक्त क्रिकेटपुरताच विचार केला तरीही तो इतरांपेक्षाही वेगळा क्रिकेटपटू असल्याचे लक्षात येते. अगदी अलिकडचेच उदाहरण द्यायचे झाल्यास विश्वचषक २०१९ मधील त्याची इंग्लंडविरुद्ध सामन्यातील खेळी. धोनी हा ‘’Great finisher’चे लेबल असलेला क्रिकेटपटू होता. त्याला फलंदाजीचा गिअर कोणत्याही क्षणी बदलता यायचा. डावाचा बचाव करण्याची क्षमता असलेल्या धोनीला अखेरच्या षटकांमध्ये हवे तेव्हा चौकार-षटकार मारता यायचे. इंग्लंडविरुद्ध बर्मिंगहॅम येथील सामन्यात धोनीने तसे केले नाही. तो केदार जाधवसोबत कसोटी क्रिकेट खेळावे असा बचावात्मक खेळला. त्यावेळी धोनीवर जगातील सर्वच स्तरावरून टीका झाली. त्या प्रश्नाचे ना कप्तान विराट कोहलीकडे उत्तर होते ना धोनीकडे.

खरं तर धोनी हा जगातील सर्वोत्तम एकेरी-दुहेरी धावणार्या फलंदाजांमध्ये अग्रेसर होता. त्याचा फलंदाजीचा बचाव उत्तम होता. एकेरी धावा पळण्यासाठी आवश्यक असलेला वेग त्याच्याकडे होता. चेंडू मोकळ्या जागांमध्ये ‘प्लेस’ करण्याची हातोटी त्याच्याकडे होती. मात्र काळाच्या बदलानुसार त्याने स्वतःलाही बदलवले. ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये मोठे फटके खेळण्याचे महत्त्व त्याला वेळीच उमगले. त्यामुळे ‘’Great finisher’ ही प्रतिमा निर्माण करू शकला. हवे त्याक्षणी, हवे तेव्हा चौकार मारण्याची कला त्याने विकसित केली. खरंतर आजच्या क्रिकेटमध्ये एकेरी-दुहेरी धावा वेगात काढणारे फलंदाज अभावानेच पाहायला मिळतात. चौकार-षटकारांवर सर्वांचा भर असतो. परंतु जेफ बॉयकॉट आणि केवळ चौकार-षटकाराने धावा काढणारा ऑस्ट्रेलियाचा मॅक्सवेल या दोघांच्याही फलंदाजीच्या शैलीचा अभूतपूर्व संगम धोनीत सापडतो.

धोनीची फलंदाजीची शैलीही विचित्र होती. त्याच्या मनगटात प्रचंड ताकद होती. त्या ताकदीचा वापर त्याने मोठे फटके खेळण्यासाठी केला. त्यावेळी चेंडू मारण्यासाठीची सहजसुंदरता त्याच्याकडे नसेलही परंतु परिणामकारकता निश्चितच होती. त्यामुळे तो कसोटी क्रिकेटप्रमाणे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही चमकला.

यष्टीरक्षणाबाबतही हेच बोलता येईल. मूळचा तो फुटबॉलचा गोलरक्षक होता. प्रशिक्षकांनी एकदा यष्टीरक्षक आला नाही म्हणून क्रिकेट संघात घेतले. फुटबॉल आणि क्रिकेट यष्टीरक्षण फारसे वेगळे नाही. चेंडूचा आकार फक्त वेगळा आहे. दोन्हीकडे चेंडू अडवावा किंवा पकडावा लागतो. प्रशिक्षकाच्या त्या एका प्रयोगाने क्रिकेटचा फायदा झाला आणि फुटबॉलचे नुकसान. त्यामुळे सुरवातीच्या काळात धोनी यष्टीरक्षक नव्हे तर गोलरक्षक वाटतो असे क्रिकेट समीक्षक म्हणायचे. पण धोनीने ती प्रतिमा बदलली. त्याने यष्टीरक्षणावर अधिक मेहनत घेतली. चपळाईवर अधिक भर दिला. त्यामुळे त्याच्या नावावर सर्वाधिक यष्टीचीत बळींची नोंद आहे. हा आजवरचा उच्चांक आहे. आज निवृत्तीनंतरही धोनी तरुण यष्टीरक्षकांनाही लाजवेल एवढा चपळ आहे. त्याच्या तंदुरुस्तीबाबत भारतीय संघाचे एक दशकभर ‘मॅसाजिस्ट-मॅस्युह’ माने काका सांगत होते, ‘धोनी हा संघातील सर्वाधिक फीट खेळाडू आहे. आजही त्याचे दोन्ही हात तपासून पाहा. बोटांवर सगळीकडे बँडेंज बांधलेले दिसेल. त्या दुखापती घेऊनही तो चपळ यष्टीरक्षण करतो. ही बाब थक्क करणारी आहे.’

