न्यूझीलंड संघाचा दिमाखदार विजय…

न्यूझीलंड संघाचा दिमाखदार विजय…

कसोटी क्रिकेटचा जन्म झाल्यापासून 144 वर्षांनी प्रथमच विश्व क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या गेली. या स्पर्धेचा अंतिम सामना कोणत्या दोन देशांमध्ये खेळला ज

नेमक्या समालोचनाचा व निष्पाप मूल्यांचा वारसा
जामीनावरील प्रज्ञा ठाकूरांच्या हातात क्रिकेटची बॅट
अंधाराची झगमगाटावर मात…

कसोटी क्रिकेटचा जन्म झाल्यापासून 144 वर्षांनी प्रथमच विश्व क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या गेली. या स्पर्धेचा अंतिम सामना कोणत्या दोन देशांमध्ये खेळला जाईल याबद्दल क्रिकेट रसिकांमध्ये खूपच उत्सुकता होती. न्यूझीलंड संघ सर्वप्रथम अंतिम सामना खेळण्यास पात्र ठरला. दुसरी चमू भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या तीन देशातून निवडली जाणार होती. भारत-इंग्लंड कसोटी मालिका भारताने जिंकल्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघाला मागे टाकून अंतिम सामन्यासाठी भारताची निवड झाली. सर्व जगातील क्रिकेट रसिकांसाठी 18.06.2021 हा दिवस कधी उजाडतो असे झाले होते. एक दिवसीय आणि टी ट्वेंटी क्रिकेटसाठी विश्वचषक खेळल्या गेलेत. कसोटी क्रिकेटचा विश्वचषक पहिल्यांदाच खेळला जात असल्याने या सामन्याचे महत्त्व खूपच होते.

इंग्लंडमध्ये अंतिम सामना खेळला जाणार असल्याने तिथल्या लहरी पावसाशी जुळवून घेणे दोन्ही संघासाठी आवश्यक होते. वारंवार येणारा पाऊस हे इंग्लिश हवामानाचे वैशिष्ट्य. फलंदाजीसाठी हा व्यत्यय त्रासदायक ठरतो. फलंदाजीची लय आणि एकाग्रता बिघडवण्यास तो बऱ्याच अंशी कारणीभूत ठरतो. ढगाळ वातावरणात आणि थंड हवेत चेंडू चांगला स्विंग होतो. फलंदाजीच्या तंत्राचा इथे चांगलाच कस लागतो. चेंडू स्विंग होण्यास गोलंदाजाला गतीवर नियंत्रण ठेवावे लागते. त्यामुळे गतिमान गोलंदाजीपेक्षा कमी गतीचे गोलंदाज जास्त परिणामकारक ठरतात. न्यूझीलंड संघाने पांच गतिमान गोलंदाज निवडले. कुठलाही फिरकी गोलंदाज खेळवला नाही. या उलट भारतीय चमूने तीन द्रुतगती आणि दोन फिरकी गोलंदाज खेळवले. आश्विन आणि जडेजा फलंदाजीत सुद्धा उपयोगी पडू शकतात असा विचार केला गेला असेल. खरंतर परिस्थितीचे अवलोकन केल्यास सिराजला संधी देणे उपयोगी ठरले असते. खेळपट्टी फिरकी गोलंदाजी करिता फारशी योग्य नव्हती. पावसाचा व्यत्यय लक्षात घेता एक अतिरिक्त दिवस सामन्यासाठी राखून ठेवला होता.

महत्त्वाची नाणेफेक विलियमसनने जिंकली आणि क्षेत्ररक्षण पत्करले. पाच द्रुतगती गोलंदाजांचा ताफा घेऊन न्यूझीलंड संघ मैदानात उतरला. पावसामुळे पहिल्या दिवशीचा खेळ होऊ शकला नाही. दुसऱ्या दिवशी खेळास सुरुवात झाली. किवी गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना अतिशय कठीण प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. जेमिसन, वॅगनर आणि बोल्ट हे पहिल्या डावात परिणामकारक ठरले. रोहित आणि गिल यांनी संयमित फलंदाजी केली. धावा काढणे फार कठीण जात होते. तरी दिवसभरात भारताने तीन गडी बाद 146 धावांची मजल मारली. कोहली आणि रहाणे नाबाद राहिले. त्यामुळे दुसऱ्या दिवशी भारत चांगल्या धावा फळ्यावर लावेल अशी आशा होती. पण रोहित, गिल, कोहली आणि रहाणे यापैकी एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. जेमिसनची गोलंदाजी खेळणे भारतीय फलंदाजांना अशक्यप्राय होत होते. त्याने पहिल्या डावात भारताचे पाच गडी बाद केले. जेमिसन, बोल्ट आणि वॅगनरने भारताचा पहिला डाव केवळ 217 धावात गुंडाळला. रहाणेने सर्वाधिक 49 धावा काढल्या. पंत आणि रहाणे यांनी मारलेले अवसानघातकी फटके त्यांना बराच काळ लक्षात राहतील. किवी गोलंदाजी अप्रतिम झाली.

पावसाच्या व्यत्ययामुळे आणखी एक दिवस वाया गेला. न्यूझीलंडचा पहिला डाव विलियमसन, कानवे आणि लॅथम यांच्या फलंदाजीने गाजला. विश्व क्रिकेट कसोटी सामन्यातील पहिले अर्धशतक कानवेने नोंदविले. डावाच्या शेवटी जेमिसन आणि साऊदी यांनी काढलेल्या 51 धावा निर्णायक ठरल्या. त्यामुळेच न्यूझीलंड संघाला पहिल्या डावात 32 धावांची आघाडी मिळाली. शमी, ईशांत आणि आश्विन यांनी चांगली गोलंदाजी केली पण त्यात किवी गोलंदाजीला असलेली धार नव्हती हे मान्य करावेच लागेल.
भारताचा दुसरा डाव चाचपडत सुरू झाला. रोहित आणि पंत जर सोडले तर कुणीही न्यूझीलंड माऱ्यापुढे टिकू शकले नाहीत. भारताचा दुसरा डाव केवळ 170 धावात आटोपला. साउदी, बोल्ट, जेमिसन यांच्या गोलंदाजीवर भारतीय फलंदाजांजवळ उत्तर नव्हते. दोन दिवस पावसामुळे वाया गेल्याने सहावा राखीव दिवस वापरणे अनिवार्य होते. कसोटीचा सहावा दिवस अतिशय रोमांचक होता. कुठलाही निर्णय शक्य होता. पण किवीची पकड घट्ट होती, त्यांचा निर्धार मजबूत होता. भारताने दिलेले लक्ष तुटपुंजे होते. पन्नासपेक्षा जास्त षटकात केवळ 139 धावा काढणे अशक्य नव्हते. लॅथम आणि कानवेला लवकर बाद करून आश्विनने सामन्यात चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण विलियमसन आणि टेलरने आपला अनुभव पणास लावत न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. जागतिक पातळीवर न्यूझीलंडसाठी हा विजय आत्मसन्मान वाढविणारा आणि कायम लक्षात ठेवणारा राहील. वाटलिंगसाठी हा विजय म्हणजे निवृत्तीची अविस्मरणीय भेट असेल. परत एकदा भारतीय फलंदाजी द्रुतगती गोलंदाजी समोर सफशेल नामोहरम ठरली. क्रिकेटच्या प्रत्येक क्षेत्रात न्यूझीलंड चमूने आपले वर्चस्व सिद्ध केले. भारतीय क्रिकेट रसिकांसाठी हा पराभव पचविणे खूपच जड जाणार हे निश्चित.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0