माने काका म्हणतात, माझ्याकडून त्याने कधीही मसाज करून घेतला नाही. एवढी स्वतःची तंदुरुस्ती त्याने जपली होती. त्याला, त्याच्या शरीराला मसाजची कधीही गरज भासली नाही. जेव्हा त्याच्या डोक्यावर लांबसडक केस होते, तेव्हा मात्र केसांना तेल लावून हेड मसाज माझ्याकडून करून घ्यायचा.

माने काकांवर धोनीची नितांत श्रद्धा होती. माने काका एखाद्या जागेवर बसले आणि संघासाठी सारे काही आलबेल होत असलं की, सामना संपेपर्यंत तो त्यांना तेथून हलू द्यायचा नाही. मुंबईत वानखेडे स्टेडियमवर विश्वचषक अंतिम सामन्यातही धोनीने माने काकांना जागा सोडू नका, असा प्रेमळ आदेशही दिला होता. त्यामुळे स्टेडियममध्ये असूनही माने काकांना धोनीचा तो षटकार टेलिव्हिजनवर पाहून समाधान मानावे लागले.

धोनीची फलंदाजीची शैली जशी विचित्र तसेच स्वभावही लहरी होता. तो कधी काय करेल याचा कुणालाही अंदाज नसायचा. त्याच्या वागण्याचाही अनेकांनी धसका घेतला होता. स्वतःच्या लग्नाला सचिनसारख्या सहकार्यालाही बोलावण्यास विसरणारा धोनी प्रसिद्धी माध्यमांपासून स्वतःला चार हात दूरच ठेवायचा. त्याने स्वतःहून मुलाखत देणे पसंत केले नाही. किंबहुना कुणालाही स्वतंत्रपणे मुलाखत दिलीच नाही. कप्तान या नात्याने अधिकृत मुलाखती देण्याचे केवळ कर्तव्य पार पाडले. कुणाचीही भीडभाड न बाळगता तो क्रिकेट खेळला. स्वतःच्या अटींवरच तो क्रिकेट जगला. स्वतःला पाहिजे तेव्हा निवृत्त झाला. पाहिजे तेव्हा खेळला. त्यामुळे त्याने प्रसिद्धी माध्यमांमधील अनेकांशी अनेकदा पंगा घेतला. मीडियाशी फारकत घेतली. सीनियर क्रिकेटपटूंशी काही वेळा त्याचे बिनसले. क्रिकेट बोर्डाच्या पदाधिकार्यांशीही खटके उडाले. एवढे सारे शत्रू अंगावर घेऊनही तो यशस्वी झाला. या मध्येच त्याच्या गुणवत्तेचे प्रचंड यश दिसून येते.

निर्णय घेण्याबाबतची अचूकता, घेतलेल्या निर्णयांच्या होणार्या परिणामांची आधीच जाणीव असणे. यामुळे योजना फसल्यास त्यावरच्या उपायांसह तो सज्ज असायचा. ‘कूल कप्तान’ असा लौकिकही त्याने अखेरपर्यंत जपला. मात्र त्या थंडपणाच्या आत नाराज कप्तानचा ज्वालामुखी खदखदत असायचा. ज्याचा उद्रेक त्याने होणार नाही याची कायम खबरदारी घेतली.

धोनी यशस्वी कप्तान म्हणून निवृत्त झाला. त्याचा ६० कसोटी, ७२ ट्वेन्टी-20 आणि २०० एकदिवसीय सामन्यातील (एकूण ३३२) यशाचा आलेख होता १५१ सामन्यांचा. त्याच्यापेक्षा नेत्रदीपक यश फक्त पॉटिंगलाच (१७१ विजय) मिळवता आले आहेत. भारतीय कप्तानांमध्ये धोनी सर्वाधिक यशस्वी कर्णधार होता.

फलंदाज म्हणूनही तो यशस्वी होता. त्याची एकदिवसीय सामन्यातील ५० पेक्षा अधिक धावांची सरासरी ते स्पष्ट करते. तो ‘Great finisher’ होता हे त्याच्या ४७ वेळा नाबाद राहून मिळवलेल्या विजयांनी सिद्ध केले आहे. त्यापैकी चक्क ९ वेळा त्याने षटकार ठोकून विजय साजरे केले आहेत. त्यामध्ये भारताच्या २०११च्या विश्वचषक विजयाचा समावेश आहे. त्याचे २२९ षटकार त्याच्या उत्तुंग फटके खेळण्याच्या क्षमतेची साक्ष देतात.

यष्टीपाठचे ४४४ बळी जशी त्याच्या यष्टीरक्षणाचे श्रेष्ठत्व सिद्ध करतात तसेच यष्टीचीतचे १२३ बळी हा आजवरचा उच्चांक त्याच्या चपळाईवर शिक्कामोर्तब करतात.

स्वतःचा मर्जीनुसार क्रिकेट खेळलेला, जगलेला हा क्रिकेटपटू भारतातीलच नव्हे तर जगाच्या क्रिकेट इतिहासात कायमचे स्थान पटकावून बसला आहे.

विनायक दळवी, हे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत.

COMMENTS